निसर्गाचं निखळ सौंदर्य न्याहळत सुधा खिडकिमध्ये बसली होती.किती तो निरागसपणा,किती ती सहनशक्ती,त्याचा तो उदारपणा, आपत्कालामध्ये परिस्थितीशी केलेले दोन हात,सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन ,दुःखाला मागे सारत सुखाला आलिंगन देत आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन आहे त्याच तोऱ्यात उभा राहून निरंतर प्रेमाचा वर्षाव करत सगळ्यांची सोबत करत आहे.असा तिचा विचार अखंड चालूच होता.स्वतःच्या सुख – दुःखाची तुलना ती निसर्गाशी करत होती.क्षणात तिच्या मनाने भूतकाळाचा पाठलाग केला.
मोहन सोबत लग्न करून सुधा त्याच्या घरी आली.मोहनच्या प्रेमाच्या वर्षावाने अगदी सुखावून गेली होती. तिला अनोळखी घरात रुळायला जास्त वेळ लागला नाही.घरामध्ये मोहन आणि त्याची आई दोघच राहत होते.तीही लवकरच त्यांच्यात समरस होऊन गेली.दोघांचा सुखी संसार पाहून मोहनची आई सुखावून गेली.सुधा ही सासूबाईला अगदी लेकीच्या मायेने सांभाळत होती.सगळं कसं मजेत चाललं होतं.
बघता बघता लग्नाला पाच सहा वर्ष झाली.पण त्यांना काही आपत्य होईना. मोठे मोठे डॉक्टर केले.नवस सायास केले ;परंतु तरी काही फलित होत नव्हते.आता तिघांच्याही चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसू लागली.सर्व उपाय करता करता दहा वर्ष सरली.नातेवाईक,शेजारी सगळेजण मोहनला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देऊ लागले.सुधाच्या जीवाची घालमेल वाढू लागली.मोहन काही लग्नाला तयार होत नव्हता.कारणकी त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.आता मोहनची आई देखील मोहनला भरीस पाडू लागली .
“तुम्ही करा दुसरे लग्न माझ्यामुळे तुमचे आयुष्य का वाया घालवता.”सुधा निराश होऊन बोलली.
” हे तू मला नजरेला नजर देत बोल.”मोहन एक प्रेमाचा कटाक्ष सुधावर टाकत बोलला.
“मला बायको मिळेल पण मला माझी योग्य जीवनसाथी मिळेल का ? आपल्याला मूलबाळ नाही याची खंत दोघांना आहे.पण त्याच्यासाठी एकमेकांना सोडून द्यायचं .हे कितपत योग्य आहे. दुसरी एखादी बाई मुलाला जन्म देईल खरी पण माझी सहचारिणी होईल का ? तूच सांग मला सुधा ? “मोहनच्या डोळ्यात पाणी आले.
सुधाने मोहनला घट्ट मिठी मारली.आणि ती मनसोक्त रडली.तिला हरवत चाललेलं सुख पुन्हा गवसल्या सारखं वाटलं.दोघांनी निर्णय घेतला काहीही झालं तरी एकमेकांची साथ आता कधी सोडायची नाही.आता आभाळ कोसळलं किंवा धरती दुभंगली तरी एकमेकांवरची माया आटू द्यायची नाही.
बरेच दिवस लोटले .लोकांच्या बोलण्याकडे कानाडोळा करत दोघेही आपले उर्वरित आयुष्य सुखाने घालवत होते.काही कामानिमित्त मोहन हा आठ दिवसांसाठी मुंबईला गेला. सुधा आणि तिची सासूबाई दोघीच घरी होत्या.पहील्यासारखी सासूबाई सुधाशी बोलत नव्हत्या.सुधाची नित्याची कामे चालूच होती.तिला जरा बेचैन वाटू लागले.अधूनमधून चक्कर येऊ लागली.पोटात मलमळू लागले.परंतु सासूबाईंनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.सगळी कामे आटोपून सुधा दवाखान्यात गेली.तिथे काही तपासण्या झाल्यावर तिला आनंदाची बातमी कळली .आज सुधाचा आनंद गगनात मावेनासा झाला.काय करू ?काय नाही? अशी तिची अवस्था झाली.ती घरी आली.तिला ही बातमी सर्वात आधी मोहनला सांगायची होती .म्हणून ती वाटेकडे डोळे लावून बसली . दोन दिवसात मोहन गावी येणार अशी तार सुधाला आली.ते दोन दिवस तिला दोन महिन्यांसारखे वाटू लागले .सर्व प्राण डोळ्यात आणून ती त्याची वाट पाहू लागली.
