मार्च महिन्यात जन्मलेले प्रमुख क्रिकेटपटू l Top Cricketers born in March

WhatsApp Group Join Now

Top Cricketers born in March :मार्चमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या, समाजप्रिय असतात असे म्हटले जाते. सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.

विजय हजारे :- (११ मार्च १९१५) सांगली येथे जन्म, तर बडोद्यात ९० व्या वर्षी मृत्यू. भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आणि चांगले मध्यमगती गोलंदाज. त्यांचा कालावधी हा भारताचा या खेळातील सुरुवातीचा काळ असल्याने नावावर तीसच कसोटी लागल्या. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतके तसेच ब्रॅडमन यांना दोन वेळा बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १८,७४० धावा आणि ५९५ बळी आहेत.       

ईफ्तेकार अली खान पतौडी :- (१६ मार्च १९१०) ईफ्तेकार पतौडी हे एकमेव असे खेळाडू आहेत की ज्यांनी भारत व इंग्लंड या दोन्ही देशांचे (प्रत्येकी ३) कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे, तसेच त्यांनी भारताचे त्या तीनही कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते. ते पतौडी या संस्थानचे नवाब होते. पुढे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेले मन्सूर अली खान पतौडी हे त्यांचे पुत्र होत.

पॉली उम्रीगर :- (२८ मार्च १९२६) सोलापूर येथे जन्म, तर मुंबई ही कर्मभूमी. मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज. ५९ कसोटीत ३६३१ धावा व ३५ बळी. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १६,१५५ धावा आणि ३२५ बळी आहेत. सुनील गावस्करच्या उदयापर्यंत फलंदाजीचे अनेक भारतीय विक्रम पॉलीकाकांच्या नावावर होते.        

एकनाथ सोलकर :- (१८ मार्च १९४८) ह्या मुंबईकर अष्टपैलू खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षाही आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने आपला काळ गाजवला. चंद्रा, बेदी, प्रसन्ना आणि व्यंकट ह्या जादुई फिरकी चौकडीला आपल्या चपळ, अविश्वसनीय क्षेत्ररक्षणाने अनेक बळी मिळवून देत सोलकरने भारताच्या अनेक विजयांत मोलाचा हातभार लावला. भारताच्या स्वातंत्र्यदिनानंतर जन्मलेला व भारतासाठी कसोटी खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.             

विवियन रिचर्डस :- (७ मार्च १९५२) अॅंटिग्वा येथे जन्मलेला हा वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज मैदानावर एखाद्या राजासारखा वावरे. १९७३ ते १९९१ या काळात त्याने आपल्या आक्रमक खेळाने आणि राजेशाही व्यक्तिमत्वाने, क्रिकेटपंडितांसह सामान्य क्रिकेटरसिकांपासून ते सचिन तेंडुलकर सारख्या तत्कालीन युवा क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांना वेडावून टाकले.       

हाशीम अमला :- (३१ मार्च १९८३) दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जन्मलेला हा भारतीय वंशाचा अतिशय सातत्यपूर्ण फलंदाज. कसोटीत ९००० च्या वर आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ८००० पेक्षा अधिक धावा. पूर्ण टक्कल, भरघोस दाढी आणि बुद्धाप्रमाणे शांत चेहरा यामुळे हा खेळाडू मैदानावर लक्ष्य वेधून घेई.           

इंझमाम उल हक :- (३ मार्च १९७०) पाकिस्तानातील मुलतान येथे जन्म. कसोटीत ८००० पेक्षा अधिक तर वन-डे मध्ये ११,००० हून जास्त धावा. गुटगुटीत शरीर, संथ हालचाली, व अनेकदा धावबाद होणे यामुळे हा जबरदस्त फलंदाज अनेकदा तज्ञांच्या टीकेचा व रसिकांच्या चेष्टेचा विषय बने.

ऑल्वीन कालीचरण :- (२१ मार्च १९४९) भारतीय मूळ असलेल्या या आकर्षक डावखु-या फलंदाजाचा जन्म वेस्ट इंडिज मधील गयाना बेटावरील. पदार्पणाच्या पहिल्या दोन कसोटीत शतक झळकावले. एकूण ६६ सामन्यांत ४००० पेक्षा जास्त धावा.         

शाहिद आफ्रिदी :- (१ मार्च १९८०) पाकिस्तानातील खैबर प्रांतात जन्म. अति-आक्रमक, बेशिस्त फलंदाजी आणि मध्यमगतीने लेग-स्पिन गोलंदाजी करणारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणारा अस्सल अष्टपैलू क्रिकेटर. टी-२० क्रिकेटच्या जन्माआधी त्या शैलीने फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळख. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,००० हून अधिक धावा आणि ५०० हून जास्त बळी.       

नासिर हुसैन :- (२८ मार्च १९६८) मद्रास (आताचे चेन्नई) येथे जन्मलेल्या नासेरचे वडील तमिळ-भारतीय-मुस्लिम होते तर आई ब्रिटिश. ईसेक्स परगण्याच्या हुसैनने इंग्लंडकडून ९६ कसोटी सामने खेळले आणि त्यात तब्बल ४५ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्याचबरोबर तो ८८ एकदिवसीय सामने खेळला आणि त्यातील ५६ सामन्यांत त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले. 

रंगना हेराथ :- (१९ मार्च १९७८) श्रीलंकेच्या ह्या डाावखु-या फिरकी गोलंदाजाने ९३ कसोटीत तब्बल ४३३ बळी मिळवले. पण फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन ह्याच्या छायेखाली त्याची कामगिरी झाकोळली गेली.     

