“ निता, ए निता पटकन इकडे ये”, राजन चा आवाज ऐकून भांडी घासत असलेली निता गडबडीत उठताना पाय घसरून पडली, कंबरेला धरत लंगडत च राजन जवळ जाऊन म्हणाली, “ काय हो काय झालं?”.
राजन म्हणाला, “ उमरावती मावशीचा मुलगा अपघातात गेला”.
“ काय! अरे देवा”, असं म्हणत निता खालीच बसली, आधीच तिला लागलं होतं आणि आता हे ऐकून तर तिचं होतं नव्हतं अवसानच गेलं.
“उमरावती मावशीचा मुलगा गेला, अरे बापरे! काय प्रसंग आला रे? आता या माऊलीला कशी सावरू? कशी सामोरी जाऊ तिला, काय बोलू, कसं बोलू, खूपच बिकट प्रसंग ओढावलाय, आता काय करायचं?”, या विचाराने निताचं मन ढवळून निघत होतं.

उमरावती मावशी म्हणजे निताच्या धुणी भांडी करणाऱ्या मावशी. एक दणकेबाज बाई. कोणाचही कसलच ऐकून नं घेणारी, इमानदार, स्वाभिमानी तेवढीच हेकेखोर.
कपाळाला मोठी टिकली, हातात जवळपास 4 डझन बांगड्या तर सहज खेळायच्या,सकाळी वेगळी तर संध्याकाळी वेगळी साडी नेसून पदर एक बाजूने झाकून तर एका बाजूने उघडा असा अवतार, त्यातून मोठ्या दिमाखात डोकावणारी गोल गरगरीत ढेरी, मागून केसांचा तेल लावून पाडलेला अंबाडा आणि हास्याचा जणू धबधबा म्हणा, सुनामी म्हणा किंवा त्यापेक्षा त्यावर ही काही असेल तर तसं त्यांचं हसणं. असा एकंदर मावशी बाईंचा रुबाब.
कोणाच्या अध्यात ना मध्यात, म्हणून कामाची जेवढी घरं होती ती सगळी मावशीना सांभाळून असायची. त्यांची हक्काची सत्ता चालायची फक्त निता वर. तिने यांना सोडून कुठे जायला भाग नाही का काही आणायला भाग नाही, नीताच्या गाडीची मागची सीट जणू काही मावशीसाठीच रिजर्व असायची. चुकून जरी मावशीला कळलं की निता त्यांना सोडून कुठे जाऊन आली की, स्वारी लगेच नाक फुगवून कमरेवर हात ठेऊन तिला जाब विचारायला तयारच असायची. पण निताला त्यांची खोड माहित होती म्हणून ती त्यांना कितीही रुसल्या असल्या तरी 2 मिनटात हसवायची. मावशी म्हणायच्या पण , “ काय गं, साधं रुसू पण देत नाहीस तुझ्यावर”.
पण निता तेवढीच मायेने त्यांना सांभाळायची, काही गोष्टी पटत नव्हत्या,तरिही ती पटवून घ्यायची, बोलून दाखवायची पण त्यांना अंतर कधी दिलं नाही तिने.
लग्न होऊन सासरी आल्यावर सासूबाईंनी सांगून ठेवलं होतं, “ हे बघ, या उमरावती मावशी, मी शेताकडे राहिल पण या कायम तुझ्यासोबत वाड्यात राहतील, यांचा कधी अनादर करू नकोस”. अश्या या उमरावती मावशी वाड्यात मागच्या बाजूस शेड मध्ये राहायच्या. त्यांची आणि नीताची कधी चांगली गट्टी जमली हे दोघींनाही कळलं नाही.
पण नीताच्या सासरी रुजण्यात आणि करमण्यात मावशीचा मोठा वाटा होता. निता त्यांना गमतीत, “ओ उमरावती मावशी, चला की अमरावती ला म्हणायची”, त्यावर मावशी, “तुला गढढा उठला, कडू”, असं म्हणून खळखळून हसायच्या.
नवरा व्यसनाधीन असताना सुद्धा एकट्या बाईने लहान दोन्ही मुलं स्वतःच्या हिमतीवर मोठी केली होती. मुलगा जास्त शिकला नाही आणि मुलगी वयात आल्या आल्या तिचही लग्न लावून दिलेलं. लेकरावर मावशीचा फार जीव. तो काहीतरी काम करेल चांगल्या वळणाला लागेल अशी या माऊलीची भाबडी आशा. पण तो त्याच्या उलट. एका ठिकाणी काम करत होता पण तिथेही जास्त काळ काम केलं नाही. मित्रांसोबत येणं जाणं असायचं. ते काही मावशीला आवडायचं नाही. त्या सतत त्याला वळणात आणण्याचा प्रयत्न करायच्या, पण मुलाला व्यस*नाची सवय लागली. वडील प्यायचे त्यामुळे काय अधोगती झाली हे डोळ्याने पाहून सुद्धा याने ही पिणे सुरु केले. त्यामुळे माय लेकरामध्ये बरेच वेळा वाद व्हायचे. सगळ्यांनी समजावून सांगितलं पण हा काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.
