भारतीय जेवणामध्ये साधारणतः वरण-भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, काही गोड पदार्थ याचबरोबर डावीकडे तोंडी लावायला विविध प्रकारच्या चटण्या असतात. चाटण या शब्दावरून चटणी हा शब्द तयार झाला आहे. चटण्या या घराघरांमध्ये प्राचीन काळापासून तयार केल्या जातात आहेत. पूर्वी खलबत्ता किंवा पाट्यावर वाटल्या जायच्या आता मिक्सरवर वाटल्या जातात.चटण्यांचा उपयोग साधारणतः जेवणाची चव वाढवायला असतो. पण बरेचदा या चटण्यांचे भरपूर फायदे शरीराला होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कोरडया चटण्यांचा अंतर्भाव आपल्या जेवणामध्ये केला जातो. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या घटकांच्या उपलब्धतेनुसार या चटण्या कशा करायच्या हे ठरवले जाते. या चटण्यांमध्ये भरपूर प्रथिने अँटिऑक्सिडंट्स्, अँटी कॅन्सर अशा अनेक घटकांचा समावेश असतो त्यामुळे चटण्या खाल्ल्या की रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कधीकधी जेवणात भाजी नसली तरी चपाती बरोबर चटण्या खाऊ शकतो. त्यामुळे त्यांना आपल्या जेवणामध्ये मानाचे स्थान आहे.
भारतीय जेवणामधील कोरड्या चटण्यांचे विविध प्रकार व त्याचे फायदे types of different dry chutneys in Marathi या लेखामध्ये आपण विविध प्रकारच्या कोरड्या चटण्या कशा तयार केल्या जातात व ते खाल्ल्याने काय फायदा होतो ते बघूया.
१) लसूण, खोबरे चटणी–
सामग्री–साधारण पाव किलो किसलेले खोबरे, एक चमचा धणे पावडर, दोन लसणाच्या गड्ड्या, तीन टीस्पून तिखट, दोन टीस्पून जिरे पावडर. चवीपुरते मीठ
कृती –प्रथम खोबरे मंद आचेवर भाजून घ्यायचे. धणे व जिरे सुद्धा भाजून घ्यायचे. मिक्सरमध्ये धने जिरे बारीक वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये सोललेला लसूण टाकायचा व खोबरे आणि तिखट टाकून, चवीपुरते मीठ टाकून, थोडे तेल टाकून बारीक फिरवून घ्यायचे. आपली लसूण खोबरे चटणी तयार. अतिशय चविष्ट अशी ही चटणी असते.
फायदे–लसणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. तसेच ते वाईट कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करते. मधुमेहीं साठी तर खूपच फायदेशीर आहे. कारण रक्तातील शर्करा कमी करते. त्यातील मसाले धणे, जिरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
२) शेंगदाणा चटणी–
सामग्री —साधारण एक वाटी शेंगदाणे, एक चमचा तिखट,७ते ८ लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ.
कृती –दाणे खरपूस भाजून घ्यावे व थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे, तिखट, मीठ आणि लसूण घालून एकत्र वाटून घ्यावे किंवा खलबत्त्यातही जाडसर वाटून घेता येते. या चटणीची चव अतिशय छान असते व खरमरीत पण लागते.
फायदे–शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे प्रथिने ही चटणी खाल्ल्याने मिळू शकतात. तसेच चवही उत्कृष्ट असते, ती खाल्ल्याने मनही आनंदी होते. त्यात लसूणही असल्यामुळे लसणाचे सगळेच फायदे मिळतात.
३) जवसाची चटणी–
सामग्री–एक ते दीड वाटी जवस, ज्याला इंग्लिश मध्ये फ्लॅक्स सीड्स असे म्हणतात. पाव वाटी तीळ,दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या, चार ते पाच लाल मिरच्या, सात आठ कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ.
कृती–सर्वप्रथम कढईमध्ये जवस भाजून घ्यावा. त्याला एका भांड्यात काढून ठेवावे. नंतर तीळ भाजावा. त्याला सुद्धा भांड्यात काढून ठेवावे. कढीपत्ता सुद्धा भाजून घ्यावा नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस, तीळ, कढीपत्ता, लाल मिरच्या, लसूण व मीठ एकत्र करून वाटून घ्यावे. गरज वाटल्यास एक ते दीड चमचा तिखट टाकावे व त्यानंतर एका बरणीत ही चटणी काढून ठेवावी. याला जितकं बारीक वाटाल तितकी त्याची चव चविष्ट येईल.
फायदे—जवसाच्या चटणीत भरपूर फायबर असते त्यामुळे वजन कमी करायला त्याचा उपयोग होतो. तसेच कॅल्शियम सुद्धा असल्यामुळे हाडे मजबूत होतात. जवसामुळे चयापचय क्रिया गतिमान होते. सांधेदुखी करता सुद्धा खूप उपयोगी आहे. जवसामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने सुद्धा असतात त्यामुळे संपूर्ण शरीर निरोगी राहते.
४) तिळाची चटणी–
सामग्री–साधारण एक वाटी पांढरे तीळ, अर्धा वाटी शेंगदाणे, आठ ते दहा लसूण पाकळ्या, एक टीस्पून तिखट, एक टीस्पून जिरं व चवीपुरतं मीठ.
कृती –सर्वप्रथम कढईमध्ये तिळ भाजून घ्यावे व त्याला एका ताटलीमध्ये काढून ठेवावे नंतर त्याच कढईत शेंगदाणे भाजून घ्यावे. शेंगदाण्यांचे साल काढून, सगळी सामग्री म्हणजेच तिळ, शेंगदाणे, लसूण, तिखट, जिर, थोडं भाजून घ्यावं. आणि चवीपुरतं मीठ घालून वाटून घ्यावे. चविष्ट चटणी तयार होते.
फायदे —तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडांच्या मजबुती करता ही चटणी खूप फायदेशीर आहे. तसेच थंडीमध्ये सुद्धा तिळ गरम असतो म्हणून हिवाळ्याच्या दिवसात ही चटणी खाल्ली असता शरीराला गरम ठेवण्यास उपयोगी पडते. त्यातील इतर घटक शेंगदाणे, लसूण या गोष्टी सुद्धा शरीराला पोषण देतात.
५) कारळ्याची चटणी–
कारळं ही एक तेलजन्य बी आहे. काळे तीळ, राम तीळ या नावाने सुद्धा ती प्रसिद्ध आहे.
सामग्री—एक वाटी कारळं, पाव वाटी तिळ, आठ ते दहा लसूण पाकळ्या, एक टीस्पून जिरे ,एक चिमूटभर हिंग, एक टीस्पून आमचूर पावडर, चार-पाच लाल मिरच्या., चवीपुरते मीठ
कृती —प्रथम कारळे मंद आचेवर भाजून घ्यावे. कारळं झाले की पांढरे तीळ पण भाजून घ्यावे. लसूण पण थोडा भाजून घेतला की चटणी भरपूर दिवस टिकते. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण सामग्री कारळे, पांढरे तीळ, लसूण, सुक्या मिरच्या, हिंग, आमचूर पावडर आणि मीठ एकत्र वाटून घ्यावे. फारच बारीक चटणी करू नये. थोडी जाडसर वाटावी. पोळी बरोबर अथवा वरण भाताबरोबर ही चटणी अतिशय चविष्ट लागते.
फायदे —कारळे हा एक स्निग्ध पदार्थ आहे. मलावरोध, मूळव्याध याकरता कारळे हे अतिशय उत्तम गुणकारी आहे. कारळे हे कृमीनाशक आणि उष्ण आहे. त्यामध्ये तिळ मिसळला की त्याची पौष्टिकता अजून वाढते. बाळंतपणानंतर ही चटणी विशेष करून दिली जाते.
