” मॅडम ! आप यहांसे मत जाइये.” रोशनी म्हणाली.
” मॅडम ! इथून खरंच नका ना जाऊ.” सुनंदा कळकळीने म्हणाली.
” प्लिज ! डोन्ट गो.” मार्गारिटा म्हणाली.
रोशनी, सुनंदा, मार्गारिटा बरोबरच समस्त बंदिवान महिला नसीमा मॅडमना न जाण्याची विनंती करत होत्या.
” मला जावं तर लागेलच. माझी पोस्टिंग दुसरीकडे झाली आहे ना. मी मधे मधे तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्की येईन.” नसीमा मॅडम म्हणाल्या.
आज नसीमा मॅडमचा बंदिवासातील कामकाजाचा सेंड ऑफ होता. गेली दहा वर्षे महिला जे*लरचे पद त्यांनी सांभाळले होते. मॅडमच्या सेंड ऑफसाठी बंदिवान महिलांनी खूप छान तयारी केली होती. त्यांनी सगळा परिसर स्वच्छ करून रांगोळ्या काढल्या होत्या. नसीमा मॅडमचा सत्कार केला गेला. भाषण करताना मात्र त्यांचा उर भरून आल्यामुळे त्यांना जास्त बोलता आलं नाही. इतक्या वर्षांच्या त्या बंदिवान महिलांच्या सहवासामुळे नसीमा मॅडमना आज तिथून निघताना खूप वाईट वाटत होते कारण सगळ्या महिला अश्रू अनावर येऊन रडत होत्या. त्यांना विनवणी करून थांबवत होत्या. स्वतःचे अश्रू थोपवत नसीमा मॅडम सगळ्यांचा निरोप घेऊन गाडीत बसल्या. गाडीत बसल्यावर मात्र त्यांचे अश्रू त्यांना थोपवता आले नाही. ज्यावेळी त्या ह्या पदावर रुजू झाल्या तेव्हा ह्याच महिलांची वागणूक कशी होती आणि आज त्याच महिला आपल्यासाठी रडत आहेत हा विचार मनात येऊन त्यांचे मन भूतकाळात गेले.
नसीमा एक होतकरू तरुणी. मराठवाडयातील एका छोट्याश्या गावात राहणारी. घरची प्रतिकूल परिस्थिती असून देखील स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेऊन एमपीएससी सारखी कठीण परीक्षा देऊन त्यात यश प्राप्त केल्यामुळे सरकारी नोकरी ताबडतोब मिळाली; पण जे*लर म्हणून तिला मुंबईतील एका कारा*गृहात जेलरच्या पदावर रुजू व्हायचे होते. घरातील अत्यंत गरीब परिस्थितीमुळे नसीमाला नोकरीची आवश्यकता तर होतीच. त्यामुळे ही नोकरी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरी जावे लागेल ही गोष्ट तिच्या मनालाही शिवली नव्हती. आपल्या भविष्यासाठी ती मुंबईत दाखल झाली.
नोकरीचा पहिला दिवस. कडक युनिफॉर्म मध्ये सज्ज होऊन नसीमा ड्युटीवर गेली असता अचानक बंदिवान महिलांमधील काही गुं*ड प्रवृत्तीच्या महिलांनी तिच्यावर हल्ला चढवला. नसीमाला हे असे काही घडेल याची सुतराम कल्पना नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नसीमा घाबरून गेली. त्या महिलांनी तिच्यावर असा काही हल्ला केला होता की त्यात नसीमाच्या हातावर जखमा झाल्या. अवघ्या चोवीस वर्षांची नसीमा थरथर कापू लागली होती. तिने धावत जाऊन तिच्या वरिष्ठ महिला अधिकारीची भेट घेतली आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. तिने तिच्या मॅडमना सांगितले, ” मॅडम, मला नाही करायची ही नोकरी. मी आजच माझा राजीनामा देते.”
