मुलांचा अभ्यास कसा घ्यावा?

WhatsApp Group Join Now

अलीकडे शिक्षणाच्या बाबतीत” मुलांचा अभ्यास कसा घ्यावा?”ही चिंता प्रत्येक पालकांना भेडसावत असते.

आजच्या या स्पर्धेच्या जगात पाऊल टाकताना आपल्या मुलांनी खूप शिकून मोठं व्हावं असे स्वाभाविकपणे सगळ्यांना वाटत असते. अर्थात यासाठी पहिली पायरी म्हणजे मुलांचे शिक्षण. साधारणपणे मुलांच्या या शैक्षणिक प्रवासात पालकांच्या मुलांकडून फार अपेक्षा असतात. अशावेळेस मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून पालकांची चिडचिड होते. तर त्यांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे? त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास कसा घेता येईल? हे खालील मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेऊ.

1] फक्त अर्धा तास मुलांना द्या:-

आपल्या मुलांसाठी कसंही करून रोज अर्धा तास काढा. या अर्ध्या तासात कुठलेही ताणतणावाचे, रागाचे विषय असणार नाही याची काळजी घ्या. मार्क किती (कमी )पडले वगैरे चर्चा शक्यतो करू नका. पहिले काही दिवस रोज अर्धा तास मुलांना आई-वडिलांबद्दल विश्वास वाटेल असं वातावरण तयार झालं पाहिजे. यावेळी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. 

मुलांच्या अडचणी समजून घ्या. या वेळेत मुलांवर टीका, भाषणबाजी, उपदेश करू नका. मुलांना आपलेसे करा. त्यामुळे मुलं विश्वासाने आणि मोकळेपणाने अडचणी, चुका तुमच्यासमोर मांडायला लागतील.आपल्या मुलांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी मुलांची आणि आई वडिलांची चांगली जवळील असणे आवश्यक असते. अशी जवळीक साधली की मग बाकीच्या गोष्टी खूप सोप्या होतात. आणि मग हळूहळू अभ्यासाविषयी गोष्टी बोलायला, अभ्यास करायला सुरुवात करा.

2] मुलांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्या:-

सर्वप्रथम मुलांना अभ्यास म्हणजे काय? अभ्यास का करावा? अभ्यासाचे महत्त्व काय आहे? या गोष्टी त्यांना समजून सांगा. खरंतर लहानपणापासूनच मुलांना अभ्यासाचे वळण लावावे. अभ्यासात येणाऱ्या समस्या,अडचणी यात तुम्ही त्यांच्या सोबत आहात याची त्यांना जाणीव करून द्या.

3] अभ्यासाकरिता वेळेचे नियोजन करा:-

साधारणतः दिवसभरात शाळा आणि शिकवणी यांचा वेळ वगळता मुलं जेव्हा घरी असतात त्यात त्यांचा खेळ आणि अभ्यास यासाठी समसमान वेळ द्या. त्यामुळे आई वडील सतत अभ्यास करायला सांगतात हा विचार त्यांच्या मनातून नाहीसा होईल. आपण वेळेत अभ्यास पूर्ण केला तर आपल्याला खेळायला मिळेल या आशेने अभ्यास ही जलद गतीने पूर्ण होईल. यासाठी तुम्ही अभ्यासाचं एक वेळापत्रक ही बनवू शकता.

4] मनोरंजक पद्धतीने अभ्यास घ्या:-

वेगवेगळ्या विषयांचा मुलांच्या वयानुसार विविध पद्धतींचा वापर करून मुलांना विषय शिकवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये कधी चित्रांच्या माध्यमातून,गाणी म्हणून,गोष्टी सांगून, इतिहासातले प्रसंग रंगून सांगून, विविध विषयांवरील तक्ते येता जाता त्यांच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी जरूर लावा. थोड्या मोठ्या वयातील मुलांसाठी प्रश्नमंजुषा सारखे खेळ खेळून अभ्यास घेता येतो. तसेच वेगवेगळी उदाहरणे देऊन नाट्यमय रीतीने मुलांना विषय समजावून सांगितला तर मुलांचे मनोरंजन पण होते आणि अभ्यास ही होतो.

साधारणपणे मुलं तीन-चार वर्षांची असताना त्यांच्याबरोबर पाटी पेन्सिल घेऊन रेघोट्या,चित्र काढणे,गोष्टी सांगणं, रंगीत खडूने रंगवणे,एखाद्या विषयाची त्यांच्या वयानुसार ओळख करून देणे या गोष्टी पालकांनी करायला हव्यात. यामुळे मुलांना एका जागी बसण्याची सवय लागेल.

मुलं खूप लहान असताना त्यांच्याकडून लिखाणाचा आग्रह करू नका. त्यांच्या बोटांच्या स्नायूची पूर्णपणे वाढ न झाल्यामुळे सहसा त्यांना लिहिणे जमत नाही. मुलांच्या बोटाची पकड वाढवण्यासाठी त्यांना खोडरबरने खोडणे, लहान वस्तु निवडणे असे केल्यास फायदा होतो.

