आज शनिवार नीलच्या ऑफिसला सुट्टी होती. आज काय करावं हा विचार चालूच होता तो मोबाईल वाजू लागला. सुलू मावशीचा फोन..
ही मानलेली मावशी, आईची मैत्रिण पण रक्ताच्या नात्याहून जवळची.”हॅलो, बोल ग मावशी”,नीलने उत्साहात फोन उचलला.
” शांत ऐक फक्त.मला तुला भेटायचय.. पण आई बाबांना नको सांगूस .. ते समोर नाहीत ना अत्ता? “
“नाहीत”,
नीलला कळेना काय,सस्पेन्स आहे हा?
” माझा फोन आला म्हणूनही सांगू नकोस, पत्ता पाठवते. दुपारी 2 ला भेटू, बाय.”
मावशीने फोन ठेवलाही.आपल्याला वेळ आहे का नाही, मावशीने हे ही नाही विचारलं, याचं खूप आश्चर्य वाटलं नीलला. आई बाबाही खूप दिवसांपासून डिस्टर्ब आहेत. बाबा तर चक्क थकल्यासारखे वाटतायत. काही विचारलं तर दोघेही काही सांगत नाहीत.खरं तर नीलचं लग्न करायचं आता, मुली पहायच्या म्हणून खूश असतानाच अचानक आई बाबांच काही तरी बिनसलय, हे नील च्या लक्षात आलं होतं.
“आई, काय झालय, खूप शांत शांत आहेस दोन दिवसांपासून, बाबाही कसल्यातरी गहि-या विचारात दिसतात. कुणी काही बोललय का त्यांना? काय प्रॉब्लेम आहे. काही आर्थिक अडचण आहे का, का तुमच्या दोघांपैकी कुणाला बरं नाहीए… शपथ आहे तुला खरं खरं सांग.” नील आईला खोदून खोदून विचारत होता.
“काही नाही रे बाळा, वयोमानाप्रमाणे येतं,कधी तरी डि*प्रेशन”, म्हणत आईने नीलच्या गालावरून हात फिरवला आणि आपले पाण्याने डबडबलेले डोळे लपवत ती निघून गेली. बाबा सहसा शनिवार,रविवार कोणती कामं ठेवत नाहीत.नील बरोबर गप्पा,गोष्टी करायला, काही ठरवायला हे दोन दिवसच तर मोकळे असतात. पण आज सकाळी नील उठायच्या आतच बाबा मित्राकडे गेलेत. सगळंच विचित्र, गूढ. त्यात या मावशीचा फोन .. तिला नक्की काहीतरी माहित असेल..कधी एकदा जाऊन तिला भेटतो, असं झालं होतं नीलला.
सुलू मावशीने दिलेला पत्ता एका काॅलेजचा होता. ती गेस्ट लेक्चरर म्हणून येत असते वेगवेगळ्या काॅलेजमधे, कधी कधी तिचे वर्कशॉपही असतात कौन्सिलिंगचे त्यामुळे तिने काॅलेजचा पत्ता देणं नीलला काही ऑड नाही वाटलं.काॅलेजच्या गेटवर आल्यावर नील ने सुलू मावशीला फोन केला आणि मग तिने सुचना दिल्याप्रमाणे तो एका काॅनफरन्स रूम मध्ये आला. ब-या पैकी मोठ्या असणा-या काॅनफरन्स रुम मध्ये सुलूमावशी एका खुर्चीवर बसली होती.. बाकी रूम रिकामी, नीललाही तिने खूर्चीवर बसायला सांगितलं .
“अग, मावशी, काय सस्पेन्स चाललाय हा, तू घरी का नाही आलीस नी आई बाबांना का नाही सांगायचं आपण भेटलेलो.. तुला कल्पना आहे का विचार करून माझं डोकं बधिर झालय.. आई बाबांना काही झालं तर नाही ना? उलट सुलट मी इतके विचार करतोय की माझ्या विचारांची मलाच भिती वाटायला लागलीय. केवढे वाईट विचार येतायत मनात.”
“शांत हो, पाणी हवय?” मावशीने दिलेलं पाणी पिऊन नील थोडा शांत झाला.
“बघ, किती तरुण आहेस तू , पण समोर काय मांडून ठेवलय या कल्पनेने किती कासावीस झालास. सर्वात जास्त काळजी तुला आई बाबांच्या तब्येतीची वाटली ना? त्यांच्यापैकी कुणाला काही असाध्य आजार तर नाही झाला, या विचाराने कळवळलास ना?”
” मावशी, तू तर कौन्सिलीग करतेस तुला चांगलं माहितेय कोण काय विचार करेल ते” नीलचे हे म्हणणे मावशीने खोडून काढले ती म्हणाली, “मला माहित नसतं नी ओळखतही येत नाही कुणाच्याही मनातलं.. अरे, मी फक्त अंदाज बांधू शकते. म्हणूनच आता मी तुझ्या आई बाबा काय विचार करत असतील याचा विचार करतेय. खूप एकाकी, खूप असुरक्षित, आगतिक झाल्यासारखं वाटतय त्यांना काही दिवसांपासून आणि गेल्या दोन दिवसांत तर खचून गेलेत ते, कोणताही गुन्हा न करताही अपराध्यासारखं वाटतय त्यांना, त्यांचा एकमेव आधार,प्रेम, काळजाचा तुकडा तू.. तू हरवशील, दूर जाशील असं वाटतय त्यांना.”
“ओह, आई बाबा माझ्या लग्नाचं, भावी सुनेचं टेंशन घेताहेत का?. हॅ, बाबा एवढे स्ट्राॅग असून असा विचार..”
नीलचे बोलणे सलू मावशीने मधेच थांबवले,” छे,छे अरे वेडा आहेस का ..”
“मावशी, माझा पेशन्स संपतोय, काय झालय आई बाबांना, काय चाललंय तुमचं , ते स्पष्ट सांग.” नील उतावळा होत होता.
मोठा सुस्कारा सोडून सुलू मावशी बोलू लागली.
” गेले काही दिवस तू तुझं हाॅस्पिटलचं बर्थ सर्टिफिकेट शोधतोयस, कारण स्कूल लिविंग सर्टिफिकेटवरची जन्म तारीख तर तुला माहिती आहे पण जन्म वेळ कुठेच लिहीलेली मिळाली नाही. आणि तुला तुझ्या ज्योतिष शिकणा-या मित्राला तुला ती द्यायचीय. तुला तुझी पत्रिका पहायचीय. ही गोष्ट कुठे कमी का होती, तोच दोन दिवसापासून लीना नामक मुलीची बातमी चर्चेत आहे, या दोन्ही गोष्टींचा खूप मनस्ताप झालाय तुझ्या आई बाबांना. “
नीलला सलू मावशी वेड्यासारखं काही तरी बरळतेय असं वाटायला लागलं.
“अग, मजा म्हणून पहायची होती पत्रिका, माझ्या लग्नाचा विषय निघाला म्हणून पत्रिकेचं डोक्यात आलं आणि मी काही भविष्य बघत बसणार नव्हतो आयुष्यभर, आणि लीनाचा आई बाबांशी काय संबध? तिला जे आईवडील रस्त्यावर फेकून गेले होते तिने मोठं झाल्यावर तिनं त्यांना शोधलं. त्यांची पूर्ण समाजाने कान उघडली केली आणि मुख्य म्हणजे सर्व जूनं विसरून ती परत आपल्या जन्मदात्या आई बापाकडे गेली.”
“तेच,तर ..” सुलू मावशीचं मधेच बोलणं नीलला खटकलं पण त्याला तिच्या बोलण्याच्या अर्थापर्यंत पोहचताच आलं नाही.