असेच दिवस पुढे जात होते.
इकडे नवरा बायकोमध्ये सुद्धा वाद व्हायचे. वादाचं कारण एकच दा*रू. मावशीचे यजमान तसें स्वभावाने चांगले होते पण पिल्यानंतर त्यांचा पार मानवाचा दा*नव व्हायचा. ते विनाकारण मावशीला त्रास द्यायचे. मावशी तश्या चांगल्या घरच्या होत्या, परिस्थिती मुळे त्यांना धुणी भांड्याची कामं करावी लागायची. , दिसायला सुंदर होत्या ,स्वच्छ काम करणाऱ्या होत्या. त्यांना मामांचं वागणं बोलणं पटायचं नाही आणि कितीही सांगून मामा काही ऐकायचे नाही. फक्त ते निताला तेवढे घाबरायचे.
एकदा मावशीचा मुलगा त्याच्या मामाच्या घरी गेला असताना मामांनी अनावधानाने मावशीला मागून पाठीवर रागाच्या भरात खूप जोरात जोड्याने मारले. त्या इतक्या तळमळल्या की थेट निता जवळ येऊन म्हणाल्या की, “मी चालली बघ नित्यो, माहित नाही कुठं पण मी चालली”. नीता ने खूप विचारल्यावर मावशीनी, “ बघ गं मामाने किती मारलं!”, असं म्हणून पाठीवरचे व्रण तिला दाखवले आणि रडत रडत निघाल्या. निता ला काहीच सुचेना. घरी फक्त तिचा लहान मुलगा आणि त्याचा मित्र खेळत होते. तिने त्यांना घरीच बसून खेळायला सांगितले आणि बाहेरून लॉक लावून मावशीला शोधायला गाडीवर निघाली.
सुदैवाने थोड्या अंतरावर तिला मावशी दिसल्या. तिने त्यांना गाडीवर बसायला सांगितले. “कुठं नेतीस मला?”, या प्रश्नाचं उत्तर निता जवळ ही नव्हतं. पण तरीही तिने त्यांना गाडीवर बसवून घेतलं आणि निघाली. कुठे जायचंय काहीच माहित नव्हतं, घरी तर मावशी येणार नाहीत याची तिला खात्री होती. अचानक तिला काहितरी सुचलं आणि मोठ्या निर्धाराने तिने गाडी टमटम पॉईंट वर नेली. तिथे तिच्या गावी जाणाऱ्या टमटम मध्ये मावशीला बसवलं आणि टमटम वाल्या दादांना सांगितलं की, “वहिनीकडे सोडा, कुठे मध्ये उतरवू नका”. तसंच तिने सासूबाईंना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. वहिनी म्हणजे तिच्या सासूबाई ज्या शेताकडे गावी राहायच्या त्यांच्याकडे मावशीना तिने पाठवलं आणि तिथेच काही दिवस रहा म्हणून सांगितलं.
इकडे मामा मावशीला शोधत होते, निता ला विचारत होते, पण निता आणि तिच्या सासूबाईंशिवाय कोणालाच माहिती नव्हतं की, मावशी कुठे आहेत. 2 दिवसांनी त्यांचा मुलगा घरी आला त्यानेही विचारलं, “आई कुठे गेली?”, तर निता ने त्यालाही धडा मिळावा म्हणून काहीच सांगितलं नाही.
काही दिवस शोधाशोध केल्यानंतर आईसाठी अत्यंत केविलवाणं झालेलं लेकरू बघून निताने फक्त त्यालाच सांगितलं की,काय घडलं होतं आणि त्याची आई कुठे आहे. त्याने तडक गाव गाठलं पण तिथे ही त्याला मावशी भेटल्या नाही.
दुःखी मनाने आजोळी गेल्यावर तिथे अचानक डोळ्यासमोर त्याच्या आईला बघून तो आईला घट्ट मिठी मारून खूप रडला. आईला पण गहीवरून आलं. “ आई चल घरी”, असं मुलाने म्हणताच मावशी नको म्हणाल्या.
“मला त्या घरी जाऊ वाटंना, तुह्या बापानं दिलेल्या जखमा अजून ताज्या हायेत , येईन मी कंधी यायचं तवा ”, असं म्हणून मावशी तिथेच त्यांच्या माहेरी राहिल्या.