६) कढीपत्ता चटणी —कढीपत्ता अथवा कडीपत्ता ही महाराष्ट्रीयन वा दक्षिणात्य पदार्थांमध्ये वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. अतिशय गुणकारी वनस्पती आहे.
सामग्री —साधारण 40 ते 50 कढीपत्त्याची पाने, पाव वाटी किसलेले खोबरे, तीन ते चार लाल मिरच्या, दोन टीस्पून तिळ, एक टीस्पून जिरे, आणि चवीपुरते मीठ.
कृती —सर्वप्रथम कढईमध्ये थोडेसे तेल घालून कढीपत्त्याची पाने खरपूस भाजून घ्यावी. त्यानंतर त्याच तेलामध्ये पांढरे तीळ आणि खोबरे पण भाजून घ्यावे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्त्याची पाने, तीळ, खोबरं, जिरं, लाल मिरच्या, मीठ एकत्र वाटून घ्यावे. अतिशय चविष्ट चटणी तयार होते वरण भाताबरोबर, भाकरी व पोळीबरोबर सुद्धा या चटणीला खाता येते.
फायदे —कढीपत्त्याची पाने मधुमेहीं करता अत्यंत उपयोगी आहेत. साखरेची पातळी नियंत्रित करतात. तसेच तिळामध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर असते .त्यामुळे हाडांच्या मजबुती करतात त्या उपयोगी ठरतात तसेच इतर घटक लाल मिरची शरीराला पौष्टिक घटक पुरवतात.
७) दोडक्याच्या शिरा ची चटणी–
सामग्री–ताज्या दोडक्याच्या शिरा साधारण तीन ते चार दोडके, दोन टीस्पून तिळ, अर्धा वाटी किसलेलं खोबरं, दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या, सात आठ कढीपत्त्याची पाने,चवीपुरतं मीठ आणि साखर एक चमचा तेल
कृती —सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या दोडक्याच्या शिरा तेलात परतून घ्याव्या. नंतर त्याच तेलामध्ये मोहरी आणि हिंग घालून त्यामध्ये खोबरं परतून घ्यावं. तिळ थोडासा परतून झाल्यावर हिरवी मिरची घालावी आणि कढीपत्त्याची पाने सुद्धा घालावी .सगळं एकत्र करून घ्यावं. खरपूस झालेल्या दोडक्याच्या शिरा घालाव्या. सगळं एकत्र करावं. त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून मिसळून घेतलं की खरपूस चटणी तयार. ही चटणी भाकरी आणि पोळीबरोबर अतिशय चविष्ट लागते.
फायदे–दोडक्यामध्ये कमी कॅलरीज आणि फायबर जास्ती असते त्यामुळे ही चटणी खाल्ल्यामुळे वजन आटोक्यात राहते तसेच पोटही स्वच्छ होतं. दोडक्यामध्ये विटामिन ए, बी, सी आणि इतरही पौष्टिक घटक असतात जे दृष्टी स्वच्छ करण्यास मदत करतात. दोडक्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम तसेच अँटी ऑक्सीडेंट्स सुद्धा आहेत,जे आरोग्या करता अतिशय गुणकारी आहेत. तसेच चटणी मधील इतर घटक जसे तीळ, खोबरं हे सुद्धा आरोग्या करता अतिशय उत्तम आहेत.
तर या सगळ्या प्रकारच्या चटण्या जर प्रमाणात खाल्ल्या तर त्यांचे शरीराला नक्कीच चांगल्या प्रकारचे फायदे होतात.
भारतीय जेवणामधील विविध प्रकारच्या कोरड्या चटण्या आणि त्यांचे फायदे types of different dry chutneys in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचे व्हाट्सअप चॅनेल पण जॉईन करा धन्यवाद!
लेखिका –वैशाली देव( पुणे)