“शांत आणि नीट ऐक, समजून घे, तुझी जन्मवेळ नाही तशीच तुझी जन्म तारीख ही खरी नाही. अंदाजे लिहीलेली आहे. तुला आई बाबांनी दत्तक घेतलं होतं.”
नीलच्या कानावर मावशीचे शब्द पडले आणि संपूर्ण काॅनफरन्स रूम गरगरू लागली. त्याच्या पायातलं त्राण इतकं गेलं की कंबरे खाली आपलं काही शिल्लकच नाही असं वाटलं त्याला . हा आघात मोठा होता पण त्याला रडू आलं नाही तो शांत आवाकच राहिला. क्षणात सा-या ब्रम्हांडात आपण आपले एकटेच आहोत असे नीला वाटू लागले.
सुलू मावशी सांगू लागली.
” त्यावेळी मी NGO मध्ये काम करायचे. दोन मुलंही होती मला पण तुझ्या आईच्या नशीबात ते सुख नव्हतं. एक दिवस बास्कैटमध्ये नीट गुडाळून ठेवलेलं एक निरागस गोरं गोमटं बाळ मला ऑफिसच्या गेटपाशी ठेवलेलं मिळालं. मला माझ्या जीवलग मैत्रिणीची, वेदिकिची आठवण झाली कारण तुझा रंग, तुझं नाक,तुझं दिसणं सारं तिच्याशी मिळत जुळत होतं. मी ऑफिसमधे न सांगताच तुला तुझ्या या आई बाबांकडे घेऊन आले. पोलिसातही कळवलं. कुणाची बाळ चोरीला गेल्याची तक्रार, हरवल्याची तक्रार येते का, हाॅस्पिटल मधून कुणी बाळ हरवलय का? महिना,दोन महिने वाट पाहिली. खरं तर तुला कायद्याने असं कुणाच्या घरी ठेवणं चूकच पण मैत्रिणीला तेवढंच आईपण मिळेल नी एका तान्ह्या लेकराला आई ! तुला पाहताच तुझ्या बाबांनी तुला छातीशी घेतलं. माझ्या घरी कान्हा आला म्हणून खुष झाले ते. मी ओळखीचा वापर करून घेतला. आणि तुला त्यांच्याच घरी ठेवलं. तसं तर मी माझ्या NGO च्या ऑफिसमधेही सुचना दिल्या.. पण तुझ्यासाठी कोणी फिरकलं नाही. दोन महिन्यांतर सर्व फाॅरमेलीटी कायदेशीर पूर्ण करून तुझ्या आई बाबांनी तुला कायदेशीर रित्या दत्तक घेतलं. तरी रात्रंदिवस त्यांना वाटायचं तुझे जन्मदाते आले तर तुला त्यांना परत द्यावं लागेल. वर्षभर त्यांनी मनाची ही तयारीही ठेवली होती. त्यांच्यापरीने त्यांनी तुझे जन्मदाते तुला मिळावे हे प्रयत्न ही केले पण कुणी आलं नाही. “
हे सर्व एकून नीलच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागलं.
“सावर नील , अरे तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी काय काय नाही केल॔…” सुलू मावशी समजवत होती पण नीलचं लक्ष कुठे होतं?
“हे काय नाटक आहे का चित्रपट आहे..माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागायला… मुलगी जन्मल्यावर फेकतात.. मुलगी नको म्हणून मी तर मुलगा होतो ना, का मी कर्णासारखाच ….” नीलला भावना अनावर झाल्या . एव्हाना सुलू मावशी जवळ येऊन नीलला समजावत होती, जवळ घेत होती….”तू लहान असताना, शेजारच्यांनी तुला ..हे तुझे खरे आईबाबा नाहीत असं सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लगेच तुझ्या बाबांनी प्रमोशन लाथाडून बदली करून घेतली दुस-या गावी… ”
” मग अत्ता तरी का सांगितलंस तू मला?”
नीलने वैतागून विचारलं. त्याचा प्रश्न बरोबरच होता.
