Dance forms of India in Marathi: भारतीय संस्कृती अति प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये १४विद्या आणि ६४ कला यांचा संगम आढळतो. या ६४ कलांमध्ये नृत्य ही अभिजात कला आहे. इतिहासात अनेक वेगवेगळ्या प्रकारची नोंद आढळते. नृत्य या कलेतून अनेक गुणांची अभिव्यक्ती साकार करता येते. नृत्य म्हणजे लय आणि तालावर पायांची, हातांची व चेहऱ्याची हालचाल करणे. पूर्वी मनोरंजन आणि आनंदा याकरता नृत्य केले जात असे. त्यानंतर या नृत्याला काही नियम लागू केले गेले व त्यातूनच लोकनृत्य या कलेची निर्मिती झाली.
या कलेला जेव्हा शास्त्र व तंत्र याची चौकट दिली गेली. त्यातून शास्त्रीय नृत्य उगम पावलं. भारतीय संस्कृतीत नृत्याला खूप महत्त्व आहे. जागतिक नृत्य दिन हा 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
नृत्यकला ही आता फक्त आवड किंवा छंद म्हणून न राहता, त्याला आता व्यावसायिक रूप आलेले आहे. अनेक कलाकारांनी या कलेमध्ये नाव कमावलेले आहे. उदाहरणार्थ बिरजू महाराज, रोहिणी ताई भाटे, सुचेता चाफेकर, वैजयंतीमाला, मल्लिका साराभाई असे अनेक नृत्यातले गुरु आपल्या देशात आहेत. Dance forms of India in Marathi या लेखात आपण शास्त्रीय नृत्या विषयी माहिती बघूया. नृत्या मध्ये अनेक भावभावनांचा संगम आढळतो. नृत्य हे नवरसां द्वारे व्यक्त केले जाते.
नृत्य कलेचे फायदे (Benefits of Dance)–
*शारीरिक आणि मानसिक शक्ती सुधारते.
*लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
*अभिव्यक्ती सुधारते.
*शरीर संतुलन करण्यास मदत होते.
*नृत्याद्वारे अनेक पौराणिक कथांची माहिती होते.
*मुद्रांमुळे हाताच्या हालचाली होतात.
नृत्याचे दोन प्रकार असतात. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य.
भारतात अनेक राज्य आहेत. त्या राज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याचे शास्त्रीय आणि लोकनृत्य असे प्रकार आहेत. प्रत्येक नृत्याची स्वतःची एक खास शैली आहे आणि त्यातच त्या नृत्याचे सौंदर्य लपलेले आहे.
भारतामध्ये शास्त्रीय नृत्याचे आठ प्रकार आहेत.
आता आपण शास्त्रीय नृत्याचे प्रकार बघूया (Types of Indian Dance form)—
१) भरतनाट्यम् —तामिळनाडू—-
तामिळनाडू राज्यातील अतिशय प्राचीन असा हा नृत्यप्रकार आहे यामध्ये भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केले जाते.. भगवान शंकराला या रचना अर्पण केलेल्या आहेत.हा नृत्य प्रकार अतिशय प्राचीन आहे. पूर्वी देवळांमध्ये देवासमोर ही कला सादर केली जायची. तामिळनाडूमध्ये इसवी सन पूर्व१००० पूर्वीपासून ही नृत्यशैली सापडते. भरतनाट्यम् मध्ये मुद्रा, चेहऱ्यावरील भाव आणि पदन्यास याद्वारे आपले नृत्य प्रदर्शित केले जाते. या नृत्या करता कर्नाटक संगीत शैली वापरली जाते.या कलेला दक्षिणेतील राजांनी राजाश्रय दिला. तंजावर मधील चोल आणि मराठी राज्यांनी या कलेला प्रोत्साहन दिले. भरतनाट्यम चा पोशाख आणि दागिने हे पारंपारिक आहे.
त्यामध्ये आत्ता आधुनिक युगात काही बदल केले गेले आहेत. केसांना दागिने आणि फुलांनी सजवले जाते. हातांच्या हालचालीकडे लक्ष जाण्यासाठी हाताना लाल रंगाने उजळवले जाते. भरतनाट्यम सहा भागांमध्ये प्रदर्शित केले जाते. अल्लारिपु, जथिस्वरम्, शब्दम् वर्णम्, पदम आणि तिल्लाना, हा शेवटचा भाग असतो. हा जलद लयीत संपतो.
भरतनाट्यम मध्ये घुंगरांची साथ आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये अनेक गुहांमध्ये भगवान शिवाला भरतनाट्यमच्या मुद्रांनी कोरले गेले आहे. ब्रिटिश काळामध्ये या कलेवर बंदी आणण्यात आली होती. नंतर या कलेला पुनर्जीवित करण्यात आले. स्त्री आणि पुरुष दोघेही जण हे नृत्यकला सादर करतात.
२) कथक— उत्तर प्रदेश—
हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेशातला आहे. या नृत्याचा उगम वाराणसी मध्ये झाला..हा नृत्य प्रकार दोन घराण्यांमध्ये केला जातो. जयपुर घराणे. आणि लखनऊ घराणे. हा अभिजात नृत्य प्रकार आहे. या नृत्य प्रकारांमध्ये एखादी कथा सुंदर तऱ्हेने नर्तक किंवा नर्तकी आपल्या हावभावांनी आणि हातांच्या हालचालींनी व पदन्यासांनी कथन करतात. या कथा, नृत्य गाणी आणि संगीताद्वारे सांगितल्या जातात. म्हणूनच या नृत्यप्रकाराला कथक असे नाव आहे.
लखनऊ घराण्याच्या परंपरेत असा समज आहे की श्रीकृष्ण ईश्वरी नावाच्या त्यांच्या भक्ताच्या स्वप्नात आले व त्यांनी नृत्य उपासनेचा प्रकार विकसित करण्याची सूचना केली. व ईश्वरीने कथक हा नृत्य प्रकार विकसित केला. आज पर्यंत त्यांचे हजारो वंशज हा नृत्य प्रकार पुढे चालवतात आहेत. मुघलांनी या कलेला राजाश्रय दिला. त्यांच्या दरबारामध्ये कथ्थक नृत्यप्रकार सादर केला जाई. या नृत्य शैलीमध्ये गत, तोडे नायक नायिका घुंगरांचा आवाज तालवादकांसह नर्तकांची जुगलबंदी इत्यादींचा समावेश होतो. कथ्थक सुद्धा स्त्री आणि पुरुष दोघेही जण करतात.
३) कथकली– केरळ– केरळ मधील शास्त्रीय नृत्याचा हा एक मुख्य प्रकार आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली याचा अर्थ आहे खेळ. यामध्ये एखादे कथानक नृत्या द्वारा सांगितले जाते. या शास्त्रीय नृत्यात पुरुष हे पारंपारिक पेहराव करतात. हे पोशाख रंगबिरंगी असतात. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे असतात.या नृत्य प्रकारांमध्ये सुद्धा संगीत, गायक, नर्तकाचे हावभाव हातांच्या मुद्रा याद्वारे एखादी कल्पना व्यक्त केली जाते. भरतनाट्यम सारखेच हे नृत्य सुद्धा केरळमधील प्राचीन मंदिरांमध्ये ईश्वरासमोर समर्पित केले जायचे.
कथकलीमध्ये धार्मिक लोककथा, महाभारत, रामायण, हिंदू महाकाव्य हे नर्तकांद्वारे सादर केले जातात. कथकलीचे घटक प्राचीन संस्कृत नाट्य शास्त्रातून घेतले जाते. याचे जनक भरत ऋषी आहेत. मूक अभिनयातून प्रदर्शित केलेले संगीत नाटक असे याचे स्वरूप आहे.
४ ओडिसी–ओरिसा
ओडिसी हा नृत्य प्रकार सुद्धा खूप प्राचीन आहे. हा सुद्धा अभिजात नृत्य प्रकार आहे. भरत ऋषींच्या नाट्यशास्त्रात याचा उल्लेख आहे. पूर्व भारतातील या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे मूळ पौराणिक कथांमध्ये आढळते. या नृत्य प्रकारात शिव आणि सूर्य यांचे चित्रण आढळते. हा नृत्य प्रकार बहुतेक महिलांद्वारे केला जातो. काही पुरुषही हा नृत्य प्रकार करतात. भुवनेश्वर जवळ उदयगिरी आणि खंडगिरी या गुहांमध्ये या नृत्याचे प्रमाण आढळते. कोणार्कच्या सूर्य मंदिरात देखील हे नृत्य करणाऱ्या नर्तिका कोरल्या गेल्या आहेत. या नृत्यांमध्ये तीन भागांवर लक्ष केंद्रित केले जाते. डोके शरीर आणि पाय. या नृत्यांमध्ये भगवान जगन्नाथांच्या स्तुतीचे गीत गायले जाते. याचे श्लोक गीत गोविंदम या सांस्कृतिक नाटक गीतातून घेतले आहेत. भक्ती आणि श्रद्धा या गीतांमधून प्रदर्शित होते.
५)मोहिनीअट्टम—कथकली बरोबरच केरळ मधील हे दुसरे शास्त्रीय नृत्य आहे. हे लास्य पद्धतीचे नृत्य आहे. हे नृत्य हळुवारपणे केले जाते. हे नृत्य पारंपारिक पद्धतीप्रमाणे स्त्रियांनी केलेले एकांगी नृत्य आहे. या नृत्याला सुद्धा कर्नाटक शैलीचे संगीत साथीला असते. संगीताचे गायन स्वतः नर्तकी करते अथवा इतर गायक करतो. ही गीते मनीप्रवाळा या बोलीतून असते जी मल्याळम आणि संस्कृत मिळून तयार होते. मोहिनीअट्टम चा उल्लेख सोळाव्या शतकातील व्यवहारमाला या ग्रंथात सापडला. पण हे नृत्य त्याहीपेक्षा जुने आहे. ब्रिटिश काळात या नृत्याकडे देवदासी पद्धतीने बघितले जायचे. पण त्यानंतर ही कला पुनर्जीवित करण्यात आली. या नृत्यांमध्ये भावपूर्ण डोळे आणि मुद्रा हे विशेष असतात.
या नृत्याची कथा अशी आहे की समुद्रमंथनामध्ये दैत्यांनी अमृताचा कलश पळवला. त्यावेळी विष्णूंनी मोहिनी या अप्सरेचे चे रूप घेतले आणि देवांची मदत केली. मोहिनीचे नृत्य देवदासींनी शिकले म्हणून त्याला दासीअट्टम असेही म्हणतात.
या नृत्यात नर्तकी पांढरी साडी ज्याला गोल्डन बॉर्डर आहे अशी परिधान करते. नर्तकीच्या संपूर्ण अवयवांवर दागिने असतात. हात आणि पायांना लाल रंगाने उजळवले जाते की जेणेकरून तिच्या मुद्रा लोकांना नीट दिसता येतील.
६) मणिपुरी नृत्य—पूर्वोत्तर भारत—मणिपुरी नृत्य ही मणिपूर राज्याची अभिजात नृत्यकला आहे. भारताच्या ईशान्य भागात ही नृत्यकला प्रचलित आहे. या नृत्यात कृष्णभक्ती ची अभिव्यक्ती केली जाते. पंधराव्या ते अठराव्या शतकात या नृत्याचा विकास झाला. मणिपूर मध्ये जेव्हा वैष्णोपंथाचा विकास झाला त्या काळात ही नृत्यशैली उगम पावली. या नृत्याचे दोन प्रकार आहेत
१) रास-हे नृत्य राधा कृष्ण आणि गोपी या विषयावर केले जाते.
२) संकीर्तन-हे नृत्य पुरुषां द्वारे खोल नावाचे वाद्य घेऊन केले जाते.
या नृत्याने रवींद्रनाथ टागोर सुद्धा प्रभावित झाले होते. त्यांनी शांतीनिकेतन मध्ये या नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले. या शैलीमध्ये रंगीबिरंगी पोशाख केला जातो. त्याला पतलोई असे म्हणतात. गळ्यात कोलू हार घालतात. फुलांच्या माळा घालतात. पायात पैंजण घातले जाते. तसेच मणिपुरी नर्तकींचे डोळे लहान असल्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना काळजी घेतली जाते. कपाळावर चंदन तिलक लावले जाते.
७) कुचीपुडी –आंध्र प्रदेश–
हा आंध्र प्रदेशात प्रदर्शित केला जाणारा अतिशय कठीण नृत्यप्रकार आहे. तेथील कुचिपुडी गावातील नर्तकांनी हा नृत्य प्रकार सुरू केला म्हणून त्याला म्हणतात. हा एक प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. यामध्ये उच्चवर्गीय ब्राह्मण नर्तक आपली कला सादर करीत असत. यामध्ये देवाची पूजा करण्याची संपूर्ण प्रक्रिया नर्तकांद्वारे प्रदर्शित केली जाते. जसे की अगरबत्ती लावणे, देवाचे पाणी शिंपडणे, प्रार्थना करणे इत्यादी. या नृत्याचे जनक सिद्धेंद्र योगी आहेत. ते आपल्या शिष्यांना नाट्यशास्त्र,
अभिनय दर्पण, रसमंजिरी या ग्रंथाचे धडे देत असत. भागवत परंपरेतील हा नृत्य प्रकार आहे. कुचीपुडी संगीत नृत्य करणाऱ्या नर्तकांना भागवतालु असे म्हणतात. कुचीपुडी नृत्य देवळामध्ये रात्रीच्या चांदण्यांमध्ये करण्याची पद्धत होती. रंगमंचाला पडदा नसायचा. उजव्या बाजूला गायक वृंद बसलेला असतो. नृत्याच्या सूत्रधाराला दरवु असे म्हणतात. सुरुवातीला दोन स्त्री नर्तक प्रेक्षकांसमोर पडदा धरून उभे राहतात आणि त्यामागे नर्तक नृत्य करतात. अशावेळी नर्तकांचे पाय फक्त प्रेक्षकांना दिसतात. काही वेळाने तो पडता दूर झाल्यावर नर्तक प्रेक्षकांसमोर आपले नृत्य सादर करतो. प्रत्येक कुचीपुडी नृत्य करणाऱ्याला गायनाचे ज्ञान असावे लागते. या नृत्यासाठी सुद्धा कर्नाटक संगीत शैलीचा वापर केला जातो. परंपरेनुसार कुचीपुडी हा नृत्य प्रकार नृत्य नाट्य आणि नृत्त या प्रकारांमध्ये सादर केला जातो.
८) सत्रिया– आसाम–
आसाम मधील संत श्री शंकरदेव यांनी वैष्णव धर्माच्या प्रसारासाठी एक सशक्त माध्यम म्हणून पंधराव्या शतकात या नृत्याची सुरुवात केली. तेथील वैष्णव मठांमध्ये भक्ती आणि कला यांचा मिलाफ करून नृत्य नाटक आणि संगीत यांची रचना केली. आसामी, हिंदी, मैथिली आणि ब्रज भाषेमध्ये या नृत्य नाटकांची निर्मिती केली. आसाम मध्ये वैष्णव मठांना सत्र असे म्हणतात त्यावरून त्यांनी सत्रिय नृत्य असे या नृत्य प्रकाराला प्रकाराला नाव दिले.
