हलकी फुलकी रुचकर कौटुंबिक कथा -बिर्याणी

WhatsApp Group Join Now

बराच वेळ झाला.  गीता रांगेत उभी होती. चिकन सेंटर समोर.  आजूबाजूला आणखी काही दुकाने होती चिकनची.  पण सगळीकडे हीच गर्दी.  साहजिक आहे.  आज रविवार ना!  भाजी मार्केटही गर्दीने फुलले होते.  तीच गत मासळी बाजाराची.  मासे तर इतके महाग आहेत.  पाहुणे येणार असतील तर चिकनच बरे पडते.  तिखट जाळ रस्सा केला कि हव्या तेव्हढया भाकऱ्या चापता येतात.  सर्वांना पुरवठ्यालाही बरे पडते.  नाहीतर माशाचे कालवण! पटकन संपते.  भाकऱ्या कमी कालवणच जास्त ओरपले जाते.  अशावेळेस घरच्या बाईची पंचाईत.  कालवण काही पुरत नाही, खाणारे ‘पुरे’ म्हणत नाहीत. 

फड् फड् फड्… दुकानदाराने कोंबडी उचलली.  वजन काट्यावर ठेवली.  “दीड किलो”. गीताने “ठीक आहे” म्हणून मान डोलावली आणि पर्स उघडली.  कोंबडीचा कलकलाट आता शांत झाला होता आणि नुसताच खट् खट् खट् आवाज येत राहिला.   अशावेळेस मात्र गीताच्या अंगावर शहारे येतात. आज वीस वर्षे होऊन गेली तिच्या लग्नाला.  किती तरी वेळा आली असेल ती येथे चिकन घ्यायला! पण हा शहारा काही जात नाही.  दरवेळेस तो येतोच.  नेहमी सारखा. न बोलावता.  अंगावर काटा आला की आपली त्वचाही तशीच दिसते पिसे उपटलेल्या कोंबडीसारखी.  मग अजूनच थरथर जाणवते.  जशी कोंबडी थरथरत होती.  कसायाने उचलल्या बरोबर!   ‘देवाss! नको नको ते विचार येताहेत मनात! त्यात हा नकोसा वास!  या नकोश्या संसारा सारखाच.  कधी सवय होणार आपल्याला या सर्वाची!’ गीता पुन्हा पुन्हा मनाला समजावत होती. मन थाऱ्यावर आणायचा प्रयत्न करीत होती. पण तो वास! चिकन सेंटर बाहेरचा! त्या वासाची सवय तिलाच काय कुणालाच होत नसेल!  गीता ओढणीने नाक दाबून चिकन घेऊन तिथून बाहेर पडली. 

घरी परतायला अंमळ उशीरच झाला तिला.  आज पाहुणे येणार होते जेवायला. नवऱ्याचे मित्रच! मस्त पार्टीचा बेत होता.  त्यामुळे खास बिर्याणीची फर्माईश झाली.  

तशी गीता लग्नाआधीपासूनच सुगरण होती.  आई, काकू, मावशीच्या तालमीत तयार झाली होती.  बिर्याणी म्हणजे तर तिची खासियत. पण ती व्हेज बिर्याणी!  गीताच्या माहेरी सगळेच शाकाहारी.  मसाले भात, पुलाव, आमरस पुरी, श्रीखंड, पुरणपोळी, मोदक हे पदार्थ त्यांच्याकडे खास म्हणून गणले जात.  क्वचित पाव भाजी नाहीतर व्हेज बिर्याणीचा बेत जमे.  अगदी अंड सुद्धा निषिद्ध होतं.  पण लग्नानंतर सगळंच बदललं!  गौरवशी प्रेमविवाह करताना पुढे आपल्याला सासरी स्वयंपाकही करायचाय, तो ही सर्वांच्या पसंतीचा हे ती सोयीस्कर विसरली.  किंबहुना प्रेमाच्या धुंदी पुढे बाकी सगळेच गौण समजली.  खरे तर घरच्यांनी समजावयाचा पुष्कळ प्रयत्न केला होता.  परंतु देखण्या आणि राजबिंड्या गौरवच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती.  आता जीवनात येणाऱ्या कुठल्याही वादळाला हसत हसत सामोरी जायला ती सिद्ध होती.  पण म्हणून स्वयंपाक? तो ही मांसाहारी? अरे देवा!

फड् फड् फड्… गीता दचकली.  पिशवीतून आवाज? नाही नाही.  नक्कीच भास झाला.  एव्हढयात खिडकी बाहेर कबुतर फडफडत उडाले.  हुश्श!  गीताने घटाघट पाणी प्यायले.  आणि स्वयंपाकाला लागली.  खूप सारा कांदा तळावा लागणार होता बिर्याणीसाठी.  काय तर म्हणे बरिस्ता!

‘व्हेज बिर्याणी खावी तर नलू आत्याच्या हातची.  अश्शी सुरेख बनवायची!  तळलेले पनीरचे तुकडे  आणि बटाट्याच्या काचऱ्या पेरलेली. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि खूप सारा तळलेला कांदा! वा! खाणाऱ्याचे तर बघूनच मन तृप्त व्हावे.  तिनेच तर शिकवली आपल्याला बिर्याणी.  कांदा ही कसा तर उभा उभा आणि पातळ चिरावा.  मग थोडेसे मीठ शिंपडून भरपूर तेलात मस्त कुरकुरीत फ्राय करायचा.  मगच बनतो तो बरिस्ता!’  माहेरच्या आठवणीने गीताच्या डोळ्यांत पाणी आले.   नाक ओढत डोळे पुसत ती कांदा चिरत होती.  ‘किती छान मजा यायची तेव्हा!  सणावाराला पाहुण्यांनी घर भरून जायचे.  सर्वत्र अत्तराचा, धुपाचा नि दहया-दुधा-तुपाचा गंध दरवळायचा.  शुद्ध शाकाहारी जेवणाचा गंध जसा दरवळायचा तसाच भजनाच्या आणि अभंगांच्या मैफिलींनाही रंग चढायचा. बाबांना शास्त्रीय संगीताचा गळा होता.  तर आई, काकू, आत्या साऱ्याच सुरेख भजने, ओव्या म्हणायच्या.  भराभर स्वयंपाक आटोपून त्याही मैफिलीत सामील व्हायच्या.’  गीताच्या डोळ्यांतून घळा घळा पाणी वाहू लागले.

“अगं, राहू देत तो कांदा!  आण इथे. मी चिरते,”  म्हणत सासुबाईंनी कांदे ओढून चिरायला घेतले. 

फड् फड् फड्… विचारांची शृंखला काही थांबतच नाहीये.  अजून मसाला वाटायचाय.  किलोभर बासमती धुवून भिजवायचाय.  चिकन साफ करून दही आणि मसाल्यांमध्ये मेरीनेट करून ठेवायचेय.  खरं तर आपले आई बाबा सात्विक ब्राह्मण.  आजोबा तर दशग्रंथी ब्राह्मण म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध.  घरात देवधर्म, कुलाचार, पूजाअर्चा, खूप सारे सोवळे ओवळे. या सर्वांची किती सवय होती आपल्याला आणि आज आपण काय साफ करतोय तर चिकन!

“गीतू, थांब! मी साफ करतो चिकन. तू मसाला वाटायला घे.”  गौरवच्या बोलण्याने गीता भानावर आली.  ‘हो, हो’ म्हणत तिने चटकन् आले लसूण वाटायला घेतले.   ‘सगळा जन्म मसालाच तर वाटतेय.  तसा चांगला आहे गौरव खूपच.  मला नेहमीच समजून घ्यायचा प्रयत्न करतो.  आजही किती प्रेम करतो माझ्यावर.  अगदी कॉलेज मध्ये करायचा तसाच!  पण सासू बाई! त्या मात्र जरा खटच आहे.  या तेलात तडतडणाऱ्या खडा मसाल्यांसारख्याच!  थोड्या तिखट पण सुगंधित!’

“वा! छान सुवास आला.  आज भारीच बेत जमणार असे दिसतेय.”  किचनच्या दारातूनच सासरेबुवा  डोकावले.  काकडी-टोमॅटोची पिशवी उचलत म्हणाले, “ते मेरीनेटेड चिकन मस्त परतून घे भरपूर तेलात आणि मग त्यात थोडे बटाटेही घाल बरे! मला आवडतात. तोवर मी झक्कास रायता बनवून ठेवतो.”

“बाबा, राहू दे. मी बनवेन रायता.” गीता म्हणाली. 

“अगं कशाला! त्यापेक्षा तू आईला भाताचे आधण चढवायला मदत कर.  नाहीतर एव्हढयाशा वजनाने कंबर धरून बसेल ती!”

“हो हो. मी बरी कंबर धरीन.  अजूनही दहा जणांचा स्वयंपाक एकटीने करू शकते बरे!.  पण सूनबाईच्या हाताला चव भारी म्हणून तिच्याच कडून करून घेते म्हटले. पण लेयर्स लावायला मात्र तुम्हीच या बरं का?  तसेही तुम्हाला भारी जमते लावालाव्या करायला.” 

सासूबाईंनी तोफ डागताच सासरे बुवा काकडी टोमॅटो सकट मुलुख मैदान सोडून हॉल मध्ये पळाले.  

थोड्याच वेळात चिकनचाही घमघमाट सुटला.  आतापर्यन्त या मांसाहारी भोजनाच्या वासाची गीताला सवय झाली होती.  पण वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा गौरवच्या आग्रहाखातर ऑम्लेट बनवायला घेतले होते तो दिवस तिला आजही आठवतो.  अंड फोडताक्षणीच तव्यावर पडलेला पांढरा पिवळा गिळगिळीत द्राव पाहून गीताला उलटीच झाली होती.  त्यानंतर कितीतरी दिवस तिला नुसते अंड बघितले तरी मळमळत असे.  सासू सासऱ्यांनीही समजुतीने घेतले.  कधीही तिला मांसाहार बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी दबाव नाही टाकला.  नंतरची काही वर्षे शाकाहारी जेवण गीताने तर मांसाहारी जेवण सासुबाईंनी करायचे असा अलिखित नियमच बनला होता. त्यात दोघीही खुश होत्या.  बऱ्याचदा सासूबाई त्या दिवशी सुनबाईसाठी तिच्या आवडीचा विशेष मसालेदार पदार्थही बनवायच्या. 

पुढे पुढे गीता संसारात रुळली तरी मांसाहारापासून दूरच होती.  एव्हाना पाहून पाहून डोळ्यांनाही सवय झाली होती.  मनही बरेच कणखर झाले.  त्यातच एकदा पाय घसरून पडण्याचे निमित्त झाले आणि सासूबाई महिनाभरासाठी अंथरूणाला खिळल्या.  त्यांची सेवा करता करता गीता मांसाहारी स्वयंपाकातही तरबेज झाली.  खाऊ शकत नव्हती तरी बनवायची तयारी झाली मनाची.  आता तर स्वत: बाजारात जाऊन आणण्यापर्यन्त मजल मारली होती.  पण मनाची चलबिचल संपत नव्हती.  फड् फड् फड्…. अजून सुरुच होती.

गौरवचे मित्र आले तोवर गीताने बाबांच्या मदतीने बिर्याणी मस्त डबल लेयर्स मध्ये सेट केली.  वरुन बरिस्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या पुदिन्याने सजवली. त्यावर सुरेख केशर दूध आणि साजूक तूप.  अगदी आत्या बनवायची तश्शीच!  मग कणकेचा गोळा बिर्याणीपॉट वर फिरवून त्यावर प्लेट घट्ट बसवली.  बस्स! आता फक्त पंधरा मिनिटे पॉट तव्यावर ठेवून दम द्यायचा बाकी होता.  अर्थात तोवर सर्वांनी दम धरला तरच!   

सगळेजण गप्पा मारे पर्यन्त गीताने डायनिंग टेबल वर प्लेट्स मांडायला सुरुवात केली.  गरमा गरम स्वादिष्ट चिकन दम बिर्याणी, रायता आणि तळलेली अंडी. वा! बेत तर फक्कड जमला होता.  गौरवचे मित्र अतिशय खुश झाले.  त्यामुळे गौरवही खुश होता.  सासुबाईंनी वाढायला घेतले.  सावकाश सर्वांची जेवणे झाली.   तसे गीताने टेबल आवरायला घेतले.  एव्हाना तिलाही अतिशय भूक लागली होती.  पण तिच्या जेवणाचे काय?  सकाळ पासूनचा सगळा वेळ बिर्याणी बनवण्यातच गेला होता.  गीता गौरवकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होती.  तोच मायक्रोवेव्हमधून पदार्थ गरम केल्याचा खमंग गंध दरवळला.  गीता आश्चर्याने वळली.  तर गौरव गरम गरम मसाले भात आणि रायता घेऊन तिच्या समोर आला आणि प्रेमाने म्हणाला, “कधीची थकली असशील ना! चल जेवून घेऊ आपण.” 

“म्हणजे? तू नाही जेवलास मित्रांबरोबर?”

“अ हं! माझी बायको उपाशी असताना माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल?  मग तो बिर्याणीचा का असेना!”

“पण हा मसाले भात कधी बनवला?”

“अगं, तू चिकन आणायला बाजारात गेली होतीस तेव्हाच मी आणि आईने हा खास तुझ्यासाठी बनवून ठेवला आणि थोडे रायतेही तुझ्यासाठी आधीच बाजूला काढले होते, नाहीतर बिर्याणी मध्ये तुझे सोवळे मोडायचे!”  गौरवने कोपरखळी मारलीच. 

अहाहा! मसाले भात, रायता आणि पापड.  भुकेला अजून काय हवे? गीता तृप्त झाली.  आता मनातली फड् फड् थांबली होती.  “पाहिलेस, तुझ्या बाबांनी कितीही राग आळवले तरी तुझ्या नाकावरचा राग फक्त मीच पळवू शकतो,” म्हणत गौरव मिश्किल हसला. “हो का? मग बिर्याणी कशी झाली होती ते नाही सांगितलेस अजून?” गीताने विचारले. “एकदम फक्कड.  बिर्याणी अश्शी मस्त मुरली होती, अगदी तुझ्या माझ्या संसारासारखीच!” गौरव हसत हसत उत्तरला. 

तुम्हाला  ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.  आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करायला विसरु नका.  अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्या पर्यन्त पोहचवत राहू.  याचा  लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या.  तसेच आमचा WhsApp ग्रुप ही जॉइन करा.  धन्यवाद! 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “हलकी फुलकी रुचकर कौटुंबिक कथा -बिर्याणी”

  1. अतिशय सुंदर कथा, मला पूर्वीची आठवण आली. मी अंड देखील खात नव्हते. 33 वर्ष झाली संसाराला आता मी नॉनव्हेज करते आणि खाते देखील 😁

  2. रश्मी कोळगे

    खूप सुंदर कथा.. अक्खी बिर्याणी डोळ्यासमोर उभी केली.. मस्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top