” नाईलाज…अजून एक खोटं सांगितलय तुला. तुझ्या आई बाबांपैकी कुणाचाही ब्लड ग्रुप A+ नाही ..तुझा आहे. आतापर्यंत तुला खोटे blood गृप सांगितले..पण हे किती दिवस लपणार.. त्यांची अजून पर्यंत कोणतीही सर्जरी झाली नाही की कधी त्यांना रक्त द्यावं लागलं नाही, म्हणून लपवता आलं. पण कधी ना कधी हेही कळेलच. खूपदा ठरवलं त्यांनी तुला खरं सांगायचं पण तू दुरावशील, या भितीने नाही सांगू शकले कधी.”
सुलू मावशी बोलत होती ,आई बाबांनी नीलला पोटच्या गोळ्यासारखं कसं वाढवलं, नीलने या सर्व परिस्थितीचा कसा विचार करायला हवा…पण सगळे नुसते पोकळ शब्द बनून आपटत होते नीलच्या कानावर..तो बधिर झाला होता..दगड झाला होता.
सुलू मावशीला लेक्चर साठी जायचं होतं
“आपण पुन्हा भेटू मी 5 वाजता फ्री होईन ,करते तुला फोन..एकत्रच जाऊ तुझ्या घरी ..तू अत्ता मोठ्या शाॅक मध्ये आहेस.शांत विचार कर.काही दिवस लागतील गोष्टी स्विकारायला, 5 वाजता भेटल्यावर बोलू ना आपण” म्हणत सुलू मावशी निघून गेली.
घरं..ते घर आपलं आहे? आई बाबा म्हणतो ते कुणीतरी ति-हाईत आहेत. माझी जात ,माझा धर्म, माझी भाषा सारंच कुणाचं तरी आहे.. पण माझं काय आहे मला माहितच नाही. अशा विचारात विमनस्क अवस्थेत तो चालत होता. खूप दमल्यासारखं वाटलं. सुलू मावशी म्हणाली होती ते आठवलं … कुठे तरी शांत ठिकाणी जाऊन बस, तुला तुझी उत्तर मिळतील. समोर एक मठ होता… खूप शांत परिसर होता. बाहेर विशाल औदुंबराचं झाड पसरलेलं होते..भला मोठा पार रिकामाच होता. गुढग्यात पाय दुमडून, डोकं खुपसून..नील तिथे बसला.
कमालीची शांतता होती. आतून एक इसम आला नी त्याने नीलला प्रसाद दिला…”जय श्री राधाकृष्ण”..म्हणत नमस्कार करून निघून गेला. हा मठ आहे का कृष्ण मंदिर.. नीलच्यामनात नकळत विचार आला आणि लहानपणी आई सांगत असलेल्या कृष्णाच्या गोष्टी त्याला नकळत आठवू लागला. किती त्रास द्यायचा यशोदामाईला कृष्ण..अचानक मनात कळ आली. अरे कृष्ण देव असूनही यशोदेकडेच लहानाचा मोठा झाला. भागवतात, गीतेत, महाभारतात कृष्ण या गोष्टीसाठी कुठेही दुःखी झालेला दिसला नाही. देवालाही हे चुकलं नाही. स्वतःला थोडसं सकारात्मक करायच्या विचारात असतानाच बुद्धीच्या सैतानाने षडयंत्र रचलं. ..
तो देव होता, सर्व त्याचीच लीला.. त्याला सर्व ज्ञात होते, तोच कर्ता करविता.. आपण थोडेच देव आहोत. उलट सुलट विचारांनी नील दमला होता. विचारांच्या घड्या घालून त्या मेंदूत कायमच्या लाॅक करता आल्या असत्यातर सारे तापदायक विचार कैदेतच कुजले असते. असे त्याला वाटू लागले.