इयत्तेनुसार मुलांचे पाढे पाठ असणे गरजेचे असते जेणेकरून गणित हा विषय त्यांच्यासाठी सोपा होईल. गणित आणि विज्ञान या विषयाच्या संकल्पना समजून घेतल्या की हे विषय नक्कीच सोपे होतात पण त्यासाठी सराव करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. भाषा विषयांसाठी व्याकरणाचा पाया चांगला असावा लागतो. एकंदरीत सगळ्या विषयांसाठी वाचनाचा आणि लेखनाचा सराव व उजळणी महत्त्वाची आहे. याकरिता मुलांना नियमित अभ्यासाचे नियोजन करून द्यावे.

जे पालक दोघेही आपल्या नोकरीनिमित्त मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंत त्यांच्या मनाला वाटत असते अशा पालकांनी सुट्टीच्या दिवशी मुलांच्या अभ्यासा करिता जरूर वेळ काढावा. मुलं एखाद्या विषयात मागे पडत असतील अशावेळेस मुलांना जेव्हा शाळांना सुट्टी लागते तेव्हा त्यांचे विषय सुधारण्यासाठी तुम्ही ही सुट्टी उपयोगात आणू शकता.

5] घोकंपट्टी करून घेणे टाळा:-

आजकाल मुलांना शाळांमध्ये प्रश्नांची उत्तरं तयार स्वरूपात मिळतात. त्यामुळे त्यांना चुकतमाकत, धडपडत उत्तर शोधण्याची गरज भासत नाही. त्यामुळे होतं काय की, आपल्या प्रयत्नांनी काही अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना सवयच लागत नाही. नेहमीच कोणीतरी उत्तर तयार करून द्यायची आणि आपण ती घोकंपट्टी करून परीक्षेत लिहायची अशी सवय मुलांना लागते. अशा परिस्थितीत उत्तर लिहिताना एखादा शब्द किंवा एखादे वाक्य मुलांना मध्येच आठवले नाही की पुढचं सगळं मुलं विसरून जातात. अशावेळेस एखाद्या विषयासंबंधीच्या संकल्पना (concept)मुलांना स्पष्ट करून सांगा जेणेकरून ते त्यांच्या कायम लक्षात राहील व त्यांना आपल्या शब्दात उत्तरे लिहिता येतील.

6] मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करा:-

मुलांना त्यांच्या वयानुसार विविध विषयांवरची पुस्तके, गोष्टीची पुस्तके वाचावयास देऊन वाचनासाठी त्यांच्या मनात ओढ निर्माण करा. मुलांबरोबर तुम्हीही एखादं पुस्तक घेऊन वाचत बसलात तर त्यांना वाचनाचे महत्त्व पटून वाचनाची सवय लागेल. वाचनामुळे मुलांचा शब्दसंच वाढेल, भाषा विकसित होईल, संवाद कौशल्य वाढेल एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला गती मिळेल.

7] मुलांचं कौतुक करा:-

मुलांना नेहमीच आई-वडिलांकडून कौतुकाची अपेक्षा असते. परीक्षेतील यश,विविध स्पर्धां, खेळ शिवाय छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांची स्तुती जरूर करा. मुलांच्या चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार हा नेहमीच एक उत्तम मार्ग असतो.त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यास नवा हुरूप येतो. आणि तुमच्या लक्षात येईल की पुढच्या वेळेस मुलं अधिक मेहनत घ्यायला सज्ज असतील. 

8] अभ्यासाच्या वेळेस मुलांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून काळजी घ्या:-

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाचे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी त्यांना पुरेशी झोप आणि वेळेवर पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आजकाल घराघरात स्मार्टफोन सहज उपलब्ध असल्याने साहजिकच मुलांनाही त्याचे आकर्षण वाटू लागते. या स्मार्टफोनच्या आहारी गेल्यास मुलांना अभ्यासापेक्षा त्यातच जास्त गोडी वाटू लागते. त्यामुळे मुलांना मोबाईल, टीव्ही यापासून शक्य तितके दूर ठेवावे. मुलांची मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणा किंवा प्राणायाम शिकवावे.

9] पालक म्हणून स्वतःमध्ये बदल करा:-

•प्रत्येक मूल हे वेगळे असते त्याचबरोबर त्यांची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता ही वेगळी असते त्यामुळे आपल्या मुलांची तुलना इतर मुलांबरोबर करू नका.

•आपले मुल अभ्यासात मागे का पडते? अभ्यास का करत नाही? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या.

•शाळेतील शिक्षकांना भेटून मुलांच्या अभ्यासाविषयी चौकशी करा.

10] आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्या:-

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुलांना शैक्षणिक ॲप्सद्वारे अभ्यास मनोरंजक पद्धतीने शिकण्यास मदत होते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.त्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.

                              धन्यवाद!

5 thoughts on “मुलांचा अभ्यास कसा घ्यावा?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top