कथेचे नाव – अक्कलदाढ

WhatsApp Group Join Now

माधवीची सकाळ झाली तीच प्रचंड दाढ दुखण्याने. ‘ अरे देवा ! नेमकं ह्या दाढेला आत्ताच दुखायच होतं ? एकतर मेलं आज ऑफिसमध्ये नटूनथटून जायचे आहे आणि आजच का हिला उत आला आहे दुखायचा ?’ माधवीची प्रचंड चिडचिड झाली होती. 

                ” माधवी, माझा सॉक्स सापडत नाही. कुठे ठेवला आहेस ?” विघ्नेश करवादला. 

                 ” हे बघ विघ्नेश, तूच शोध तुझा सॉक्स. इथे मेलं घरातलं आवरून स्वतःची तयारी करायची आहे तर मेली दाढ प्रचंड दुखते आहे. आज तर डॉक्टरांकडे जायला देखील वेळ मिळणार नाही. आज ‘ महिलादिन ‘ निमित्ताने ऑफिसमध्ये काठापदराच्या साड्या नेसून अगदी पारंपरिक वेशात जायचे आहे आणि त्यात ह्या दाढदुखीने बेजार झाले आहे मी.” माधवी म्हणाली.

marathi vinodi katha

                  ” ओह ! आज तुमचा महिलादिन ना ? महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. मी तुला शुभेच्छा नाही दिल्या तर माझी बत्तीशी नक्कीच पाडशील तू.” विघ्नेश मस्करीत म्हणाला.

                  ” तुला बरी मस्करी सुचते आहे. इथे माझी दाढ दुखते आहे त्याचे काहीच नाही तुला. कसला मेला महिलादिन ? आम्हाला घरातली कामे करूनच बाहेर पडावे लागते. कोण म्हणतं का की आज काही कामे करू नकोस हो ! आजचा दिवस तुमचा आहे तर मस्त एन्जॉय करा तुमचा दिवस; पण नाही. सकाळी पिहूला स्कूलबसमध्ये सोडून आले तेव्हा छान ब्लॅंकेटमध्ये गुडूप झोपला होतास. बोललास का ? मी सोडतो पिहूला, तू तुझं आवर म्हणून.”

                 आता सगळं खापर आपल्यावर फुटेल म्हणून विघ्नेशने गुपचूप एक क्रोसिनची गोळी आणि एका ग्लासात पाणी भरून माधवीला दिले. ” ही घे गोळी, थोडा फरक वाटेल. जा तुझं तू आवर. मी घेतो तुझा आणि माझा डब्बा भरून. आज कॅबने जा ऑफिसमध्ये. ट्रेनने धक्के खात जाऊ नकोस. आता मी निघतो ऑफिसला जायला. मला उशीर होतो आहे आणि  छान साडी नेसून तयार झालीस की मला फोटो काढून पाठव.” विघ्नेशच्या बोलण्याने माधवीला त्याची दृष्ट काढाविशी वाटली.

              ” विघ्नेश, माझा डब्बा भरू नकोस. आज आम्हाला जेवण आहे ऑफिसमध्ये.”

                ” बरं.” असे माधवीच्या म्हणण्याला दुजोरा देऊन विघ्नेश ऑफिसमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला. क्रोसिनची गोळी घेऊन माधवी तयार होण्यासाठी बेडरूममध्ये गेली. दाढ तर दुखतंच होती तरीदेखील त्या दुखऱ्या दाढेकडे दुर्लक्ष करत माधवी छान तयार झाली. आरशात स्वतःला न्याहळत एक सेल्फी काढून विघ्नेशला पाठवला आणि ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडली.

                ऑफिसमध्ये पोहचल्यावर माधवीने ऑफिसमध्ये एक नजर टाकली असता संपूर्ण ऑफिस आज रंगीबेरंगी झाले होते. सगळ्या महिला उत्साहाने पारंपरिक वेशात आल्या होत्या. सगळ्या महिलावर्गाचा नुसता चिवचिवाट सुरू होता. कोणाच्या साडीची, तर कोणाच्या दागिन्यांची तारीफ केली जात होती. तर काहीजणी उगीचंच एक दुसरीला पाहून नाकं मुरडत होत्या. ( स्त्रीसुलभ वृत्ती, दुसरं काय ? ) 

                ऑफिसमध्ये बॉसने आज महिलावर्गासाठी खास फोटोग्राफर बोलवला होता. जेवणाची ऑर्डर बाहेरून दिली होती. त्यामुळे आज महिलामंडळीची चंगळच होती. फोटोग्राफरकडून अनेकजणी फोटो काढून घेत होत्या. कोणी एकटीचा तर कोणी ग्रुपमध्ये. माधवीचे सगळे लक्ष तिच्या दुखणाऱ्या दाढेमध्ये अडकले होते म्हणून तिला फोटो काढून घ्यायचा देखील उत्साह राहिला नव्हता. एका मैत्रिणीने तिला जबरदस्ती ग्रुप फोटोसाठी उभे केले. फोटोग्राफर म्हणाला, ” स्माईल प्लिज.” सगळ्याजणींनी आपले चेहरे हसरे करून दात दाखवले. एकट्या माधवीच्या चेहऱ्यावर माशी हलत नाही असे दिसल्यावर तो फोटोग्राफर म्हणाला, ” ओ मॅडम ! जरा हसा ना प्लिज.” त्या क्षणाला माधवीला त्या फोटोग्राफरचे दात घशात घालावेसे वाटले. माधवीने कसेबसे उसने हसू चेहऱ्यावर आणत फोटो काढून घेतला बाबा एकदाचा. 

                जेवणासाठी बुफे मांडून तयार होता. तंदूर रोटी, पनीर मटरची भाजी, जिरा राईस, दाल फ्राय, पापड, सॅलड, लोणचं, गुलाबजाम यांनी टेबल सजले गेले होते. सगळं जेवण अगदी माधवीच्या आवडीचे होते. माधवीने चिवट झालेल्या तंदूर रोटीचा तुकडा मोडला. त्याला भाजीत बुडवून घास तोंडात टाकल्यावर दुखऱ्या दाढेमुळे तिच्या मस्तकात कळ गेली. तिने त्या रोटीला बाजूला सारून भात खाण्यास घेतला इथेही भात फळफळीत असल्या कारणाने तोही खाल्ला जात नव्हता. मग तिने मोर्चा वळवला गुलाबजामकडे. तो मेला इतका गोडमिट्ट की तो खाल्ल्यावर दातात सणक गेली. आज तर माधवीची परिस्थिती ‘ दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत ‘ अशी झाली होती. दुखणाऱ्या दाढेबरोबर सगळ्याच दातांनी असहकार पुकारला होता. 

               ऑफिसमधील एक कलीग तिच्याजवळ आली आणि म्हणाली, ” जेवण आवडलं नाही का तुला ? जेवत का नाहीस ?” तिला उत्तरादाखल माधवी म्हणाली, ” अग खूप दाढ दुखते आहे.” माधवीचे उत्तर ऐकून ती कलीग तिथून निघून गेली. माधवी मनात म्हणाली, ‘ हिचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आनंदच झाला असेल हिला, मी जेऊ शकत नाही म्हणून. आज काही दाताला अन्न म्हणून लागले नाही.’

               दुपारी माधवीच्या गालाला प्रचंड सूज आली. त्यामुळे माधवी अर्ध्या दिवसांची सुट्टी टाकून घरी जायला निघाली. माधवीचा एक गाल सुजलेला पाहून काहीजणींनी दात विचकले. त्यांच्या अशा वृत्तीने माधवीने मनातल्या मनात दातओठ खाल्ले. 

                संध्याकाळी दातांच्या डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता माधवीकडे. डॉक्टरांसमोर खुर्चीत जाऊन बसल्यावर त्यांची आयुधं पाहून माधवीची दातखिळी बसली. डॉक्टरांनी माधवीला भला मोठा ‘आ ‘ करायला सांगितला. दाती तृण धरून ( शरण जाऊन ) माधवी डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन करत होती.  दुखणाऱ्या दाढेमुळे मोठा ‘ आ ‘ तर वासलाच जात नव्हता. त्यात ते डॉक्टर ड्रिल मशीन सारख्या आवाजाच्या उपकरणाने दात कोरून कोरून पाहत होते. आज तर माधवीचे दात कोरून देखील पोट भरले नव्हते. ( एवढ्या तेवढ्या गोष्टीने पोट भरत नाही.) डॉक्टर सारखे चूळ भरायला सांगत होते. खुर्चीच्या बाजूला असलेल्या स्वच्छ छोट्या बेसिनमध्ये डॉक्टरांसमोर सारखी सारखी चूळ भरायला माधवीला कसेनुसे होत होते. सारखा सारखा ‘ आ ‘ वासून दाढेबरोबर माधवीचा जबडा देखील दुखू लागला होता.

             ” अहो मॅडम ! अक्कलदाढ येते आहे तुमची; पण ती इतकी विचित्ररित्या वाकडीतिकडी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतो आहे. ती दाढ काढायला लागेल त्यासाठी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही.” 

              डॉक्टरांच्या बोलण्याने माधवीच्या मनात विचार आला की, ‘ ही अक्कलदाढ वयाच्या पस्तिशीमध्ये येते आहे म्हणजे याआधी आपल्याला अक्कल आलीच नव्हती का ? गद्धेपंचविशी देखील उलटली आपली आणि त्याच दरम्यान आपले लग्न देखील झाले होते म्हणजे आपण  अक्कल नसताना लग्न केले ? अरे देवा ! तरीच मी भोगते आहे माझ्या कर्माची फळे. आता अक्कलदाढ येते आहे ती पण माझ्या अकलेसारखी वाकडीतिकडी. जाऊदे मेली ती दाढ. ‘ आपलेच दात आणि आपलेच ओठ.’  ‘ किती  दात धरू त्या दाढेवर ? ‘ ( किती राग राग करू ? ) आता ह्या दाढेला जबड्यातून काढायचे आहे म्हणजे किती पैसे लागतात देव जाणे ? आपण ह्या डॉक्टरांना दात ( हात ) दाखवून अवलक्षण तर केले नाही ना ?’

                माधवीच्या गालाला जास्त सूज आल्याने डॉक्टरांनी सूज उतरण्यासाठी गोळ्या लिहून दिल्या आणि तीन दिवसांनी पुन्हा तपासण्यासाठी बोलावले. 

                घरी आल्यावर माधवीला एक सुखद धक्का बसला तो म्हणजे आज विघ्नेश लौकर घरी आला होता. त्याने संपूर्ण घर आवरून ठेवले होते. आलं घातलेला चहा थर्मासमध्ये ओतून ठेवला होता. माधवीने त्याला ती डॉक्टरांकडे जाऊन आल्याचे आणि डॉक्टरांनी काय उपाय करावा लागेल हे देखील सांगितले. 

               ” अरे देवा ! म्हणजे आज तुझा महिलादिन अक्कलखात्यात गेला म्हणायचा.” विघ्नेश म्हणाला. 

                ” अक्कलखात्यात कसला रे ? अक्कलदाढेत गेला.” माधवीच्या बोलण्याने विघ्नेशला हसू फुटले. 

               विघ्नेशला हसताना पाहून माधवी मनात म्हणाली, ‘ हसतील त्याचे दात दिसतील.’ स्वतःच्याचं विचाराने माधवीला देखील हसू फुटले. बुडत्याला काठीचा आधार म्हणून दिवसभर माधवीच्या पोटात काहीच अन्न गेले नसल्याने कसाबसा चहाबरोबर ब्रेड तिने खाल्ला. खाल्ल्यामुळे तिला थोडी तरतरी आली.

              माधवीची अक्कलदाढेत वाया गेलेल्या दिवसाची सांगता मात्र नवऱ्याच्या आणि लेकीच्या प्रेमळ सहवासात झाली. 

समाप्त

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsAp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

      धन्यवाद !

10 thoughts on “कथेचे नाव – अक्कलदाढ”

  1. छान आहे कथा. लिखाण छान झालं आहे. वास्तववादी.

  2. Anupama potphode

    छान हलकी फुलकी विनोदाचा टच असलेली कथा वाटली.. मस्त.. keep it up 👍👍

  3. अरुण समेळ

    कथा अगदी मनापासून आवडली. महिला दिन, स्त्रियांचा स्वभाव व त्यात भरीस भर म्हणजे अक्कलदाढेचा होणारा त्रास या सर्व गोष्टी खुप छान प्रकारे कथेत वर्णन केल्या आहेत. मात्र नवरोबांचं वागणं जरा सुसह्यच वाटलं आणि थोडा का होईना मनाला रिलीफ वाटला.

  4. अक्कल नसताना लग्न केले. त्याच कर्माची फळं भोगते आहे हे अगदी अचूक आहे. कथा वाचताना आमचे घरचे विचारत होते. दात काढायला काय झाले. त्यांना कोण सांगेल अक्कलेची गोष्ट. म्हणजे अक्कलदाढेची गोष्ट असं म्हणायचं होतं. 😅😅

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top