या नृत्य प्रकारातील एकांकिकांना अंकिया नाटक असे म्हटले जाते. हे नृत्य मठ, मंदिर यामध्ये सादर केले जाते. या नृत्यांमध्ये विष्णू अवतार, राम सीता, कृष्ण, महाभारत, रामायण यांचे संदर्भ दिले गेले असतात. इतर नृत्याप्रमाणे सुद्धा या नृत्यात भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातील नियम पाळले जातात. या नृत्याच्या शैली तांडव आणि लास्य यावर आधारित आहे. अंकिया नाटाचे चरित्र हे वाचिक अभिनयातून प्रदर्शित केले जाते. वस्त्र, अलंकार, मुखवटे, वेशभूषा, प्रतिमा यांचा वापर या नृत्यात केला जातो. आसाम मधील पारंपारिक वेशभूषा या नृत्यांमध्ये स्त्री आणि पुरुषांकडून केले जाते. सत्रिया नृत्या मध्ये राग आणि तालाची एक विशिष्ट प्रणाली वापरली जाते. या नृत्यांमध्ये मुख्य वाद्य वापरले जाते ते म्हणजे खोल. याशिवाय इतर अनेक वाद्य वापरले जातात. या नृत्याचा प्रसार करण्यास बापूराम बरबायान, जिवेश्वर गोस्वामी, गोपीराम बरबायान यांनी हातभार लावला आहे.
आता आपण काही लोकनृत्यांची माहिती पाहू-Dance forms of India in Marathi
लावणी,– महाराष्ट्र-
हे नृत्य नाटक आहे यामध्ये बैठकीची लावणी सुद्धा असते.
महाराष्ट्रा मध्ये कोळी नृत्य, लेझीम भाडा इतर लोकांनृत्य आढळतात.
भांगडा- पंजाब
उत्तर भारतात साधारणतः बैसाखीच्या वेळेस हे नृत्य केले जाते.
पांडवांनी- छत्तीसगड
पांडवाशी संबंधित हे नृत्य छत्तीसगडला केले जाते.
घूमर, कालबेलिया– राजस्थान
भिल्ल समाजातील स्त्रिया घूमर हे नृत्य करतात.
गरबा– गुजरात
महिलांद्वारे गुजरात मध्ये गरबा हे नृत्य नवरात्रात केले जाते.
दांडिया रास भाई हे इतर लोकनृत्य गुजरात मध्ये केले जातात.
छऊ– ओडिसा
देवी दुर्गा राक्षसांचा वध करते आहे हे दर्शवण्याकरता हे नृत्य केले जाते.
बिहू– आसाम
आसाम मध्ये पीक कापणीच्या वेळेस हे नृत्य केले जाते.
महारास, कालीगोपाल, नटपूजा नावान रित्या हे इतर आसामचे लोकनृत्य आहेत.
रौफ— काश्मीर
वसंत ऋतु साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.
हिंमत,मंददास दमाली असे अनेक लोकनृत्य कश्मीरमध्ये केले जातात.
याशिवाय भारतामध्ये अनेक लोकनृत्याचे प्रकार आढळतात.
तर भारतीय नृत्याचे प्रकार dance forms of India in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे वाचण्यासाठी व इतर नवनवीन लेख व कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
धन्यवाद!
लेखिका- वैशाली देव ( पुणे)
Very informative .. it could relate link of our culture to individuals development on health , mind, personality development etc.
Thanks Vaishali Sharing a valuable information.
Thank you so much 😊
Very nice illustration of dance forms. Awesome 👌
Thank you so much
खूप छान माहिती
धन्यवाद,🙏
खूप छान 👌👌
Informative
धन्यवाद
Very nice read! Being a bharatnatyam dancer myself, it was nice reading about other dances!
Thank you so much
Khup chhan mahiti, dhanyawad
Thank you so much
Very nice detailed information. Loved the article .
Thankyou
So informative! Gives in detail information about Indian dance forms.