पुरणपोळी गर्वाने टम्म फुगली होती आणि अभिमान चेहऱ्यावर मिरवत तव्यावरून हलकेच डोकावत होती. तेवढ्यात अलगद ती उचलली गेली आणि आणि अलगदच गोल डब्यात विसावली पण ; डोकावता डोकावता तिला शेजारच्या डब्यात बसलेला गुलाबजाम दिसला आणि पुरणपोळी खुदकन हसली.
” गुलाबजाम , ए गुलाबजाम, इकडे इकडे पहा. मी इकडे आहे रे ” . पुरणपोळी गुलाबजामला बोलवत होती आणि गुलाबजाम बिचारा आवाजाचा कानोसा घेत अजूनही इकडे तिकडेच पाहत होता.
“हमम् , काय हा गोलू गोलू गुलाबजाम , गोल गोल फिरुन पहा म्हणजे मी दिसेल तुला “. पुरणपोळी वैतागून म्हणाली आणि गुलाबजामचे लक्ष अखेर तिच्या आवाजाकडे गेले.
” पुरणपोळी ताई , आलीस तू ? वाटच पाहत होतो तुझी. ए ताई , मी आज खूप खुश आहे. आज आपला दिवस आहे. किती छान ! ” गुलाबजाम आनंदाने टाळी वाजवत म्हणाला आणि पुरणपोळीला जरा अजूनच गर्व चढला.
“हो , आहोतच आपण स्पेशल . वर्षातील काही दिवस आपण खास असतो. अगदी आवर्जून बोलावले जाते आपल्याला . आनंदाच्या आणि सणासुदीच्या प्रसंगी आपली उपस्थिती अनिवार्य असते. सगळ्यांच्या नशिबी थोडीच असते हे सुख ? ” पुरणपोळी एक उपहासात्मक तिरका कटाक्ष एका टोपलीत ठेवलेल्या काकडीवर टाकत म्हणाली.
” ए पुरणपोळी ताई , तो बघ शिरा आला आणि खीर सुद्धा ! पण ; हा वास कसला येतोय ? अरे हा तर या शिऱ्याने अननसाचा सेंट फवारला आहे “. गुलाबजाम नाक मुरडत म्हणाला.
” काहीही म्हणा आपला थाटच न्यारा गडे !
आपण म्हणजे जणू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ! ”
शिरा मान ताठ करत म्हणाला आणि इकडे टोमॅटोचे गाल मात्र रागाने लालभडक झाले.
” काय झाले टोमॅटो तुला ? का एवढा चिडला आहेस ? शांत हो , नाहीतर आता रागाने फुटशील ” . बीट टोमॅटोच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला पण ; टोमॅटोने रागाने बीटचा हात झिडकारला आणि एका कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून बसला. बीटने सुस्कारा सोडत आपला मोर्चा उदास मुळ्याकडे वळवला.
“काय हो मुळा दादा, झाले काय म्हणायचे ? हा टोमॅटो आधीच लाल आणि त्याच्या रागाने तर त्यात अजून भर पाडली “. बीट कोपऱ्यात रुसून बसलेल्या टोमॅटो कडे पाहत म्हणाला.
” बीट दादा, फ्रीज मध्ये बंद होतास तो आत्ता बाहेर आला आहेस म्हणून तुला काही माहिती नाही.
ती पुरणपोळी आणि गुलाबजाम ,
त्यांचेच आहे हे काम.
तो शिरा तर याला जबाबदार सारा ,
खिरीचाही वाढलाय तोरा.
माझ्या हिरव्यागार शेंडी वर हसत होते सारे ,
म्हणे हिरवे हिरवे कुठे केस असतात का रे ?
बीट शांतपणे मुळ्याचे म्हणणे ऐकत होता. तेवढ्यात मेथी , पालक , वांगी , दोडका असे एक एक करून सगळ्या भाज्या बीटच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आणि आपापले गाऱ्हाणे ऐकवू लागल्या.
