वादळ
” दामू , ए दामू , आरं पावसानं लईच जोर धरलाय . कवादरनं वाट बगत्या म्या . सखाराम आजून घरला आल्याला न्हाय. वाईच पारापसनं तिकडं फुडं पांदीच्या रस्त्याला जाऊन बगून इतूस का ? ” म्हातारी शांताक्का दामूला विनवत होती पण ; दामू निगरगठ्ठ आणि निष्ठुर मनाचा होता.
“आरं माजा लाडका नातू हायस का नाय ? हायस नव्हं. मग ऐक की जरा ल्येकरा . सखाराम आसल्या वावटूळात फसला आसल रं. बग जा की जरा “. म्हातारी शांताक्का कळवळून दामूला विनंती करुन थकली पण ; दामू वैतागून शांताक्का वरती खेकसला .
” ए म्हातारे, आगं गप की जरा. कवादरनं डोस्कं उटिवलयस. तुला तुज्या ल्येकाचा लय कळवळा आसल तर तूच जाऊन बगून ये. जा जा उठ आन् जा आसल्या पावसात भिजत ” . शांताक्काला राग तर आला पण ; बोलण्यात काही अर्थ नाही असे समजून ती स्वतःच उठली आणि काठी हातात घेतली.
” मा*र*ती का काय म्हातारे आता ? ” दामू घाबरुन मागे सरकला. शांताक्काने दामूकडे दुर्लक्ष केले आणि घराबाहेर पडली. दामू शांताक्का बाहेर गेल्याचे पाहताच जागचा उठला आणि घराच्या मोडकळीस आलेल्या दरवाजातून बाहेर डोकावला. पांदीकडेच्या रस्त्याकडे एक कटाक्ष टाकत त्याने सुस्कारा सोडला.
शांताक्का भयाण पसरलेल्या वादळात एकटीच आपल्या लेकाला शोधायला निघाली होती. मुसळधार पाऊस , चिखलाने माखलेले रस्ता आणि सगळीकडे दाटलेला अंधार पाहून शांताक्काला आपल्या लेकाची जास्तच काळजी वाटू लागली.
पाराला वळसा घालून शांताक्का पांदीच्या रस्त्याला लागली. चिखलाने रस्ता निसरडा झाला होता . सखारामच्या काळजीने शांताक्काचा जीव वरखाली होत होता. झपाझप पावले टाकत ती पुढे जातच होती आणि अचानक तिचा पाय घसरला आणि ती चिखलात पडली. आधीच पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. त्यात आता पडल्यामुळे शांताक्काचा पाय जोरात मुरग*ळला होता. उजव्या हाताला खरचटले होते. तर डाव्या पायाचा अंगठ्यातून र*क्त यायला सुरुवात झाली होती.
शांताक्काने उठायचा प्रयत्न केला पण ; कमरेतून एक जोराची कळ आली आणि शांताक्का जिवाच्या आकांताने ओरडली. आजूबाजूला चिटपाखरुही नव्हते. वादळाने घातलेल्या थैमानामुळे ती पाखरेही आपापल्या घरट्यात भेदरून बसली होती. शांताक्काचा आवाज वादळी अंधारात विरुन गेला.
पायाचा अंगठा तिने हाताने दाबून धरला. र*क्त वाहत चालले होते. वेदना असह्य होताच शांताक्का धाय मोकलून रडू लागली. तिला आता केवळ सखारामची काळजी वाटत होती. वरून धो धो पाऊस कोसळतच होता. म्हातारी शांताक्का काळ्याकुट्ट अंधारात समोरचा रस्ता पाहायचा प्रयत्न करत होती. समोर आणि आजूबाजूला देखील काही दिसत नव्हते. शांताक्का हतबल होऊन तिथेच बसली.
सखाराम शेतातील दोडका घेऊन विकण्यासाठी सकाळीच शहरात गेला होता. त्याला एकट्यालाच जाणे भाग होते कारण दामूने सोबत येण्यास खोट्या सबबी सांगत टाळाटाळ केली. सखाराम एकटाच निघून गेला आणि शांताक्का तेव्हाही हतबलतेने पाहत राहीली.
विना आईचे पोर म्हणून लाडात वाढवलेला दामू आता अति लाडाने बिघडत चालला होता आणि हे समजत असूनही शांताक्का शांत बसण्या शिवाय काही करु शकत नव्हती. ती केवळ शहराकडे वळलेल्या सखारामच्या बैलगाडी कडे पाहत राहीली.
