महाराष्ट्रातील स्त्रियांचे पारंपारिक दागिने l Traditional Jewellery of Maharashtrian women in Marathi 

WhatsApp Group Join Now

Traditional Jewellery of Maharashtrian women in Marathi: जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरीही स्त्रियांना दागिन्यांची हौस असतेच. आदिम काळात सुद्धा स्त्रीला दागिन्यांची हौस होती ती वेगवेगळ्या प्रकारचे खड्यांचे दागिने घालायची. पौराणिक काळात सुद्धा स्त्रियांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दिसायचे. फक्त फरक एवढाच असतो की प्रत्येक देश, प्रत्येक प्रांत यांची दागिन्यांची प्रथा वेगवेगळी असते.आणि हौसेला मोल नसते असे म्हणतात. म्हणूनच श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे दागिने खरेदी करत असतो. दागिने वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले असतात जसे सोने, चांदी, पितळ इत्यादी. काही दागिने हिऱ्यांपासून सुद्धा बनवलेले असतात. दागिने घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य कारागिराच्या हातात असावे लागते. त्यातील काही भाग हाताने तयार केला जातो. तर काहींचे ठसे असतात. तार काढणे, धातू जोडणे, टिकली पाडणे, इत्यादी अनेक टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिने घडतात. पारंपारिक दागिन्यांना एक ठराविक प्रकारचे डिझाईन असते.

महाराष्ट्रात विविध प्रकारचे पारंपारिक दागिने आढळतात. अनेक राज घराण्याची मोहर त्यावर आहे. अगदी पेशवाईपर्यंतचे विपुल प्रमाणात दागिने आढळतात. त्यातील अनेक दागिने कालबाह्य झालेले आहे. दागिन्यांची प्रथा कधीच जुनी होत नाही. ती पुन्हा पुन्हा प्रचलित होत असते.दागिने हे नेहमी आपल्या संस्कृतीला प्रदर्शित करत असतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.

   तर, महाराष्ट्रातील स्त्रियांचे पारंपारिक दागिने, traditional jewellery of Maharashtrian women, in Marathi या लेखामध्ये आपण विविध प्रकारच्या दागिन्यांची नावे व त्यांची माहिती बघूया.

* केसांना लावण्याचे दागिने—(शिरोभूषणे)

१) फुले —लहान लहान सोन्याची किंवा चांदीची फुले केसांची शोभा वाढवतात.

२) गुलाब फूल किंवा नग-गुलाबाच्या आकाराचे फुल वेणीला लावतात.

३) आकडा–आकडा बहुतेक अंबाड्याला लावतात. त्याने अंबाडा नीट बसतो.

४) सुवर्णफुल

५) अग्रफुल

६) तुरा

७) रत्नफुल आणि रवी फुल

८) सूर्यफूल चंद्रफुल

असे अनेक दागिने वेणीला लावण्याकरता आहेत. पण काळानुसार त्याचा आता वापर होत नाही. सोने, चांदी किंवा इतर धातू मध्ये हे दागिने घडवलेले असतात.

भांगाच्या मध्यभागी बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यासारखे आभूषणे लावली जातात. अंबाडा सजवण्यासाठी आंबोड्यातील फुले लावली जातात. Traditional Jewellery of Maharashtrian women in Marathi 

* कानात घालण्याचे विविध प्रकारचे दागिने—(कर्णालंकार किंवा कर्णभूषणे)

१)कुडी-सोने किंवा मोत्याला फुलांचा आकार देऊन कुडी तयार केली जाते. हा मुख्यतः पेशवाई काळातील  दागिना आहे.

२) कर्णफुले–या दागिन्याने संपूर्ण कान भरलेला दिसतो.

३) झुंबरं–या प्रकाराचे कानातले, कानामध्ये झुंबरा सारखे लोंबते असतात.

३) वेल–मोत्याची किंवा सोन्याची सर ही केसांमधून कानात अडकवतात.

४) कुडकं–कानाच्या पाळीच्या आतील भागात हे घातले जाते.

५)कान–कानावर घालण्याचा हा एक दागिन्यांचा प्रकार आहे.

६) बुगडी–कानाच्या पाळीच्या वरच्या भागावर बुगडी घातली  जाते .ती मोत्यापासून तयार केली जाते.

डुल, कुंडल, काप, सुवर्ण फुले असे अनेक प्रकारचे दागिने कानात काढण्यासाठी सापडतात.

*गळ्यात घालण्याचे विविध प्रकारचे दागिने—

१)ठुशी–हा दागिना अगदी गळ्या जवळ घातला जातो. यामध्ये बारीक बारीक मणी असतात. ठुशीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. साधी ठुशी, मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी तसेच पेंडट असलेली ठुशी., पेशवाई ठुशी ही ठुशी जोंधई मण्यांनी तयार केली जाते.

२) चिंचपेटी–हा पण गळ्याशी घालायचा मोत्याचा दागिना आहे. कीर्ती मुख आणि मत्स्य असे याच्यावर नक्षीकाम केले जाते.

