श्रावणी नऊ वर्षांची एक नव्या पिढीची नव्या विचारांची चुणचुणीत मुलगी होती.
श्रावणीचा मावसभाऊ अविनाश दादा मुंबईच्या एका मोठ्या स्टुडिओमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि ॲनिमेशन विभाग सांभाळत होता. तो एका कार्यक्रमासाठी म्हणून गावी आला होता तेव्हा श्रावणी आणि त्याच्या आई बाबांना भेटायला त्यांच्या घरी सुद्धा आला होता. त्यावेळी त्याच्या कार्यक्षेत्राबद्दल सविस्तर चर्चा झाली. श्रावणी हे सगळं ऐकत होती होती. तिला मुळातच या क्षेत्राबद्दल एक सुप्त आकर्षण होतं. दादाकडून प्रेरणा घेऊन आता मात्र तिने तिचे कार्यक्षेत्र जणू फायनलचं करून टाकलं.
नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. परीक्षा संपली होती. श्रावणीने कोडिंग आणि ॲनिमेशन शिकायला सुरुवात केली होती.
कोडिंग म्हणजे कम्प्युटरला कळेल अशा भाषेत त्याच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या ऍप आणि फंक्शन साठी कॉम्प्युटरला तयार करणे इतकी जुजबी माहिती तिला तिच्या बाबांनी दिली होती.
तसेच एनिमेशन हे फक्त कार्टूनसाठी वापरत नसून अजून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियासाठी त्याचा वापर केला जातो हे पण तिला अविनाश दादाकडून कळलं होतं आणि या दोन्ही गोष्टी तिला प्रचंड रस वाटत होता. या उन्हाळ्याच्या सुट्टीत हे सगळं सखोलपणे शिकून त्यात तिला काही तरी स्वतःची सर्जनशीलता दाखवायची होती.
तिचे आईबाबाही तसे मॉडर्न विचारांचे होते. त्यांची आर्थिक परिस्थिती जरी फारशी बरी नसली तरी आर्थिक परिस्थितीचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा योग्य निर्णय घेऊन आपली पुढची पिढी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम कशी होईल याच्यावर श्रावणीच्या आई बाबांचा भर होता. आजकाल काळाची तशी गरजच आहे आपल्या मुलीने काही तरी वेगळं करून दाखवाव. काही तरी छान शिकावं. नेहमीच्या वहिवाटेपेक्षां नवीन वाटेने पुढे जावं अशी त्यांची इच्छा होती.
तिला वयाच्या नवव्या वर्षीच ठाऊक होतं की तिला पुढे काय करायचे आहे. स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ तिला सुरू करायचा होता. तिच्या हाताखाली अनेक ऍनिमेशन इंजीनियर्स कार्यरत असतील आणि देशाविदेशातले मोठमोठे लोक तिचे क्लाएंट्स असतील असं तिचं स्वप्न होतं.
मोठी स्वप्नं बघणं ही स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची पहिली पायरी असते आणि श्रावणी नक्कीच त्या पहिल्या पायरीला पार करून पुढे जाणार होती कारण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी हे सगळे गुण तिच्यामध्ये होते शिवाय घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता. असे आई वडील मिळणं हे सुद्धा एक प्रकारे तिचं भाग्यच म्हणावं लागेल.
एनिमेशन आणि कोडिंगच बेसिक शिकून झाल्यावर ती नवनवीन कार्टून स्वतःच एनिमेट करू लागली.
तिचा नवीन गोष्टी शिकण्याचा आणि आत्मसात करण्याचा वेगही इतर मुलांपेक्षा खूपच जास्त होता.
तिच्या आई वडिलांचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शिक्षक आणि आजूबाजूचे सगळेच तिची चिकाटी पाहून थक्क होत असत.
एके दिवशी एक नवीन कार्टून ‘ओल्डी’ नावाचा एक स्पेस इंजीनियर आणि अंतराळवीर तयार करायचं तिने मनातल्या मनात ठरवले. त्याबद्दलचे कोणते डाउट्स क्लीयर करायचे आणि टीचरला काय काय विचारायचं आहे काही शंका आहेत का असा सगळा अभ्यास करून झाल्यावर ती अंथरुणावर पडली पण तिला झोपच लागत नव्हती. ध्येय समोर दिसत असताना जे तुम्हाला झोपू देत नाही ते तुमचं खरं स्वप्न असतं जसं श्रावणीच होतं.
ती सकाळी उठली पटापट सगळं आवरलं. ॲनिमेशन क्लासमध्ये पोहोचली. सरांच्या मदतीने ने एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ओल्डी नावाचा एक स्मार्ट ऍस्ट्रोनॉट क्रिएट केला. एवढंच नाही तर तिची ॲनिमेशन मूव्हीची स्टोरी लाइनसुद्धा तयार होती. तिने ओल्डीचं रोबोटिक व्हर्जन तयार केलं. ओल्डीला स्पेस शटलमधून अंतराळात पाठवण्यात आलं. त्याची क्रिएटर म्हणून श्रावणीलाही अंतराळ भेटीची ही संधी मिळाली होती त्यासाठी विशेष गणवेश त्यांना देण्यात आला. ते स्पेस शटल ज्या रॉकेट बेसवरून वर अंतराळात जाणार होते. ते एका छोट्या टिव्हीवर शटलमधील खुर्चीत बसुनच बघता येत होते. सीट बेल्ट घट्ट बांधायला त्यांना सूचना देण्यात आल्या.
