मराठी कथा- नव्याने जुळले नाते मैत्रीचे

WhatsApp Group Join Now

ऐश्वर्या स्टँडवर उभी होती. ती तिच्या गावी आली होती. अजून गाडी यायची होती. आज ती तिच्या नवऱ्यासोबत, मुलीसोबत लकवर येवून थांबली होती. तिचे मन भूतकाळात गेले. 

“ही अजून कशी आली नाही… नेहमी कसं उशीर होतो हिला?” सायली वैतागून गेली होती. 

“सॉरी…. सॉरी….” ऐश्वर्या धापा टाकतच तिच्या समोर आली. दोघी स्टँडवर होत्या. 

“आता बस गेली असती म्हणजे?” सायली. 

“अजून वेळ आहे गं तूच लवकर येवून बसतेस.” ऐश्वर्या थोडी चिडत म्हणाली. 

“माझं घर लांब आहे म्हणून मी लवकर निघते.”

“ते ही आहेच..” ती तो विचार करत हळवी झाली.

“ऐशू….कुठे हरवली?” प्रदीप म्हणजे तिच्या नवर्‍याने तिला विचारले. 

“काही नाही….” ती अस्वस्थ झाली. 

“सायली ची आठवण आली?” त्याने विचारले. 

“तुम्हाला कसं समजलं?” 

“मला माहीत आहे तुमची मैत्री किती घट्ट होती ते. पण…. घरच्या वादामुळे तू तिला साधं बघू ही शकत नाहीस. त्यात आपण इथे राहत ही नाही.”

“मला सायली ला भेटायचे आहे. किती वर्षं झाली मी तिला साधं डोळेभरून बघितलं ही नाही…. भांडणं कोणाची आणि भरडले जातंय कोण? कधी संपणार हे सगळं?” ऐश्वर्या आता चिडली होती. 

“तू शांत हो…. आपण स्टँडवर आहोत. बाबांना नाही चालत त्यांच्यासोबत बोललेलं… त्याला मी काय करू?”

“आहो… पण माझी काय चूक आहे? सायली ची काय चूक आहे या सगळ्यात… कधीतरी बायकोचा विचार करा. दोन घरं सोडून तिचे घर आहे. पण बोलणं तर दूर बघू ही देत नाहीत. त्यात तुमची नोकरी तिकडे. सहा महिन्यातून एकदा येतो. तरी तिला भेटता येत नाही. फोन करायचा नाही.” 

“मी समजू शकतो…”

“नाही समजू शकत…. जर समजत असाल तर आता मला तिला भेटायला घेवून जा….”

“हे शक्य नाही.”

ऐश्वर्या शांत बसली. तिने एक रागीट नजर त्याच्यावर टाकली. आणि समोर बघू लागली. तोपर्यंत तिचे लक्ष समोर गेले. ती सरळ त्या दिशेला निघाली. पळत जावून तिने सायली ला मागे खेचले. समोरून वेगात गाडी निघून गेली. सायली चे लक्षच नव्हते. 

“वेडी आहेस का तू? अजून ही अशी कशी चालतेस…. लागलं नाही ना तुला?” ऐश्वर्या काळजीने ओरडू लागली. सायली फक्त तिचे बोलणे ऐकत होती. आज कितीतरी दिवसांनी ती तिच्या जिवलग मैत्रिणीचा आवाज ऐकत होती. 

“अशी बघत काय बसली…. सायू बोल न काहीतरी….” ऐश्वर्या तिला हलवू लागली. 

“ऐशू….” स्टँडवरच सायली ने तिला मिठी मारली. आणि रडू लागली. त्या दोघीही रडत होत्या. आणि त्यांचे नवरे यांना बघत होते. 

“ऐश्वर्या….” प्रदीप तिला हाक मारतो. ती बाजूला होते. 

“तू ही आहेस इथे…. काळजी घेता येत नाही हिची? माहीत आहे ना तुला तिची सवय?” ऐश्वर्या आपला मोर्चा उमेश कडे वळवते. उमेश – सायलीचे लव्ह मॅरेज झाले होते. 

