सासू सुनेच्या नात्यांतील हळवे क्षण टिपणारी हसरी कथा
“नीता ssss, चहा दे बाबांना! त्यांची वॉकिंगला जायची वेळ झालीय कधीची”
ठयाण ठयाण ठयाण…जोरात आवाज झाला..
“काय गं! आता काय पाडलंस? एक काम धड करत नाही! आणि माझ्या गोळ्या कधी देणार आहेस? मला उशीर झालेला चालत नाही, माहीत आहे ना तुला?”
ठण ठणाण ठण…
“भांड्यांना पोचे पाडल्याशिवाय काम होणार आहे कि नाही आज? अजून चहा नाही झाला??”
ठयाण ठणाण ठयाण…
“औषधे घ्यायची वेळ झालीय! नाष्टयाचा पत्ता नाही!”
ठणाण ठण ठणाण ठण…
“काय चाललेय हिचे मगापासून? अशी का वागतेय ही बाई आज? विजय, एsss विजय, उठलास का राजा? अरे, आज चहा नाश्ता मिळणार आहे कि नाही?”
ठयाण ठयाण ठयाण…
“बघ रे बाबा तूच! आम्ही काय म्हातारी हाडे!”
ठण ठण ठणाण…
विजय घाबरला. कुठल्याही वाक्याला आज किचन मधून फक्त भांडी आदळल्याचाच आवाज येतोय! बापरे! काय बिनसलेय हिचे एव्हढे! “नीता, अगं काय झालेय आज तुला? चहा नाष्टा बनवणार आहेस कि नाही? मला उशीर होतोय ऑफिसला! हवे तर डबा राहू देत आजचा दिवस!”
“नाही हं विजय, डबा नाही म्हणजे पोळी भाजी नाही! मग खिचडी वर भागावावे लागेल दुपारी! मला नाही आवडणार! बनवू देत डबा तिला! उगाच बाहेरचे का खायचे तू? नस्ती थेरं! आम्ही नाही बनवला वर्षानुवर्षे स्वयंपाक? हूंssss?” आई हुंकारली.
एव्हढयात नीता येऊन धाड्कन् सोफ्यावर बसली. सासूकडे बघून नाक मुरडले. विजयकडे रागाने कटाक्ष टाकला. तिचा आजचा आवेश बघून सोफा खुर्चीत बसलेले सासरेही बुचकळ्यात पडले! काय प्रकार आहे हा? त्यांना काहीच कळेना!
अखेर सासुबाईंनी कोंडी फोडली. “काय गं ए, काय झाले एव्हढे शेफारायला? रोजची कामे सुद्धा वेळेवर करता येत नाहीत का तुला?” नीताने तोंड फिरवून सासूकडे अशी जळजळीत नजर टाकली की सासूने घाबरून विजयकडे पाहिले. विजयने गडबडून नीता कडे पाहिले.
“आज मी ‘पण’ केलाय. आज काहीही बनवणार नाही.”
“ठिकाय, मग माझाही ‘पण’ ऐक. मी बाहेरचे काहीही खाणार नाही. उपाशी राहीन.” इति सासू.
“अगं आई, पण”,
“तुझं पण बिण काही नाही. बायकोला समजाव.” विजयला पुढे बोलू द्यायची संधी न देता आई फुत्कारली,
“त्यापेक्षा आईंना समजाव”, नीता गुरकावली.
दोघीही तोंडे फिरवून फुरंगटून बसल्या. आता विजयचे काहीही चालेना. इकडे आई तिकडे बायको. कोणता आड नी कोणती विहीर? विजय चांगलाच कात्रीत सापडला.
प्रसंगावधान राखून अखेर सासरेबुवा म्हणाले, “ठीक आहे, असू देत. आजचा दिवस मी बनवतो चहा!”
“काय बाई दिवस आलेत! सून एव्हढी घरात असताना आत सासरे चहा करणार का? मीच नसता का केला? पण माझे मेलीचे मागच्याच महिन्यात गुडघ्याचे ऑपरेशन झालेय ना! अयाई गं! दुखतेय फारच अजून!”
“अहो, माझा चहा गोड करा हं! म्हटले शुगर तुम्हाला आहे, मला नाही!”