अखेर तो दिवस उजाडला . सुधाची लगबग चालू झाली .ज्या दिवशी मोहन येणार होता तो दिवस गुढीपाडव्याचा होता.सुधाने सगळी तयारी केली .आता फक्त गुढीचं उभारायची बाकी होती.तेवढ्यात गावातील दोन माणसे सुधापाशी आले आणि त्यांनी तिला जे सांगितले त्याने सुधा चक्कर येऊन खाली पडली.शेजारच्या काकूने तिला सावरले,उठवले ,पाणी प्यायला दिले आणि काय झाले म्हणून विचारले.तेव्हा सुधाने मोठ्याने हंबरडा फोडला.आणि रडतच सांगितले.की मोहनचा अ*प*घा*त झाला आहे.त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
सुधा आणि मोहनची आई लगेच दवाखान्यात गेल्या.त्यांनी मोहनला पाहिले त्याची अवस्था पाहण्यासारखी नव्हती.डॉक्टरांनी तो कोमात गेला आहे असे सांगितले.कधी शुध्दीवर येईल सांगता येणार नाही.सुधा बेचैन झाली .तिच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नावच घेत नव्हंतं.जे सांगण्यासाठी सुधाची तगमग चालू होती.ते मात्र आता राहून गेलं .सासूबाईला ही बातमी कळली .तिने सुधाला मिठी मारून रडू लागली.त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे आणि पश्चातापाचे आश्रु वाहू लागले.
दिवसा मागून दिवस गेले. मोहनच्या तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही. नऊ महिन्यानंतर सुधाला कन्यारत्न प्राप्त झाले.सुधाला आनंद तर खूप झाला परंतु मोहनची उणीव तिला भयंकर भासे.त्याच्या आठवणी उन्मळून येत.जोपर्यंत सुधाला मूलबाळ होत नव्हतं तोपर्यंत सगळेजण मोहनला लग्न करण्यास जबरदस्ती करीत.आता त्याची अशी अवस्था आहे तर सुधाला लग्नासाठी भरीस पाडत आहे.पण तिच्या मोहनवरच्या श्रद्धेमुळे ती तिच्या निर्णयावर ठाम होती.हळूहळू त्यांचं बाळ मोठं होवू लागलं.सगळ्यांची निराशा झाली होती,परंतु सुधाला पूर्ण विश्वास होता की मोहन बरा होणार आहे.जणू काही तो तिच्या विश्वासावरच जिवंत आहे.
एक वर्ष उलटले.सुधा दवाखान्याचा फेरा कधी चुकली नाही. फाल्गुन महिना संपत आला. मोहन चा अ*प*घा*ताला एक वर्ष पूर्ण होत आले होते. दवाखान्यातून सुधाला फोन आला. आणि सुधा आनंदाने वेडीपिशी झाली. कारण मोहनला शुद्ध आज आली होती. आज मात्र ती भरून पावली होती. तिची श्रद्धा फळाला आली.दुःखाचे मळभ हटवून सुखाची चाहूल लागली.झाडांची पानगळ होऊन नवी पालवी फुटली तशी सुधाच्या आनंदाला नवी पालवी फुटली.
अखेर गुढीपाडव्याचा दिवस उजाडला.आज मोहन घरी येणार होता.त्याला सर्वात मोठं सुख मिळणार होतं.ते सुख म्हणजे त्याची आणि सुधाची मुलगी.दरवाज्यावर तोरण चढली.उडून गेलेले रंग पुन्हा रांगोळीत चढले.आज किती दिवसांनी गुढी आणि सुधा नवीन वस्त्र परिधान करणार होते.मोहन घरी आला.सुधा सुखावली.एवढ्या वर्षाचं मुलाचं स्वप्न त्याचं पूर्ण झालं.त्यांच्या हरवून गेलेल्या जीवनात आज सुखाची पालवी फुटली.
“आई sss ” या हाकेने सुधा खोल विचारांमधून बाहेर आली. आता सगळं काही मनासारखं चाललं होतं .तिच्या जीवनात सुखाने प्रवेश केला होता….
समाप्त !
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर