प्रत्येकीच्या मनातल्या बेफिकीर, निवांत दिवसाचे, दिवसास्वप्नाचे विनोदी वर्णन.
आजच्या कथेचे नायक आणि नायिका नेहमीचेच. आपल्या कथेच्या हिरोचे आणि हिरोईनचे आज मुद्दाम मी नाव सांगणार नाही. तुम्हीच ओळखा. तसं तर तुम्ही खूप हुशार आहातच. असं चटकन एका मिनिटात ओळखाल. पण आधी गोष्ट पूर्ण तरी वाचा .
आज रविवार असूनही ती फार निवांत होती. तिला रविवारचा निवांतपणा मिळतो का कधी? रविवारी त्याला तरी आठवडाभराची झोप पूर्ण करायला मिळते. पण तिला सकाळी लवकर ऊठण्यावाचून पर्याय नाही.
अहो का म्हणून का विचारता. रविवारी आठवड्याभराचं नियोजन करते. धुतलेले कपडे इस्त्री करून आणते, मुलांच्या, नवर्याच्या आणि स्वतःच्या डब्यासाठी रोज काय बनवायचे ह्याचे मेन्यूकार्ड तयार करते आणि त्याप्रमाणेच रोजचे नियोजन आखते. घरातील वाणसामान, खाणे पिणे, सगळ्याची यादी बनवून सामान घरी आणून जागेवर लावेपर्यंत तिला ऊसंत कुठे मिळते. आठवड्याचा घरखर्चाचा हिशेब लिहायचा, जमाखर्चाचा मेळ बसवायचा ही कामं सुद्धा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ती करते.
त्या आठवड्यात येणाऱ्या सणसमारंभाची तयारी, खरेदी सुद्धा रविवारीच करून ठेवते. अचानक आलेल्या पाहुण्यांची सरबराई आहेच रविवारी. संडे स्पेशल डिश पाहिजेतच. म्हणजे अगदी संडे स्पेशल नाश्त्यापासून दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे सगळंच पाहिजे. सुस्त आणि मस्त रविवार फार कमी वेळेस मिळतो तिला. नाही म्हणायला असते नवरोबाची मदत पण ते ही त्याच्यामागे हजारदा लाडीगोडी लावूनच.

पण आज तिला निवांत रविवार मिळाला. नवरोबा होता घरी. पण आज त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचे असे तिने ठरवलेच होते. कधीतरीच असा दिवस मिळतो , की कुणीतरी म्हणतं कि जा सिमरन जी ले अपनी जिंदगी आणि आज तो दिवस तिला मिळाला होता. आज ती अर्ध्या दिवसासाठी का होईना पण निवांपणा जगून घेणार होती.
आज सासू सासरे त्यांच्या ग्रुप बरोबर एका संगीत कार्यक्रमाला गेले होते. मुलं त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे गेली होती. मग तिनेही ठरवलेच आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे जगयचा. गाणी ऐकावी हा विचार करून रेडिओ सुरू केला. रेडिओ लावल्याबरोबर तिच्या आवडीचं तिच्या मनातलं गाणं सुरू झालं . ‘पंछी बनू ऊडती फिरू मस्त गगन मे आज मै आझाद हू दुनिया के चमन मे. ‘
ठरवल्याप्रमाणे ती तिचा दिवस घालवत होती आणि आपल्या आयुष्यातील काही क्षण जगत होती. पण स्त्री सुलभ स्वभावानुसार ह्या ऊनाड दिवसाचा इतिवृत्तांत आपल्या सखीला कळवणे आलेच की. (एकीला सांगून भागत नाही हो. गर्ल गॉसिप पाहिजेतच की. ) मग काय दुरध्वनीचा कान पिरगळून लगेच सखींना ऊनाड दिवस विस्तृतपणे सांगून झाला. तो इतिवृत्तांत तुम्हाला ही ऐकायचा असेल ना. ऐका तर मग पुढे. .
सकाळी ती गेली होती बाजारात भाजी आणायला
भाजी न घेता अहो नुसताच फिरण्यात वेळ गेला
विचार करत होती कुठली भाजी घ्यावी की न घ्यावी
आज खरचं तिचं डोकं काही काम करतंच नाही
भाजी घेतलीच नाही पण जेवण तर हवे करायला
तयारी केली नि घेतले मिरची कांदे बटाटे चिरायला
विचार केला काय जेवण करायचं की करायचंच नाही
आज खरचं तिचं डोकं काही काम करतंच नाही
जेवण नाही केले, कारण मिळाले त्याला रूसायला
आता रुसवा काढण्यासाठी लागा प्रयत्न करायला
पुरे एक कटाक्ष की लाडीगोडीसाठी मागावी माफी
खरंच सांगते, आज तिचं डोकं काही काम करतंच नाही
अरे बापरे मग काय केलं तरी काय तिने? राग गेला कि नाही त्याचा? असे प्रश्न पडले असतीलच तुम्हाला. पण खांदे ऊडवून बेफिकीरपणे तिने आज दुर्लक्षच केलं त्याच्याकडे. कारण आज आहे तिचा एक ऊनाड दिवस, एक बेफिकीर दिवस, एक निवांत, शांत दिवस.
मग आज केलं तरी काय तिने? खुर्चीवर बसून पायावर पाय टाकून निवांतपणा मजेत एन्जॉय केला. आज तिचा चेहरा हसरा आणि खूप सुंदर व तेजोमय दिसत होता. मनापासून मनसोक्त जगणारी ती.
पुढे काय? पुढे.
आज सहज मनात आलं तिच्या एखादा मराठी चित्रपट बघावा. म्हणून चॅनल सर्च करत होती. एकीकडे चहाचं आधण ठेवलं. मस्त आलं वेलची ठेचून घातलं. चहा ऊकळेपर्यंत पिक्चर लावला. चला आज की शाम बन गयी असं वाटलं होतं. गरम चहा आणि पिक्चर. पण ती बघते तर काय; ‘काॅफी आणि बरंच काही’ हा पिक्चर लागला होता. मनात आलं हा पिक्चर बघताना हातात कॉफीचा कप हवा होता पण काही हरकत नाही. चालवून घेऊ. चहाचे घोट घेता घेता कॉफी आणि बरंच काही बघू. पिक्चर बघता बघता मध्येच ब्रेक आला. जाहिरात लागली पण; जाहिरात लागावी कुठली तर बॅगपाइपर ‘जब मिल बैठे तीन यार’. आता मात्र हद्द झाली. तिने परत मनाला समजावलं चहा, ती आणि पिक्चर तीन यार.
नवरोबा सगळ्याची मजा घेत होता कदाचित तिचीच. तिला विचारले, ” आज बहुधा कॉकटेलचा विचार आहे का?. हातामध्ये चहाचा कप, समोर काॅफी बघते आणि ब्रेक घेते बॅगपाईपरचा .” आता यावर काय ऊत्तर देणार. तरी सुद्धा पुष्पा पिक्चरच्या स्टाईलमध्यै झुकेगा नही ॲटिट्यूडमध्ये ऊत्तर दिले. रम्य संध्याकाळी चहाचे घोट, रजनीच्या शीतलतेमध्ये काॅफीचा सीप, आणि डोक्याची कटकट वाढली की बॅगपाईपर हे समीकरण असलं तरीही आज मला कॉकटेल चालेल. मुद्दा काय तर निवांतपणासाठी बसावं लागतचं. चाय हो या काॅफी या फिर बॅगपाईपर. आपलं तर ठरलंय बुवा.
ह्या वाक्यावर नवरोबाची दांडी ऊडाली. क्लीन बोल्ड झालेल्या डक आऊट प्लेअरसारखे तोंड पाडून तो पॅव्हेलिअन मध्ये गुपचूप जाऊन बसला. मग तिलाच कसंतरी वाटलं. कारण तो फार ऊतम प्लेअर आहे हे तिला माहित होते. पण आज का दिन मेरा है असं ती मनोमन म्हणाली. दीनवाणा नवरा बघू शकत नव्हती म्हणून मग त्याला म्हणाली, “चला तुमच्या आवडीचं तुम्हाला खाऊ घालते”. पण मग तिचा ऊनाड, निवांत दिवस बघून त्यालाही वाटलं असावं असा निवांतपणा परत कधी मिळणार त्यांना.
मग त्यानेही तिच्यासारखंच अगदी फिल्मीस्टाईलमध्ये तिला विचारले.
किसी होटल में खाएं खाएं
कोई देख ले ना हमे यहां
कहीं घूम के आएं हम
चलो इश्क़ लर्डाई सनम
नवरोबा ने असं म्हणताच तिने क्षणाचाही विलंब न करता सरळ कपाटाच्या दिशेने कूच केले.
आता मात्र खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला. कपाटाचे द्वार उघडताच पेच निर्माण झाला. कपाटातील निरनिराळी वस्त्रे खोलीभर पसारली. नेमके कुठले वस्त्र परिधान करावे ह्या पेचात अजूनच पडली. हा पेच बहुतांश वेळेस निर्माण होतोच आणि तो सोडवण्यासाठी बाहेरील कक्षातून आवाज दिला गेला. “काहीही घातलंस तरी छानच दिसते तू. लाल रंगात तर अजूनही गुलाबच.” म्हणजे पेच सुटला. लाल रंगाचा ड्रेस परिधान करून ती तयार झाली.
आज दोघेही एकमेकांना वेळ देत होते. अगदी प्रेमीयुगल वागतात त्याप्रमाणे जगाला विसरून फिरायला गेले. नाही नाही चांदी की सायकलवर नाही बाईकवर गेले. नदीकाठी, समुद्र किनाऱ्यावर वगैरे नाही जमलं पण एका छान शांत गार्डन हॉटेलमधले एका कोपर्यातील टेबल मिळवलेच. चला आता नवरस ग्रहण करून उदरभरण झाल्यावर परत त्याच धकाधकीच्या आयुष्यात जायला हवे ह्याच विचारात ती असताना त्याची मात्र तिच्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर देऊन सुद्धा झाली.
आपल्या आवडीचे जेवण ऑर्डर केलेले बघून तिला फार आश्चर्य वाटले. आनंद सुद्धा झाला. तिचे आश्चर्य पाहून तो म्हणाला, ” मला माहीत आहे आमच्या आवडीनिवडी जपताजपता तुझ्या आवडीचं काहीच करायला जमत नाही. खरं सांगू तर आज तू जसा बेफिकीर दिवस एन्जॉय केला तसा मला सुद्धा करावा वाटतो. पण कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक नियोजन, भविष्याची तरतूद, शिक्षण आणि आरोग्य ह्यासाठीची बचत ह्याचे गणित मांडताना दमछाक होते.
नाही म्हणायला मित्रांसोबत कधीतरी जातो मी. पण तुला ते सुद्धा जायला मिळत नाही. तरीदेखील कुरकुर न करता तू मला खूप साथ देतेस. त्याबद्दल तुझे कधीच कौतुक केले नाही. पण खरंच थॅन्क्स आणि सॉरी सुदूधा. असं म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. चक्क सगळ्यांसमोर. तिच्यासाठी हा आनंदाचा धक्काच. हे खरंच घडत आहे की स्वप्न आहे हे बघण्यासाठी तिने स्वतःला चिमटा काढून बघितला.
“आऊच” जोरातच ओरडली ती. बघितलं तर काय समोर सासूबाई ऊभ्या आणि ही स्वयंपाकघरात ऊभी होती. म्हणजे स्वप्नच बघत होती ती. म्हणजे आतापर्यंत ती करत होती ते नुसतेच विचार. म्हणजे तो चहा, तो पिक्चर, मैत्रिणींसोबतच्या गॉसिप, ती कविता, तो नवऱ्याचा रोमॅटिक अंदाज, ते हॉटेल, नवऱ्याने केलेले कौतुकाचे संभाषण सगळंच विचारात होतं. प्रत्यक्षात काहीच घडलं नव्हते.
तिच्या ओरडण्याने आत आलेले सगळेच जण तिला काहीच न झालेले बघून परत बाहेर गेले. जाता जाता मात्र सगळेच काही ना काही सुचना करून गेले. सगळ्यात आधी सासरेबुवा म्हणाले, ” अगं थालीपीठ खावसं वाटतंय. दोन थालीपीठ कर माझ्यासाठी. ” त्यानंतर मुलं “थालीपीठ नको पिझ्झा कर” म्हणाली. ” थालीपीठ करणार असशील तर मी सुद्धा खाईन पण; त्यासोबत प्रसादाचा करतेस ना तसा शिरा कर”. नवरोबाचा हुकूम आलाच.
मग काय सगळ्यांची आवडनिवड जपायला पदर खोचून केसांना वर बांधून ती सज्ज झाली . तुमच्यासाठी काय बनवू असं विचारण्यासाठी सासूबाईंकडे वळलेली ती सासूबाईंना बघतच राहिली. कारण गॅस बंद करत सासूबाई मिश्कीलपणे हसत म्हणाल्या, “काय सूनबाई दिवास्वप्न बघताय की दिवसास्वप्न”. हसावं की रडावं हेच तिला सुचेना. तिला गोंधळलेले पाहून सासूबाई म्हणाल्या, “गॅसवरचं दूध ऊतू जाऊ देऊ नये आणि चहाचे आधण जास्तच ऊकळून आटून जाऊ देऊ नये. वेळेतच चहा पावडर, साखर घालावी. आलं, वेलदोडा कुटून घालावं आणि गरम दूध घालून फक्कड चहा गाळून घ्यावा. काय समजलं का?
तिला काहीच न समजल्याचे समजून सासूबाई म्हणाल्या, अगं म्हणजे अवास्तव इच्छा ऊतू जाऊ देऊ नयेत. हे जरी खरं असलं तरीपण छोट्या छोट्या पूर्ण होऊ शकणार्या इच्छा वेळेतच छोटे छोटे प्रयत्न करून पूर्ण कराव्यात. त्यासाठी काही पावलं ऊचलावी लागतात. काय आतातरी कळलं का?”
तिने हसून होकार दिला व म्हणाली,” मी आज जेवण बाहेरून मागवते. ज्याला जे हवे ते मागवते. आज स्वयंपाकघरात नो एन्ट्री मला सुद्धा आणि तुम्हाला सुध्दा. चला चहा आणते. मग आपण दोघी तुमच्या खोलीत निवांत पिक्चर बघत बसू. मिल बैठे तीन यार. आप, मै और ये चाय”. प्रत्येकीच्या मनातला ऊनाड, बेफिकीर दिवस दिवास्वप्नच. नाही नाही दिवसास्वप्न.
__पुजा सारंग, मुंबई.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मस्त दिवास्वप्न!
धन्यवाद मॅडम 😊🙏🏻
झकास स्वप्न👌👌
प्रत्येकीच्या मनातलं स्वप्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला ह्याचे समाधान. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻😊