स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संपूर्ण माहिती | Vinayak Savarkar information in Marathi

WhatsApp Group Join Now

SVATANTRYAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR (28th May 1883 – 26th February 1966)

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता सूर्य, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या अग्निकुंडासमान आहे. ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर एक कुशल राजकारणी, समाजसुधारक, लेखक, कवी, वक्ते होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वत:चे प्राण, स्वत:चा संसार, स्वत:चा परिवार सर्वाची आहुति दिली.

शहिद भगतसिंग यांनी ज्यांना आपले आदर्श मानले अशा पूजनीय वीर सावरकरांच्या बहुआयमी व्यक्तिमत्त्वाबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊ.

वीर सावरकरांचे बालपण | Veer Savarkar’s childhood

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. वडील दामोदरपंत, आई राधाबाई, मोठे बंधू गणेश उर्फ बाबाराव तर धाकटे बंधू नारायणराव सावरकर असा हा परिवार होता. आईच्या निधनानंतर मोठे बंधू बाबाराव आणि येसूवाहिनी यांनी वीर सावरकर आणि नारायणराव सावरकर यांचा पुत्रवत सांभाळ केला. 1901 मध्ये वीर सावरकर यांचा विवाह यमुनाबाई यांसोबत झाला. पुढे आयुष्यभर यमुनाबाईंनी सावरकरांच्या क्रांतिकार्यामध्ये भक्कम आणि मोलाची साथ दिली.

वीर सावरकरांचे शिक्षण | Veer Savarkar’s Education

वीर सावरकर लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. त्याकाळी प्लेगच्या PLAGUE PANDEMIC साथीने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सावरकरांचे वडिलसुद्धा प्लेगमध्ये बळी पडले. इंग्रज सरकारने प्लेगच्या साथीच्याआड जो अत्याचार चालवला होता तो सावरकरांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड आणि पारतंत्र्याविरुद्ध उठाव करण्याची बीजे इथेच रोवली होती.

शालेय शिक्षण संपवून त्यांनी 1902 साली पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये FERGUSSON COLLEGE प्रवेश घेतला. तेथे ते सदैव अव्वल दर्जाचे गुण मिळवून उत्तीर्ण झाले. कॉलेजमध्ये सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता.

त्यांनंतर ते वकिलीचे उच्चशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.

वीर सावरकरांची देशभक्ति आणि क्रांतिकार्य | Veer Savarkar’s Patriotism & Revolutionary Work

छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू यांना स्वा. सावरकर आपले आदर्श मानित होते. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांनी ‘राष्ट्रभक्तसमूह – मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. त्यांच्यावर इटलीचे विचारवंत आणि क्रांतिकारक ‘जोसेफ मॅझीनी’ यांच्या विचारांचा प्रभाव होता.

सावरकरांनी मित्रमेळा चळवळीचे नंतर ‘अभिनव भारत’ संघटनेमध्ये रूपांतर केले. पुणे येथे विदेशी कपड्यांची मोठी होळी पेटवली. त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाने स्वत: लोकमान्य टिळक प्रभावित झाले. पुढे टिळकांच्या शिफारसीवरून सावरकरांना लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची आणि तेथेच इंडिया हाऊस मध्ये राहण्याची सोय झाली. इथेही त्यांचे क्रांतिकार्य सुरूच होते. त्यांनी लंडनमध्ये ‘फ्री इंडिया सोसायटी’ची स्थापना केली. त्या संस्थेतर्फे शिवजयंती, शिखांचे गुरु श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमरचा महासोहळा, विजयादशमी असे अनेक उत्सव घडवून आणले.

उच्च शिक्षण सुरू असतानाच सावरकरांचे सशस्त्र क्रांतिविषयी लेखन आणि संशोधन सुरू होते.

‘१८५७ चा उठाव हे निव्वळ ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड नव्हे तर तो एक सशस्त्र स्वातंत्र्यलढा होता’ हा विचार त्यांनी हिरीरीने मांडला. त्यासाठी त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक सप्रमाण लिहिले. इटलीचे क्रांतिकारक जोसेफ मॅझीनी यांच्या आत्मचरित्राचा मराठीमध्ये अनुवाद केला. या पुस्तकांच्या प्रती अत्यंत गुप्तपणे भारतात पाठवल्या. क्रांतिकारकांसाठी पिस्तुले, बॉम्ब बनवण्याची माहिती इत्यादि गोष्टी अत्यंत गोपनीय पद्धतीने भारतात पाठवण्यामागे वीर सावरकरांचा मोठा हात होता.