आताही ती त्या चिखलात बसून रड*त होती. अंगठ्यातून र*क्त येणे थांबले होते पण ; वेदना शमल्या नव्हत्या. पावसाचा जोर आता ओसरला होता. शांताक्का हुंदके देत तशाच ज*ख*मी अवस्थेत अंधारात गुडूप झालेल्या वाटेवर डोळे लावून बसली होती.
बराच वेळ असाच निघून गेला आणि अचानक शांताक्काच्या कानावर अस्पष्ट हाक ऐकू आली. तिने अंधारात डोळे किलकिले करत आवाजाच्या दिशेने पाहीले तर कंदीलाच्या उजेडात सखाराम चालत येताना दिसला. शांताक्काच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले आणि पुढच्याच क्षणी चेहरा आनंदाने खुलला.
” सखाराम , सखाराम तू आला व्हय. म्या लय भ्याली हुती. आसल्या पावसात आन् वावटुळात तू कुटं आडाकला आसशील म्हणून म्या तुला हुडकाय हिकडं आली हुती. सखाराम , माझं कोकरू , माझं ल्यकरु यवस्थित मागारी आलं. भगवंता तुझं लय उपकार झालं बग. लय उपकार झालं “. शांताक्का आभाळाकडे पाहून सारखे हात जोडत होती.
” आयं , अगं म्या पावसाचं रुपरंग बगितलं आन् घरला जाण्यापरीस कुटं तर आसरा घिऊ आसा इचार माज्या मनात आला हुता. पर पुना वाटलं तू वाट बघत बसशील म्हणून म्या परतीच्या वाटला लागलो. या वाटला सगळा चिक्कुल हुतो मला माह्यत हुतं म्हणून म्या सरपंचांच्या घराकडनं आलो. त्ये आंतर जरा लांब पडतय पर रस्ता चांगला हाय. कसाबसा घरात आलो तर दामू म्हणला म्हातार आय तुमास्नी हुडकायला गिल्या. तसा म्या भेदरलो आन् लगबगीनं हिकडं आलो ” . सखाराम सांगत होता पण ; शांताक्काचे डोळे वाहते चालले होते. तिचे तिला कळत नव्हते की आनंद होतोय की पायातल्या वेदना डोळ्यातून बाहेर पडत आहेत.
” आयं आशी चिकलात का बसल्यास ? आलो नव्हं मी आता. चल घरला चल “. सखारामने शांताक्काला उठवण्यासाठी हात पुढे केला आणि त्याचे लक्ष शांताक्काच्या पायाकडे गेले.
“आगं , आगं ,आगं किस्तं र*गा*त आलय. पायाला लागलय तुज्या. आयं पडलीस व्हय तू . आजून कुटं लागलय ? ” सखाराम कळवळून विचारु लागला. त्याला आता दामूचा रा*ग येऊ लागला. दामूला आता योग्य वळणावर आणावेच लागणार याची खूणगाठ त्याने मनाशी पक्की बांधली. रड*णाऱ्या शांताक्काला हळूहळू आधार देत उठवले आणि सखाराम घराकडे चालू लागला.
पुढचे दोन दिवस शांताक्कावर उपचार चालू होते. हळूहळू शांताक्का बरी झाली तसे सखाराम दामूकडे वळला. दामूला स्पष्ट सांगितले की त्याला जमिन मिळणार नाही. घरात राहता येणार नाही. घरात रहायचे असेल तर काम करावे लागेल. दामूने आधी तर दुर्लक्ष केले पण ; सखाराम आणि शांताक्काने ठरवले होते की जोपर्यंत दामू सुधरत नाही तोपर्यंत त्याच्याशी क*ठो*र वागायचे.
काम केल्याशिवाय दामूला जेवण नाही असा नियमच शांताक्काने आखला तर काम केल्याशिवाय हातात एक पैसाही देणार नाही असा नियम सखारामने आखला. दामूला पर्याय राहीला नाही आणि नाईलाजाने तो शेतात जाऊ लागला. सुरुवातीला नको नको वाटणारे काम दामू आता मनापासून करु लागला. शेती विषयी त्याच्या मनात जिव्हाळा निर्माण होऊ लागला. दामू दिवसरात्र शेतात राबू लागला.
आज सखाराम आणि शांताक्का दामूने फुलवलेले जोंधळ्याचे मोती पाहत बांधावर उभे होते. दोघांनाही दामूचा अभिमान वाटू लागला. शांताक्का आता समाधानी होती कारण दामू आता योग्य मार्गाला लागला होता. ती हसतमुखाने वाऱ्यावर डोलणारा जोंधळा पाहू लागली.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाइटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
सुंदर कथा आहे
खूप सुंदर लेखन …..