तिच्या मॅडम तिला म्हणाल्या, ” तू भगौडी आहेस का ? एवढ्याश्या प्रसंगाला इतकं घाबरून जायचं का ? ही नोकरी नाही केलीस आणि कुठेही दुसरीकडे नोकरी केलीस तरी काही ना काही चांगले वाईट अनुभव तर तुला येणारच आहेत तेव्हा देखील अशीच घाबरून जाणार आहेस का ? तुझ्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग येणार आहेत तेव्हा अशीच वेळोवेळी आलेल्या प्रसंगांना घाबरून पळ काढणार आहेस का ? असं समज ना की तुला एक आव्हानात्मक नोकरी करायची आहे.”
मॅडमच्या करारी बोलण्यामुळे नसीमाला एक वेगळेच बळ मिळाले. आता माघार घ्यायची नाही असे तिने मनापासून ठरवले त्याप्रमाणे तिने तिच्या कामकाजाला सुरुवात केली. नसीमा जरी जे*लर म्हणून तिथे जॉब करू लागली होती तरी त्या फक्त चोवीस वर्षांच्या कोवळ्या तरुणीला त्या सरावलेल्या बंदिवान महिला थोडीच भीक घालणार होत्या ? त्यांनी नसीमाला खूप त्रास देण्यास सुरुवात केली. नसीमाने त्या महिलांना कुठली गोष्ट सांगितली की मुद्दामहून दुर्लक्ष करणे, अर्वाच्य शिव्या घालणे अशा पध्दतीने त्या महिला नसीमाशी फटकारून वागत असत. काही महिला तर तिच्यासमोर स्वतःलाच ओरबाडून अंगावर जखमा करून घेत असत. कुठूनतरी नसीमा पळ काढून नोकरी सोडेल अशा भावनेने ह्या ना त्या कारणांनी त्या महिला नसीमाला त्रास देत असत. ह्या प्रसंगांनी नसीमा आता डगमगणार नव्हती उलट ती ह्या नोकरीत मुरू लागली होती.
गुं*ड प्रवृत्तीच्या महिला कारा*गृहात चूल तयार करत असत आणि त्यांच्या जेवणात असलेल्या चपात्या त्या चुलीवर शेकून कडक करत असत. म्हणजे त्या चपात्यांचा ते सरपणासारखा उपयोग करत. नसीमाने त्या महिलांची चूल पेटवणं बंद केले. कारा*गृहात काही परदेशी धिप्पाड बंदिवान महिला असत. त्यांचे वर्चस्व सर्वांवर तर इतके असायचे की त्यांना पाहून कोणीही घाबरेल. नसीमाने महिला कॉन्स्टेबल, शिपाई यांना हाताशी धरून, सगळ्याजणींनी मिळून त्यांची धुलाई सुरू केली त्यामुळे त्या महिला नसीमाला आता वचकून राहू लागल्या होत्या.
नसीमाला ड्युटी बजावताना दिवसाचे चोवीस तास काम करावे लागे. वेळेवर झोप नाही, जेवण नाही, कधीतरी कै*द्यांचेच जेवण जेवायला लागत असे यासारख्या गोष्टींनी तिच्या मनावर आणि शरीरावर ताण येत होता. इतक्या लहान वयात झोपेच्या गोळ्या घेऊन देखील तिच्या डोळ्यांवरची झोप उडालेली होती.
एके दिवशी तर असा प्रसंग घडला की त्यामुळे नसीमाच्या जीवाचा थरकाप उडाला. एका बंदिवान महिलेने मानेभोवती दोर गुंडाळून स्वतःचे जीवन संपवले. नसीमाला हे वृत्त समजताच ती त्या दिशेने धावली. त्या महिलेचे दोन्ही पाय तडफडून हलत होते. तिला अशा अवस्थेत पाहून नसीमाने शिपायांकरवी तिला खाली उतरवले; पण खाली उतरवल्यावर तिचा तिथल्या तिथे मृ*त्यू झाला. हे दृश्य पाहून नसीमाचे अंग थरथर कापत होते. कित्येक दिवस तिच्या डोळ्यांसमोरून ते दृश्य जात नव्हते.