आई बाबांची चित्रकला जराही चांगली नसताना मी कसं छान चित्र काढत होतो. आजोबांवर गेलाय म्हणत आई वेळ मारून नेत असावी. बाबांसारख माझ्यात काहीच नाही नै.. तरी आई उगाच म्हणत असते..बाबांवर गेलायस म्हणून… आता सगळ्याच आठवणीतल्या गोष्टीत त्याला लपवा लपवी भासू लागली. त्याला कळत होतं, त्याला डेंग्यू झाला तेव्हा आई बाबांची अवस्था किती वाईट झाली होती, त्याला ठेच लागलेली तर आज ही आपली आई रडेल हे पक्क माहित होतं त्याला..माझ्याच नशीबात हे का ?याचा त्याला त्रास होत होता.. आई बाबा आपले आईबाबा नाहीत ही गोष्ट त्याच्या पचनीच पडत नव्हती. नाही कसं, फोनवर मी बोलतो का बाबा ..कित्ती जण फसतात,ओळखू शकत नाहीत इतके सारखे आहेत आमचे आवाज…..हे कसं मग..
मी आईसारखा दिसतो..असंही म्हणतात..मावशी खोटं सांगतेय का? ती कशाला खोटं बोलेल.. तिचा काय फायदा..
पाच वाजत आले होते.त्याला येऊन 1 तास झाला होता.
मठात जरा वर्दळ दिसू लागली आणि सत्तर पंचाहत्तरीचे दोन आजोबा त्याच्या बाजूला बसून गप्पा मारू लागले. पहिल्यांदाच भेटत असावेत आणि एकाच गावचे असावेत….त्याच्या गप्पा ऐकून नीलने अंदाज बांधला.
एकमेकाच्या ओळखीतल्या नातलगाविषयी बोलत होते.
“आहो, मी राजाराम देसायांचा मुलगा” पहिले आजोबा
दुसरे आजोबा…”द्या टाळी, मी त्याच्या मेहुण्याच्या गावचाच..
“म्हणजे तुम्ही आमच्या मामाच्या गावचे म्हणायचेत. “पहिले आजोबा
दुसरे..”पण काही तरी घोळ होतोय..तुमचं आजोळ तुम्ही तर नाटे गावचं आहे म्हणलात ना मघाशी.. “
पहिला..”घोळ काही नाही हो..मला दत्तक दिलं त्यामुळे माझं केडगावही आजोळच. नाटेगाव जन्मदात्या आईचं इतकंच.”
दुसरा..असं प्रकरण आहे होय..दत्तक का दिलं बुवा तुम्हाला”
पहिला मिश्किल हसत … “हॅहॅ..हॅ..आहो पूर्वी काय लेकरांची कमी होती का? देसायांच्या घरात सर्व मुली…मुलगा हवा म्हणून घेतलं मला दत्तक. मला ५ थोरले सख्खे बंधू आहेत. देऊन टाकलं आपलं मला ,तेवढाच एक जमिनीला हिस्सा कमी ..आणि देसायांच्या जमिन जुमल्यास वारस.”
म्हाता-याच्या गप्पा ऐकून नीलला वाटलं नियतीच आपल्याला समजवतेय..किती सहज यांनी आपलं दत्तक जाणं स्विकारलं. जन्मदाती आई समोर असतानाच दुसरी आई व्यवहारासाठी स्विकारायची?
गोष्टी मनावर घेतल्या तर खूप मोठ्या,नाही घेतल्या तर सुखच सुख.. आश्चर्य म्हणजे आपल्याला आई बाबा आपले जन्मदाते नाहीत याचं वाईट जास्त वाटतय पण आपले खरे आई वडिल शोधायची इच्छाही होत नाहीए.
ते आता भेटले तर त्या लीनासारखं मी स्विकारू शकेन? एखादी परकी स्त्री मला तिचा मुलगा म्हणेल मी तिच्या जवळ जाऊ शकेन? सत्य कळायच्या आधी नंतर काय बदलणार आहे नेमकं.. काहीच तर नाही.. इतके वर्षात मला न शोधलेले आता कशाला शोधत येतील आणि आलेच तरी मला आपले का वाटतील? सुलू मावशी म्हणते तशी माझ्या जन्मदात्यांची काही मजबूरी असेलही कदाचित ते जिवंतच नसतील म्हणून मला कुणीतरी स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी असं सोडून गेलं असेल.