“हो तर काय , मला तर दोडका आहे मोडका असे म्हणाला तो गोलू गुलाबजाम तर गोलू पेढा म्हणत होता की मी किनई कुण्णाकुण्णाला म्हणून आवडत नाही “. दोडका रडक्या आवाजात सांगत होता.
मेथी आणि पालक तर आम्हाला सणाचा मान नाही . साध्या पंगतीचे आम्ही मानकरी आहोत आणि साग्रसंगीत पंगतीचे मानकरी मात्र ही पुरणपोळी, हा गुलाबजाम, ही खीर आणि हा लाडूच का अशी तक्रार मांडत होते. वांग्याचीही तिच कथा होती. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत बीट निष्कर्षापर्यंत पोहोचला इतक्यात हसण्याचा आवाज ऐकू आला आणि बीटचे लक्ष आवाजाच्या दिशेने वेधले गेले. फुलका मोठमोठ्याने हसत होता आणि पुरी त्याच्याकडे रागाने पाहत होती.
पुरीराणी, गोल गुटगुटीत अगदी टम्म् फुगून पात्रात अंगावरचे अतिरिक्त तेल झटकत बसली होती इतक्यात जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला आणि पुरीराणी चमकून आवाजाच्या दिशेने पाहू लागल्या .
पुरीराणी सारखेच गोल गरगरीत, अगदी टम्म् फुगलेले फुलके पुरीराणीच्या अंगावरील तेल पाहून हसत होते. पुरीराणीला जरा रागच आला.
“काय रे फुलक्या, हसतोस का म्हणून ? मी रागावले तुझ्यावर “. पुरीराणी तोऱ्यात म्हणाली आणि फुलका जास्तच हसू लागला. तसा पुरीराणीचा राग अजूनच वाढला पण ; फुलका काही हसायचा थांबेना.
” अगं अगं पुरी, अशी चिडू नको. मला जरा सांग , तू तेलातून अशी बुडून येते आणि बाहेर पडून तेच तेल झटकत बसते पण ; तेल काही तुझा पिच्छा सोडत नाही म्हणून मला हसू आले तुझ्यावर. बाकी काही नाही ” . फुलका परत हसू लागला.
“हमम् , तुला तेल आपल्या आसपास ही भटकू देत नाही म्हणून माझ्यावर जळतोस . कळते बरं मला सगळे “. पुरीराणी तोऱ्यात म्हणाली आणि फुलका मात्र तिच्या या बोलण्यावर शांत बसला आणि काही क्षणांत उत्तरला.
” पुरीराणी, तेल मला नाही तर मी तेलाला माझ्या आसपास भटकू देत नाही. समजले “. फुलका म्हणाला आणि पुरीराणीचा राग सातव्या आसमानावर चढला.
बऱ्याच वेळापासून सगळ्यांचे म्हणणे ऐकणारी काकडी मनाशी काही तरी विचार करु लागली. थोडा वेळ विचार केल्यानंतर तिने सगळ्या पदार्थांची मिटिंग बोलावली . पुरणपोळी , लाडू , खीर , शिरा , श्रीखंड , गुलाबजाम , पेढा , पुरी असे सगळे एका रांगेत उभे होते तर त्यांच्या विरुद्ध बाजूला टोमॅटो , बीट , मुळा , काकडी , मेथी , पालक , दोडका , वांगी एका रांगेत उभे होते. एकमेव गाजर मात्र त्या सर्वांच्या अगदी मधोमध उभे होते.
“मी काकडी , आजची ही सभा मी आयोजित केली आहे त्याचे एक खास कारण आहे. तुम्हां सर्वांना जसे स्वत:चे महत्त्व माहिती आहे तसेच आता इतरांचे ही महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि जेवणाच्या पानावरती तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी का महत्त्वाचे आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथे बोलावले आहे. सर्वांनी कोणतीही गडबड न करता शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती ” . काकडी खाली बसली आणि सर्वांच्या मधोमध असणारे गाजर बोलू लागले.