बंदिवान महिलांची मुले सहा वर्षांची झाल्यावर त्यांच्यासोबत ठेवत नाहीत. त्यांना इतरत्र सुधारगृहात ठेवण्यात येते. त्या मुलांना आपल्या आईला वर्षातून एक – दोन वेळा भेटायला मिळत असे. ते सुद्धा भेटताना त्यांच्यामध्ये जाळीची भिंत असे. आपल्या आईजवळ जाण्यास त्या मुलांना मज्जाव असे. आपल्या मुलांना भेटण्यास त्या महिलांना साहजिकच ओढ वाटे. आपली मुले नक्की कुठल्या सुधारगृहात आहेत हे देखील त्या महिलांना माहीत नसे. नसीमाने पहिलं तर एक काम केले की, कुठल्या स्त्रीचे मूल कुठल्या सुधारगृहात ठेवले आहे याची लिस्ट तयार केली. त्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मूल आणि आई भेटल्यावर त्यांच्यामधील जाळीच्या भिंतीचा तिने अडसर दूर केला. आता एक आई तिच्या मुलांजवळ बसून बोलू लागली होती, प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवू लागली होती. त्या महिलांनी नसीमाकडे याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नसीमाने ज्या महिलांना लिहिता वाचता येते अशा महिलांना तिथल्या महिलांच्या लहान मुलांना शिकवण्याचे काम दिले होते. काही महिलांची शिवण कामात गती असल्याने त्यांना कारा*गृहात शिलाई मशीनची सोय करून दिली. काही महिलांना कारा*गृहातील बंदिवानांना चहा देण्याचे काम दिले. या कामांसाठी त्या महिलांना पगार म्हणून काही रक्कम देण्यात येई. मिळालेली रक्कम बचतगटामध्ये त्या महिला जमा करू लागल्या. नसीमामुळे त्यांच्यात देखील एक महत्वाकांक्षा तयार झाली होती.
नसीमाने बंदिवान महिलांना कधीच कै*द्यांसारखी वागणूक दिली नाही; पण अगदीच कोणी विरोधात गेले तर त्यांना मात्र त्यांच्या चुकीची शिक्षा तिच्याकडून दिली जात असे. नसीमा आणि त्या बंदिवान महिलांमध्ये एक आपुलकीचे, प्रेमाचे नाते तयार झाले होते आणि त्यामुळे त्या महिलांच्या आवडत्या मॅडम आज बदली होऊन दुसरीकडे जाणार हे त्यांच्या पचनीच पडत नव्हते.
नसीमाने आपला संसार, मुलेबाळे सांभाळून तिच्या कामकाजाचे कर्तव्य अगदी चोख बजावले होते. नसीमाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील देण्यात आले होते. एक कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून तिची तिच्या डिपार्टमेंट मध्ये ख्याती झाली होती. आता तिची बदली डेप्युटी कमिशनरच्या पोस्टसाठी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये केली गेली होती.
ही जे*लरची नोकरी सोडताना नसीमाची द्विधा अवस्था झाली होती. एकीकडे तिला डेप्युटी कमिशनर म्हणून पद मिळाले होते तर दुसरीकडे ह्या बंदिवान महिलांबरोबर जे आपुलकीचे नाते जुळले होते त्या नात्याला ती मुकणार होती. त्या महिलांसाठी नसीमा केवळ एक मॅडम नसून त्यांची बहीण, आई, मुलगी झाली होती.
एका छोट्याश्या खेडेगावातून आलेल्या नसीमाच्या पंखांना बळ मिळाले होते आणि तिने स्वबळावर त्यात यश देखील प्राप्त केले होते. आज नसीमा तिच्या नवीन कार्यकारी क्षेत्रात झेप घेण्यास सज्ज झाली होती.
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे ,ठाणे
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)