वांझोटी – वांझोटेपण शरीराचे की विचारांचे!

WhatsApp Group Join Now

सनईचे मंगलमय सूर, अत्तराचा सुगंध, फुलांची सजावट, दागदागिन्यांनी, भरजरी कपड्यांनी नटलेली मंडळी, सुग्रास भोजनाचा सुवास, अगत्य, आतिथ्य, मानपान ह्यासाठीची लगबग आणि लेकीच्या, पाठवणीचे दडपण आज गौरव आणि गौरी अनुभवत होते. आज त्यांच्या मुलीचे तन्वीचे लग्न होते.  गौरी आणि गौरव अगदी जातीने सगळीकडे लक्ष देत होते. 

तन्वी कधीच आई होऊ शकणार नाही हे माहित असूनही तिला स्विकारणारा अनयसारखा चांगला, समजूतदार नवरा मिळाला आणि सासर मिळालं ह्याची पाहुण्यांमध्ये कुजबुज होतीच. सगळं वातावरण आल्हाददायक तरीही भावनिक झालेलं होतं. अशातच माई म्हणजे गौरवची आत्या आली. गौरवने त्यांच्याशी खूप आधीच बोलणे टाकले होते, म्हणून गौरी त्यांच्या स्वागताला पुढे झाली. माईंच्या पाया पडली.  तिने केलेला नमस्कार न स्विकारता माई सरळ गौरव कडे गेल्या. 

Marathi Emotional Story

गौरव त्यांच्याशी न बोलता निघून जात होता. इतक्यात माई गौरवला थांबवत म्हणाल्या, ” मी काही लग्नासाठी इथे आली नाही. पण जशी तुझी फसवणूक तुझ्या बायकोने केली तशीच फसवणूक तिने उचलून आणलेल्या मुलीने त्या मुलाची करू नये म्हणून इथे आले आहे.  त्या मुलाची फसवणूक होण्यापासून मी त्याला वाचवणार आहे. तू पूर्वी माझं ऐकलं असतंस तर तू ही वाचला असतास. आज स्वतःच्या रक्ताच्या मुलाचं लग्न करत असतास. पण नाही तूझं म्हणे प्रेम होतं ना तुझ्या बायकोवर. म्हणून आयुष्यभर पोसत बसलास उचलून आणलेल्या पोरीला. काय माहित कुणाचं रक्त आहे?”

“पुरे झालं माई तुमचं. मी ऐकून घेतो आहे कारण मला माझ्या मुलीच्या लग्नात कुणाचाही अपमान करायचा नाही. पण म्हणून तू काहीही बोलशील आणि माझ्या बायकोचा आणि मुलीचा अपमान करशील ते मी सहन करणार नाही.”गौरव ओरडून माईना म्हणाला. 

माईंनी  तरीही आपले बोलणे सुरूच ठेवले. “माझ्यावर ओरडून काहीच होणार नाही. त्यावेळेस जसा मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न मी आजसुद्धा करणार. त्या मुलाची फसवणूक होण्यापासून त्याला वाचवणार. “

गौरी माईंना हात जोडून काहीही न बोलण्याची विनवणी करत होती. परंतू माईंच्या शब्दांना अजून वरचा सूर लागला जेणेकरून तिथे उपस्थित सगळ्या पाहुण्यांना ऐकू जावे. तणावाचे वातावरण निर्माण झाले. इतक्यात तन्वी आणि अनय तिथे आले आणि त्यांनी माईंना इतकं चिडून बोलण्याचे कारण विचारले. तनू अतिशय नम्रपणे माईंशी बोलत होती. परंतू माईंनी तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि गौरवला म्हणाल्या,” हे बघ कुठूनही उचलून आणलेल्या मुलांशी मी बोलत नाही. मला ह्यांच्याशी बोलायचे नाही. मला त्या मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी बोलायचे आहे. “

माईंनी असे म्हणताच गौरी माईंच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली आणि विनवू लागली. माईंना हेच हवं होतं. गौरीला अपमानित करण्याची संधीच मिळत होती त्यांना. कुत्सितपणे माई म्हणाल्या,” हिच जागा आहे तुझी आणि हिच तुझी लायकी. आमच्या घराण्याला वारस देऊ शकली नाहीसच पण किमान माहेरवाशीण तरी द्यायचीस. तुला तर काहीच द्यायला जमलं नाही आम्हाला. दिलं ते तुझं वांझोटेपण, वांझोटी कुठली. “

आता मात्र गौरवही खचून गेला. कारण जे सत्य तनू आणि अनयपासून लपवण्याचा ते प्रयत्न करत होते ते सत्य माई अशाप्रकारे त्यांच्यासमोर आणत होत्या. गौरव आणि गौरी मान खाली घालून अश्रू ढाळत अपराधी भावनेने तनूसमोर उभे होते. कुणालाही काहीही बोलण्याचे सुचत नव्हते. भयाण शांतता तिथे पसरली. 