३) राणी हार–दोन ते तीन पदर असलेला हा दागिना असतो. यावर सुद्धा नक्षीकाम केलेले असते.

४) बोरमाळ—यामध्ये लहान लहान बोराच्या आकाराचे मणी गोवले जातात. अर्थात सोन्याचे असतात. आजकालच्या काळामध्ये त्याला दोन किंवा तीन पदरी पण घडवले जाते.

५) पुतळी हार-पुतळीहारामध्ये सोन्याची चपटी नाणी एकमेकांमध्ये गुंफलेली असतात.

६) चपलाहार–चपट्या सोन्याच्या नाण्यांमध्ये  गुंफलेला म्हणजे चपला हार असतो.

७)  लक्ष्मी हार–यामध्ये चपट्या नाण्यांवर लक्ष्मी देवीच्या प्रतिमा असतात. हा संपूर्ण सोन्याचा असतो. त्याला सोन्याची साखळी सुद्धा असते.

८) मंगळसूत्र–हा सौभाग्यवती स्त्रियांचा अलंकार आहे. यामध्ये काळेमणी तसेच सोन्याच्या दोन वाट्या असतात. मंगळसूत्रांमध्ये अनेक प्रकारचे डिझाईन उपलब्ध असतात. वेगवेगळ्या प्रांतात  वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घातले जातात.

९) मोहन माळ–सोन्याचे मणी एकमेकांमध्ये गुंफले जातात. दोन पदरी किंवा तीन पदरी हाराला मोहन माळ म्हणतात.

१०) कोल्हापुरी साज–अनेक शुभ चिन्हांनी या हारावर नक्षीकाम केले जाते. किंवा अनेक शुभचिन्ह यावर कोरले जातात. तसेच महालक्ष्मीची प्रतिमा सुद्धा त्यावर असते. सोने किंवा इतर धातू मध्ये हा दागिना घडवला जातो.

११) वज्रटीक–हा पेशवाई दागिना आहे. याला गळ्याशी घालतात. लाल रंगाच्या कापडी पट्टीवर सोन्याच्या माळांची पट्टी एकमेकांमध्ये तारेने गुंफलेली असते. याला तीन पदर असतात.

१२) बकुळहार –या दागिन्यांमध्ये छोटी छोटी सोन्याची बकुळीची फुले एकत्र गुंफली जातात. हा दागिना एक पदरी किंवा दोन पदरी असतो.

१३)गोफ–सोन्याच्या तारांना नाजूक तऱ्हेने एकत्र गुंफून गोफ तयार होतो.

१४) चौसरा–या प्रकारच्या हाराला चार पदर असतात. बारीक बारीक कड्या एकत्र करून त्यांचा दागिना घडवला जातो. हा दागिना बहुतेक सोन्याचा असतो.

१५) एकदाणी—या दागिन्यांमध्ये सोन्याचे टपोरे मोती एकमेकांमध्ये सरी सारखे गुंफले जातात.

या व्यतिरिक्त गळ्यात  घालण्याचे अनेक दागिने आहेत. जसे, गहू माळ, गोखरू माळ ,चंद्रहार, चाफेकळी माळ, लक्ष्मी हार, जोंधळी पोत, टीकमणी सर, लफ्फा, लड, साखळी, नळ्याची पोत, डोरले, तन्मणी, पोहे हार, रेवडी हार,  कंठी, कंठी हार, गजरा हार, सूर्यहार, बेलपान अशा अनेक दागिन्यांनी पारंपारिक दागिन्यांची श्रीमंती अधिक वाढवली आहे.

*नाकात घालण्याचे दागिने—

१) नथ—नथ हा नाकात घालण्याचा पारंपारिक सुंदर दागिना आहे. नथी मुळे स्त्रियांचे सौंदर्य खूप खुलते. मोती आणि सोन्याची तार मिळून हा नाकात घालण्याचा दागिना तयार केला. जातो. तो ओठां पर्यंत रुळत असतो.

नाकात घालण्याच्या दागिन्यांचे इतर प्रकार आहेत. मोरणी, चमकी, लोलक. traditional jewellery of Maharashtrian women.

त्यानंतर येतात हातावर घालण्याचे दागिने. हातावर आपण तीन ठिकाणी दागिने घालू शकतो. बाहूवर, मनगटावर आणि बोटात.

*बाहूवर घालण्याचे दागिने—(-बाहूभूषणे)

१) बाजूबंद–हा दागिना बाजूला बांधला जातो. सोने किंवा मोती यात घडवला जातो.

२)वाकी—वाकी सुद्धा दंडावर बांधली जाते ती सुद्धा सोने किंवा मोत्याची बनलेली असते. काळानुसार वेगवेगळे नक्षीकाम यामध्ये आढळते.

३) नागबंद—या दागिन्यांमध्ये वेटोळे घालून बसलेला नाग व फणा काढलेला नाग असे याची रचना असते.

४) नागोत्र–नागाच्या वेटोळ्याला भरपूर  रुंदी असलेली ही एक प्रकारची वाकी आहे.

५) तोळेबंद—चटई सारखी नक्षीकाम असलेली ही एक वाकी आहे. चांदीमध्ये ती घडवली जाते.

६) वेळा–हा अलंकार बहुतेक ग्रामीण स्त्रीच्या दंडाला बघायला मिळतो. हा दागिना बहुतेक कोपरा जवळ घातल्या जातो.

*मनगटावर घालायचे दागिने—

१) पाटल्या–हा मुळचा पेशवेकालीन दागिना आहे. थोड्या जाड अशा बांगड्यांना पाटल्या म्हणतात. यात सुद्धा विविध प्रकारच्या पाटल्या असतात जाळीच्या पाटल्या, तोडीच्या पाटल्या, पुरणाच्या पाटल्या, पोवळ पाटल्या तसेच मोत्याच्या पाटल्या.

२) बिलवर—पैलू पडलेल्या बांगड्यांना बिलवर असे म्हणतात.

३)गोठ—हे एक भरीव सोन्याचं कड असतं.

४)तोडे—तोडे हे शुद्ध सोन्याचे किंवा लाल खड्यांचे भरीव असे असतात.

५) गजरा–मोत्यांचे सर गुंफुन त्याला मनगटात बांधले जाते.

६) जवे–जव या धान्या सारखे सोन्याचे मणी एकमेकांना गुंफून त्याला मनगटात घातले जाते.

याशिवाय शिंदेशाही तोडे, सोन्याच्या बांगड्या, कंगन, कंकाळ असे अनेक दागिने हातामध्ये घालण्यासाठी मिळतात. त्यावर केलेले नक्षीकाम सुद्धा फार अप्रतिम असते.

विशेष म्हणजे मनगटावर घालण्याच्या दागिन्यांचा एक विशिष्ट क्रम सुद्धा असे.

*बोटातले दागिने—-

बोटांमध्ये साधारणतः अंगठी घातली जाते. यामध्ये अनेक प्रकार आपल्याला पारंपारिक दागिन्यांमध्ये सापडतात.

नाग, मुद्रा, दशांगुळे, वेढा, वळं, दर्भाची अंगठी, नग, खडे, हल्ला असे अनेक बोटा मध्ये घालण्याचे  पारंपारिक दागिने बघायला मिळतात.

*कमरेवर घालण्याचे दागिने—(कटी भूषणे)

१) कंबरपट्टा—अतिशय जुना असा हा दागिना आहे. राज घराण्यातील स्त्रिया कंबरपट्टा घालत असत. सोन्यावर, चांदीवर सुंदर नक्षीकाम करून त्यावर हिरे जोडून अतिशय सुंदर असा कंबरपट्टा तयार केला जात असे. आजही अनेक प्रकारचे कंबरपट्ट्याचे डिझाईन सापडतात. अर्थात तयार होतात. कंबरपट्टा घातल्याने पोटाचा घेर प्रमाणात राहतो असा समज आहे.

२) मेखला —हा दागिना कंबरेच्या एका बाजूला घातला जातो. सोने चांदी व इतर धातूतही हा दागिना घडवला जातो. या दागिन्याच्या डिझाईन मध्ये वेल असतात.

३) छल्ला—हा दागिना कमरेवर अडकवला जातो. किंवा सोने किंवा चांदीत हा दागिना घडवला जातो. त्यावर विविध प्रकारचे नक्षीकाम असते.

*पायात घालायचे दागिने—-(पद्मभूषणे)

पद्मभूषणे बहुतेक चांदीचे तयार केले जातात. कारण चांदी पायाला थंड ठेवते.

१) पैंजण–पैंजण हे सोने किंवा चांदीत एक पदरी घडवलेले असतात.

२) तोरड्या–तोरड्या या जाडजूड असतात. त्यांना एकाहून अधिक पदर असतात.

३) वाळे–वाळे हे लहान मुलांच्या पायात घातले जातात. ते तांबे या धातूचे असते

४)चाळ–चाळ हे पितळे मध्ये घडवलेले असतात आणि त्यांना घुंगरू असतात. हे बहुतेक नृत्यांगना वापरतात.

५)हाताच्या बोटाप्रमाणे पायाची बोटही सजवली जातात.

पायाच्या अंगठ्यात अनवट अंगुष्टा नावाचे जाड कडे, दुसऱ्या बोटात जोडवी, तिसऱ्या बोटात विरोद्या, चौथ्या बोटात मासोळी, तर करंगळीत वेढणी घालण्याची पद्धत आहे

याशिवाय ,मंजीर, हे पायात घालण्याचे दागिने आढळतात.

तर हा लेख, महाराष्ट्रातील स्त्रियांचे पारंपारिक दागिने Traditional Jewellery of Maharashtrian women in Marathi आपल्याला कसा वाटला? हे नक्की वाचून सांगा आणि प्रतिक्रिया द्या. तसेच नवनवीन लेख आणि कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या व आमचे व्हाट्सअप चॅनेल पण जॉईन करा.

धन्यवाद!

17 thoughts on “महाराष्ट्रातील स्त्रियांचे पारंपारिक दागिने l Traditional Jewellery of Maharashtrian women in Marathi ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top