पण मग मला आईबाबा परके वाटायला लागलेत का अचानक? काय होतय मला.. या विचारातच, पारावर बसण्यापूर्वी नीलने चपला काढून ठेवल्या होत्या त्या तो घालायला गेला. एव्हाना लाल मुंग्यानी चप्पल गच्च भरली होती. नील ने चप्पल जोरात आदळली,झटकली. निम्म्याहून अधिक मुंग्या तर मेल्या.
कपडे झटकून निघताना त्याची नजर पुन्हा मुंग्यावर गेली.. त्या रांगेत एकामागे एक पारावर चढत होत्या. पडलेल्या औदुंबराच्या फळांचा, प्रसादच्या पडलेल्या साखरदाण्यांचा आस्वाद घेत होत्या.
मेलेल्या मुंग्यांच त्यांना सोयरं सुतक होतं की नाही देव जाणे पण आपलं कर्म करत राहणं आणि पुढे जात राहाणं ,एवढं त्यांना कळत होतं, आपण क्षुद्र समजतो त्या किड्या मुंग्यांकडूनही शिकता येतं खूप. कुणास ठाऊक कुठे जन्मतात, कोण कुणाला जन्म देतात ..आई कोण..बाप कोण..काही गरज नसते त्यांना
माणसा सारखी .. पण एकजुटीने कर्म करत राहतात. दिसतातही एकमेकां सारख्याच.. आपणही तसेच तय एकरूप झालोय आई बाबांशी.. नील चे विचार थांबतच नव्हते.
प्राण्यांच असंच असतं..एका घरात वाढलेले कुत्रा,मांजरही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राहतात. सहवासाने त्यांनाही लळा लागतो एकमेकांचा..
नील विचार करतच होता कि सुलू मावशीचा फोन आला.. ती फ्री झाली होती. जवळच्या एका हाॅटेलमधे ते भेटले.
“अरे, आई बाबा खूप टेंशन मधे आहेत ,तुला खरं कळलं तर तू ते घर सोडशील. .. तुझ्या आईबाबांना शोधायचा प्रयत्न करशील.. ते नाहीच मिळाले तर एकटा पडशील..” सुलू मावशीला मधेच अडवत नील म्हणाला,
“मी ठरवलय..मला पत्रिका पहायची नाही, माझं भाग्य मी ठरवणार आणि मी एकटा ही पडणार नाही नी माझ्या आई बाबांनाही एकटं पडू देणार नाही?
आईचे दोन फोन आले होते, मी उचलेले नाहीत मला घरी निघायला हवं, तू घरी जा, लक्षात ठेव …आपण आज भेटलोच नाहीत. आई बाबांसाठी सगळं पहिल्यासारखंच राहू दे. बाकी मी सांभाळतो .”
सुलू मावशीचे डोळे भरून आले, शहाणं ग माझं बाळ म्हणत तिने नीलला जवळ घेतलं.
“जन्माच्यावेळी मी कोणत्या नाळेपासून वेगळा झालो देवजाणे पण आता ही नाळ कायमची जोडली गेली, मावशी” म्हणत नील आपल्या आई बाबांचा आधार होण्यासाठी घराकडे परतला…
सौ. निशा चौसाळकर ,अंबाजोगाई, बीड
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
नाळ ही कथा अगदी रहुदयस्पर्शी आहे.
शब्दरचना मनाचा ठाव घेणारी लिहिली आहे.
कथेला नाळ हे शिर्षक समर्पक वाटते.
धन्यवाद 🙏
Khupch chan. mhantle tar sopya nahi tar saglech kathin ,Aapla drishtikon kasa aahe hya var sagle tharte.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर..भावस्पर्शी कथा ..निशा 💐💐
धन्यवाद 🙏