सासरे बुवा गरम गरम चहाचे कप घेऊन हॉल मध्ये आले तरी विजय नीता कडेच पाहात बसला होता. आत्ता अचानक हिला नक्की काय झाले कळतच नाहीय. काल रात्रीपर्यन्त तर बरी होती. बरे विचारायची टाप नाही. नाहीतर बया रात्रभर अबोला धरून बसायची. मग मनवायला पुन्हा किमान हजाराचा खड्डा.
“विजयsss, ए राजा !” आईच्या हाकेने विजयची तंद्री भंगली. “अरे! उशीर नाही का होत आहे तुला ऑफिसला! जा बाबा तू तुझा वेळेवर! आमचे काय म्हाताऱ्यांचे! करू दिवसभर कसंतरी अॅडजस्ट!”
“आई, असं का बोलतेस? नीता करेल ना रोजच्याप्रमाणे सगळं! अगं आत्ता जाईल राग तिचा. मी बघतो काय ते!” असे म्हणत विजय नीताला हाताला धरून खेचतच बेडरूम मध्ये गेला.
“नीता, काय चाललेय तुझे सकाळपासून! तुला माहीत आहे, आईची ‘क्नी रीप्लेसमेंट’ झालीय ती. तिला वेळेवर औषधे घ्यायला लागतात. अधिक फिजिओ थेरपि चालू आहे. बाबांनाही शुगर आहे. त्यांचेही पथ्य पाणी सांभाळावे लागते. रोज तर नीट करतेस! मग आज काय झालेय तुला?
“हो ना! रोज करतेच ना मी? पण आज नाही करणार.” नीता चिडून बोलली.
“दिवसभर घरातली उस्तवार करून जीव दमतोय माझा! सगळा स्वयंपाक रोज एकटीने करतेय मी. यांचे पथ्य वेगळे, त्यांची आवड वेगळी. सगळं सांभाळतेय. अगदी आपले समजून करते. फक्त पोळ्यांना बाई लावू म्हटले तर नाही म्हणालास. तरी तक्रार नाही माझी. रोज दिवसभरात किमान तीस पोळ्या लाटते मी. तू ऑफिस मधून येऊन दमतो तेव्हा मी दमलेली नाही दिसत तुला. पण आज नाही.. नाही म्हणजे नाही..”
“अगं पण का?”
“कारण आज महिला दिन आहे. आणि मी तो साजरा करणार. माझ्या मैत्रिणीं बरोबर. अगदी करणार म्हणजे करणार. आज माझी सुट्टी.”
“क्काय? विजय किंचाळला. हे काय नवीन खूळ? मग एव्हढया पोळ्या कोण करणार? तुला माहीत आहे, आईला हॉटेलचे जेवण नाही चालणार!
“ते तुमचे तुम्ही बघा! आज माझी सुट्टी. माझा प्रोग्रॅम आधीच ठरलाय. आज महिला दिनाचे सर्वत्र भरपूर कार्यक्रम आहेत. मी आणि माझ्या मैत्रिणी आजचा दिवस खूप धम्माल करणार आहोत. रोज अडवतोस. प्लीज, आज नको अडवू.” असे म्हणून नीता स्वत:चे आवरायला गेली. पंधरा मिनिटांत मस्त टापटीप होऊन जीन्स कुर्ता घालून तयार झाली. आज हाय हिल्स घालून केसांचा पोनिटेल बांधला होता. मस्त हलकासा मेकप केला होता. फिकट गुलाबी लिपस्टिक ओठांवर खुलून दिसत होती. रोज गबाळ्या सारखे गाऊनवर वावरणाऱ्या, केसांचा बुचडा बांधून घरकाम उरकण्यात मग्न बायकोला बघायची सवय झालेल्या विजयला नीताचा आजचा अवतार कुठेतरी सुखावूनही गेला. लग्ना आधी नीता अगदी अश्शीच तर होती. “गोड दिसतेय”, त्याने मनातच कॉम्प्लिमेंट देऊन टाकली. तोवर “बाय” म्हणत ती निघूनही गेली. जाता जाता एक कटाक्ष सासूकडे टाकलाच.
आई बाबा आssss वासून बघतच राहिले.
