मिनलची सकाळ नेहमीच पाच वाजता होत होती. पाचला ऊठून आन्हिक आटपून आंघोळीनंतर स्वयंपाक घरात प्रवेश करायचा हा तिच्या सासूबाईंचा शिरस्ता तिने अगदी तंतोतंत पाळला होता. कणीक भिजवत बाजूला भाजी फोडणीला द्यायची. भाजी शिजेपर्यंत एकीकडे दूध गरम करत ठेवायचं. मग सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता तयार करायचा. सगळ्यांच्या डब्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी पोळ्या, कोशिंबीर करायची. सासू सासऱ्यांच्या दुपारच्या जेवणासाठी वरण भाताचा कुकर लावायची. मुलांना, अमितला ऊठवायचं, त्यांची शाळा, कॉलेज, ऑफिसची, स्वतःच्या ऑफिसची तयारी करायची आणि मग सगळं आवरून धावतपळत ऑफिस गाठायचं.
संध्याकाळी तसंच धावतपळत येऊन संध्याकाळचं जेवण तेही प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवायचं हा तिचा दररोजचा दिनक्रम. सगळंच निभावून नेत होती. सुरवातीला तिने ऊत्तमरित्या सगळं केलं आनंदाने. सासरच्या पै पाहुण्यांचे देखील आनंदाने करायची. सासूसासरे, मुलं, नवरा कोणालाही तिने कधीच नाराज केलं नाही. नेहमीच हसमुख.
पण आताशा तिची चिडचिड होत होती. ऑफिस,घर सांभाळताना दमत होती. रात्री लगेच झोप येत होती; पण सकाळी मात्र ऊठायला ऊशीर होत होता. ऊशीरा ऊठल्यामुळे तिच वेळेचे गणित चुकत होते. सगळी योजलेली कामे अपूर्ण राहत होती. कामाचे आणि वेळेचे नियोजन चुकत असल्यामुळे मीनलची चिडचिड वाढत होती. ती स्वतःला दोप देत होती. तिला असं वाटू लागले की ती सर्व जबाबदारी सांभाळण्यास, सर्वांना आनंद देण्यात, आपल्या कर्तव्यात चुकत आहे.
तिच्या ह्या विचारांचा परिणाम तिच्या ऑफिसमधल्या कामावर सुद्धा होऊ लागला. ऑफिसच्या कामात खूप चुका होऊ लागल्या. सगळ्यांशी हसतखेळत,मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणारी मीनल आता ऑफिसमध्ये सुद्धा आपल्या सहकाऱ्यांवर, ऑफिसच्या मैत्रिणीवर चिडू लागली. कधीकधी तिला थकवा सहन न झाल्यामुळे ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी येऊ लागली.
एक दिवस तर मीनल इतकी चिडली की तिने मुलावर हात ऊचलला. त्यामुळेच तिची दोन्ही मुलं घाबरून गेली. सासू सासऱ्यांवर सुद्धा चिडू लागली. त्यांनाही थोड आश्चर्यच वाटलं. अमित तिला फार समजून घेत होता. पण त्याच्याशी सुद्धा शुल्लक कारणांवरून वाद घालत लागली होती. मीनल ह्याआधी कधीच असं वागली नव्हती.
असंच एक दिवस ऊशीरा ऊठल्यामुळे मीनल ऑफिसला गेली नाही. अमित आणि मुले ऊठून आवरून ऑफिसला, शाळा कॉलेजला निघून गेली होती. सासरे नेहमीप्रमाणे बागेत फिरायला गेले होते. सासूबाई देवाची पूजा करत होत्या. मीनल ऊठली त्यावेळेस तिने हे सर्व बघितले आणि तिला स्वतःचाच राग आला. “आजसुद्धा कशी मी ऊशीरा ऊठली. आता सगळे काय म्हणतील कि मी आळशी झाले. मी कामचुकार झाले. कसं अशी मी झोपून राहिले.” असं पुटपुटत ती स्वतःचे आटपत होती.
तिची हे पुटपुटणे सासूबाईंनी ऐकले होते. त्यांना मिनलची मनाला लावून घेण्याची सवय माहित होती. म्हणूनच ती स्वतःचे आटपत असताना त्यांनी तिच्या खास मैत्रिणीला फोन केला व मीनलची सद्यःस्थिती सांगितली आणि तिला लगेच येण्यास सांगितले. त्यांनी बोलावल्या प्रमाणे मीनलची खास मैत्रिण दीप्ती अर्ध्या तासात मीनलच्या घरी आली. बेल वाजल्यानंतर मीनल दार ऊघडेल म्हणून सासूबाई वाट बघत होत्या. पण परत बेल वाजल्यानंतर मात्र स्वतः दार उघडण्यासाठी गेल्या.
“बरं झालं तू आलीस ते. तूच बोलून बघ तिला नक्की काय झालं आहे. तिच्या वागण्यातील बदल मी तुला मगाशीच सांगितला आहे. तू तिची मैत्रीण असण्याबरोबर एक डॉक्टर आहेस म्हणून तुला मुद्दाम बोलावून घेतले आहे. आता तूच बघ तिला. मी सुद्धाबाहेर जाते म्हणजे तुला तिच्याशी सविस्तर बोलता येईल.” असं म्हणत मीनलच्या सासूबाई घराबाहेर पडल्या.
“मीनल ए मीनल कुठे आहेस ग. कधीची आले आहे मी. तू इथे आतल्या खोलीत काय करतेस? मी तुला भेटायला आले आणि तू मात्र आतल्या खोलीत हे काही बरोबर नाही.” असं म्हणतच दीप्ती आत शिरली. पण खोलीच्या दरवाज्यावर थबकून ऊभी राहिली. कारण मीनल हमसून हमसून रडत होती. दीप्तीला तिच्या मानसिक स्थितीचा अंदाज येत होता. परंतू त्यामागील कारणं समजत नव्हते. त्यासाठी तिला मीनल ला शांत करून बोलते करणे भाग होते.
“अगं मीनल अशी काय रडतेस? काही झालं आहे का? तुझी तब्येत बरी नाही का? शांत हो बघू आधी. हे घे पाणी घे.” असं म्हणत दीप्ती ने तिला बाजूच्या तांब्यातील पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन शांत झाल्यावर दीप्ती ने मीनल ला विचारले,” सांग आता शांतपणे काय झालं आहे ते. तू का रडतेस होतीस? “
मीनलने दीप्तीला सांगायला सुरूवात केली. “दीप्ती अग मला काय झालयं तेच मला कळत नाही. हल्ली माझी चिडचिड वाढली आहे. काम करताना थकवा येतो. ऑफिसच्या कामात चुका होत आहेत. कधी खूप रडावे वाटतं, कधी खूप ओरडावे वाटतं. भूक मंदावली आहे. खूप झोप येते. केससुद्धा खूप गळत आहेत. खूप घाम येतो. हाडांचा तर कडकड आवाज येतो. अग साधी दळणाची पिशवी ऊचलली तरी हात दुखतो.
कधी कधी ऊगाच रडू येतं. घरचे खूप समजून घेतात. मला कधीही कुणीही काहीच बोलत नाहीत. मग मला अजून अपराधी वाटतं. ह्याआधी ही सगळी कामं मी सहज करत होते. कुणाच्याही मदतीशिवाय करत होते न थकता न दमता. मग आत्ताच मी अशी कशी आळशी झाले गं. मी खरंच कामचुकारपणा करत नाही गं. काय विचार करत असतील सगळेच माझ्याविषयी.” असं म्हणत मीनल परत रडायला लागली.
दीप्तीने मीनल शांत होण्याची वाट बघितली. नंतर ती बोलू लागली. “हे बघ मीनल मी तुझी मैत्रीण तर आहेच; पण सोबतच एक गायनॅकॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे तुला जर काही अजून त्रास असेल तर तो सुद्धा सांग. आपण त्यावर इलाज करू शकतो. “
“अगं नाही गं. काही होत नाही. मगाशी सांगितलं तितकंच होत आहे.” असं मीनलने दिल्लीला सांगितलं.
