आंब्यापासून कोकणात हमखास बनवले जाणारे हे पदार्थ तुम्ही कधी बनवले आहेत का.?
Authentic Mango Recipes :सध्या प्रचंड उकाडा जाणवतोय. दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे. अशा अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात एकच गोष्ट आनंद देते ती म्हणजे या सिझन मध्ये येणारा फळांचा राजा “आंबा”. आता बाजारात या राजाने आपलं जिथे तिथे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहेच. बरेच जण आंबे फक्त आमरस बनवून खाण्यासाठी आणतात. तर काही जण या आंब्यापासून किंवा अगदी कैरी पासून सुद्धा जेवढे बनवता येतील तेवढे पदार्थ बनवून संपूर्ण उन्हाळाभर या फळाचा पूर्णपणे आस्वाद घेतात. त्यात मग गुळांबा असेल, मॅंगो मिल्कशेक असेल किंवा मग साधं पन्हं नाहीतर एखाद दिवशी आंब्याचा पल्प काढून त्याचं आईस्क्रीम बनवून खातात.
आज या लेखात आम्ही आंब्यापासून बनवले जाणारे दोन पारंपरिक पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवू शकता.
१. उकड आंबा
उकड आंबा हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो खास करून कोकणात बनवला जातो. काही ठिकाणी त्याला मोहरीचा उकडांबा असं सुद्धा म्हणतात. एकदम चटपटीत आणि झणझणीत असा उकड आंबा म्हणजे एक प्रकारचं लोणचं. जेवताना भाजी नसली तरी तोंडी लावायला घेऊ शकता. हा उकड आंबा बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया.
साहित्य :-
१. छोटे छोटे पिकलेले किंवा अर्धवट पिकलेले आंबे, कोकणात यांना बिटके आंबे बोलतात. असे साधारण आठ ते नऊ छोटे आंबे.
२. मोहरी तीन ते चार मोठे चमचे(एक छोटी वाटी)
३. मीठ – पाव वाटी
४. तिखट – पाव वाटी
५. मेथी दाणे – एक छोटा चमचाभर
६. तेल – पाऊण वाटी
७. हिंग गरजेनुसार
८. हळद गरजेनुसार
कृती :-
तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तर आंबे उकडून घ्यावेत. उकड आंबा म्हटल्यावर ही कृती सगळ्यात महत्वाची. पण हे आंबे फक्त वाफेवर शिजवून किंवा उकडून घ्यायचे, बरं का.! मग त्यानंतर चार ते पाच तास ते छान थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यांना चार बाजूने उभ्या चिर मारून घ्यावेत. एका बाजूला पाऊण वाटी मोहरी मिक्सरमधून बारीक करून घ्यावी आणि त्या पावडर मध्ये उकळून थंड केलेले पाणी घालून ती थोडी सरसरीत भिजवून दोनते अडीच तास बाजूला ठेवून द्यावी.
नंतर एक छोटी कढई किंवा तडका द्यायला वापरतो ती कढई तापत ठेवून त्यात एक मोठा डाऊल तेल गरम करावं, त्यात एक छोटा चमचा मेथीचे दाणे घालून ते थोडे लालसर होईपर्यंत परतावे. गॅस बंद करून ते बाहेर काढून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर करून घ्यावी. एक दोन मिनिटांनी पुन्हा त्याच कढईत तेल तापवून पाव वाटी तिखट परतून ते थंड करून घ्यावे. हे झाल्यावर आता एका मोठ्या कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात थोडी मोहरी घालावी, मोहरी तडतडली की त्यात थोडं हिंग टाकावं, आणि मग हळद टाकून एक दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.
आता वाटून भिजत ठेवलेल्या मोहरी पावडरच्या मिश्रणात थंड झालेलं फोडणी करून घेतलेलं तेल टाकावं, परतून घेतलेलं तिखट घालावं, मेथी पावडर आणि मीठ घालून चांगलं ढवळावं. आवडत असल्यास थोडा गूळ घातला तरी चालेल. सगळं छान मिक्स झाल्यावर एका बरणीत आपण चिरा मारून ठेवलेल्या कैऱ्या ठेवाव्यात आणि तयार केलेलं हे सगळं मिश्रण त्यात ओतावं. कैऱ्यांच्या वरपर्यंत छान सगळं मिश्रण आलं पाहिजे. आता ही बरणी घट्ट बंद करून दहा पंधरा दिवस बाजूला ठेवून द्यावी. आणि पंधरा दिवसांनंतर छान चटपटीत मुरलेला उकड आंबा खायला घेऊ शकता.
२. नारळ आंबा वडी
आता नारळ आणि आंबा कोकणातील मुख्य फळं. नारळ वडी ही कोकणातील प्रसिद्ध आणि घरोघरी हमखास बनवली जाणारा पदार्थ. मुंबईवरून आलेल्या चाकरमान्याला जाताना त्याच्या पिशवीत या वड्या असणारच. आता याच वड्या मॅंगो फ्लेवर मध्ये हव्या असतील तर त्या कशा बनवायच्या ती कृती इथे सांगतोय, नक्की करून बघा.
साहित्य :-
१. दोन छान तयार झालेले आंबे
२. पाच ते सहा वाट्या खवलेलं ओलं खोबरं
३. तुप ४ चमचे
४. साखर अडीच वाटी(जास्त गोड आवडत असल्यास तीन वाट्या)
५. मिल्क पावडर (असेल तर)
६. ड्राय फ्रूटस सजावटीसाठी
कृती :-
नारळ आंबा वडी बनवायला अगदी सोपी. फार वेळ सुद्धा लागत नाही. आंब्याचा रस काढून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावा. आणि नारळ फोडून छान वरवर बारीक खवून घ्यावा. म्हणजे नारळाचा चव जास्त जाडसर काढू नये. नंतर एका कढईत तूप घालून नारळाचा चव छान परतून घ्यावा. तो सतत हलवत राहावं. रंग सोनेरी होत आला की साखर आणि मिल्क पावडर घालून परत दोन तीन मिनिटं ढवळत राहावं. नंतर शेवटी आंब्याचा रस घालून पुन्हा दोन तीन मिनिटं परतून घ्यावा. मग गॅस बंद करून कढई खाली उतरून घ्या. नंतर एका मोठ्या ताटाला खाली तूप लावून गरम केलेलं मिश्रण गरम असतानाच हाताने किंवा एखाद्या वाटीने एकसारखे पसरवून घ्यावे. थोड्या वेळाने मिश्रण थोडं थंड झालयं असं वाटेल तेव्हा बारीक काप केलेले ड्राय फ्रूट्स वरून सजवावे. दोन तीन तास ताट बाजूला ठेवून द्यावं. नंतर छान सुरीने हव्या तशा आकारात वड्या पाडून घ्याव्यात. अगदी सहज खायला किंवा एखाद्या दिवशी जेवणात गोड म्हणून सुद्धा या वड्या तुम्ही बनवू शकता.
तुम्हाला या रेसिपीज Authentic Mango Recipes कशा वाटल्या, आणि तुम्ही त्या कधी बनवल्या आहेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आंब्यापासून बनवले जाणारे अजून पदार्थ माहीत करून घ्यायचे आहेत का हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. असे अजून माहितीपूर्ण लेख, वेगवेगळ्या कथा, रेसिपीज असे सगळ्या प्रकारचे लेख एकाच ठिकाणी वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला जरूर भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद.!
-आकांक्षा