नीता बाहेर पडताच आईने चार्ज घेतला. “विजय, अरे आता पुरता चहा बिस्किटे खाल्ली रे! पण जेवणाचे काय? आता दुपारचे बाबा बघतील काहीतरी. पोळी भाजी काही जमणार नाही त्यांना. पण आमटी भात तरी करतील ते. नाही का हो?” बाबा गडबडून हो-नाही म्हणायच्या आतच आई पुढे म्हणाली, “तुला तर माहितीये, मला बाहेरचे काहीही चालणारच नाही. डॉक्टरांनी कडकडीत पथ्य सांगितले आहे. आणि बाबांना दोन्ही वेळेचा स्वयंपाक जमणार नाही. असे कर.. तू संध्याकाळी लवकर ये. आणि बनव काहीतरी. साधे पिठले भातही चालेल रे आजचा दिवस! पण घरीच बनव बाबा!.”
“आई मी?”
“मग काय झाले? मी ऑफीसला जायचे, त्यामुळे तुला सारे शिकवून तर ठेवले होते. लग्नाआधी कारायचास ना मला मदत? आता घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नीताने जॉब सोडला म्हणून सगळे तीच करते. पण तुलाही बऱ्यापैकीत येतोच ना स्वयंपाक. मग कर कि आजचा दिवस.”
“बघतो. जमावतो”, म्हणत विजय आतापूरता सटकला.
इथे नीताने आज पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरा सारखी मोकळ्या आकाशात झेप घेतली होती.
“पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में,
आज मैं आज़ाद हूँ दुनिया की चमन में I”
तिचे मन पाखरू भिरभिरु लागले. आज सर्व मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पूर्ण दिवसभरासाठी बाहेर पाडून मौज करणार होत्या. मोकळ्या आकाशात स्वतंत्रपणे विहरणार होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाने ही पर्वणी उपलब्ध करून दिली होती त्यांना. पण त्यासाठी प्रत्येकीनेच घरी काय काय पापड लाटले होते त्यांचे त्यांनाच माहीत. खूप दिवसांपासून त्यांचे प्लॅनिंग चालू होते यासाठी. खर्चही फार होणार नव्हता. आज सर्वत्र महिलांसाठी भारी डिस्काउंट्स होते ना! सगळ्या जणी खूप खुश होत्या.
सर्वांनी आधी स्टार बक्स मध्ये जाऊन मस्त पैकीत ‘हॅझेलनट लाते विथ डबल चॉकलेट चिप कुकीज’ची ऑर्डर दिली. हळूच आजूबाजूला पाहिले तर वेगवेगळ्या वयोगटांतल्या महिलांचे बरेच ग्रुप्स हास्यविनोद करीत खिदळत होते. आज दिवस त्यांचाच तर होता. भरपेट नाश्ता झाल्यावर नीता मैत्रिणीं समवेत स्पा मध्ये गेली. तिथे किती तास उलटुन गेले कळलेच नाही. मॅनिक्युअर, पॅडीक्युअर, कुणी मड बाथ तर कुणी स्टीम बाथ आणि शेवटी नेल आर्ट! वॉव! एकेकीची नखे इतकी सुंदर दिसत होती! आपलीच नखे पाहून प्रत्येकीला हेवा वाटत होता. जरी उदया त्यांचा काहीच उपयोग नव्हता तरी आजचा दिवस प्रत्येकीला समरसून जगायचा होता.
मस्त मसाज घेतल्याने स्पा मधून बाहेर पडताना सर्वांना अगदी हलके हलके नि मोकळे मोकळे वाटत होते. तिथंही भरभक्कम डिस्काऊंट मिळाल्याने साऱ्याच खुशीत होत्या. तिथून शॉपिंगला मॉल मध्ये जायचे ठरले. शॉपिंग हा तर स्त्रियांचा विक पॉइंट. मग काय! मॉल वर हल्ला बोल. तिथे खरेदी कमी आणि विंडो शॉपिंगच जास्त झाली. तरीही सगळ्या अतिशय खुशीत होत्या. हळू हळू परत एकदा भुकेची जाणीव झाली. तसा मोर्चा हॉटेल मध्ये वळला. इथेही मस्त कंसेशन त्यांची वाटच पाहात होते. सूप पासून सुरुवात करून मेन कोर्स आणि मग डेझर्ट पर्यन्त सगळे काही हादडून झाले. एरव्ही रोज घरी ‘रांधा, वाढा, ऊष्टी काढा करून झाल्यावर आपण जेवा’, अशा महिलांना हॉटेल मध्ये कुणीतरी मग तो वेटर का असेना आपल्याला अदबीने सर्व्ह करतोय याचेच किती अप्रूप असते हे इतरांना काय कळणार? सगळ्या जणींनी यथेच्छ ताव मारला.