“अजून तशीच भांड तू….” उमेश म्हणतो. तशी ऐश्वर्या त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागते. 

प्रदीप त्या तिघांकडे बघत होता. प्रदीप चे शिक्षण बाहेर झाले होते त्यामुळे त्याला जास्त माहिती नव्हती. “उम्या… मी भांडत नाही. तूच सुरवात करतो….” ती चिडून म्हणते. तिच्या तोंडून हे ऐकून सायली डोक्यावर हात मारून घेते. 

“तुम्ही दोघे शांत बसाल का?” सायली म्हणते. 

“ह्याला सांग ना तू… लगेच नवर्‍याची बाजू घेते.”

“तू मैत्रिणीची बाजू घे”

“तुमचं चालू द्या.” म्हणून सायली बाजूला होते. ते दोघे वाद घालत होते. मधूनच उमेश चे लक्ष सायली कडे गेले. तो तिच्याकडे बघतो. सायली त्या दोघांना रागाने बघत होती. उमेश कुठे बघतो आहे म्हणून ऐश्वर्या ही बघते. सायली ला असं बघून ती हसू लागते. उमेश ही हसतो. 

“ऐश्वर्या काय सुरू आहे हे…” प्रदीप वैतागून विचारतो. त्याला काहीच समजत नव्हते. हे दोघे भरपूर हसत होते. 

“हे कायम असेच करतात. आधी भांडतात मग एकत्र होतात. मला एकटे पाडतात.” सायली दातओठ खात बोलते. त्यावर परत दोघे हसतात. 

“तू उमेश ला….” प्रदीप 

“भांडनातून तुम्हाला वेळ मिळाला तर कळेल ना…. तुमच्यामुळे आम्ही तिघे दूर झालो. लग्न झाल्यापासून खूप.” ऐश्वर्या चिडली. 

“ह्यात त्याची काहीच चूक नाहीये. माझे बाबा आणि ह्याचे बाबा दोघे बोलत नाहीत. त्यांच्यात वाद आहेत.”

“अरे म्हणून आपण का दूर राहायचे. किती खुश होते मी माहीत आहे लग्न ठरले तेव्हा… एका गावातच आम्ही दोघी आहोत ते ही चार घरे सोडून… पण… ह्यांची भांडणे! काहीही कारण नसताना. ती कधीच्या काळात झालेली भांडणे अजून धरून ठेवली आहेत. तुमचे वाद तुमच्या पुरते ठेवा ना… पुढच्या पिढीला का वेठीला धरता. तू काय नि सायली काय… माझे खास मित्र आहात. पण तुझ्यासोबत माझी मैत्री आहे हे घरात कुणालाच माहीत नाही. का तर फक्त ह्यांचे वाद आहेत म्हणून. सायली सोबत मैत्री आहे समजल्यावर गोंधळ घातला घरात. 

सासरी आल्यावर सगळं विसरून जायचे. ह्याला काय अर्थ आहे? चार वर्षे झाली साधं बघितलं ही नाही मी…. सायली प्रयत्न तरी करते. पण उम्या तू साधी ओळख ही दाखवली नाहीस कधी. हीच आपली मैत्री?” 

“ऐश्वर्या खूप वाटते गं तुझ्यासोबत बोलावे पण… शेवटी तू एक विवाहित आहेस. त्यात आपल्या घरात असलेले वाद, त्याची झळ तुला बसू नये म्हणून नाही बोलत मी. आज तू स्वत:हून बोलली म्हणून मी धाडस केले. आपण आपल्या घरातील मोठ्यांचे ऐकून आपले मन मारत आलो.”

“मी खूप वाद घातले आहेत उमेश सोबत. एकदा मला तुला भेटव म्हणून. दोन वेळा मी ह्याला न सांगता आले होते. पण तुझा पत्ता नाही. म्हणून भेट नाही झाली.” सायली म्हणाली. 

“ऐश्वर्या उशीर होतोय. बस लागली आहे.” प्रदीप 

“तुम्ही जावा. आज मी माझ्या मैत्रिणीला भेटून, इतक्या वर्षांच्या गप्पा मारून च येणार. तुम्ही ह्या बस ने घरी जावा.” असं म्हणून ती सायली चा हात धरून त्यांच्या कॉलेज च्या रस्त्याला लागली. उमेश आणि प्रदीप एकमेकांकडे बघत होते. 

“प्रदीप…” उमेश त्याला हाक मारतो. 

“उमेश…. आपण पण बोलूया….” प्रदीप त्याचा हात धरून त्यांच्या मागे जातो. 

“प्रदीप, तुझे आणि माझे कधीच भेटायचे धाडस झाले नाही. तू माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठा असलास तरी आपली मैत्री होती. त्या भांडणानंतर तू शिकायला बाहेर गेला तो गेला. तू जसा गेलास तशी आपली मैत्री सुटली रे. उरले ते फक्त वाद.” उमेश जुने दिवस आठवून म्हणाला. 

“हो… सतत बाबांची भीती होती. त्यांना आवडणार नाही. म्हणून मी घाबरून कधीच तुला भेटलो नाही. तिला सायली वहिनीला भेटू दिले नाही. दरवेळी गावात आलो की आमचे वाद होत होते. खूप वर्षांपूर्वी झालेले वाद अजून का धरून ठेवता म्हणून. तुझ्या आईबाबांना ती भेटून आली होती. त्यावेळी तिला बाबा खूप बोलले होते. ते नाही आवडलं मला. म्हणून मी तिला कायम अडवू लागलो. आजही ती जुने दिवस आठवून रडत होती. बसची वाट बघताना ती त्या जुन्या दिवसांत रमली.”

“हो. ते दिवस भारीच होते. कॉलेज मध्ये असताना आमची मैत्री झाली. मी सायली च्या प्रेमात पडलो. आमच्या मदतीला कायम ती असायची. तिनेच पुढाकार घेवून आमचं लग्न जमवून आणलं. तिच्यामुळे आम्ही एकत्र आहोत. ती आणि सायली एकमेकींचा जीव आहेत. पण ह्या वादामुळे त्या दुरावल्या. एकाच गावात असून साधं भेटता येत नाही याचा खूप त्रास होतो रे. सायली किती रडत असते त्यावरून.”

“आपण करूया नव्याने मैत्री?” प्रदीप 

“हो! नक्कीच. जुने वाद विसरून नवी सुरवात केलीच पाहिजे. मागच्या पिढीत वाद होते ते आपण पुढे न्यायलाच पाहिजे असे थोडीच आहे. आपली मैत्री त्या वादामुळे तुटली. ह्यात आपली काहीच चूक नव्हती. इतके दिवस मोठ्यांचे ऐकले. आता आपल्या मनाचे ऐकू.” उमेश म्हणतो. 

“ठीक आहे. आज आपण एकत्रच जावू. तिकडे बघ. आपल्या दोघांची मुले कशी एकत्र बसली आहेत. त्यांना आपल्यातील वाद न सांगता आपली मैत्रीच सांगू.” प्रदीप हसत म्हणाला. 

“त्या दोघींना भान आहे का बघ.” उमेश 

“हो… नवरा, मुलांना विसरूनच गेल्या.”

“सायली….”उमेश हाक मारतो. ह्या दोघांना एकत्र बघून सायली उमेश कडे बघते. 

“तू कायम विचारत होतीस ना शाळेत माझा कोण मित्र होता जो कॉलेज ला बाहेर गेला…”

“हो अजून तू ते नाव कधीच सांगितले नाहीस.”

“तो प्रदीप. आम्ही दोघे खास मित्र होतो.”

“काय?”ऐश्वर्या चकित होवून प्रदीप ला विचारते.