“माई आपण शांतपणे बोलूयात का? तुम्हाला मला जे काही सांगायचे आहे ते शांत आणि स्पष्ट, मला कळेल असे सांगाल का?” असं म्हणत अननये ती शांतता मोडली. त्याला सगळंच सत्य समजणार ह्या विचाराने गौरी आणि गौरव गर्भगळित झाले.

माई अनयला बघून त्याच्याकडे जात म्हणाल्या,” तुम्हाला ह्या मुलीविपयी काहीही माहीत नाही. ह्या सर्व लोकांनी सत्य दडवून तुमची फसवणूक केली आहे. तेच सत्य सांगण्यासाठीच मी इथे आली आहे. “

“बरं माई. तुम्ही नक्की सांगा. सत्य सगळ्यांना कळायलाच पाहिजे. तो अधिकारच आहे सगळ्यांचा. बोला तुम्ही. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.”अनयच्या अशा बोलण्याने आता मात्र गौरव आणि गौरी समजून गेले कि माईंना सत्य सांगण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. हे सत्य समजल्यावर तनू आणि अनय आपल्यापासून कायमचे दुरावणार आणि तनूचे ही लग्न त्यामुळे तुटणार.  

माईंनी सत्य सांगण्यास सुरूवात केली.” तुम्हा मंडळींना माहित नाही ही मुलगी कधीच आई बनू शकणार नाही. देवाने ह्या मुलीला आईपणाचं दान दिलंच नाही आहे. वांझोटी आहे ही मुलगी. तिला गर्भाशय नाही. त्यामुळे ती तुमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही. “

अनय म्हणाला, “माई ह्यांनी आम्हाला हे आधीच सांगितलं आहे आणि आम्हाला ते मान्य आहे. ही देवाची इच्छा आहे हे आम्ही मान्य केले आहे. आम्ही नंतर एखादं बाळ दत्तक घेऊ. माझ्या संपूर्ण कुटुंबाला हे माहित आहे आणि मान्य देखील आहे. त्यामुळे तुम्ही शांत व्हा आणि लग्न समारंभात आनंदाने सहभागी व्हा. “

माईंना थोडे आश्चर्य वाटले; परंतु त्यांनी संपूर्ण सत्य अनयला सांगायचे ठरवले. माई पुढे बोलू लागल्या, “तुम्हाला कदाचित अर्धवट सत्य माहित आहे. ही मुलगी कुणाची आहे ठाऊक आहे का?”

“हो माहित आहे. गौरव आणि गौरीची लाडकी तन्वी.” अनयने ऊत्तर दिले. 

माई कुत्सित हसत म्हणाल्या, “म्हणजे तुम्हाला पूर्ण सत्य माहित नाही. ही मुलगी ह्यांची नाही. ही गौरवची बायको कधीच आई होऊ शकत नव्हती. लग्नाला वर्ष उलटून गेली तरी मूल होत नाही म्हणून डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर समजलं ही आमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही आणि म्हणूनच मी गौरवच्या मागे लागले होती की दुसरं लग्न कर. पण ह्याचं आपलं एकच मी दुसरं लग्न करणार नाही. 

एके दिवशी दोघं कुठल्यातरी अनाथाश्रमात गेले आणि ही मुलगी उचलून घेऊन आले. हिच्या ना कुळाचा पत्ता, नाही रक्ताची माहिती. उचलून आणलेल्या मुलीला आमच्या कुळाचं नावं दिलं. स्वतःचं वांझोटेपण लपवण्यासाठी दत्तक घेण्याचं नाटकं रचलं हिने. मला ह्या गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी ह्यांच्याशी संबंध मोडला. पण आता तुमची फसवणूक होऊ नये, तुम्हाला सत्य समजले पाहिजे म्हणून मी इथे आले आहे. 

सांगा हे माहित होतं का तुम्हाला ही मुलगी दत्तक आहे ती आणि ही बाई वांझोटी आहे ते. आता हे समजल्यानंतर सुद्धा लग्न करणार आहात का ह्या मुलीशी. बोला. सांगा ना.” 

सगळेच स्तब्ध झाले होते हे सत्य ऐकून. इतकी वर्ष लपवून ठेवलेली गोष्ट अशाप्रकारे सगळ्यांसमोर आली होती. गौरव आणि गौरी एकमेकांना पकडत खाली बसले. माईंनी त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊन काहीच शिल्लक ठेवले नाही. आनंदी वातावरण कटुतेने, दुःखाने, हतबलतेने ढवळून निघाले. आनंदाश्रू ऐवजी क्षमायाचनेच्या अश्रूधारा वाहत होत्या. 

