मराठी कथा – गुलमोहर 

WhatsApp Group Join Now

गुलमोहर 

यारी दोस्ती मस्तीची आठवण…. रखरखत्या ऊन्हातल्या गुलमोहराच्या सावलीसारखी…

प्रत्येकाच्या आयुष्यातील यारी, दोस्तीसाठी ही कथा.

किती वेळ झाला इथे रणरणत्या ऊन्हात ऊभ राहून. वाट बघणंच आहे माझ्या नशिबात. उगाच भेटूया म्हणाले. जाऊ का निघून इथून. देईन नंतर काहीतरी कारण त्याला.” असं बडबडत कनिका रोहन ची वाट बघत होती. थोडी अस्वस्थ होती. हाताच्या बोटांची गुंतागुंत म्हणजे तिच्या मनाची गुंतागुंत हे फक्त रोहनलाच माहित होते. तो वेळेवर आला होता. थोडा लांब ऊभा राहून तिला बघत होता. खूप वर्षांनी बघत होता तिला. तिच्या बोटांची गुंतागुंत त्याला दिसली होती म्हणून तो तिला शांत होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून थोडा लांब ऊभा होता. पण ती निघून जाण्यासाठी वळताना दिसल्यावर तिच्यासमोर जाऊन बाईक थांबवली. 

“हं… बसा मॅडम.” असं म्हणत त्याने ती बसण्याची वाट बघितली. पण ती ओळख नसल्यासारखी चार शब्द बोलून निघत होती. ती असं का करते हे रोहनला समजेना. परत तो म्हणाला, “ओ मॅडम बसा ना कशाला गरिबाला बोल लावता. बसा लवकर.” तिने रागाने रोहनला बघितल्यावर त्याच्या लक्षात आले आणि त्याने डोक्यावरचे शिरस्त्राण अर्थात हेल्मेट काढले. 

आता मात्र कनिकाला बोलायला शब्दच सुचत नव्हते. लगेच त्याच्यामागे बाईकवर बसली. “कुठे जायचे आहे मॅडम” रोहनने विचारल्यावर कनिका म्हणाली,” तू नेशील तिथे. फक्त खूप बोलायचं आहे. आपल्याला शांतपणे बोलायला मिळेल अशा ठिकाणी ने.”

रोहनने एका अतिशय शांत ठिकाणी म्हणजेच एका मॉलमध्ये कनिकाला नेले. ते बघून कनिकाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. हे बघून रोहन म्हणाला, “ह्यापेक्षा शांत जागा मला माहीत नाही. यायचं तरं ये नाहीतर जा घरी परत.” कनिका नाईलाजाने मॉलमध्ये गेली. फूड फ्लोअर वर जाऊन एका टेबलावर जाऊन दहा मिनिट कोण खायला मागवतंय ह्याची वाट बघत बसले. शेवटी रोहनने जाऊन कॉफी आणि सँडविच ऑर्डर दिली आणि कनिकाला म्हणाला,” ‘टी टी एम एम करायचे. तू बोलावलं आहेस मला पण मी माझ्या खाण्याचे पैसे देणार आणि तू तुझ्या खाण्याचे पैसे द्यायचेस.” 

कनिका नुसतच “हो” म्हणाली व गप्प बसली. त्यांची ऑर्डर येईपर्यंत रोहनने तिच्या बोलण्याची वाट बघितली. शेवटी तोच म्हणाला, “बोल काय बोलायचं आहे. तूच मेसेज करून म्हणालीस एकदा भेटू या. म्हणून आपण इथे आलो आहोत. मग आता बोल. तू स्वतःला अपराधी वाटून घेऊ नकोस. मी तुला माफ केले आहे.” 

हे ऐकल्यानंतर मात्र कनिका आश्चर्याने त्याच्याकडे बघून म्हणाली, “मी ! मी का अपराधी वाटून घेऊ स्वतःला. चूक तुझी आहे. तू सोडून गेलास मला. म्हणजे आम्हाला. तू आम्हाला विसरून तिच्यामागे गेलास. मग मी सुद्धा तुला सोडून गेले .”

“अजिबात नाही. तू हुरळून गेलीस. तू त्याची त्याची मोठी गाडी बघून त्याच्यामागे तू गेलीस. मग मी माझा मार्ग निवडला”. रोहनने तिला ऊत्तर दिले. 

“हे बघ, हे खोटं आहे. कॉलेजमध्ये असताना आपला पाच जणांचा छान ग्रूप जमला होता. ती आली आणि तू तिच्यामागे फिरत होता. आमच्याशी बोलणं खुंटलं तुझं. मागे वळून बघायला सुद्धा तुझ्याकडे वेळ नव्हता .” कनिका चिडून बोलत होती. 

रोहनला तिच्या बोलण्याचा रोख कळला होता. हाच गैरसमज त्यांच्या ग्रुपमध्ये झाला होता आणि त्यामुळेच त्यांचा ग्रूप तुटला होता. तो गैरसमज इतक्या वर्षांनंतर दूर करावा म्हणून दोघं आज भेटले होते. रोहन तिला म्हणाला, “कनिका रागावू नकोस; पण मला विचारलंत का तुम्ही कधी कि तू का ग्रुपमध्ये येत नाहीस? आधीपासूनच तुम्ही माझ्याविषयी गैरसमज करून घेतला आहेत. आजही तुम्ही मलाच व्हिलन बनवत आहात. तुमच्या चुका मी तुम्हाला कधीच सांगितल्या नाहीत. पण आज सांगणार आहे. 

तुझा भाऊ शैलेश जो तुझा मित्रसुद्धा आणि तू नेहमीच ऐकमेकांबरोबर राहत होतात. तुला तुझी मैत्रीण ममता फार प्रिय होती. तुला कधीच माझ्यासाठी वेळ नसायचा. कायम ममता, शैलेश ह्यांच्या शिवाय तुझं जग नव्हतं. ममताचे जग होता रवी. रवीला ममता आवडायला लागल्यापासून ती आणि तो सोबत फिरायचे. शैलेशला नेहमीच कुणी ना कुणी सोबत असायचे. त्याचे मित्रमैत्रिणीं खूप होते. तू कधीही एकटी मला भेटायला येत नव्हती. तुला कायम ममता नाहीतर शैलेश सोबतीला लागायचा. मग मी सुद्धा माझी जोडी शोधली. ती मला खूप जपत होती. तिने माझी काळजी घेणं, प्रेम करणं मला आवडतं होतं. आज ही ती मला स्पेशल ट्रिटमेंट देते. नवरा बायको असूनही आम्ही आजसुद्धा एकमेकांचे मित्र आहोत. माझ्यावर अतोनात प्रेम करणारी मला बायको मिळाली. मी खूष आहे माझ्या आयुष्यात. पण तुमचा गैरसमज दूर व्हावा म्हणून मी आज तुला भेटायला आलो. “

कनिका अगदी शांतपणे सगळं ऐकत होती. त्याच बोलून झाल्यावर म्हणाली,” झालं तुझ बोलून. मी सुद्धा आज हाच गैरसमज दूर करायला आले आहे. आज सगळंच स्पष्ट बोलणार आहे. आधी आपल्या विषयी बोलू या. हो मला तू आवडत होतास. तुझ्या आणि तिच्याविषयी माहित असूनही माझ तुझ्यावर प्रेम होतं. आपल्या ग्रुपला हे सगळंच माहित होतं. माझं पहिलंच प्रेम पण ते दुसर्‍याच कुणाला तरी मिळत होतं. तू सुद्धा माझ्याबरोबर कुठे स्पष्ट बोललास . कॉलेज संपल्यावर संपर्क कुठे ठेवलास. माझं शैलेश आणि ममता जग होतं ह्याला कारण माझी आई. माझ्या आईचा त्यांच्यावर असलेला विश्वास. ती दोघं बरोबर असली कि तिला माझी काळजी नसायची. एका मुलीची आईला काळजी वाटणं स्वाभाविक आहेच की. “

“म्हणजे आम्ही काय नाला*यक होतो की काय? आमच्यावर विश्वास नाहीच का ?”, रोहन मध्येच ओरडून म्हणाला. 

कनिकाने हसत मान डोलावत नकार दिला आणि म्हणाली ,”आईला कळालं होतं तू मला आवडतोस ते. म्हणून ती मला तुझ्याबरोबर पाठवत नव्हती. आतातरी कळलं ना मी तुला एकटी भेटायला का येत नव्हती ते. बरं ह्या सगळ्यासाठी मी तुला नाही बोलावलं. आपला ग्रुप जो तुटला आहे तो जोडण्यासाठी बोलावलं आहे. तु तुझ्या संसारात सुखी आहेस आणि मी माझ्या संसारात खूष आहे. आपल्यासाठी देवाने हेच लिहून ठेवले होते. पण मला असं वाटतं की आपला ग्रुप परत एकत्र यावा. सगळेच परत भेटूया. “

“मला काहीच प्रॉब्लेम नाही. बाकीच्यांना विचार त्यांना मी चालणार आहे का?” रोहनने कनिकाकडे ऊत्तराच्या अपेक्षेने बघत विचारले. 

“त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. तुला कळवते मी ते काय सांगत आहेत ते. एक दिवस ठरवू आणि आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटू. जुने दिवस परत जगूया.” कनिकाने ठरवण्याच्या ऊद्देशाने रोहनला सांगितले.

“अच्छा ह्याचा अर्थ सगळ्यात आधी मला बकरा बनवते आहेस. चालेल. बकरा हलाल होने को तयार है. आता ह्या खाण्याचे पैसे सुद्धा मलाच द्यायचे आहेत हो ना.” रोहन नकारार्थी मान डोलावत हसत कनिकाला म्हणाला. 

“अगदी बरोबर ओळखलं आहेस. तसं तू खूप बदलला आहेस. आधीच इतकं मोकळेपणाने बोलला असतास तर आज चित्र काही वेगळेच असते. असो. बिल तू दे. तुझ्या वागण्याची शिक्षा समज.” असं म्हणत कनिका ही हसून डोळे मिचकावत होती. 

“तू सुद्धा बदलली आहेस. खूप चतुर नार झाली आहेस.” रोहन सुद्धा असं म्हणत हसत खाण्याचे पैसे देण्यासाठी ऊठला. आता दोघेही मोकळेपणाने बोलत होते. कनिकाचा सुद्धा अवघडलेपणा नाहीसा झाला होता. ती रोहनला म्हणाली,” बाय द वे तुझी फॅमिली मस्त आहे. छोटा रोहन तर अगदी त्याच्या आईसारखाच आहे. खूप छान वाटलं तुमची हॅपी फॅमिली पाहून. “

रोहनने हसून तिच्या ह्या कौतुकाचा स्वीकार केला. आता रोहन ही आपल्या फॅमिलीविषयी विचारेल ह्या अपेक्षेने कनिका त्याच्याकडे बघत होती. पण रोहन तिची मस्करी करण्यासाठी म्हणाला, “लग्न जास्तच मानवलं आहे तुला. सॉरी सुखाचा संसार मानवला आहे तुला असं म्हणायला पाहिजे आता. दोन मुलांची आई वाटतेस खरी. “

“म्हणजे मी इतकी जाडी दिसते का तुला ?” कनिकाने स्वतःला चाचपडून बघत बावळटपणाने त्याला विचारलं. तसा रोहन जोरात हसला आणि म्हणाला, “तुम्ही मुली लग्नाआधी बिनडोक असता कि लग्न झाल्यानंतर बिनडोक होता हे कळतं नव्हतं पण आज प्रत्यक्ष बघितलं की मुली बिनडोक असतात नेहमीच. ” 

कनिकाला आपली चूक लक्षात आली. हा बावळटपणा आपल्याला करायला नको होता हे तिच्या लक्षात येतं पण लगेच ती त्याला म्हणते, बिनडोक मुलगी तुझ्या घरातच आहे. ते बघण्यासाठी तुला इथे येण्याची गरज नव्हतीच. एका बिनडोक मुलीनेच तुझ्याबरोबर लग्न केले आहे तिलाच जाऊन बघ.” 

“वाह! क्या फ्लॉप जोक था”, असं म्हणत रोहन तिला चिडवत होता. दोघेही असंच थट्टा मस्करी करत होते आणि परतीच्या वाटेवर निघाले. परतण्याची वेळ झाल्यावर दोघेही परत थोडे अवघडले. पण कनिकाने मात्र हिंमत करत त्याला विचारले, “तुला वेळ असेल तर आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊया का?” रोहनने लगेच होकार सुद्धा दिला.

मग बाईकचा वेग वाढवत दोघही नेहमीच्या कट्ट्यावर आले. बसस्टॉप जवळचा गुलमोहर हा त्यांचा कॉलेजमध्ये असतानाचा कट्टा. गुलमोहोराच्या झाडाखाली, त्याच्या सावलीत कॉलेज सुटल्यावर ह्या पाच जणांचा ग्रुप तिथे येत होता. थट्टा मस्करी करत वेळ घालवून आठवणी जमा करत होता. ह्याच गुलमोहोराखाली प्रेम बहरले होते. काहींच्या वाटा जुळून आल्या तर काहींच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. आठवणी मात्र तिथेच राहिल्या होत्या. 

त्याच गुलमोहोराखाली कनिका आणि रोहन परत आले होते. त्या सावलीत आयुष्यातल्या ऊन्हाचा दाह कमी झाला. एक शांत गार झुळूक स्पर्शून गेली दोघांना. कनिका थोडी भावनिक झाली. डोळ्यात आसवांची गर्दी होऊ लागली. रोहनला कळेनाच तिला कसं समजवावे. कनिकाने त्याची घालमेल समजून घेऊन स्वतःला सावरले आणि म्हणाली, “काळजी करू नकोस. मी स्वतःच स्वतःला सावरायला शिकले आहे. तुम्ही सगळेजण निघून गेलात. मग मीच स्वतःला सावरायला शिकले. इथे आल्यावर आपले आधीचे दिवस आठवले. 

आपला ग्रुप पाच रंगांचा. ममता समजूतदार, तू अबोल, रवी प्रॅक्टिकल, शैलेश मस्तमोला आणि मी बावळट घाबरट. कदाचित म्हणूनच आपण सगळे एक धाग्यात बांधले गेले होतो. धागा तुटून गेला. मणी विखरून गेले. पण अजूनही कधीतरी मणी एकमेकांवर आदळतातच. ममता आणि मी अजूनपर्यंत एकमेकांबरोबर आहोत. ममता आहे म्हणून रवि आहे. पण ह्या माळेला शोभा देणारे दोन मोती अजूनही लांब आहेत. 

एक मोती समुद्राच्या खोल तळाशी जाऊन बसला आहे. आणि एक मोती इथेच कुठेतरी लपून बसला आहे. तो लपलेला मोती आमच्या माळेमध्ये येईल का परत? सांग ना. येईल का परत?. समुद्रात गेलेला मोती नाही परत आणू शकणार; पण लपलेला मोती माळेमध्ये परत ओवून घट्ट बांधू शकतो ना आपण. बोल ना येशील का परत आमच्यामध्ये?”

रोहन आता सुन्न होऊन गुलमोहराच्या सावलीत बसला होता . त्याला आता कळालं होतं कि कनिका सगळ्यांना एकत्र आणण्याचा का प्रयत्न करत आहे. तिचं पहिलं प्रेम ती त्या माळेत ओवून ठेवू पाहत होती. तिचं पहिलं प्रेम म्हणजे त्यांची पाच जणांची यारी दोस्ती. त्यातील एक दोस्त त्यांच्यामधून कधीच निघून गेला होता. खूप लांबच्या प्रवासाला. शैलेशच्या जाण्याने माळेतला एक मोती निखळून पडला. माळ अपूर्ण राहणार होती. 

शैलेशच्या आठवणींनी तिघांचेही मन डोळे भरून आले. ती यारी, ती दोस्ती, ती मस्ती, ते प्रेम हूया सगळ्यालाच साक्ष हा गुलमोहर होता. आज तो गुलमोहर सुद्धा आसवं गाळीत होता. पाच जणांच्या आयुष्याचा साक्षीदार पुन्हा आज एका नवीन प्रवासाचा साक्षीदार होणार होता. 

रोहन कनिकाला म्हणाला, “मी ह्या माळेतून कधीच तुटलो नाही. तू बरोबर म्हणालीस एक मोती लपला आहे. तो मोती मी आहे हे जसं तुला माहित आहे तसं ह्या गुलमोहराला सुद्धा माहित आहे. तू जसं माझी माहिती सोशल साईटवरून मिळवत होतीस तसं मी ही माहिती मिळवत होतो. रवि ममताचं लग्न, त्यांच्या दोन्ही मुली, तुझी दोन्ही मुलं सगळ्यांना मी बघितलं सोशल साईटवर. तू सोशल साईटवर लिहीतेस हे सुद्धा मला माहीत आहे. 

आठवणींसाठी ऊचकी हवी कशाला 

डोळे बंद करूनी विचार फक्त स्वतःला

स्वप्नी पहावा नेहमीच त्याचा हसरा चेहरा 

नजराणा द्यावा त्याने मला प्रत्यक्ष भेटीचा

मग आतातरी ऊचकी थांबली का? आणि पटलं का मी लपलेला मोती असलो तरी तुटलेला मोती नाही. तुटलेला मोती आपल्यात कधीच परत येऊ शकत नाही. हे मान्यच आहे. पण आठवणीच्या शिंपल्यात तो मोती नेहमीच असेल हे सुद्धा मान्य कर. सगळे मोती तुटून जाण्याआधी आपल्या चार मोत्यांची माळ परत एकदा ओवून घट्ट बांधू या. मी आहे तुझ्याबरोबर. ” 

कनिकाला काय रिॲक्ट करावं तेच समजतं नव्हते. तिथे फक्त आसवांचा पूर वाहत होता. रोहनने तिला रडू दिलं कारण त्याशिवाय ती शांत होणार नव्हती. ती रडून थोडी शांत झाल्यावर रोहनला म्हणाली, “मला खात्री होतीच तू माझ्याबरोबर असणार ह्याची म्हणूनच पहिला बकरा तुला केला. आता इथेच ह्या गुलमोहराखाली अजून एक बकरा आणि बकरी पकडते. बघ आताच करते त्यांना मेसेज.” असं म्हणत कनिकाने ममता आणि रवीला मेसेज करून बोलावून घेतले. 

आता गुलमोहराच्या साक्षीने कनिकाने रोहनला सांगितले. “तूला कंटाळा येणार नसेल तरं काही लिहीले आहे ते ऐकवू का?”

“हम आता काय दुसरा बकरा आणि बकरी येईपर्यंत ये बकरा आपकी खिदमद में हाजीर है. सुनाईऐ आपकी बकवास कविता.”, असं म्हणत रोहन हसत होता. कनिकाला सुद्धा हसू आले. तिने त्याच्या आणि गुलमोहराच्या आठवणीत रचलेल्या चार ओळी त्याला ऐकवल्या. 

तुझी माझी तिथे भेट होईल का परत

जिथे बहरला होता प्रेमाचा गुलमोहर 

तुझ्या माझ्या भावनांचा साक्षीदार तो

त्याच वाटेवर चढे आपल्या प्रेमाचा बहर

चार ओळी ऐकताच रोहनने भुवया ऊचांवल्या.” विचार काय आहे मॅडम. भिती वाटते आहे मला. मेरी इज्जत खतरेमें है”, असं म्हणत रोहन घाबरण्याची ॲक्टींग करत होता. 

कनिकाने ही हसत ऊत्तर दिले, “थोडीशी फ्लर्टींग तब्येतीला चांगली असते. म्हणून मी अजूनही तरूण आहे आणि तू म्हातारा. “

तोपर्यंत रवी आणि ममता सुद्धा आले होते. त्यांचे हे बोलणे ऐकून ते ही त्यांच्या मस्करीत सामील झाले. अशीच थट्टा, मस्करी, मस्ती चार जणांमध्ये सुरू झाली आणि परत एकदा आठवणींचा साक्षीदार होण्यासाठी गुलमोहर बहरला.  

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

प्रत्येकाच्या आयुष्यातील यारी, दोस्तीसाठी ही कथा आवर्जून वाचा. तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

   

8 thoughts on “मराठी कथा – गुलमोहर ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top