देशात आणि परदेशात अनेक क्रांतिकारक वीर सावरकरांना आपले प्रेरणास्थान मानत होते. मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, भगतसिंग ही त्यापैकी काही नावे. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव यांना ब्रिटिश सरकारविरोधात कार्य केले या आरोपाखाली काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पाठोपाठ लंडन येथे स्वत: सावरकरांना अटक झाली. समुद्रमार्गे भारतात आणताना त्यांनी फ्रांसच्या मार्सेलीस बंदराजवळ बोटीतून पाण्यात उडी मारली. पोहत पोहत ते फ्रांसच्या किनाऱ्यावर आले. मात्र पाठोपाठ आलेल्या ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा पकडले. सावरकरांचे हे धाडस आणि आतापर्यंत केलेले क्रांतिकार्य याची शिक्षा म्हणून त्यांना एक नाही तर दोन जन्मठेप (सुमारे 50 वर्षे) आणि काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यांना अंदमानला पाठवले.

एकाच परिवारातील दोन भावांना काळ्यापाण्याची शिक्षा होणे, त्यांच्या परिवाराची, नातलगांची मालमत्ता जप्त होणे, त्यापैकी एक भावाला एकाच जन्मात दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा होणे, हे इतिहासातील पहिले आणि एकमेव उदाहरण आहे.

वीर सावरकरांना जन्मठेप (काळेपणी) | Veer Savarkar’s Life Imprisonment (Kala Paani)

  • इ. स. १९११ ते १९२४ – अंदमान सेल्युलर कोठडीत सश्रम कारावास (१३ वर्षे)
  • ६ जानेवारी १९२४ – अंदमानातून सशर्त सुटका, रत्नागिरी येथे स्थानबद्धता
  • इ. स. १९२४ ते १९३७ – स्थानबद्धतेमधून बिनशर्त सुटका (१३ वर्षे)

अंदमानातील काळ्यापाण्याची शिक्षा हा सावरकरांच्या जीवनातील अत्यंत खडतर काळ होता. अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांचा अनेक प्रकारे छळ केला गेला. त्यांना अत्यंत लहान आणि कोंदट सेल्युलर जेलमध्ये एकांतात ठेवले. कधी खड्या बेडीत टांगले. कधी दिवसभर तेलाच्या घाण्यामध्ये बैलाच्या जागी कोलूला जुंपले. सावरकरांनी तुरुंगात असूनही बाणेदारपणा सोडला नाही म्हणून अमानुष मारहाण झाली. अशा मरणयातना भोगत असतानाही ते त्यांच्या ध्येयापासून किंचितही ढळले नाही. उलट त्यांची राष्ट्रभक्ति आणखी प्रखर होत गेली. त्यांच्यामधील सर्जनशील कवी तुरुंगात त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. तुरुंगाच्या भिंतींचा त्यांनी कागद म्हणून वापर केला. त्यावर महाकाव्ये लिहिली. सावरकरांची इच्छाशक्ति तोडण्यासाठी तुरुंगाचे अधिकारी वारंवार भिंतीला पांढरा रंग दिला. आधीचे लेखन नष्ट केले. परंतु वीर सावरकर नव्या दमाने त्यावर पुढचे लेखन लिहीत गेले.

१९२४ मध्ये अथक प्रयत्नांनंतर स्वा. सावरकर आणि त्यांचे बंधू यांची अंदमानातून सशर्त सुटका करण्यात आली. त्या अटी पुढीलप्रमाणे – (१) रत्नागिरी जिल्ह्यात सावरकर स्थानबद्ध राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. त्यांच्यावर अनेक राजकीय बंधने घालण्यात आली. भारतात आल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध ठेवण्यात आले. मात्र सावरकरांनी आपले कार्य अन्य मार्गाने सुरूच ठेवले.

वीर सावरकरांनी केलेले सामाजिक सुधारणेचे कार्य | Veer Savarkar’s work of Social Reforms

सावरकरांनी सुटकेनंतरच्या काळात समाजसुधारणाविषयी भरीव कार्य केले. त्यांनी जातिभेद, वर्णव्यवस्थेला कडाडून विरोध केला. दलितांना मंदिरात प्रवेश मिळत नाही म्हणून त्यांनी ‘पतितपावन मंदिराची’ स्थापना केली आणि ते सर्व जातीवर्गासाठी खुले केले. जवळपास 500 देवळे अस्पृश्यांसाठी खुली केली. आंतरजातीय विवाह, आंतरजातीय स्नेहभोजनाचे आयोजन केले. आंतरजातीय महिलांचे हळदीकुंकू समारंभ, आंतरजातीय मुलांचे सहशिक्षण असे अनेक सुधारक उपक्रम राबवले.

वीर सावरकरांचे मराठी भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी संदर्भात योगदान | Veer Savarkar’s contribution to purification of Marathi Language and Script

परकीय सत्तेसोबत परकीय भाषेचा आपल्या मातृभाषेवर होणारा प्रभाव सावरकरांना मान्य नव्हता. त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धीचा आग्रह धरला. अनेक फारसी, अरबी, इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेत प्रतीशब्द लिहिले. त्यापैकी कितीतरी प्रतिशब्द आजही प्रचलित आहेत.

उदा.

क्रमांक, बोलपट, चित्रपट, वेशभूषा, नेपथ्य, प्राचार्य, दिग्दर्शक, प्राध्यापक, शस्त्रसंधी, दूरध्वनी, टपाल, मुख्याध्यापक, ध्वनिक्षेपक, नभोवाणी, विधिमंडळ, अर्थसंकल्प, तारण, परीक्षक, गतिमान, संचलन, नेतृत्व, क्रीडांगण, हुतात्मा, महापौर, उपस्थित, सेवानिवृत्तिवेतन, इत्यादि  

वीर सावरकरांचे देहावसान | Veer Savarkar’s Death

सुमारे 13 वर्षे वीर सावरकर रत्नागिरीला स्थानबद्धतेत होते. 10 मे 1937 रोजी त्यांची  बिनशर्त मुक्तता करण्यात आली. त्यानंतर ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. आपली मते ते अतिशय स्पष्ट आणि परखडपणे मांडत होते. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आणि त्यानंतरच्या काळातील घडामोडींमुळे ते व्यथित झाले. त्यांची प्रकृतीसुद्धा खालावली.

वयाच्या 83 व्या वर्षी 1966 मध्ये त्यांनी प्रायोपवेशन करून त्यांनी आयुष्याची इतिश्री करण्याचे ठरवले.

सुमारे 60 वर्षे धगधगणारा सशस्त्र क्रांतीचा आणि प्रखर राष्ट्रवादाचा अग्निकुंड शांत झाला. वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व आणि जीवितकार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श प्रेरणास्थान

ठरले आहे.

वीर सावरकरांची साहित्यसंपदा | Veer Savarkar’s Literature

ऐतिहासिक पुस्तके

  1. १८५७ चे स्वातंत्र्यसमर
  2. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  3. हिंदुपदपादशाही

आत्मचरित्र –

  1. माझी जन्मठेप
  2. शत्रूच्या शिबिरात
  3. अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका)
  4. अंदमानच्या अंधेरीतून
  5. माझ्या आठवणी – नाशिक
  6. माझ्या आठवणी – पूर्वपीठिका
  7. माझ्या आठवणी – भगूर

कादंबरी –

  1. काळे पाणी
  2. मोपल्यांचे बंड

नाटके –

  1. संगीत उत्तरक्रिया
  2. संगीत उःशाप
  3. बोधिवृक्ष (अपूर्ण)
  4. संगीत संन्यस्तखड्‌ग
  5. रणदुंदुभी

महाकाव्ये –

  1. कमला
  2. गोमांतक
  3. विरहोच्छ्वास
  4. सप्तर्षी

अन्य पुस्तके, काव्यसंग्रह आणि लेखमालिका –

  1. अंधश्रद्धा भाग १
  2. अंधश्रद्धा भाग २
  3. ऐतिहासिक निवेदने
  4. क्रांतिघोष
  5. गरमा गरम चिवडा
  6. जात्युच्छेदक निबंध
  7. जोसेफ मॅझिनी
  8. तेजस्वी तारे
  9. नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
  10. प्राचीन अर्वाचीन महिला
  11. भाषा शुद्धी
  12. रणशिंग
  13. लंडनची बातमीपत्रे
  14. विविध भाषणे
  15. विविध लेख
  16. विज्ञाननिष्ठ निबंध
  17. शत्रूच्या शिबिरात
  18. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
  19. सावरकरांची पत्रे
  20. सावरकरांच्या कविता
  21. स्फुट लेख
  22. हिंदुत्व
  23. हिंदुत्वाचे पंचप्राण
  24. हिंदुराष्ट्र दर्शन
  25. क्ष – किरणें

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर SVATANTRAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR याबद्दलचा हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सूचना करायच्या असतील तर तुमच्या सूचनेचे स्वागतच आहे.

विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख तसेच कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देत रहा तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.

धन्यवाद!

4 thoughts on “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संपूर्ण माहिती | Vinayak Savarkar information in Marathi”

  1. गुरुप्रसाद दि पणदूरकर

    खूप छान लेख, धन्यवाद.

    सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा रणदीप हुड्डा यांनी तन, मन, धन अर्पून निर्माता, दिग्दर्शक, प्रमुख भूमिका या नात्याने सादर केलेला हिन्दी व मराठी चित्रपट चालू आहे.
    पालकांनी आपल्या युवा व बाल पाल्यांना जरूर हा चित्रपट दाखवावा, ज्यायोगे थोर देशभक्त सावरकर आणि सशस्त्र क्रांतीकारकांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातला सहयोग याबाबतचा खरा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना माहीत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top