भारतीय साड्यांचे विविध प्रकार l Different types of Indian sarees in Marathi

WhatsApp Group Join Now

साडी ही भारतीय स्त्रियांचा अतिशय आवडता वस्त्र प्रकार आहे.हा वस्त्र प्रकार अतिशय प्राचीन आहे. हा शब्द संस्कृत शब्द सारिका यापासून तयार झाला आहे. सारिका म्हणजे न शिवलेले लांब वस्त्र.

प्राचीन काळापासून हिंदू स्त्रिया साडी हे वस्त्र परिधान करतात. इतर अनेक संस्कृतींमध्ये सुद्धा साडी परिधान केला गेल्याचा दाखला आहे. साडीची लांबी पाच ते दहा वार असते आणि तो एक सलग कापडाचा आयताकार तुकडा असतो. साड्या वेगवेगळ्या कापडांपासून तयार केलेल्या असतात. सुती साड्या, रेशमी साड्या असे अनेक प्रकार त्यामध्ये सापडतात. साडी मध्ये स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते. तरुण मुलींना तर साडी नेसून नटण्या मुरडण्यात एक वेगळाच आनंद वाटत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये सण, वार लग्न, अनेक घरगुती कार्यक्रम पूजा या कार्यक्रमांमध्ये विशेष करून साडी नेसली जाते. प्रत्येक राज्यातील साडी नेसण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत.

भारतामध्ये अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची साडीची वेगवेगळी परंपरा आहे.

भारतीय साड्यांचे विविध प्रकार different types of Indian sarees, in Marathi या लेखामध्ये आपण विविध राज्यातील साड्यांचे प्रकार व त्यांची माहिती बघूया.

१) कांजीवरम साडी–(तामिळनाडू)—-कांजीवरम साडीचा प्रकार तामिळनाडूमध्ये तयार होतो.  रेशीम धाग्यापासून ही साडी तयार होते. यामध्ये सोने आणि चांदीचे धागे विणले जातात. कांजीवरम साडी तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे विणली जाते. या साडीचे विशेष असे आहे की त्याच्या रंगाला विरूद्ध असे त्याचे रुंद काठ असतात. साडीची किंमत अडीच हजारापासून सहा लाख रुपयांपर्यंत असते. कांजीवरम साडी विणायला नेहमी तीन विणकर लागतात. पदर आणि मूळ साडी जिथे जोडल्या जाते तिथे सूक्ष्म नागमोडी रेषा आढळते. ही साडी रेशमी धागा आणि जरी काठ यामध्येच विणली जाते. या साडीची रुंदी ४८ इंच असते. कांजीवरम साडीच्या नक्षीकामात सूर्य, चंद्र, मोर, पोपट, राजहंस, आंब्याचे पान, जाई जुई यांचा वापर केला जातो.

असा समाज आहे की कांजीवरम साडीचे विणकर हे महर्षी मार्कंडेय यांचे वंशज आहेत.

ही साडी स्त्रिया लग्न समारंभांमध्ये विशेषतः वापरतात.

२) पैठणी साडी–(महाराष्ट्र)—-पैठणी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय साडी प्रकार आहे. पैठण ही फार पूर्वी महाराष्ट्राची राजधानी होती. त्या वेळेची शिवकालीन साडी आहे. या साडीचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे.

भारतातील उच्च दर्जाचे रेशमी धागे या साडी करता वापरले जातात. पदरा वरती मोरांचे नक्षीकाम असते. पैठणी साडीला महावस्त्र असे संबोधल्या जाते. ही साडी महाराष्ट्रातील येवला या गावामध्ये तयार होते. ही साडी तयार करण्याकरता अतिशय कुशल कामगार असतात. ही साडी रेशमी सोनेरी आणि चंदेरी धागे एकत्र करून विणली जाते. या साडीचा उपयोग फार पूर्वी रोमन लोकांबरोबर चलन म्हणून केला जात असे. मध्य काळामध्ये पैठणी तयार करण्याचे काम पूर्ण थांबले होते.पेशव्यांनी या वस्त्रोद्योगाला खूप चालना दिली. पेशव्यांनी या कामगारांना येवला येथे अभय दिले.त्यानंतर पैठणी येवला येथे तयार होऊ लागली.यामुळे संपूर्ण भारतभर या साडीची लोकप्रियता खूप वाढली. आता तर संपूर्ण जगामध्ये ती अतिशय लोकप्रिय आहे. पैठणी ही साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिव्यक्त करते. पैठणी साडी ही मुख्य साडी बॉर्डर म्हणजेच काठ व पदरावर भरजरी रेशमी डिझाईन असलेली साडी असते.

३) बनारसी साडी –(उत्तर प्रदेश) संपूर्ण भारतभर स्त्रियांमध्ये अतिशय आवडता असा हा साडी प्रकार आहे. बनारसी साड्या खूप महाग असतात. या साडीला ब्रोकेड केलेले असते. ब्रोकेड म्हणजे सोने व चांदीच्या धाग्यांपासून कामगार ही साडी तयार करतात. आधी फक्त रेशमी कपड्यावरच ब्रोकर केले जायचे आता लोकर, कृत्रिम कापड, सुती कापडावर सुद्धा ब्रोकेड केले जाते. ब्रोकेड खूप प्राचीन काळी चीनमध्ये केले जायचे त्यानंतर युरोप आणि आशियामध्ये त्याचा वापर होऊ लागला. या साड्यांवरील डिझाईन मुघल काळापासून प्रेरित होऊन केल्या गेलेले आहेत. बनारसी साडी मध्ये जाला पगिया आणि नाका या पारंपरिक पद्धतीचे काम केले जाते.

गुजरात मधील रेशीम विणकर बनारस मध्ये स्थायिक झाले होते. त्यावेळी तिथे रेशमी ब्रोकर चे काम चालू झाले साधारण 17 व्या शतकापासून बनारसी साडी वर ब्रोकेड चे काम केले जाते.

तीन हजार ते पाच लाखापर्यंत या साडीची किंमत असते. बनारसी साडी मुळे उत्तर प्रदेशातील हजारो कामगारांना रोजगार मिळालेला आहे. ही साडी विकण्यासाठी अनेक ब्रँड्स समोर आलेले आहेत. या साडी मध्ये दोन्ही बाजूला सारखेच जरीकाम असते. याची ही खासियत आहे. पूर्वीपासूनच विणकर आपल्या खानदानी गुपितासह या साड्या हातमागावर मिळत असतं. ही गुपितं कधीच बाहेर जात नसतं. त्यामुळे एकाच नक्षीची नक्कल कधीच होत नसे. आता मात्र तंत्रज्ञानाच्या साह्याने कुठलीही नक्कल करणे सोपे झाले आहे. पण तरीही या साडीची स्वतःची अशी एक ओळख आहे. पूर्वी खूप महाग असल्यामुळे सर्वसाधारण लोक ही साडी नेसू शकत नसतं. पण आता कृत्रिम धाग्यांमुळे ही साडी कमी किंमतीतही मिळू लागली आहे.

४) बांधणी साडी–(गुजरात)—गुजरात राज्याची बांधणी ही एक अतिशय खास साडी आहे. गुजरात मधील खत्री या समुदायाने हा साडी प्रकार तयार करायला सुरुवात केली. या साड्या तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे बंधन बांधले जाते. त्यावरूनच याला बांधणी असे नाव पडले. कापड बांधणाऱ्याला बंधारा व रंगविणाऱ्याला रंगरेज असे म्हणतात. राजस्थानातील काही भागात सुद्धा ही साडी तयार केली जाते. गुजरातमध्ये मंगल प्रसंगी स्त्रिया ही साडी नेसतात. या साड्यांचे रंग सुद्धा खूप छान असतात. पिवळा लाल निळा हिरवा आणि काळा हे रंग मुख्यतः वापरले जातात. या साड्या रेशमी आणि सुती प्रकारात मिळतात. त्यावर सुद्धा आजकाल विविध प्रकारचे नक्षीकाम केले जाते, त्या साड्या खूप महागड्या असतात. बांधणी कला ही एक कुशल प्रक्रिया आहे. पूर्वी कापसाच्या धाग्यापासून ही साडी तयार होत असे आता रेशमी आणि कृत्रिम धाग्यांपासून सुद्धा ही साडी तयार होते. या साडीच्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम कापडाला निळी मध्ये भिजवले जाते. नंतर त्याच्या आडव्या उभ्या घड्या घातल्या जातात. काठ व पदर यांना पोतापेक्षा वेगळा रंग द्यायचा असतो. त्यामुळे गेरूच्या पाण्यात बुडवलेल्या धाग्याने त्यावर रेषा मारण्यात येतात. जशी नक्षी असेल त्याप्रमाणे धाग्याचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी रंगाचा ठिपका काढायचा असतो तो भाग नखाग्राने उचलून त्याला मेणयुक्त धाग्याने बांधले जाते. नंतर ते रंगरेज कडे हव्या त्या रंगात तयार केले जाते. विसंगत रंग एकत्र करणे हे बांधणी साडीचे वैशिष्ट्य आहे. एकापेक्षा अधिक रंग वापरले असतील तर त्याला फुलवारी म्हणतात. पोतावर जर प्राण्यांच्या आकृती असतील तर त्याला शिकारी असे म्हटले जाते. बांधणी साडीचे काठ वीरभात या पारंपारिक शैलीनेच सजवले जातात. म्हणजे भावाने बहिणीला दिलेली देणगी.

५) कसावू साडी–( केरळ) केरळ मध्ये मंगल प्रसंगी ही साडी नेसली जाते. या साडीचे वैशिष्ट्य असे की तिचा रंग मोतीया असतो व बॉर्डर गोल्डन असते. यामध्ये असलेल्या गोल्डन जरी मुळे त्याचे नाव कासवू असे पडले आहे. ही साडी रेशमी सुती तसेच इतर प्रकारांमध्ये सुद्धा मिळते. या साडीला कसारागोड असे सुद्धा म्हटले जाते. या साड्या पाच हजाराच्या पुढे मिळतात.

कसावू साडीला जी आय टॅग मिळायला आहे. म्हणजे भौगोलिक स्थान दर्शक प्रमाणपत्र. चांदीची तार सोन्याच्या पाण्यात बुडवून तयार केलेली जर या साडीत वापरली तर या साड्या खूप महागड्या असतात.तांब्याच्या तारेचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

या डिझायनर साड्यांमध्ये पारंपारिक जरीच्या काठात लाल हिरव्या रंगात अतिशय उत्कृष्ट काम केलेलं दिसतं. या साडीची निर्मिती केरळमध्ये बौद्धकालात झाल्याचे दाखले आहेत. मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्यांमध्ये कसावू साडी नर्तकी द्वारा नेसली जाते. Different types of Indian sarees, in Marathi.

६) चंदेरी साडी–(मध्य प्रदेश) हातमागावर विणलेली ही मध्य प्रदेशातील सर्वोत्कृष्ट साडी आहे.

या साडीचे नाव मध्य प्रदेशातील चंदेरी या गावावरून देण्यात आले आहे. चंदेरी साडी विणण्याची कला ही तेराव्या शतकात राजा शिशुपालाच्या कारकिर्दीत सुरू झाली. पूर्वी मुघल कारागीर हे काम करत असत पण त्यानंतर कोष्टी कारागीर झाशीहून चंदेरीला आणण्यात आले. या साड्या रेशीम आणि मऊ सुता पासून तयार केल्या जातात.

भारतात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चंदेरी साडीचे उत्पादन केले जाते. चंदेरी सिल्क साडी, चंदेरी कॉटन साडी, आणि चंदेरी सिल्क कॉटन साडी.

जसजशी धाग्यांमध्ये उत्क्रांती होत गेली तसे तसे वेगवेगळ्या प्रकारची चंदेरी साडी तयार होऊ लागली.

१९३० च्या सुमारास कारागिरांनी कापसाऐवजी सिल्क चे धागे वापरायला सुरुवात केली.

चांदीच्या आणि सोन्याच्या धाग्यांनी केलेले उत्कृष्ट काम हे या चंदेरी साडीचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः पदर आणि बॉर्डरवर हे काम केले जाते. साडीचे कापड खूप पारदर्शक असते त्यामुळे अतिशय हलके असते. चांदी आणि सोन्याच्या विणकामामुळे या साड्या अतिशय सुंदर दिसतात. साडी वरील ताना हा धागा अतिशय उच्च दर्जाचा असतो त्यामुळे त्यावरील जुनी काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असते साडी वरती पारंपारिक फुले मोर नाणी आणि भौमितिक आकृत्या  यांची आकर्षक रचना केली जाते. चंदेरी साड्या अतिशय हलक्या असल्यामुळे भारतासारख्या उष्ण हवामानासाठी योग्य आहेत. पूजा, लग्न समारंभ, सणवार यासारख्या शुभ प्रसंगांकरता ही साडी वापरली जाते.

या साडीचे सत्यता पडताळण्या साठी त्याला जीआय टॅग आहे.

७) गढवाल साडी-( आंध्र प्रदेश) गढवाल साडी ही आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून १७० किलोमीटरवर असणाऱ्या गदवाल या गावी तयार होते. गदवाल या शब्दाचा अपभ्रंश होऊन गढवाल असे नाव पडले आहे. उत्तराखंड मधील गढवाल या शब्दाशी त्याचा काहीही संबंध नाही. पूर्वी ती पूर्णतः सुती साडी असायची. या साडीला पौराणिक संबंध आहे. या साडीचे जे विणकर आहेत ते पूर्वी हिंदू देवदैवतांचे वस्त्र तयार करायचे, त्यांना जीवेश्वर महाराज म्हणतात. त्यांचे वंशज आहेत. म्हणून या साडीला एक धार्मिक अधिष्ठान आहे. तिरुपती बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाच्या वेळेस देवाला गदवाल वस्त्र परिधान केले जाते.

गदवाल साडी तीन प्रकारात तयार केली जाते. एक असते संपूर्ण सुती, दुसरी असते संपूर्ण रेशमी, तिसरी म्हणजे मुख्य साडी सुती व काठ आणि पदर रेशमी. साडीच्या मधल्या भागावर कधी चौकडी डिझाईन असते तर कधी वेल व बुट्टी असते. गदवाल साडीच्या काठ व पदरावर दाक्षिणात्य देवळांचा तसेच नैसर्गिक घटकांचा प्रभाव असतो. मोर, कमळ, गोपुरं, रुद्राक्ष, कोयऱ्या इत्यादी आकृत्यांची सुंदर गुंफण केली जाते. या साडीच्या सुरुवातीचा भाग साडी नेसताना खोचला जातो, त्याला मुद्दाम टोचू नये म्हणून रेशमी धाग्यात विणले जाते.

८) बोमकाई साडी -(ओरिसा)

ही साडी ओरिसातील हातमागाची साडी आहे. बोमकाई हे गावाचे नाव आहे. या साड्या नेहमी करता पण नसल्या जातात तसेच रेशमी साड्या विविध प्रसंगी नेसल्या जातात. पूर्वी फक्त सुती धाग्यामध्ये विणल्या जात असतं. आता रेशमी टस्सर व इतर कृत्रिम धाग्यात सुद्धा विणल्या जातात. मुख्य साडी पदर आणि काठ यांचे रंग विरुद्ध असतात. भौमितिक रचना फुल पान यांचे नक्षीकाम केलेले असते. यामध्ये मुख्यतः लाल पिवळा निळा हिरवा असे वापरले जातात. बोमकाई साड्यांमध्ये सोनपुरी पळसपली, बारपाली यासारखे विविध प्रकार आढळतात. अनेक कथ्थक नर्तक ही साडी परिधान करतात. बोमकाई साड्यांमध्ये रंगाच्या दुहेरी छटा आढळतात. दिसायला अतिशय सुंदर व तलम ही साडी आहे.

तर या लेखांमध्ये भारतीय साड्यांचे विविध प्रकार, different types of Indian sarees in Marathi दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा. प्रतिक्रिया द्या व आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या व आमच्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा.

धन्यवाद!

14 thoughts on “भारतीय साड्यांचे विविध प्रकार l Different types of Indian sarees in Marathi”

  1. उत्तम माहिती, सर्व स्त्रिया चा आवडता विषय म्हणजे साडी 😊

  2. मेधा deshpande

    Very nice information that boost our creativity and increases knowledge, as well as we get introduced to our culture

  3. Vaishali Mannikar

    Unending varieties……Very nicely compiled.You have covered the main ones comprehensively under the restriction of word count.

  4. Gouri Santosh Jangam

    Very nice…. आणखीही काही साड्या राहून गेल्या आहेत
    त्यांच्यावर ही एक लेख लिहावा

    1. वैशाली देव

      हो, नक्कीच. अजून खूप प्रकारच्या साड्या आहेत. धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top