“माझ्या प्रियजनांनो , मी आज तुम्हाला इथे एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी बोलावले आहे. बऱ्याच कालावधीपासून मी तुम्हां सर्वांची एकमेकांसोबतची भांडणे ऐकत आलो आहे . तुम्ही सारेच पदार्थ मीपणा मध्ये गुंतून पडले आहात. मी आणि मीच श्रेष्ठ आहे. माझेच गुण खास आहेत. कौतुक केवळ माझेच होते असा गोड गैरसमज सर्वांनी करुन घेतला आहे ” .
“गैरसमज कसला ? आम्ही आहोतच गुणवान आणि मिळतोच आम्हाला मान “. श्रीखंड थोडासा आवाज चढवत म्हणाले आणि गाजर गालात हसले.
” श्रीखंडा मला सांग , मी काय समजावे स्वत:ला ? मी माझेच गुणगान , किती करावे सांग. कारण गाजराचा हलवा ही अप्रतिम आणि कोशिंबीर म्हणून ही अप्रतिमच. मग सांग मी किती महान ” . गाजराचे बोलणे सर्वांना विचार करायला भाग पाडू लागले.
” सगळेच पदार्थ आपापल्या जागी योग्य आहेत आणि ती जागा तुमची शोभा वाढवते. पुरणपोळी , लाडू , खीर , पुरी हे आणि असे सारे पदार्थ सणासुदीच्या पर्वाची शान असतात पण ; दररोज तुम्हाला पानात वाढून घेणे आरोग्यास हानिकारक होऊ शकते.वजन वाढणे , कोलेस्टेराॅल वाढणे अशा तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात आणि म्हणूनच दररोजच्या पानामध्ये तुमचे आगमन होत नाही “. गाजराच्या या स्पष्टीकरणावर सगळे वरमले.
” काकडी , मुळा , बीट , दोडका , वांगी , मेथी तुम्ही सगळे पोषकतेने परिपक्व आहात म्हणून तुम्ही दररोज पानामध्ये वाढले जाता. तुमचे नियमित सेवन आरोग्य उत्तम बनवते पण म्हणून तुमचे महत्त्व केवळ साध्या पंगती पुरते मर्यादित आहे असे नाही ” . गाजराचे म्हणणे सर्वजण मन लावून ऐकत होते.
“आरोग्याचा योग्य समतोल राखण्यासाठी चौकस आहाराची गरज असते आणि यामध्ये तुम्हा सर्वांचा कमी अधिक प्रमाणात समावेश होतो. पुरणपोळी किंवा लाडू तुमच्या मध्ये असणारी डाळ किंवा खीर बनवताना वापरलेले तांदूळ तसेच काकडी , बीट , मुळा आणि सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या तसेच सगळी फळे या सर्वांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असणे म्हणजे चौकस आहार. प्रथिने , कर्बोदके , जीवनसत्त्वे एकाच पदार्थामधून नाही मिळत . केवळ उदरभरण नोहे तर शरीराचा योग्य समतोल राखण्यासाठी चौकस आहाराची गरज असते आणि ती तुम्ही सर्वांच्या एका पंगतीत बसण्यामुळे पूर्ण होते. म्हणून साध्या जेवणाची पंगत आणि साग्रसंगीत जेवणाची पंगत असा प्रकार तर काही नसतोच मुळी. तुम्ही सगळे एकमेकांच्या साथीने चालता . ना की वेगवेगळे. समजले सर्वांना ” ?
सगळे पदार्थ आणि भाज्या एकमेकांकडे पाहत होते. आता सर्वांनाच एकमेकाचे महत्त्व पटले होते. चौकस आहार कुण्या एका पदार्थापासून बनत नव्हता तर एकमेकाला पूरक आणि पोषक पदार्थ आहाराला चौकस बनवत होते हे सत्य सर्वांनी स्वीकारले होते.
..समाप्त:
सदर कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा आणि अशा नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमच्या what’s up चॅनेलला फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील , पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Good
Thank you