ईतर काही प्रमुख खेळाडू l International Cricketers born in March

अँड्रयू स्ट्राऊस = (२ मार्च १९७७) – इंग्लंड – सलामी फलंदाज व कप्तान – १०० कसोटी / १२७ वन-डे

रॉस टेलर = (८ मार्च १९८४) – न्यूझीलंड – मधल्या फळीतील फलंदाज – ११२ कसोटी / २३६ वन-डे

क्रिस वोक्स = (२ मार्च १९८९) – इंग्लंड – अष्टपैलू (वेगवान गोलंदाज + उपयुक्त फलंदाज) – ४८*  कसोटी / १२२* वन-डे / ३३* टी-२० 

हिथ स्ट्रीक = (१६ मार्च १९७४) – झिंबाब्वे – वेगवान गोलंदाज व कप्तान – ६५ कसोटी / १८९ वन-डे

शाकीब अल हसन = (२४ मार्च १९८७) – बांगलादेश – मधल्या फळीतील फलंदाज, डावखुरा फिरकी  गोलंदाज व कप्तान – ६६* कसोटी / २४७* वन-डे / ११७* टी-२०

डिन जोन्स = (२४ मार्च १९६१) – ऑस्ट्रेलिया – मधल्या फळीतील फलंदाज – ५२ कसोटी / १६४ वन- डे – १९८६ च्या टाय-टेस्ट मध्ये भारताविरुद्ध द्विशतक

ब्रुस रीड = (१४ मार्च १९६३) – ऑस्ट्रेलिया – डावखुरा वेगवान गोलंदाज – २७ कसोटी / ६१ वन-डे – आपल्या ६ फूट ८ इंच उंचीने व कृश शरीरयष्टिने लक्ष्य वेधून घेई  

हसन रझा = (११ मार्च १९८२) – पाकिस्तान – मधल्या फळीतील फलंदाज – १४ व्या वर्षी कसोटी  पदार्पण करून विश्वविक्रमाची नोंद 

इम्रान ताहिर = (२७ मार्च १९७९) – दक्षिण आफ्रिका – (मूळ पाकिस्तानी) – लेग स्पिनर – २० कसोटी / १०७ वन-डे / ३८ टी-२०    

मोहसीन खान = (१५ मार्च १९५५) – पाकिस्तान – सलामी फलंदाज – ४८ कसोटी / ७५ वन-डे – काही  बॉलीवूड चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका           

रॉजर हार्पर = (१७ मार्च १९६३) – वेस्ट इंडिज – उंचापूरा फिरकी गोलंदाज – २५ कसोटी / १०५ वन-डे ग्रॅमी स्वान = (२४ मार्च १९७९) – इंग्लंड – फिरकी गोलंदाज – ६० कसोटी, २५५ बळी / ७९ वन-डे       

नरी कॉन्ट्रॅक्टर = (७ मार्च १९३४) – भारत – सलामी फलंदाज व कप्तान – ३१ कसोटी – १९६२ साली   – वेस्ट इंडिजच्या ग्रिफीथचा बिमर डोक्याला लागल्याने काही काळ बेशुद्ध, पण  सुदैवाने मृत्यूच्या दाढेतून परत  

जयसिंहा = (३ मार्च १९३९) – भारत – सलामी फलंदाज – ३९ कसोटी – आकर्षक व्यक्तिमत्वाप्रमाणेच   देखण्या फलंदाजीमुळे लोकप्रिय     

पार्थिव पटेल = (९ मार्च १९८५) – भारत – यष्टीरक्षक – २५ कसोटी / ३८ वन-डे / २ टी-२०          

अब्बास अली बेग = (१९ मार्च १९३९) – भारत – मधल्या फळीतील फलंदाज – १० कसोटी – पदार्पणाच्या कसोटीत शतक – कसोटी खेळताना मैदानावर तरुणीकडून चुंबन  घेतला गेलेला पहिला भारतीय खेळाडू  

रंगा सोहोनी = (५ मार्च १९१८) – भारत – फलंदाज व मध्यमगती गोलंदाज – ४ कसोटी

उमेश कुळकर्णी = (७ मार्च १९४२) – भारत – डावखुरा मध्यमगती गोलंदाज – ४ कसोटी        

सलिल अंकोला = (१ मार्च १९६८) – भारत – वेगवान गोलंदाज – १ कसोटी / २० वन-डे – काही हिन्दी चित्रपट व मालिकांमधून अभिनय       

केदार जाधव = (२६ मार्च १९८५) – भारत – मधल्या फळीतील फलंदाज – ७३ वन-डे / ९ टी-२०   

मित्रहो, तुम्हाला क्रिकेटबद्दलची Top Cricketers born in March ही माहिती आवडली असेल अशी आशा आहे. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा. धन्यवाद!

10 thoughts on “मार्च महिन्यात जन्मलेले प्रमुख क्रिकेटपटू l Top Cricketers born in March”

  1. नरेश धाकु पवार

    मस्तच गुरू सर आपणं खुपचं अभ्यासू आहात. तुमचा दांडगा अभ्यास आहे.. गर्व आहे आम्हाला की आपणं एक मराठी
    अंतर्यामी असल्याचा आणि आमच भाग्य आहे.आम्हाला बँकेच्या माध्यमातून
    आपला सहवास लाभला .

  2. अभ्यास पूर्वक,माहितीपूर्ण, आणी सुरस लेख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top