काउंटडाउन सुरु झाले. भारतातील श्रीहरीकोटा शटल पोर्टवर वरून हे रॉकेट सुटणार होते. पृथ्वीपासून स्पेस स्टेशन पर्यंतचा प्रवास हा एक तास आणि पंधरा मिनिटांचा असणार होता. लिफ्ट ऑफ झाल्यावर स्पेस शटल अंतराळात पोहचले आणि ‘स्पेस स्टेशन’ म्हटल्या जाणाऱ्या एका अंतराळातल्या प्रयोगशाळेत तिच्या नवीन हिरोची आणि तिची एण्ट्री झाली. स्पेस स्टेशनची रचना ओल्डीने नीट समजून घेतली. तिथे वेगवेगळ्या खोल्या, शटलच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेस शटल उतरण्यासाठी च्या जागा, जेवणासाठीची डायनिंग रूम असं बरंच काही होतं. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे सगळे हवेत उडत उडत चालता आहेत की काय असा भास होत होता.
श्रावणीच हे पहिलंच क्रिएशन असल्यामुळे तिच्याकडून एक छोटीशी चूक झाली होती तिच्याही नकळत एक निगेटीव रोबोटिक माइंड सेट ओल्डीच्या ब्रेनला कंट्रोल करत होता. अचानक ओल्डीचा कंट्रोल हाताबाहेर गेला म्हणजे त्याचा ब्रेन कंट्रोल त्या निगेटिव माइंड सेटने ताब्यात घेतला. किंवा तसच काही तरी भयंकर घडलं खरं. हे कसं झालं तेच काही केल्या श्रावणीच्या लक्षात येत नव्हतं.
त्याच्यावर कंट्रोल राहिला नसल्यामुळे तो का काय माहीत पण अतिशय विध्वंसक मनोवृत्तीत पोहोचला आणि मग तो अवकाशात विध्वंस करू लागला. पृथ्वीला धोका पोहचेल असं काही वागू लागला त्याने स्पेस शटल मधले प्राणवायुचे सिलेंडर नष्ट केले आणि काही केल्या तो विध्वंस थांबवत नव्हता. काय करावं ते सुचत नव्हते. श्रावणी प्रचंड घाबरली होती. आपल्या कोणत्याही क्रिएशन मध्ये एकही त्रुटी इथून पुढे राहणार नाही असा तिने चंगच बांधला आणि इतक्यात आईने हाक मारली ती जागी झाली. श्रावणी घामाघूम झाली होती. ती खूप घाबरली होती घाम पुसत श्रावणी आईच्या कुशीत शिरली आणि तिने सुस्कारा सोडला आणि आईला सगळी हकीकत सांगितली. हे फक्त एक स्वप्न होतं हे कळल्यावर श्रावणीने हुश्श केलं. आईने हसतच तिला जवळ घेतलं आणि क्लासची वेळ झाल्याचं सांगितलं.
आता मात्र अधिक जोमाने एकही त्रुटी नसलेलं क्रिएशन तिला करायचं होतं. तिने ॲनिमेशनच्या क्लासची तयारी केली.
तिने तिचं ओल्डी नावाचा ऍस्ट्रोनॉट तयार केलाच शिवाय नासाकडून आयोजित केलेली लहान मुलांसाठीची आंतरराष्ट्रीय स्तरावरची परीक्षाही उत्तीर्ण केली आणि याचं बक्षीस म्हणून या सगळ्या उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक डमी अंतराळ भेट बक्षिस म्हणून देण्यात आली. अंतराळवीर अंतराळात कसे जातात, कसे राहतात अगदी तशीच वातावरणनिर्मिती करून या मुलांना एक अविस्मरणीय अनुभव नासाने भेट दिला. या अनुभवाने समृद्ध होऊन श्रावणीने तिचे आणि तिच्या कुटुंबाचेच नाही तर देशाचेही नाव उंचावले.
श्रावणी आता तीस वर्षांची झाली आहे. तिचं घर संसार सांभाळून ती तिचा स्वप्नातून प्रत्यक्षात आणलेला ॲनिमेशन स्टुडिओ सांभाळते आहे. तिचे क्रिएशन लहानमोठ्या सर्वाचे लाडके आहेत. स्वप्नांना पंख देऊन तिने जी भरारी घेतली ते बघून तिचे आईवडील आनंदाने भारावून गेले आहेत.
एकूण काय तर तुमची मेहनत घ्यायची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच मोठी स्वप्न बघा आणि स्वप्नच तुम्हाला प्रत्यक्षात येण्यासाठी प्रोत्साहित करतील.
स्वप्न मोठी बघायला हवी कारण मोठी स्वप्ने बघितली तरच मोठी ध्येये तयार होतील. त्यासाठी जास्त कष्ट घेतले जातील आणि मग ते कष्ट फळालाही येतील. प्रत्येक नव्या पिढीच्या मुलांनी जर असाच विचार केला तर उद्या भारताला एक महाशक्ती बनायला वेळ लागणार नाही.
यातून बोध हा घ्यायचा तो हा की त्यांची आर्थिक परिस्थिती नसूनही श्रावणीच्या आई बाबांनी श्रावणीला एवढे मोठे स्वप्न बघण्याची हिम्मत दिली. आजकाल अंथरुण पाहून पाय पसरावे ही म्हण कालबाह्य ठरवून आपल्याला हवे तेवढे पाय पसरण्यासाठी अंथरूणच आपल्या कर्तृत्वाने मोठे करावे असे आपण म्हणू शकतो.
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
It’s really a good story and gives inspiration to youngsters.