शिक्षण हे एक असं शस्त्र आहे किंवा एक साधन आहे ज्याच्या बळावर आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. बरीच स्वप्नं पूर्ण करू शकतो. पण बऱ्याच जणांचं शिक्षण घेणं हेच मुळात एक स्वप्न असतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेणं सगळ्यांनाच जमत नाही. त्यातही “पीएचडी” करणं हे बऱ्याच जणांसाठी खरंच एक स्वप्न असतं. कारण एकतर परिस्थिती नसते, इतका वेळ देणं शक्य नसतं किंवा मग त्याबद्दल पुरेशी माहीती न मिळणं अशी बरीच कारणं असतात. त्यामुळे आजचा हा लेख अशाच विद्यार्थ्यांसाठी किंवा पीएचडी करण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्यांसाठी आहे. यात पीएचडी कशी करता येईल? त्यासाठी पात्रता काय असते किंवा विषय कोणता निवडावा अशी संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
त्याआधी थोडक्यात पीएचडी म्हणजे काय ते समजून घेऊ. पीएचडी म्हणजे “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी”. म्हणजेच एखाद्या विषयावर संशोधन करून तुम्ही त्या विषयात डॉक्टरेट ही पदवी संपादन करणे. हा साधारण तीन ते पाच वर्षांचा अभ्यासक्रम असतो. पीएचडी ही एक अतिशय उच्च पदवी आहे. ही पदवी मिळवल्यानंतर “डॉ.” हे बिरूद आपल्या नावासमोर अभिमानाने तुम्ही मिरवू शकता. पण ते तेवढं सोपंही नसतं बरं. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते आणि महत्वाचं म्हणजे तुमचा वेळ द्यावा लागतो. आता ही पदवी प्राप्त करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी हे बघुया.
पात्रता :-
१. पीएचडी साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही विषयात उच्च पदवीधर (Postgraduate) असणे आवश्यक आहे, अर्थातच तुम्हाला पीएचडी साठी तोच विषय घ्यायचा आहे. म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला पीएचडी करण्याची इच्छा आहे त्याच विषयाची मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. किंवा मग तुमच्याकडे त्या विषयाची “एम फिल” ही पदवी असणं आवश्यक आहे.
२. तुम्हाला तुमच्या मास्टर डिग्री ला खालील प्रमाणे टक्केवारी असणं आवश्यक आहे.
१. SC/ST :- ५०%
२. Open, NT, VJNT, OBC, Other :- ५५%
३. पीएचडी अभ्यासक्रमासाठी PET ही प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. जर तुम्ही NET/SET या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा संबंधित विषयात “एम फील” केलेलं असेल तर PET ही प्रवेशपरीक्षा द्यावी लागत नाही.
वयोमर्यादा असते का.?
पीएचडी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर करू शकता. परंतु आपल्या वयानुसार आपली अभ्यास करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता बघता लवकरात लवकर करावी हे कधीही योग्य.
पीएचडीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी जेवढा मोठा तेवढीच प्रक्रिया सुद्धा मोठी असते. ही प्रक्रिया आपण टप्प्यात बघू.
कशी असते प्रवेशप्रक्रिया.?
१.नोंदणी / Application Form
पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी लागते. नोंदणी प्रकिया पूर्ण करावी लागते आणि संपूर्ण माहिती भरून तो ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. यात तुम्हाला रिसर्च सेंटर सुद्धा निवडावं लागतं, जिथे पुढे जाऊन तुम्ही रिसर्च करणार असता.
एखाद्या विद्यापीठाकडून जेव्हा ॲडमिशन संदर्भात नोटीफिकेशन जाहीर केले जाते तेव्हा त्या विद्यापीठात किती आणि कुठे कुठे रिसर्च सेंटर असणार आहेत, आणि प्रत्येक सेंटरला विषयानुसार जागा किती असणार आहेत हे जाहीर केलं जातं. त्यामुळे या गोष्टी तपासून त्या सेंटरला मार्गदर्शक म्हणून कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती जागा आहेत हे बघून सेंटर निवडावं आणि हा फॉर्म भरावा.
२. PET Exam
दुसरा टप्पा असतो तो म्हणजे “PET Exam”.
ही शंभर गुणांची पात्रता परीक्षा असते. यामध्ये मुख्यतः दोन विभाग असतात.
१. Research Methodology
२. Subject Specific Section
या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा असतो तो म्हणजे मुलाखतीचा टप्पा.
३. मुलाखत
NET/SET परीक्षा उत्तीर्ण असलेले, एम फिल पदवीधारक, आणि कमीत कमी पन्नास टक्के मिळवून PET परीक्षेत उत्तीर्ण झालेले सगळे मुलाखती साठी पात्र असतात. या संपूर्ण प्रवेशप्रक्रिये मध्ये मुलाखतीचा टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला एक सेंटर सिलेक्ट करावे लागते, आणि ही मुलाखत याच सेंटर घेतली जाते. या मुलाखतीत तुम्ही संबंधित विषयात पीएचडी करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी योग्य आहात की नाही, त्या विषयावर आधारित तुम्हाला किती माहीती आहे .? तुम्ही संशोधन करणार आहात त्याचा समाजाला किती फायदा होणार आहे.? तुम्ही त्या विषयावर तुम्ही अधिकाधिक किती संशोधन करू शकता? या सर्व गोष्टी पडताळून बघीतल्या जातात. आणि तुमची एकंदर संशोधन करण्याची क्षमता आहे की नाही हे बघून तुमची निवड केली जाते आणि मग पीएचडी करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
४. Research Proposal/Synopsis
मुलाखती दरम्यान तुम्हाला एक रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिस सबमिट करावा लागतो. अर्थात ज्या विषयावर तुम्ही संशोधन करणार आहात त्याबद्दल किंवा त्या संदर्भात तुम्हाला माहिती गोळा करून हे प्रपोजल बनवाव लागतं. यामध्ये पुढील काही गोष्टी नमुद कराव्यात. सहा-सात पानांचं हे प्रपोजल किंवा हा सिनॉप्सिस टंकलिखित स्वरूपात असावा.
१. तुम्ही संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची ओळख. तसेच तुम्ही निवडलेल्या ठराविक विषयावर संशोधन करणं का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं ते लिहावं. त्यामुळे विषय निवडतानाच तुम्हाला ज्या विषयात विशेष रूची आहे असा विषय निवडावा. कारण त्याच विषयावर पुढची किमान चार पाच वर्षे तुम्ही संशोधन करणं अपेक्षित असतं.
२. तुम्ही कोणत्या दृष्टीने संशोधन करणार आहात, यात काय काय सामाविष्ट असेल हे थोडक्यात लिहावं. यात तुम्ही या संशोधनासाठी कोणत्या साहित्याचा अभ्यास करत आहात, किंवा याआधी या विषयावर कोणकोणत्या प्रकारचं संशोधन झालं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे हे नमूद करावं.
३. तुम्ही कोणत्या पद्धतीने हे संशोधन करणार आहात म्हणजे मेथडॉलॉजी काय असेल हे जर तुमचं ठरलं असेल याबद्दल थोडक्यात माहिती लेखी स्वरूपात तुम्हाला या रिसर्च प्रपोजल मध्ये द्यायची असते. पुढे जाऊन या पद्धती बदलल्या जाऊ शकतात परंतु मुलाखत घेणाऱ्या पॅनलला तुम्ही कशाप्रकारे संशोधन करणार आहात याबद्दल थोडक्यात माहिती असावी म्हणून हे लिहावं.
४. शेवटी संबंधित विषयातील संशोधन झाल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट अपेक्षित आहे किंवा तुमच्या संशोधनाचा हेतू सफल झाल्यावर तुम्हाला काय अपेक्षित आहे हे सांगावं.
५. पीएचडी चा संपूर्ण अभ्यासक्रम हा जवळपास पाच वर्षांचा असतो तर या पाच वर्षांत तुमचा पुढील प्लॅन काय असू शकतो. विषयानुसार तुम्ही कशाप्रकारे संशोधन करणार आहात, सुरूवातीला काय करणार आहात, थोडक्यात तुमचा रिसर्च प्लॅन कसा असेल हे थोडक्यात लिहावं.
६. तुम्ही हा रिसर्च किंवा हे प्रपोजल बनवताना कोणकोणत्या साहीत्याचा, किंवा लेख, रिसर्च पेपर यांचा अभ्यास केला आहे याची यादी प्रपोजलच्या शेवटी सादर करावी.
कोर्स वर्क (Course Work)
गेल्या काही वर्षांपासून काही विद्यापीठांमध्ये कोर्स वर्क घेण्यात येतो. PET परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्याकडून विद्यापीठामार्फत कोर्स वर्क करून घेण्यात येतो. यासाठी सुद्धा ॲडमिशन घ्यावं लागतं. या कोर्स वर्क चा कालावधी साधारण सोळा आठवडे इतका असतो. आणि याची फी साधारण पाच ते दहा हजार इतकी असू शकते. प्रत्येक विद्यापीठात ही फी वेगवेगळी असते. या कोर्स वर्क मध्ये तुम्हाला पीएचडी कशी करावी, संशोधन कसं करावं, प्रबंध कसा लिहावा इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.
कोर्स वर्क पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संबंधित विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यानंतर तुमच्या विषयावर संशोधन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. यात शोधनिबंध सादर करणे, सेमीनार मध्ये सादरीकरण करणे, वेगवेगळ्या नावाजलेल्या नियतकालिकांमध्ये तुमचा शोधनिबंध प्रसिद्ध करणे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तसेच हा रिसर्च करताना तुम्हाला फिल्डवर जावे लागते. बऱ्याच संशोधन करणाऱ्या संस्थांच्या ग्रंथालयांना भेट द्यावी लागते. तुमच्या विषयासंदर्भात अनेक प्रकारची माहिती गोळा करावी लागते. थोडक्यात तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो.
पीएचडी करण्यासाठी खर्च किती येतो.?
प्रत्येक विद्यापीठात हा खर्च वेगवेगळा असतो. तुम्हाला पीएचडी करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, तुमचा विषय काय आहे यानुसार सुद्धा हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. परंतु साधारणपणे हा खर्च दिड लाख ते दोन लाख इतका होऊ शकतो.
पीएचडी साठी फेलोशिप कशी मिळते.?
तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फेलोशिप साठी अप्लाय करू शकता. या फेलोशिप मार्फत तुम्हाला पीएचडी करण्यासाठी थोडी फार आर्थिक मदत मिळते जेणेकरून तुम्हाला रिसर्च करण्यासाठी मदत व्हावी. आपल्या महाराष्ट्रात BARTI, SARTHI,MAHAJYOTI या फेलोशिप देणाऱ्या काही संस्था आहेत ज्या विशिष्ट कम्युनिटी मधील विद्यार्थ्यांना फेलोशिप देतात. अर्थात यासाठी सुद्धा तुम्हाला संबंधित संस्थांच्या परिक्षा द्याव्या लागतात.
संशोधन पुर्ण झाल्यावर अर्थात तुम्हाला प्रबंध सादर करावा लागतो. पुन्हा एकदा हा प्रबंध सादर करण्यापूर्वी हे संशोधन कशा प्रकारे केलं गेलं, कोणत्या पद्धती वापरण्यात आल्या, त्यातून काय निष्कर्ष काढण्यात आला, संशोधनाचा निकाल काय आहे यावर सहा सात पानांचा टंकलिखित स्वरूपात एक सिनॉप्सीस सादर करावा लागतो. आणि त्यानंतर तुम्ही सादर केलेला प्रबंध तज्ञांकडून तपासला जातो आणि त्यांना तो योग्य वाटला तर तशी शिफारस ते विद्यापीठाकडे करतात. त्यानंतर सुद्धा एक तोंडी परीक्षा घेतली जाते आणि त्यात तुम्ही उत्तीर्ण झालात तर विद्यापीठाकडून एक पत्रक जाहीर करून तुम्हाला “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी” ही पदवी बहाल केली जाते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, पीएचडी प्रवेश प्रक्रिया कशी असते हे तुम्हाला या लेखात समजलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाप्रकारच्या अजून कोणत्या कोर्स बद्दल माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि असे अजून माहितीपूर्ण लेख वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद.!
-आकांक्षा
फार छान पद्धतीने माहिती आहे. धन्यवाद
It was very informative article. It came into my hand at thr exact time when it was very much required.
Thanks alot for throwing the light on such important topic.
उपयुक्त असा माहितीपूर्ण लेख