मराठी कथा – आजीचा आविष्कार 

WhatsApp Group Join Now

नेत्रा आज खूपच गोड दिसत होती पिवळ्या रंगाचा कुर्ता गडद हिरवी सलवार आणि ओढणी. त्याच्यावर छोटेसे मोत्याचे झुमके, गळ्यात एक मोत्याची नाजूक सर आणि मोकळे केस. ती शूटसाठी आवरून व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरली आणि आदित्य डायरेक्टरशी काहीतरी पुढच्या सीनबद्दल बोलत होता. त्याची सहज नजर तिच्याकडे गेली आणि तिथेच खिळून राहिली. दोघांची नकळत नजरानजर झाली आणि आदित्य तर पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडला ते लव ऍट फर्स्ट साईट म्हणतात ना अगदी तसं.

                 नेत्रा अभिनेत्री होती छोट्या मोठ्या सिरीयल मध्ये  काम करायची तर आदित्य असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा. एका सिरीयलच्या निमित्ताने ते पहिल्यांदा एकत्र आले आणि आदित्यला नेत्रा आवडली.

हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या. एकमेकांच्या ओळखीने दोघांना कामे मिळू लागली. सहसा एकच काम दोघांना कसं मिळेल किंवा एकाचं सिरीयलमध्ये दोघांना काम कसे मिळेल याकडे दोघांचेही लक्ष असायचं. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना‌ असं होतं अगदी दोघांचं. क्षणात भांडतील आणि क्षणात एकमेकांना लाडीगोडी लावून लगेच एक होतील.

त्यांच्या आवडीनिवडी देखील अगदी भिन्न होत्या. तिला झणझणीत तिखट आवडायचं त्याला गोड आवडायचं. तिला पावसात भिजून चिंब व्हायला आवडायचं तर त्याला चिकचिक आणि पावसाचा प्रचंड राग येत असे. तिला हिवाळ्यातही थंड खायला आवडायचं. आणि त्याला आईस्क्रीमने लगेच शिंका येणे चालू होत असे. ते म्हणतात ना  ‘अपोजिटस अट्रॅक्ट इच अदर ’ तसंच काहीस या दोघांबद्दल होतं.

                    असं करता करता अगदी फिल्मी पद्धतीने आदित्यने नेत्राला प्रपोज केले त्याच्या गाडीतून पाठीमागच्या सीटवर केक ठेऊन, गाडी हार्ट शेपच्या फुग्यांनी सजवली. गुलाबाचे फूल, कॅडबरी असं तिच्यासाठी सगळं घेऊन गेला आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं, ‘ तू माझ्याशी लग्न करशील का ?’ असे तिला विचारलं. तिला हिऱ्याची अंगठी घातली. नेत्रा मनोमन सुखावली. क्षणाचाही विलंब न करता तिने होकार दिला.

                    यथावकाश दोघांनी लग्न केलं. पर्सनल लाईफच्या प्रसिद्धीची जास्त इच्छा नसल्यामुळे दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचे पसंत केले. दोघांच्या आई-वडिलांनीही त्यांना सपोर्ट केला. दोघांचा छानसा संसार सुरू झाला. नव्याचे नऊ दिवस छान गेले.

                  हळूहळू नेत्रा साईड रोल वरून लीड रोलवर आली. तिने आतापर्यंत मुख्य अभिनेत्री म्हणून चार सिरीयल केल्या होत्या. आदित्यलाही मोठ मोठे प्रोजेक्ट्स मिळू लागले. दोघेही कामात बिझी झाले ते पण इतके की त्यांना हेही जाणवले नाही की दिवसातल्या चोवीस तासातले एक दोन तासही आपण एकमेकांना वेळ देऊ शकत नाही मग त्यामुळे चिडचिड भांडणे सगळंच चालू झालं.

                  त्यांच्या भांडणाला सोल्युशन खूप सोपं होतं की दोघांनीही थोडा वेळ एकमेकांसाठी कसाही करून काढायचा आणि जे काय प्रश्न असतील ते बोलून सोडवायचे; पण तसं काही केल्या होत नव्हतं. एक दुसऱ्याला दोष  देण्यात वेळ वाया जात होता आणि मग गोष्टी खूपच विकोपाला गेल्या. टोकाचे निर्णय घ्यायला आज कालच्या पिढीला वेळ लागत नाही आणि तसेच या दोघांच्या बाबतीतही झालं.ती तिच्या माहेरी निघून गेली.

                दोघांच्या घरच्यांनी त्या दोघांना खूप समजावलं; पण दोघेही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते.

               मग नेत्राच्या आजीला गावावरून पाचारण करण्यात आले. खास आमंत्रणाने आजी तातडीने हजर झाली. आजीने नातीला कसंही करून परत तिच्या घरी पाठवेन म्हणून चंगच बांधला.

           आजी एकदम बिनधास्त होती. ती विमानाने नागपुरातून बसली ती थेट मुंबईला हजर झाली. येता येता एअर होस्टेस सोबत गप्पा मारून, त्यांच्याशी गोड बोलून करून, हास्यविनोद करून, त्यांच्याकडून चहापाणी घेऊन ती  मुंबईच्या विमानतळावर उतरली.

              माझ्या नातीचा सुखी संसार मला पहायचा आहे म्हणून मी आले आहे असं म्हणून तिने या दोघांना परत एकत्र आणले. आजीसाठी नेत्राला तिच्या घरी दिखाव्यासाठी यावे लागले. आजीसाठी म्हणून प्रेमाचे खोटं नाटक करत हे दोघं एकत्र राहू लागले.

               घरी येताच आजीने आपल्या मिशनप्रमाणे कारवाई चालू केली. ‘ मला भाजी ऑनलाईन आणलेली आवडत नाही. तुम्ही दोघांनी रोज सोबत भाजी आणायला एकत्र जाऊन चांगला निवडून भाजीपाला आणायचा ’ अशी आजीने सक्त ताकीद दिली तेव्हा भाजी आणण्याच्या निमित्ताने का होईना दोघांचा संवाद होऊ लागला.

                     आदित्यच्या आवडीनिवडी त्याच्या आईवडिलांशी बोलून आजीने माहिती करून घेतल्या आणि तेच सगळे पदार्थ मला खावेसे वाटतात म्हणून नेत्राच्या हाताने हळूहळू रोज एक पदार्थ ती बनवून घेऊ लागली आणि त्यामुळे आदित्य खुश होऊ लागला. एवढेच नव्हे तर नेत्राला आवडतील असे दागिने किंवा घरात उपयोगी येतील अशा वस्तू आजी आदित्यला आणायला सांगून नेत्रालाही खुश करत असे.

             आजी तिच्या उद्देशात एक एक पाऊल पुढे टाकत चालली होती आणि तिच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने पाऊल उचलत होती.  

             ‘ माझा नवस होता की तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावर सगळे ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक दर्शन दोघे जोडीने करतील ‘ असे मुद्दामहून सांगून आजीने दोघांना देवदर्शनाला पाठवले.

              कसेही करून जास्तीत जास्त वेळ त्या दोघांनी एकत्र घालवावा आणि त्यांच्यातला दुरावा संपावा हीच आजीची इच्छा होती.

               एवढे सगळे करून सुद्धा जेव्हा फारसा उपयोग होताना दिसत नाही असे आजीला वाटले तेव्हा आजीने नवीन उपाय अवलंबला.

             एके दिवशी सोसायटीतला गार्डनमध्ये सकाळी फिरायला गेल्यावर परत येताना आजीचा पाय मुरगळला ( खरा की खोटा हे फक्त आजीलाच माहित होते ) आणि मला दवाखान्यात ऍडमिट करावे लागेल, मला खूप जास्त बरं वाटत नाही, आता मी काही जगत नाही, आता मला कधीच  चालता येणार नाही असे पालुपद सुरू करून तिने नातीला घाबरवून सोडलं.

नेत्रा पण घाबरली. आपल्या घरी थोडे दिवसांसाठी आल्यावर आजीला काहीतरी झाले तर सगळे आपल्याला काय म्हणतील याचं तिला खूपच टेन्शन आलं. दवाखान्यात तिच्याकडून आजीबद्दल फोनवर समजल्यावर आदित्य तिथे लगेच पोहोचला. मग डॉक्टरशी संगनमत करून आजीने या दोघांना एकत्र कामाला लावले. एवढं करून थांबते ती आजी कसली ?  जगले वाचले तर पतवंडाच तोंड बघूनचं जाईन असे फर्मान सोडून आजीने आपला हुकमी एक्का टाकला. ह्या दोघांना त्यावेळी काही कळेना त्यांनी आजीला आश्वासन देऊन कसंबस शांत केलं.

                  थोड्या दिवसांनी आजी दवाखान्यातून लंगडत घरी आली.

आजी अजिबात थकली, कंटाळली, वैतागली नव्हती तिचे प्रयत्न तिने सुरूच ठेवले होते. त्या दोघांना मनाने एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यासाठी तिला एक छोटीशी नेत्रा किंवा गोलू मोलू आदित्य या घरात हवाच होता.

                  आजीच्या प्रयत्नांना दैवाची साथ मिळाली. नेत्रा आणि आदित्यने गोड बातमी दिल्यावर, नेत्रा आरामासाठी तिच्या आईकडे जाणार होती पण आदित्यने तिला थांबवले. त्याला तिच्यासोबत आणि येणाऱ्या पाहुण्यासोबत वेळ घालवायचा होता. दोन जीवांची काळजी घ्यायची होती.

             आदित्य त्याच्या कर्तव्यात कुठेच चुकला नाही. नेत्राच्या आरोग्याच्या अनेक बारीकसारीक गोष्टी तो लक्ष घालत होता. नेत्राची प्रेमाने काळजी घेतली आणि नेत्राच्या मनात सुद्धा त्याने जागा घेतली. एवढा चांगला लाईफ पार्टनर मिळाला आणि आपण त्याच्याशी असे वागलो याबद्दल नेत्राला वाईट वाटलं.

 एके दिवशी तिने स्पष्टच तसं त्याला बोलून दाखवलं आणि इथून पुढे नेहमी एकत्र राहण्याचं दोघांनी ठरवलं.

थोड्याच दिवसात एक गोड परी त्यांच्या आयुष्यात आली. बाळाचं नाव त्यांनी आजीच्या पसंतीने‌ ‘अनया’ ठेवले. लक्ष्मीच्या पावलांनी लेक घरात आली आणि सगळेच छान सुरू झालं. दोघांनाही अधिकाधिक कामे मिळत गेली. दोघांची प्रगती होतं गेली पण आता ते दोघे दोघांच्या प्रगतीच्या एकमेकांच्या आड आली नाही. 

             बाळ होईपर्यंत दोघांचे करियरकडे थोडे दुर्लक्ष झाले तरीही आता ते दोघे अतिशय समाधानी होते. दोन्हीकडच्या आई-वडिलांनी नातीची जबाबदारी घेऊन नेत्राला आणि आदित्यला स्वतःच्या करिअरसाठी वाट मोकळी करून दिली होती.

               दोघांनी आजीचे शतशः आभार मानले की आजीमुळे त्यांचे मोडणारे घरकुल पुन्हा नव्याने उभारले गेले होते. जुन्या पिढीचा गोडवा जपत, नवीन पिढीला योग्य मार्ग दाखवत आज लाखो आजीबाई अशी कुटुंबे जोडून ठेवत आहेत त्यांना खूप उदंड आयुष्य लाभू दे.

तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhaApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “मराठी कथा – आजीचा आविष्कार ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top