भावाने पण बहिणीला सांभाळीन, पण परत पाठवणार नाही असं सांगितलं. हळूहळू मावशी पूर्ववत यायला लागल्या. शेतात जाऊ लागल्या. एक दिवस भावाला म्हणाल्या, “आता जाती रं घरी परत, धुनी भांडी चपात्यांची घरं हायती माझी. इथे किती दिस ऱ्हावू? निताची बी फजिती व्हतीय”, असं म्हणून मावशी दुसऱ्या दिवशी परत येणार होत्या. तर त्यांच्या चुलत्याचं बकरं होतं म्हणून त्यांना अजून एक दिवस थांबवून घेतलं. पोराने गावातला कार्यक्रम केला आणि काही कामानिमित्त पुण्याला चाललो म्हणाला. मावशी त्याला अडवत होत्या. त्याचे मित्र त्यांना अजिबात पटत नव्हते तरी त्याने ऐकलं नाही आणि कार मध्ये पुण्याला जायला निघाला. मावशी पण दुसऱ्या दिवशी परत येणार होत्या.
तर अचानकच ही घटना घडली. मावशीना इथे येईपर्यंत तो गेला म्हणून कोणीही सांगितलं नव्हतं. फक्त ऍक्सीडेन्ट झालाय आणि लागलंय एवढंच सांगितलं. दवाखान्यात आल्यावर मावशी वार्डाकडे जायला निघाल्या तर त्यांना त्यांचा पुतण्या म्हणाला, “ काकू, इकडे नको इकडे चल”. त्याने असं म्हणताच मावशी तिथेच कोसळल्या, त्यांच्या मनाने कसला तरी ठाव घेतला होता, त्या माऊलीचं मन सैरभैर पळू लागलं. कारण त्याने जिकडे बोट दाखवलं होतं ते जिवंत माणसाचं वॉर्ड नसून ते मु*र्दाघर होतं. सगळी हिम्मत एकटवून कापऱ्या आवाजात मावशीने विचारलं, “ हिकडं का रं? तु तर म्हणला व्हता लागलंय, मंग, हिकडं कशाला? बोल की”.
असं म्हणताच त्यांचा पुतण्या त्यांना धरून रडायला लागला. मावशीला कळून चुकलं होतं.
तरीही त्यांनी आसवांचा बांध अडवून ठेवला होता. त्यांना त्यांच्या दिराने घराकडे चलायला सांगितलं. पण त्या नको म्हणाल्या. “मी माह्या घराकडे जाते, समदी तयारी कराव लागल, काळजाच्या तुकड्याले निरोप द्या लागन ”, असं म्हणून त्या रिक्त झाल्यासारख्या घराकडे निघाल्या. पाऊलं फक्त चालत होती, पण ती ही दिशाहीन. सर्वस्व हरवलेल्या त्या डोळ्यात आसवं बाहेर येण्यासाठी धडपडत होती, पण किनाऱ्यावरच काहीतरी बांधून ठेवत ताटकळवत होतं त्यांना.
त्या काही तासात अश्या दुःखद प्रसंगी त्यांना स्वतःच्या नातेवाईकांचे काही खरे चेहरे कळले. त्यामुळे तर त्या जास्त खचल्या. पण तरीही त्या माऊलीने स्वतःला सांभाळलं आणि त्या घरी आल्या.
दारावर बेल वाजताच निताने पळत जाऊन दार उघडलं तर समोर मावशी. दोघी फक्त नजरेनं बोलल्या, नजरेनच शाश्वत झाल्या आणि नजरेनच एकमेकांच्या मिठीत रडल्या.निता ने मावशीसाठी आणि मावशीने नितासाठी स्वतःच मन घट्ट केलं होतं.अंतिम विधी पार पडल्यानंतर बायकांची कुजबुज सुरु झाली.
‘मावशी गेल्यामुळे लेकरू गेलं, त्या घरी असत्या तर कशाला लेकरावर ही वेळ आली असती!’, कोणी म्हणे लेकरू आईला शोधत मेलं, तर कोणी म्हणे आईनीच लेकराला गिळलं, कोणी काहिही तोंडाला येईल तसं बोलायला लागलं. हे काय कमी होतं,तर मामा सकट घरचे पण मावशीला बोल लावू लागले.
तुझ्यामुळे लेकरू गेलं. अरे खरं काय घडलं हे कोणाला माहित होतं का? तिच्या जखमा कोणी बघितल्या होत्या का? तिची आणि लेकराची भेट झाली होती, मावशी घरी येणार होत्या यातलं काहीच माहित नसताना सुद्धा फक्त तिला बोल लावले जात होते. 9 महिने पोटात वाढवून जन्म दिलेल्या लेकराला गमावलेल्या एका माऊलीच्या मनाला आधीच असंख्य वेदना झालेल्या असताना तिला समजून घ्यायचं सोडून तिचं मन सगळे मिळून दुखवत होते.
त्या माऊलीने जीव घेतला लेकराचा? कोणती आई आपल्या काळजाच्या तुकड्याला मारेल? त्याच्या जीवावर उठेल? डॉक्टर ने सांगितलं होतं की, ह्या मुलाचं दा*रू पिल्यामुळे लिव्हर खराब झालंय, हा जास्त दिवस जगणार नाही. अश्या परिस्थितीत सुद्धा जिने त्याला मरणाच्या दारातून औषधं पाणी करून, पदराचे पैसे मोडून ओढून आणलं, ती जीव घेईल आपल्या लेकराचा? त्याने एवढं मोठं कर्ज, देणी करून ठेवली होती. ती या बाईने एकटीने काम करून फेडली आणि तिच्यावर आरोप लावत होते की तिच्यामुळे लेकरू गेलं. अश्यावेळेस तिला आधार द्यायचा,तिला सावरण्यास मदत करायची सोडून आधीच सोलून निघालेल्या तिच्या अंतकरणाला अजून जास्त खोल घाव दिल्या जात होते. तिची परिस्थिती फक्त निताला कळत होती आणि ती तिच्यापरीने मावशीना सावरण्याचा, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होती.
सर्व विधी आटोपून सर्व जण आपापल्या घरी गेले. मागे उरली फक्त भयाण शांतता आणि आतमध्ये फक्त आकांत कल्लोळ.
“ काय करू गं नीता आता जगून? ज्याच्यासाठी उमेदीने काम करत होते तोच निघून गेला मला सोडून, त्यात समदे म्हणत्यात म्याच मारलं माह्या लेकाला, मह्यामुळेच गेला, काय करू गं, पोटात खड्डा पडलाय कसा विझवू?”, असं म्हणून रोज रडायच्या. निता त्यांना आपापल्या परीने समजावायची.
नंतर कळलं आधीचं कर्ज फेडल्यावरही त्याने लोकांची अजून देणी करून ठेवली होती दा*रू पिण्यासाठी. मनाने कणखर असलेली उमरावती मावशी त्याची ती ही देणी फेडत होत्या. ‘लेकरू उसण्यात राहू नये’, असं म्हणून धडपडत होत्या.
2 वर्षात त्यांचा नवराही गेला. त्याचाही दोष मावशीवरच अप्रत्यक्षपणे लावल्या गेला की, भांडणामुळे मामा गेले म्हणून .पण यावेळेला ही माऊली डगमगली नाही, आलेल्या परिस्थितीला मोठ्या धीराने सामोरी गेली आणि या दुःखातून थोडी लवकर सावरली.
आता लेकींकडे बघून जगते आहे एक तिची स्वतःची तर दुसरी निता. कारण निता मुळेच मावशी सावरल्या होत्या. निताने मोठ्या नेटाने त्यांना या सगळ्यांतून बाहेर काढले होते.
एक बाई नवरा गेल्यावर त्याच्या जागी मोठ्या खमक्याने उभी राहून मुलं सांभाळते, त्यांचा बाप होण्याचा प्रयत्न करते,पण जर लेकरू गेलं तर मात्र ती पार कोलमडून पडते. त्या दुःखातून सावरून उभं राहणं हे तिच्यासाठी अशक्यप्राय असतं. त्या दुःखाचा खड्डा इतका मोठा असतो की तो काळ अन काळ बुजवल्या जात नाही. तरीही अश्यावेळी त्या दुःखातून आपण आपल्या परिने त्या माऊलीला बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते दुःख जगातलं फार वेदनादायी दुःख असतं. ते काम निताने केलं.
मावशीना तर निता भेटली अश्याच निता समाजात घडल्या पाहिजे जेणेकरून पुन्हा एखादी उमरावती मावशी मोठ्या उमेदीने आयुष्य जगण्यासाठी तयार होईल.घरावर एखाद्या दिवशी कावळा येऊन काव काव करून गेला तर, निता चेष्टेत मावशीना म्हणायची, “बघा मामांचं लक्ष आहे बरं का तुमच्याकडे !”.
आणि पुन्हा एकदा तो मावशीच्या हास्याचा खळखळाट गुंजायचा.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप ही जॉईन करा.
ऍड.रश्मी द. कोळगे, पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान आहे कथा.
खूप खूप धन्यवाद..
खूप छान
खूप धन्यवाद ताई..
खूप छान👌
खूप धन्यवाद ताई..