“बरं मग मी आता काही विचारते त्याचे ऊत्तर दे.” दीप्ती पुढे विचारू लागली. “तुझं वय काय आहे? तुझी मासिक पाळी व्यवस्थित आणि रेग्युलर आहे का? तू हार्मोन्सची तपासणी केली आहेस का ? विटामिन डी साठी रक्ततपासणी केली आहेस का? तुझा आहार तू काय घेत आहेस. “
“अगं हे काय मध्येच तुझं. ह्या सगळ्याचा माझ्या चिडचिडीशी काय संबंध. मला खरचं काही आजार नाही झाला आहे अगं.” मीनल दीप्ती च्या प्रश्नांनी गोंधळून घाबरून म्हणाली.
आता मात्र दीप्तीला हसू आले. ती हसतच म्हणाली, “मीनल अगं तू कुठचा विचार कुठे नेते. मी कधी म्हणाले की तुला आजार झाला आहे म्हणून. तू कधी आरशात बघितलं आहेस का गं स्वतःला.? केसांना चांदी चढली आहे. माझ्या सर्व प्रश्नांची ऊत्तरं दे आधी मग मी समजावते तुला.”
मीनलला अजूनही कळत नव्हते दीप्तीला काय म्हणायचे आहे ते. पण तरीही तिला ऊत्तर देत म्हणाली “माझं वय आता चव्वेचाळीस आहे. मासिक पाळी येते पण कधी मागे कधी पुढे. फार त्रास होतो हल्ली आणि मी अजूनपर्यंत कोणतीही रक्ततपासणी नाही केली आहे. दुपारी आणि रात्री जेवण सगळे खातात तेच खाते. मध्ये खायला वेळच मिळत नाही. किती वेळेस विचार करते सकाळी थोडं योगा करावं; पण सगळ्यात वेळच नाही मिळत.”
“हम. म्हणजे मीनल हा तुझा प्री मेनोपॉज सुरू झाला आहे.” दीप्ती असं म्हणताच मीनलला जरा धक्काच बसला. ती पुढे काही बोलण्याआधीच दीप्ती तिला म्हणाली,” थांब लगेच काही तर्क करू नकोस आणि घाबरून जाऊ नकोस. मी जे सांगते आहे ते ऐक. जेव्हा आपल्याला सतत १२ महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा मेनोपॉज सुरू झाला असं समजावं.साधारणपणे ४५ ते ५५ व्या वयात मेनोपॉज येतो. मेनोपॉजची कमी-अधिक लक्षणे दिसू लागतात.
मेनोपॉज येण्यापूर्वीचा टप्पा म्हणजे पेरी मेनोपॉज. यामध्ये मासिक पाळी पूर्ण बंद न होता अनियमित होते. साधारण ३५-४० व्या वर्षी प्री मेनो*पॉज सुरू होतो. यामध्ये हॉट फ्लॅशेस, अनियमित मासिक, झोप कमी होते , रात्री किंवा अनेकदा घाम येणे. सतत मूड बदलत राहणे, वजन वाढणे, मेटाबॉलिजम कमी होणे, त्वचा कोरडी पडणे, केसगळती, हृदयाचे ठोके वाढणे (Palpitation), सतत डोके दुखणे, थकवा येणे, चिडचिड वाढणे, भीती वाटणे, आत्मविश्वास नाहिसा होणे, थोडास विसरायला होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ह्या लक्षणांपैकी बरीचशी लक्षणं तुझ्यात दिसत आहेत.
आजकाल बहुतांश स्त्रिया नोकरी करणाऱ्या आहेत. अशावेळी घरची जबाबदारी, ऑफिसचे वाढते काम या दोन्ही गोष्टींमुळे मेनो*पॉज आधीच्या काळापेक्षा आता लवकर येतो इतकचं. पण म्हणून घाबरून गोंधळून न जाता मेनोपॉज आणि पेरीमे*नोपॉज दरम्यान हार्मोन थेरेपी, जीवनशैलीत बदल, औषधे आणि समुपदेशन यांसह योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम कर. पूर्ण झोप घे. भरपूर पाणी आणि चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घे. विश्रांती घे, छंद जोपास, प्रियजनांना वेळ दे आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक वेळी हो म्हणणे गरजेचे नाही. आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणायला शिक.
काय कळलं का काही. जास्त टेन्शन, धावपळ ह्यामध्ये तुझ्या लक्षात येत नव्हते. सगळ्यांच करता करता स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो आपण. आता स्वतःकडे लक्ष दे. सगळीच कामे स्वतः च करायची हा हट्ट बाजूला ठेव. हा एक टप्पा आहे ग आपल्या महिलांचा. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा अगदी संयमाने आणि आनंदाने, निगुतीने पार करतो तसाच हा एक टप्पा निवांतपणाचा. स्वतःला शोधण्याचा टप्प्या आहे हा. ऋतू आहे हा ऋतू संपण्याचा. हा ऋतू अशी रडत साजरा करणार आहेस का? स्वतःला दोप देत बसण्यापेक्षा तू तुझ्या घरच्यांशी संवाद साध. थोडा ब्रेक घेऊन कुठेतरी फिरायला जा. बघ जमतं का? आणि त्यातून काही बोलायचं असेल, मोकळं व्हायचं असेल तर मी आहेच तुझी मैत्रीण.
मीनल बरीचशी शांत होऊन स्वतःच्या ह्या टप्प्यावर विचार करत होती. तिला विचार करायला वेळ मिळावा म्हणून तिला तिच्या विचारात सोडून दीप्ती निघून गेली. दीप्तीने सविस्तर समजावल्याचा परीणाम म्हणुन रात्री जेवताना सगळे एकत्र असताना दीप्तीने सांगितलेले सर्वकाही मीनलने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने स्वतःचे आहार, व्यायाम, करावयाची कामे सगळ्याचे वेळापत्रक बनवले. घरचेही तिला तिचे वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्यात मदत करू लागले. स्वतःचे छंद, फिरण्याची आवड जोपासण्यासाठी सुट्टीचा दिवस निवडला. त्यामुळेच ती तिच्या आयुष्यातील हा टप्पा सहजरीत्या आणि आनंदाने पार करत होती.
डोळ्यांवर चढला आहे चष्मा
चेहर्यावर हलक्या सुरकुत्या
केसात झालर थोडी चांदीची
आहे ही चाळीशी नंतरची नांदी
जीवही होतो आता थोडा घाबरा
लागले आहे थोडंस विसरायला
झाले आहे थोडीशी चिडचिडी
आहे ही चाळीशी नंतरची नांदी
वय किती झाले विचारा कशाला
ऋतुनिवृतीचा ऋतू हा सुरू झाला
नाही चाळीशी तरी नाही पन्नाशी
आहे ना ही चाळीशी नंतरची नांदी
क्षणभर विश्रांती देऊ देत ह्या मनाला
शोधते आहे एकांताची निवांत जागा
सुरू केला प्रवास स्वतःच्या आनंदाशी
म्हणजे संवाद साधेन ह्या आयुष्याशी
हीच तर आहे ना चाळीशी नंतरची नांदी…..
__पुजा सारंग, मुंबई.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WaApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
सुरेख .. महत्वाचा विषय अगदी सोपा करून सांगितला.
धन्यवाद मॅडम 😊🙏🏻
खूप मस्त..सगळ्या स्त्रियांची अशीच परिस्थिती आहे प्री मोनोपॉज मधे..विषय खूप छान मांडला आहे
धन्यवाद मॅडम 🙏🏻😊. एक छोटासाच प्रयत्न केला आहे.