तनू आणि अनय ने जाऊन आधी गौरव आणि गौरीला आधार देत  बसवले. त्यांचे नयनाश्रू पुसत त्यांना नजरेनेच आश्वस्त केले आणि माई समोर ऊभे राहिले. तनू ने हात जोडत बोलायला सुरूवात केली, “माई आजी मी आता जे बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही. माफ करा पण अनयला आणि त्याच्या कुटुंबाला आधीच सगळं सत्य माहित आहे. त्यांना माझ्याविषयी आणि माझ्या जन्माविषयी सगळंच माहित आहे.” 

तनू ने असं म्हणताच गौरी आणि गौरव आधी एकमेकांकडे आणि नंतर अनय आणि तनूकडे आश्चर्याने बघतात. त्यांना कुठला प्रश्न पडला आहे हे तनूला कळले. ती त्यांना म्हणते,  “तुम्हाला आश्चर्य वाटले ना मला कसं समजलं ते. तुम्ही मला दत्तक घेतले आहेत हे मला मी पंधरा वर्षांची असतानाच कळलं आहे. मला सत्य कधीच सांगितलं नाहीत तुम्ही. पण त्यादिवशी मी कॉलेजच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्याचदिवशी ह्या माईंनी बाबाला फोन केला होता आणि त्याला सांगत होत्या त्या दोघींना सोडून दे. त्यावेळेस नाही ऐकलसं आतातरी ऐक. नाहीतर मी त्या मुलीला सगळं सांगून टाकेन की ती अनाथ आहे आणि तिचा ह्या घराण्याशी, ह्या माणसांशी काहीच संबंध नाही. पण बाबाने जास्त काहीच न बोलता फोन ठेवून दिला. 

बाबा आईला हे सगळं सांगत असताना मी ऐकलं आणि मला कळालं की मला आईबाबाने दत्तक घेतले आहे. त्याचवेळी हे सुद्धा कळलं की मला जन्मतःच गर्भाशय नाही. म्हणजे मी सुद्धा कधीही आई होऊ शकणार नाही. तो दिवस माझं आयुष्य बदलून गेला. मी खूप एकटी, शांत राहू लागले. घर सोडून जाण्याचे सुद्धा विचार आले. त्यावेळेस ज्या अनाथाश्रमातून मला आणले होते तिथे मी गेले. तिथे गेल्यावर मला समजले आईबाबाने फक्त मला दत्तक घेतले नव्हते तर तिथे असणाऱ्या अजून दोन विकलांग मुलांचे पालकत्व घेतले होते. त्या विकलांग मुलांना देखरेखीसाठी एका ऊत्तम अशा संस्थेत ठेवले आहे. त्याचा सर्व खर्च आईबाबा करत आहेत. 

हे सगळं कळल्यानंतर मला मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटला. ज्यावेळेस अनयने मला लग्नाची मागणी घातली त्यावेळी मी त्याला हे सत्य सांगितले आणि त्यानेही सत्य जाणल्यानंतर माझ्या त्रुटीसकट माझा मनापासून स्वीकार केला. तसंच त्याने त्याच्या कुटुंबाला सुद्धा हे सत्य सांगितले आणि त्यांनीही मोठ्या मनाने मला स्वीकारले. 

हे सगळं मला आणि अनयला माहित आहे हे मात्र आम्ही आईबाबाला कळू दिले नाही. तुम्ही जे माझ्या आईला सारखं सारखं वांझोटी म्हणत आहात ते मला मान्य नाही. मी तिची मुलगी आणि ती माझी आई आहे. तुम्ही नेहमीच तिला घालून पाडून बोलत आला आहात. पण ह्यापुढे तिला काहीही बोललेले मला चालणार नाही. 

तिचा तुम्ही सुरवातीपासून छ*ळ करत आला आहात. वर्षाच्या आत पाळणा हलला पाहिजे, कुळाचे नाव पुढे नेणारा कुलदीपकच पाहिजे ह्या तुमच्या विचारसरणीमुळे तिचा अतोनात त्रास केलात. येता जाता टोमणे मारणे, शुभ कार्यापासून तिला लांब ठेवणे, बारशाचे, डोहाळजेवणाचे आमंत्रण तिला न देणे, घरी आलेल्या लहान मुलांपासून तिला लांब ठेवणे अशा कित्येक गोष्टी तिने सहन केल्या आहेत. तरीदेखील कुणालाही दुषणं न देता आपल्या नशीबात हेच आहे असं स्वीकारून हसतमुख राहिली माझी आई. 

वांझोटी म्हणून माझ्या आईला बोलणार्‍या तुमच्यास्रख्यांच्या विचारांच्या वांझोटेपणाची मला किव येते. देवाने आईपण आईला दिले आहे. ती आम्हा तीन मुलांची आई आहे. माया, ममता, काळजी, आपुलकी अगदी सगळंच तर आहे तिच्याकडे. ती आमची यशोदा आहे. त्या यशोदेला वांझोटेपणाचा कारावास देणारे तुम्ही कोण आहात? तुमच्या विचारांचे वांझोटेपण दूर करून या आधी आणि त्यानंतर माझ्या आईला बोला. “

तनूने अगदी ठणकावून माईंना सुनावले. गौरीला तनूचा खूप खूप अभिमान वाटला. पण गौरव अजूनही अपराधीपणाची भावना बाळगून होता. तो पुढे आला आणि गौरीसमोर हात जोडून म्हणाला, “गौरी मला माफ करं ग. इतके वर्षात मी जे करायला पाहिजे होतं ते तनू ने केले. खरतरं खूप आधीच मी माईला आणि आपल्या घरच्यांना सगळं सांगायला पाहिजे होतं. पण मला माझा पुरुषार्थ ते करून देत नव्हता. माझ्या चुकीची, माझ्या कमतरतेची शिक्षा तू आयुष्यभर भोगत राहिलीस. मला माफ कर. “

“अहो असं काय बोलतेस आहात. आता कही बोलू नका बरं. सगळं छान झालं आहे आता. आणि तुमचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून तर तुम्ही मला साथ दिलीत. तीन मुलांची आई झाले मी ती केवळ तुमच्या पाठिंब्यामुळेच ना. आता काही बोलू नका. मला सगळं मिळालं आहे आज.” गौरी गौरवला काहीतरी सांगण्यापासून रोखताना म्हणाली.

गौरव तिला अडवत म्हणाला, “नाही गौरी आजतरी मला बोलू देत. आज माझ्या लेकीमुळे मला सत्य सांगण्यासाठी हिंमत मिळाली आहे. माई ज्या गोष्टीसाठी तू गौरीचा आयुष्यभर दुस्वास केलास, तिचा छळ केला ती कमतरता तिच्यात कधीच नव्हती. ती आई होऊ शकत होती. मीच कधी बाबा बनू शकत नव्हतो. माझ्यात ती ऊणीव होती. पण गौरीने माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी वांझोटेपण स्वतःकडे घेतले आयुष्यभरासाठी. खरा वांझोटा मी आहे . 

मी हे खूप आधीच तुम्हा सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं. पण आपल्या पुरूषप्रधान समाजात पुरूषामधली कमतरता त्याचे समाजातील स्थान कमी करते हे विचार, हे संस्कार माझ्यासारख्या अनेक पुरुषांवर त्याच्या घरातील ही अशी मोठी माणसंच करतात. माझ्यातला दोष मला माहीत असल्यामुळेच मी दुसरं लग्न केलं नाही. जर हा दोष माझ्यात नसता गौरीमध्ये असता तर कदाचित मी दुसरं लग्न केलं असतं आणि हा माझ्या विचारांचा वांझोटेपणा मला माझ्या मोठ्या मंडळींकडून मला मिळाला. 

खरंच गौरी प्रेम तर तू केलसं माझ्यावर जीवापाड. मला कुठेही हिणवलं जाऊ नये म्हणून सगळा दोष स्वतःवर घेऊन सगळा अपमान मुकाट सहन करत राहिलीस. माई अगं आपण वांझोटे आहोत. माझी गौरी तर आपल्या सगळ्यांची आई आहे. आई जसं मुलांच्या चुका पोटात घालून त्यांना माफ करते तसंच माझी गौरी करत आली आहे गं. आता तरी मान्य कर ती वांझोटी नाही. मला खरंच माफ कर गौरी.” असं म्हणत गौरव ढसाढसा रडू लागला. 

आज गौरी नाही यशोदा सगळ्यांना कळली होती. वांझोटेपण हे विचारांचे नसावे. मग असंख्य यशोदा होतील ह्या समाजात आणि कुणीच वांझोटी राहणार नाही. सगळ्याच यशोदा फक्त एकच म्हणतील.

कृष्ण देवकी पोटी जन्मला जरी

कान्हा यशोदेचा लाडाचा तरी

मी नाही देवकी नी यशोदा तुझी

आपुलं नातं माय लेकराचे परी   

या जन्मी जरी नाही कूस माझी

पुढल्या जन्मी सोसेन वेदना सारी

व्यापेल जग माझे तुझ्या लीलांनी

मिटावे डोळे माझे यश तुझे पाहूनी

जाईन मी तुझ्याच खांद्यावरूनी

करशील ना रे माझी ही ईच्छा पुरी

मी नाही देवकी नी यशोदा तुझी

आपुलं नातं माय लेकराचे परी   

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

4 thoughts on “वांझोटी – वांझोटेपण शरीराचे की विचारांचे!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top