कथेचे नाव – “वळीव” मन सुन्न करणारी हृदयस्पर्शी कथा

WhatsApp Group Join Now

उन्हाळा संपला.पावसाळ्याची चाहूल लागली.तरी वळीव काही ढसळला नाही.सगळीकडे वैशाखवणवा  पसरला होता.डोंगरावरील गवत वाळून डोंगर ओसाड वाळवंटासारखे भासत होते.झाडे झुडपे सुकून गेले होते.जमिनीला भेगा पडल्या होत्या.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता.हाताला काही काम नाही म्हटल्यावर  व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या माणसांची केविलवाणी अवस्था झाली होती.

        ” यंदा कसं व्हनार काय बी कळना झालंय.वर्षभराची जमापुंजी मातीत घालून बसलोय.आता पुढलं वरीस कसं काढायचं .?”कपाळाला हात लावत भीमा बोलला.

        ” कशाला जीवाला खातुस ? जे  जगदूनेचं झालं तेच आपलं व्हईन. बुलून काय व्हनार हाय व्हय.व्हईन पाऊस तो काय आल्याशिवाय राहणार हाय का? त्यो वर बसला हाय त्याला बी काळजी हाय की. तू नगं ईचार करू.” भीमाची आई म्हणाली.

      “आगं आय पण लोकांनी न्हाय एवढा पैका खर्च केला .आपून दुबार प्यारलया. आनं हा बाबा तोंड वासून बसलंया.एकदा दोनदा झाला ना वळीव? मग गळ लागली तरी व्हतया कसं बी.” चेहऱ्यावर अनेक प्रश्नांचे भाव चढवत भीमा बोलला.

           आज जरा वेगळंच बदल जाणवत होते. उकाड्याने हैराण केले होते.अंगातून बदबदा  घाम गळत होता. सगळ्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. उबाळ्यानी काही जण झाडांच्या सावलीत बसले होते.पाण्याच्या आभावानं झाडांची पानगळ होऊन सावली सुध्दा विरळ झाली होती .दुपारीच आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली . भीमाला जरा बरं वाटलं.आता वळीव चांगलाच तयारीत आहे.आपली आशा फळाला आली.असा विचार करून राहून राहून तो आकाशाकडे पाहत होता.

           “भीमा आज आवसान काय तरी यागळच दिसतंय . पानंवारा बी सुटलाय.दुपारच्या नंतर येईलच पाऊस .चिन्ह त तशीच दिसत्यात. बघ त्यानी घेतलंच हाय मनावं.तू उगाचीच काळजी करतो.” ,भीमाची आई धीर देत बोलली.

          गंभीर असलेलं वातावरण अचानक बदलून गेलं. काळे ढग जमा होऊ लागले .सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा गडगडाट चालू झाला. विजा कडाडू लागल्या. आणि बघता बघता पाऊस कोसळू लागला.बऱ्याच दिवस आ वासून बसलेली धरती शांत होऊ लागली.भीमा समाधानाने पावसाकडे पाहू लागला.हा पाऊस नव्हता तर त्याचं भविष्य होतं.जी काळजी त्याच्यापुढे थयथया नाचत होती ,ती आता पावसाच्या एका एका थेंबासोबत जमिनीत विरघळून जात होती. डोक्यावरचं ओझं कमी होऊ लागले.धो- धो पाऊस कोसळूत होता आणि धरती आपल्या कुशीत त्याला सामावून घेत होती. भीमाची सर्व चिंता जणू वळीव वाहून नेत होता. कोमजलेल्या पिकाला नवी पालवी फुटली. भिमाच्या चेहऱ्यावरतीही आनंदाची पालवी पसरू लागली. आता वर्षाचे स्वप्न जणू तो एक क्षणात पाहू लागला.

            पाऊस आला म्हणून भीमाने त्याच्या पत्नीला म्हणजे नर्मदाला गोडाधोडाचं जेवण बनवायला सांगितलं .घरातील होती नव्हती ती सगळी सामग्री वापरून नर्मदाने सागरसंगीत बेत केला. सगळेजण जेवून तृप्त झाले.भीमा  जेवून नाही तर पाऊसाच्या येण्यानेच  तृप्त झाला होता. “याचसाठी केला होता अट्टहास”अशी भीमाची अवस्था झाली.

             “कारं भीमा  लगीचं झालं जेवून,खा की  अजून  उसकं ? आरं पावसानं मन भरलं पण पोट थोडीच भरणार हाय ?भीमाची आई ताटात वाढत भीमाला बोलली.

           “काय पण म्हण आय  पण वळीव जसा ढसाळला हाय तशी माझी भूक गप गुमान एका कोपऱ्यात जाऊन बसली हाय .” मोठ्याने हसतच भीमा बोलला. भीमाचा उत्साह ओसंडून वाहत होता. आता बरीच काळजी मिटली म्हणून भीमा त्या रात्री निवांत झोपी गेला. वळीव मात्र धो – धो  पडत होता. दोन दिवस झाले परंतु पाऊस काही उघडायचं नाव घेत नव्हता. दोन दिवस तहानलेल्या जमिनीने आपली तहान भागवली.आता तीही तृप्त झाली होती.जमिनीची ग्रहण करण्याची क्षमता संपली.तिच्या उदरातून पाणी ओसांडून वाहू लागले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. आता गरजेपेक्षा जास्त पाऊस पडू लागला. चार दिवस झाले तरी पाऊस अजूनही उघडायचं नाव घेत नव्हता. जमिनीतून नुकतेच फुटलेले अंकुर  भुईसपाट झाले. तळे,नाली तुडुंब भरले. वळीवाने विक्राळ रूप धारण केले.शेतांची तर नासाडी झालीच .पण कोणाच्या घरात;तर कोणाच्या गोठ्यात पाणी शिरले.जी आशा उदयाला आली होती ती मावळून गेली.

       “कोणत्या जन्माचं वैर काढतोय ह्यो बाबा ,”खाईन त तुपाशी नाहीतर उपाशी “असा का करतोय गं आय ? एकटक पेरलेल्या शेताकं बघत भीमा बोलत होता.

           “आता कोणत्या तोंडानं सांगू रं बाबा तुला  का काळजी करू नगं . कोण बी आपला पाठीराखा नाय बघ.याच्यावं म्या काय बोलू लेकरा.” भीमाच्या आईच्या चेहऱ्यावर चिंतेने जाळ विणलं.

          ” आगं आय त्यानं पार   वाटूळं केलंय .काय मिळालं आस करून. आसं नाय तर तसं मा*रा*यलाच  बघतोय हा. काय करू ? हा काय आता आपली म*रा*यची वाट बघतोय काय ? रडतच भीमा तोंड बडवू लागला. नर्मदाने आणि आईने भीमाला शांत केले.

            सतत बाहेर पडणारा पाऊस पाहत असणारा भीमा आता बाहेर  डोकूनही पाहत नव्हता.आठव्या दिवशी रात्र ही सगळ्यांनी बसूनच काढली. कारण झोपण्यासाठी घरात कोरडी जागा उरली नव्हती . चार – पाच दिवस कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही . “घरात अशी अवस्था तर बाहेर काय झालं असेल ?”  भीमाच्या डोक्यातून एक विचार झरकनं बाहेर आला.

        पहाट झाली.सगळीकडे   भयाण शांतता पसरली होती.मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्यातील किड्यांचाही ओरडण्यासाठी आवाज निघत नव्हता.भीमा बाहेर आला.सगळीकडे नजर फिरवली.ज्या जागेत तो राहतो ती जागाही त्याला अनोळखी वाटू लागली.कारण सगळीकडे पाणीच पाणी शिरले होते.सगळ्या जागेचा ताबा आता पाण्याने घेतला होता.भीमा त्याच्या गोठ्याच्या दिशेने गेला.आणि त्याने मोठ्याने आरोळी फोडली.सगळे धावत आले.पाहतात तर सुक्री गाय ने जीव सोडला होता.तिच्या अंगावर विज पडली असावी .कारण ती पूर्ण भाजून निघाली होती.

       ” आरं माझ्या देवा! सगळं संपलं .” म्हणत भीमा ओक्साबोक्शी रडू लागला.मटकन तो खाली बसला.आणि चिखलात तसाच लोळत राहिला…….

नियतीचा हा खेळ नाही कुणा कळला..

त्यावर राहुनी विसंबुनी डाव तेथे फसला…

सर्व फासे उलटे पडले..
बघता बघता अघटीत घडले…

नाही आली जराही त्याला कीव..
तो निघाला जीवघेणा “वळीव” ..

        समाप्त !

          तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ” लेखक मित्र “या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा”whatsApp” ग्रुपही जॉईन करा.

          धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

8 thoughts on “कथेचे नाव – “वळीव” मन सुन्न करणारी हृदयस्पर्शी कथा”

  1. खुप सुंदर आणि वेदना दायी कथा, खुप मनाला नाही काळजाला भिडली कथा ही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top