पोटे तुडुंब भरल्यावर आता पुढे काय? हा प्रश्न सिनेमाने निकालात काढला. मग पॉपकॉर्न खात खात सिनेमाचाही आस्वाद घेतला. आज सगळ्याच तृप्त दिसत होत्या. मन, डोळे, शरीर सर्वच भरून आले होते. आजचा महिला दिन फुल्ल सत्कारणी लावला होता सगळ्यांनीच! संध्याकाळ होऊ लागली. आता सगळ्याच पाखरांना आपापल्या घरट्याचे वेध लागले. कुणाचे वयस्कर सासू सासरे तर कुणाची चिल्ली पिल्ली घरात वाट पाहात होती.
नीताने ही अंदाज घेत घरात पाऊल टाकले आणि दीर्घ श्वास घेत तिथेच थबकली. आयला! चक्क पनीर पुलावचा गंध दरवळतोय. नीताच्या सर्व जाणीवा जागृत झाल्या. घरात शिरल्या शिरल्या हळूच आधी सासूकडे पाहिले. सासुनेही नजरेनेच तिला आश्वस्त केले.
तिला बघताच विजयलाही आनंद झाला. “अगं आलीस तू? दमली असशील ना? फ्रेश होऊन ये! गरम गरम वाढतो तुलाही!”
आता आश्चर्याने आsss वासायची पाळी नीताची होती. विजय आणि चक्क पनीर पुलाव??? तिच्या तोंडून शब्द फुटणार इतक्यात कुकरची शिट्टी वाजली तसा विजय आत पळाला. नीता सासू जवळ येऊन बसली. सासूनेही मायेने पाठीवर हात फिरवला. ते बघून सासरे थक्क झाले. “अरे वा! बट्टी झाली तुमची इतक्यात?”
“अहो, कट्टी झालीच कधी होती?” असे म्हणत दोघीही खिदळू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून विजयही बाहेर आला.
“म्हणजे? सकाळचे महाभारत काय होते तर?” बाबांनी प्रश्न केला.
“अहो, पोर दिवसभर आपले सगळ्यांचे निगुतीने करते. अगदी वर्षानुवर्षे करते आहे. त्यात कधी खंड नाही. माझ्या आजारपणामुळे तिला माहेरीही जाता येत नाही. म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून मीच म्हटले तिला, “जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी, एक दिन ही सही!” असे म्हणून सासूने हळूच डोळा मिचकावला.
“अगं, मग असेच सांगायचे ना तिला जायला, एव्हढे नाटक करायची काय गरज?” आता बाबांची आणि विजयची युती होऊ लागली.
“वा रे वा! ते केले नसते तर आज तुम्ही दोघांनी मिळून असा स्वयंपाक केला असतात का? या निमित्ताने तुम्हालाही कळले आणि आम्हालाही कळले कि वेळ पडली कि तुम्ही दोघे व्यवस्थित निभाऊ शकता. अगदी स्वयंपाकही करू शकता. घर आवरू शकता. साफसफाई करू शकता. सगळे काही तुम्हालाही छान जमते. आता यापुढे आम्ही कधीही एव्हढया तेव्हढयासाठी अजिबात अडकून राहणार नाही. काय गं सिमरन?” असे म्हणत सासूने हात पुढे केला. सिमरननेही तितक्याच तत्परतेने टाळी दिली.
“म्हणजे? हे तुम्हा दोघींचे संगनमत होते तर?
“होयच मुळी! अरे, मुलगी शिकली, प्रगती झाली पण स्त्री सक्षम आणि आत्मनिर्भर झाली कि कुटुंब सक्षम आणि आत्मनिर्भर होते. सर्वच बाबतीत.”
आई असे म्हणताच अख्खे कुटुंब हास्यकल्लोळात सहभागी झाले.
ही सांठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण!
तुम्हाला ही Women’s Day special Story कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्या पर्यन्त पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉइन करा. धन्यवाद!
लेखिका –जिज्ञासा कुंदन म्हात्रे,मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
भारीच की.. आता अशीच युक्ती लढवावी लागेल 8 मार्च ला 😂
भारीच की