“हो. मी अकरावी ला बाहेर गेलो. आणि इकडे वाद झाले. बाबांनी भेटायला, बोलायला बंदी घातली. ते दिवस असेच होते. मोठे सांगतात म्हणून मी बोलणे बंद केले. तिकडेच कॉलेज झाले, नोकरी लागली. तशी मैत्री मागे पडली. आज फक्त तुझ्यामुळे इतक्या वर्षानी आम्ही बोललो.” तो ऐश्वर्या जवळ येत म्हणाला. 

“हे असं काही असेल याची कल्पनाच नाही. असे कसे तुम्ही दूर राहिलात दोघे? माझा जीव तीळ तीळ तुटत होता.” ऐश्वर्या 

“माहीत नाही. पण दूर राहिलो. तू कायम म्हणत होती एक ही मित्र कसा नाही म्हणून. ह्याच्या नंतर कोणी मित्रच नाही. जे होते ते फक्त अभ्यासापुरते होते. मग मैत्री दूर राहिली. खूप आठवण येत होती याची. परंतु कधीच धाडस झाले नाही.”

“मग आज हे धाडस कसे झाले?” ती काहीशा रागानेच विचारते. 

“आज तू धाडस केले नसते तर कदाचित झालेही नसते. तू कसला ही विचार न करता सायली वहिनी कडे गेलीस. त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला भीती दिसली. आधीच तू जे बोलत होतीस त्याचा विचार करत होतो. नंतर तुम्हाला एकत्र बघून ही उमेश काहीच बोलला नाही. तो तर तुझ्यासोबत मस्त वाद घालत होता. पण त्यात कुठेही राग नव्हता. जुने मित्र वाद घालत होते असच वाटलं. तू उम्या म्हणालीस आणि मी समजून गेलो तुमची मैत्री आहे. कारण ह्याला फक्त जवळचेच लोक उम्या म्हणून हाक मारतात.”

“नशीब तेवढं तरी आठवलं तुला..” उमेश म्हणाला. 

“अजून तसाच बोलतो.” प्रदीप हसला. 

“इथून पुढे काय? असं चोरून भेटणार?” सायली 

“नाही. आज आपण आपल्या घरात आपल्या नव्याने जुळलेल्या मैत्री बद्दल सांगू.” प्रदीप ठामपणे म्हणाला. 

“चक्क तुम्ही हे बोलत आहात?” ऐश्वर्या 

“हो… नाही दूर राहवत मित्रापसून. नको ते वाद. मिटवूया हे सगळं… कंटाळा आला या सगळ्याचा.”

“घरचे मान्य करतील? काका काकू काहीच म्हणणार नाहीत. पण आईबाबा…”

“त्यांना पटवून देवू. त्यांचा विरोध असला तरी हे नाते आता ही दोस्ती तुटायची नाही….” प्रदीप उमेशजवळ जातो. दोघे एकमेकांना मिठी मारतात. तसं ह्या दोघी ही एकत्र येतात. त्यांना बघून काहीही न कळता सायली आणि ऐश्वर्या ची मुलगी ही मिठी मारते. ते बघून सगळेच हसतात. 

आज नव्याने मैत्रीचे नाते जोडले गेले. 

खूप कुटुंबात हे आपण पाहतो. मोठ्या माणसांच्या वादात दुसरी पिढी मैत्रीसारखे नाते गमावून बसते. दुसर्‍या पिढीकडे वाद का सोपवायचे? मोठ्यांचे वाद दुसर्‍या पिढीने का पुढे न्यायचे? आंधळेपणाने वाद पुढे का न्यायचे? त्यापेक्षा मैत्रीचे नाते पुढे नेवूया. त्यात कसलाही स्वार्थ नसतो. मैत्री निरपेक्ष असते. वाद की मैत्री? यात मैत्री निवडावी असे मला वाटते. जुने आहे ते विसरून नवी सुरवात करूच शकतो.

धन्यवाद!

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा Whatspp ग्रुप ही जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top