What is World Consumer Rights Day 2024 l दरवर्षी १५ मार्च ला जगभरात Consumer Rights Day म्हणजेच ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षितता याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची थीम हि आजच्या डिजिटल युगात आवश्यक आणि मार्गदर्शक ठरणारी आहे. यानिमित्ताने आज जाणून घेऊया २०२४ ची संकल्पना आणि ग्राहकांचे हक्क याबद्दलची अधिक माहिती.
जागतिक ग्राहक हक्क दिनाचा इतिहास (History of World Consumer Rights Day):
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १५ मार्च १९६२ या दिवशी अमेरिकन काँग्रेस समोर भाषण करताना पहिल्यांदाच ग्राहक्कांच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केला. ग्राहकांच्या हक्काचा मुद्दा मांडणारे ते पहिले जागतिक कीर्तीचे नेते होते. यानंतर ग्राहक चळवळींनी जोर धरला आणि १५ मार्च १९८३ रोजी पहिला ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १५ मार्च ला जगभरात हा ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. (History of World Consumer Rights Day)
जागतिक ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व (Significance of World Consumer Rights Day):
ग्राहक हा राजा आहे असे म्हटले जाते, त्यामुळे त्या राजाला भुलवण्यासाठी अनेक कंपन्या नवनवीन युक्त्या शोधत असतात. त्याला खरेदीसाठी प्रवृत्त करायला अनेक आमिषे दाखवली जातात. या सगळ्या मध्ये अनेक वेळा ग्राहक हा फक्त नावापुरताच राजा बनून राहतो आणि त्याची फसवणूक होते. या सर्व गोष्टींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि त्यांच्यासाठी बनवले गेलेले कायदे यांची माहिती असणे गरजेचे आहे. आणि हेच जनजागृतीचे काम जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर केले जाते.
भारतातील ग्राहक हक्क कायदा (Indian Consumer Protection Act):
भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात ग्राहक हक्क संरक्षणासाठी पुढाकार घेतला. यानंतर २४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी या ग्राहक हक्क संरक्षण विधेयकावर सही केली आणि देशात ग्राहक हक्क कायदा अस्तित्वात आला. परंतु हा कायदा आणि सुव्यवस्था जोपासण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मदत करणे आवश्यक आहे तरच ग्राहक हा खऱ्या अर्थाने राजा बनेल आणि यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्राहकांचे हक्क आणि कायदा पोहोचवणे गरजेचे आहे.
२०२४ ची संकल्पना:
ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या थिम्स असतात. २०२४ ची थीम आहे, “ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता” “Fair and Responsible AI for Consumers”. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आविष्काराने मागच्या वर्षी डिजिटल जगात क्रांती घडवून आणली. AI हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होऊ लागला आहे. अशातच याच्या वापराने उद्भवणारे ग्राहकांसाठीचे धोके लक्षात घेता आत्तापासूनच ही AI प्रणाली नैतिकतेने वापरली जाणे गरजेचे आहे. ह्या वर्षीची संकल्पना हे अधोरेखित करते कि ग्राहक संरक्षण कायद्याने वेगवान तंत्रज्ञान बदल लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाऊले उचलली पाहिजेत. तसेच ही AI प्रणाली पारदर्शक आणि नैतिकपणे वापरली जात आहे ना याकडे ही लक्ष दिले पाहिजे. (Theme of World Consumer Rights Day 2024)
भारतातील ग्राहकांचे हक्क: (Consumer Rights in India)
भारतीय ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार प्रत्येक ग्राहकाला पुढील ६ मूलभूत हक्क दिले गेले आहेत.
- सुरक्षिततेचा हक्क:
सुरक्षिततेचा अधिकार ग्राहकांना त्यांच्या आयुष्यासाठी किंवा मालमत्तेसाठी घातक ठरणारी उत्पादने, जाहिराती आणि सेवा यापासून संरक्षण देतो. वस्तू विकत घेताना फक्त उपयुक्तता हा निष्कर्ष न लावता त्या वस्तूची सुरक्षितता हि बघून घ्यावी. विद्युत उपकरणे किंवा गॅस सिलेंडर घेताना ही काळजी घेणे आवश्यक ठरते. ग्राहकांनीही शक्यतो ISI किंवा AGMARK मान्य वस्तू खरेदी कराव्या. या वस्तूंच्या वापरामुळे जर काही जीवित किंवा वित्त हानी झाली तर कंपनी ला नुकसान भरपाई देणे गरजेचे ठरते. (Right to be Protected)
- माहितीचा हक्क:
एखाद्या उत्पादन किंवा सेवेबद्दल सगळी इत्यंभूत माहिती जसे की त्याची गुणवत्ता, प्रमाण, शुद्धता, किंमत, मिळवणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. अनुचित व्यापार पद्धती पासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा हक्क ग्राहकांना दिला गेला आहे. त्यामुळे कुठलाही व्यापारी किंवा दुकानदार ही माहिती मिळवण्याचा अधिकार नाकारू शकत नाहीत. उत्पादकांनी आपल्या उत्पादनाशी संबंधित सर्व माहिती उत्पादनाच्या लेबलवर आणि पाकिटावर देणे बंधनकारक आहे. (Right to be informed)
- उत्पादन/सेवा निवडीचा हक्क:
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ग्राहकांना एकाच उत्पादनासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु हे सर्व पर्याय वाजवी किमतीत ग्राहकांना उपलब्ध व्हावे आणि त्यातून त्यांना त्याच्या आवडीने वस्तू अथवा सेवा निवडता यावी याकडे हा अधिकार लक्ष देतो. कुठलाही दुकानदार किंवा व्यापारी तुम्हाला एक विशिष्ट उत्पादन निवडण्यास भाग पडू शकत नाही. तसेच एखादे उत्पादन किंवा सेवा यामध्ये जर व्यापाऱ्याची मक्तेदारी असेल तरी त्याने ते वाजवी दारात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. (Right to choose)
- तुमचे मत मांडण्याचा हक्क:
जर एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यावर किंवा घेत असताना तुम्हाला असे वाटले कि तुमची फसवणूक झाली आहे तर त्याबद्दल तुम्ही लगेच आपले मत योग्य त्या न्यायालयात मांडू शकता. हा अधिकार तुम्हाला कायद्याने दिला आहे. ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार मंच आणि ग्राहक न्यायालये स्थापन केली आहेत. तुम्ही आपली तक्रार या तक्रार निवारण मंच किंवा ग्राहक हक्क न्यायालयात मांडू शकता. तसेच आपली तक्रार सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी आपण ग्राहक मंचाची सुद्धा मदत घेऊ शकतो. (Right to be heard)
- तक्रार निवारण करून घेण्याचा हक्क:
प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती, अनुचित व्यापार पद्धती किंवा ग्राहकांचे अनैतिक शोषण याविरोधात तक्रार करण्याचा आणि आपली तक्रार निवारण करून घेण्याचा पूर्ण अधिकार ग्राहकाला आहे. जर तक्रार उचित असेल तर त्याचे १००% निवारण केले जाईल असा हक्क ग्राहकाला कायद्याने दिला आहे. ही तक्रार लहान किंवा मोठ्या कुठल्याही स्वरूपाची असू शकते. नुकसान भरपाई चे स्वरूप हे पैशांच्या स्वरूपात असू शकते किंवा सदोष उत्पादने दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येऊ शकतात. (Right to redressal)
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार:
ग्राहकांनी आपल्या हक्कांबद्दल नेहमीच जागरूक असले पाहिजे. आपली फसवणूक होऊ नये म्हणून कायद्याने आपल्याला दिलेले अधिकार समजून घेणे आणि त्यासाठी आवश्यकता असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे हा सुद्धा आपला एक हक्क आहे. जर आपल्याला आपले हक्क माहित असतील तर आपण योग्य ती कार्यवाही करू शकतो. यासंबंधी जनजागृती करण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत असतात. सरकारने शालेय आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही या विषयाचा समावेश केला आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा या विषयांवर शिबीर आणि कार्यशाळा घेत असतात. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सरकारने २००५ साली “जागो ग्राहक जागो” (Jago Grahak Jago) हे अभियान सुद्धा चालू केले होते. World Consumer Rights Day 2024
ग्राहकांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या: (Consumer Responsibilities)
कायद्याने जसे ग्राहकाने हक्क दिले आहेत तसेच ग्राहकांची काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने आपली पुढील कर्तव्ये नीट पार पडली पाहिजेत तरच आपण कायद्याने दिलेले अधिकार योग्य रीतीने वापरू शकतो.
- जागरूक राहणे: खोट्या जाहिराती आणि आमिषे यावर विश्वास न ठेवता प्रत्येक ग्राहकाने आपल्या उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षा तपासून मगच खरेदी करावी. शक्यतो ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, AGMARK आणि ISO प्रमाणित उत्पादनेच विकत घ्यावीत.
- स्वतंत्रपणे विचार करणे: ग्राहकांना आपल्या गरजा आणि आवडी याविषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन कमी दर्जाच्या वस्तू विकत घेणे ग्राहकांनी टाळले पाहिजे.
- तक्रार करणे: जेव्हा ग्राहक एखाद्या खरेदीबद्दल असमाधानी असतो तेव्हा त्याने त्या विक्रेत्या विरोधात संबंधित न्यायालयात तक्रार करणे गरजेचे आहे. तरच तो आपल्या तक्रार निवारण हक्काचा फायदा घेऊ शकतो. तसेच असे केल्याने तो भविष्यात अनेक ग्राहकांना अशा फसव्या विक्रेत्यांपासून वाचवू शकतो.
- नैतिकता: ग्राहकांनी निष्पक्ष आणि इमानदार असले पाहिजे. आपल्या वैयक्तिक कारणासाठी आपल्या हक्काचा गैरफायदा घेणे आणि उगाच एखाद्या व्यापाऱ्याच्या विरोधात तक्रार करणे टाळले पाहिजे. तसेच त्यांनी कुठल्याही गैरव्यवहार किंवा काळाबाजार यामध्ये सहभागी होऊन त्याला चालना देणे टाळले पाहिजे.
चला तर मग या जागतिक ग्राहक हक्क कायदा दिनी प्रयत्न करूया एक ग्राहक म्हणून जास्त सजग राहण्याचा. जेणेकरून येत्या काही वर्षात जागतिक बाजारपेठ ही अधिक योग्य आणि सुरक्षित होऊ शकेल. जागो ग्राहक जागो !!!
आपल्याला ही ग्राहक हक्क कायदा दिनाविषयीची World Consumer Rights Day 2024 माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण