‘मे’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या महत्त्वाकांक्षी, उत्कट व उत्साही असल्याचे मानले जाते. चालू ‘मे’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
पंकज रॉय (भारत) : ३१/०५/१९२८ = बंगालचे सलामीवीर ‘पंकज’ यांनी ४३ कसोटीत २४४२ धावा केल्या. १९५६ मध्ये विनू मंकडबरोबर न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या ४१३ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीचा त्यांचा भारतीय विक्रम २००८ पर्यन्त कायम होता. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकजना कोलकात्याच्या ‘शेरीफ’पदाचा देखील बहुमान मिळाला.
रुसी सुर्ती (भारत) : २५/०५/१९३६ = अस्सल अष्टपैलू पारशी ‘रुसी’, मधल्या फळीतील डावखुरे फलंदाज, डावरे मध्यमगती गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. सुरतमध्ये जन्मलेल्या रुसी यांनी २६ कसोटींमध्ये १२६३ धावा केल्या आणि ४२ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत अर्धशतक करून डावात ५ बळी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. तसेच ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक ‘शेफील्ड शिल्ड’ स्पर्धेत खेळणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले. निवृत्तीनंतर ते ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाले आणि प्रशिक्षक म्हणून बरीच वर्षे काम केले.
इरापल्ली प्रसन्ना (भारत) : २२/०५/१९४० = भारताच्या ‘जादुई फिरकी चौकडी’चा भाग असणाऱ्या कर्नाटकच्या ‘प्रसन्ना’ यांचे नाव सर्वकालिक महान ऑफस्पिन गोलंदाजांमध्ये घेतले जाते. १९६१ मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या प्रसन्नानी अभियांत्रिकी पदवी घेण्यासाठी क्रिकेटपासून ५ वर्षे फारकत घेतली. १९६७ मध्ये भारतीय संघात परतल्यावर १९७८ मध्ये निवृत्त होईपर्यन्त भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ४९ कसोटीत त्यांनी १८९ बळी घेतले. दरम्यानच्या काळात कर्नाटकला २ वेळा रणजी विजेतेपद मिळवून देताना त्यांनी मुंबईची १५ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली.
भागवत चंद्रशेखर (भारत) : १७/०५/१९४५ = प्रसिद्ध भारतीय ‘फिरकी चौकडी’चा आणखी एक महत्त्वाचा सदस्य म्हणजे कर्नाटकी लेगब्रेक गोलंदाज ‘चंद्रशेखर’. लहानपणी पोलीओमुळे त्यांच्या उजव्या हाताला अधूपण आले. पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी आपल्या या अपंगत्वालाच गोलंदाजीतील सामर्थ्य बनवले. गोलंदाजी करताना या हाताने ते चेंडूला असाधारण असा झटका देत, ज्यामुळे चेंडू दोन्ही बाजूंना वेगात वळे आणि फलंदाजांची खेळताना भंबेरी उडे. त्यांच्या गोलंदाजीमुळे भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळाले असून, त्यात १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात प्रथमच मिळवलेल्या विजयांचा समावेश आहे. त्यांनी ५८ कसोटीत २४२ बळी मिळवले. फलंदाजीत मात्र ते अगदीच वाईट होते आणि एकूण कसोटी धावा (१६७), बळींपेक्षा कमी असण्याचा नकोसा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
रवी शास्त्री (भारत) : २७/०५/१९६२ = डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि उजव्या हाताने कुठच्याही स्थानावर फलंदाजी करू शकणाऱ्या ‘शास्त्री’ने १९८० चे दशक अष्टपैलू खेळाडू म्हणून गाजवले. मर्यादित क्रीडा-गुणवत्ता असणाऱ्या शास्त्रीने जिद्द, परिश्रम, खडूस वृत्ती आणि जिगरबाज स्वभाव यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. ८० कसोटीत ३८३० धावा आणि १५१ बळी घेणाऱ्या शास्त्रीने, १५० वन-डे सामन्यांमध्ये ३१०८ धावा करताना १२९ बळी मिळवले. रणजी स्पर्धेत एका षटकात ६ षटकार, १९८५ च्या ‘मिनी-वर्ल्ड कप’ मध्ये मालिकावीर ठरताना ‘ऑडि’ कारचा मान, कसोटीच्या पाचही दिवशी फलंदाजी, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य, अश्या काही विशेष नोंदी शास्त्रीच्या नावावर आहेत. चतुर रणनितीकार असलेल्या शास्त्रीने दहा वर्षांनी मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच भारताचा प्रशिक्षक म्हणून प्रभावी कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला दोनदा कसोटी मालिकेत त्यांच्याच देशात पराभूत करण्यात त्याचा महत्त्वाचा हातभार होता. आकर्षक शैलीच्या समालोचनामुळेही तो श्रोत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) : ०२-०५-१९६९ = तेंडुलकरच्या जोडीने दोन दशके क्रिकेटविश्व गाजवणारा महान फलंदाज म्हणजे वेस्ट इंडियन ‘प्रिन्स’ ब्रायन लारा. डावखुरा शैलिदार ‘लारा’ केवळ धावांचा रतीब टाकत नसे तर त्याची नेत्रसुखद फलंदाजी म्हणजे क्रिकेटशौकिनांना पर्वणी असे. लाराची फलंदाजीची अप्रतिम आकडेवारी खालील कोष्टका-प्रमाणे :-
क्रिकेट-प्रकार | सामने | डाव | धावा | सर्वाधिक | सरासरी | शतके | अर्धशतके |
कसोटी | १३१ | २३२ | ११९५३ | ४००* | ५२.८८ | ३४ | ४८ |
एकदिवसीय | २९९ | २८९ | १०४०५ | १६९ | ४०.४८ | १९ | ६३ |
प्रथमश्रेणी | २६१ | ४४० | २२१५६ | ५०१* | ५१.८८ | ६५ | ८८ |
याशिवाय लाराचे काही खास विक्रम खालीलप्रमाणे :-
– डावात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम दोन वेळा करणारा एकमेव खेळाडू
– कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४००* धावा (२००४ साली हेडनचा विक्रम मोडला)
– कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३७५ धावा (१९९४ साली सोबर्स यांचा विक्रम मोडला)
– प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०१* धावा (१९९४ साली हनिफ मोहम्मदचा विक्रम मोडला)
– २००३ साली कसोटीत एका षटकात २८ धावा चोपल्या
– दोन कसोटी त्रिशतके करणारा ब्रॅडमन यांच्या नंतरचा दुसरा खेळाडू
– दोन प्रथमश्रेणी चौपदरी शतके करणारा पान्सफोर्ड यांच्या नंतरचा दुसरा खेळाडू
– कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक ५ द्विशतके
– २००५ साली बॉर्डरला मागे टाकत सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम
– १९९४ साली, आठ प्रथम श्रेणी डावात सात शतके झळकावणारा पहिला फलंदाज
– कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० व ११,००० धावा
जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज) : ३०-०५-१९०९ = वेस्ट इंडिजच्या ह्या कृष्णवर्णीय फलंदाजाला खेळातील प्रतिभेमुळे आणि धावांच्या सातत्यासाठी ‘काळा ब्रॅडमन’ असे संबोधले जाई. पण १९३९-४५ मधील दुसऱ्या महायुद्धाने त्यांची उमेदीची वर्षे हिरावली. १९३० साली पहिली कसोटी खेळणाऱ्या हेडली यांनी १९५४ साली शेवटचा सामना खेळला. पण या दरम्यान त्यांना केवळ २२ कसोटी खेळता आल्या, ज्यात त्यांनी ६१ च्या सरासरीने १० शतकांसह २१९० धावा केल्या.
फ्रँक वुली (इंग्लंड) : २७-०५-१८८७ = इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये ‘वुली’ यांचा समावेश केला जातो. डावखुरे वुली हे मधल्या फळीतील फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मध्यमगती व फिरकी गोलंदाज होते. त्यांनी ६४ कसोटीत ३२८३ धावा केल्या, ८३ बळी घेतले आणि ६४ झेल टिपले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी तर अविश्वसनीय आहे. त्यामध्ये त्यांनी १४५ शतकांसह ५८,९५९ धावा केल्या ज्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत. त्याशिवाय त्यांनी २०६६ बळी घेतले आणि १०१८ झेल टिपले जे बिगर-यष्टीरक्षकासाठी सर्वोच्च आहेत.
हेडली व्हेरेटी (इंग्लंड) : १८-०५-१९०५ = ‘व्हेरेटी’ हे गोलंदाजीतील कंजूषतेसाठी ओळखले जाणारे डावखुरे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी ४० कसोटीत १४४ बळी घेतले. १९३४ साली त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका दिवसात १४ बळी घेण्याचा पराक्रम केला. तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २ वेळा डावात १० बळी घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे, त्यातील एक वेळा त्यांनी ‘हॅटट्रिक’ही नोंदवली. अश्या ह्या गुणी खेळाडूला १९४३ साली दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याविरुद्ध लढताना वीरमरण आले.
डेनिस कॉम्प्टन (इंग्लंड) : २३-०५-१९१८ = इतिहासातील महान फलंदाजांच्या यादीत ‘कॉम्प्टन’ यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ७८ कसोटीत ५० च्या सरासरीने ५८०७ धावा काढल्या ज्यात १७ शतके आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही त्यांनी १२३ शतकांसह ३८,९४२ धावा केल्या. त्याशिवाय आपल्या डावखुऱ्या चायनामन गोलंदाजीने ६२२ बळी मिळवले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यात असताना त्यांची भारतात नेमणूक झाली आणि या काळात ते युरोपियन्स आणि होळकर संघांद्वारे भारतातील पंचरंगी आणि रणजी स्पर्धांमध्ये खेळले. क्रिकेटशिवाय ते चांगले क्लब दर्जाचे फुटबॉलपटूही होते.
सोनी रामाधीन (वेस्ट इंडिज) : ०१-०५-१९२९ = त्रिनिदादला जन्मलेले ‘रामाधीन’ हे वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेट खेळणारे भारतीय वंशाचे पहिले खेळाडू होते. उजव्या हाताने दोन्ही बाजूला चेंडू वळवणारे रामाधीन ‘मिस्ट्री स्पिनर’ होते. त्यामुळे अनेक फलंदाजांचा त्यांना खेळताना गोंधळत उडे. १९५० मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्याच मालिकेत ते अतिशय यशस्वी ठरले. ‘वॅलेन्टाईन’बरोबर त्यांची चांगली जोडी जमली आणि त्यांनी इंग्लंडची भंबेरी उडवली. त्यांच्या पराक्रमामुळे वेस्ट इंडिजने प्रथमच इंग्लंडविरुद्ध मालिका ३-१ अशी जिंकली. इंग्लंडविरुद्धच १९५७ च्या मालिकेत एजबॅस्टन कसोटीत त्यांनी एका डावात सर्वाधिक ५८८ चेंडू टाकण्याचा, तसेच पूर्ण सामन्यात ७७४ चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम केला जो अजूनही अबाधित आहे. कारकिर्दीत त्यांनी ४३ कसोटीत १५८ बळी घेतले.
टेड डेक्स्टर (इंग्लंड) : १५-०५-१९३५ = इटलीतील मिलान येथे जन्मलेले ‘टेड’ हे चिवट फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. ६२ कसोटीत ४५०२ धावा काढतानाच त्यांनी ६६ बळी मिळवले. ३० कसोटीत संघाचे नेतृत्वही केले. निवृत्तीनंतर व्यावसायिक, ब्रॉडकास्टर आणि लेखक म्हणून त्यांनी छाप पाडली. क्रिकेट व्यवस्थापनात त्यांना रस होता आणि निवड समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी बराच काळ काम पाहिले. ब्रिटिश क्रिकेटच्या अंतर्गत संरचनेत आणि काऊंटी क्रिकेटच्या ढाच्यात त्यांनी दूरगामी बदल घडवून आणले. त्याशिवाय आधुनिक ‘आयसीसी प्लेअर रँकिंग सिस्टीम’ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
ग्लेन टर्नर (न्यूझीलंड) : २६-०५-१९४७ = ‘ग्लेन’ हे न्यूझीलंडचे उत्कृष्ट सलामीवीर आणि कर्णधार होते. ४१ कसोटीत २९९१ धावा काढणाऱ्या ग्लेननी त्याकाळी नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या प्रारूपाशीही चांगले जुळवून घेतले आणि ४१ सामन्यांत १५९८ धावा केल्या. कसोटीमध्ये सलामीला येऊन डावाच्या शेवटपर्यन्त नाबाद रहाण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. १९७४ मध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतके करणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू बनले आणि त्या जोरावर न्यूझीलंडने प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. टर्नर हे वन-डेमध्ये १५०+ धावा करणारे पहिले खेळाडू आहेत आणि वन-डेच्या डावात २००+ चेंडूंचा सामना करणारे एकमेव फलंदाज आहेत. निवृत्तीनंतर संघ-व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी छाप पाडली, जेव्हा न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला प्रथमच त्यांच्या देशात जाऊन कसोटी मालिकेत मात दिली. टर्नरनी क्रिकेटसंबंधी पाच पुस्तकेही लिहिली आहेत. टर्नरना ‘सुखवींदर कौर गिल’ ही त्यांची भारतीय पत्नी १९६९ च्या भारत दौऱ्यात भेटली, जिने बरीच वर्षे ‘डनेडिन’ या शहराची महापौर म्हणून काम बघितले.
गॉर्डन ग्रीनीज (वेस्ट इंडिज) : ०१-०५-१९५१ = सलामीचा आक्रमक फलंदाज. १९७० आणि १९८० च्या दशकातल्या बलाढ्य विंडीज संघाचा प्रमुख घटक. १०८ कसोटीत १९ शतकांसाह ७५५८ धावा, तर १२८ वन-डे मध्ये ५१३४ धावा. १९७५ आणि ७९ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य. पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा ग्रीनीज, १०० व्या एकदिवसीय सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडू होता.
महेला जयवर्धने (श्रीलंका) : २७-०५-१९७७ = श्रीलंकेचा ‘महेला’ हा मधल्या फळीतील अतिशय शैलिदार फलंदाज, त्यांचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने १४९ कसोटीत ५१ च्या सरासरीने ११,८१४ धावा; तर ४४८ वन-डेमध्ये १२,६५० धावा केल्या आहेत. क्षेत्ररक्षण आणि कप्तानी या विभागातही त्याने चुणूक दाखवली. ‘ICC’ने अनेकदा गौरविलेल्या महेलाच्या नावे अनेक श्रीलंकन आणि आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे, जसे की – कसोटीत ६२४ धावांची संगकाराबरोबर सर्वोच्च भागीदारी, कसोटीतील उजव्या हाताच्या फलंदाजाने केलेली ३७४ ही सर्वोच्च धावसंख्या, श्रीलंकेकडून सर्वाधिक २०५ कसोटी झेल, वन-डेमध्ये जगात सर्वाधिक २१८ झेल, विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात शतक झळकावणारा एकमेव फलंदाज, टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू, टी-२० विश्वचषकात शतक झळकावणारा एकमेव श्रीलंकन खेळाडू, इत्यादी.
मायकल बेव्हन (ऑस्ट्रेलिया) : ०८-०५-१९७० = बेव्हन हा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज, डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज व चपळ क्षेत्ररक्षक होता. त्याची कसोटी कारकीर्द १८ सामन्यांपर्यन्त मर्यादित राहिली असली तरी तो त्याच्या काळातील वन-डे क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट ‘फिनिशर’ मानला जाई. वेळोवेळी त्याने आपल्या संघाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढत विजय मिळवून दिले आहेत. तळाच्या खेळाडूंना हाताशी धरत, नाबाद राहात संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देण्याची हातोटी त्याच्याकडे होती. २३२ वन-डे सामन्यांत ५४ च्या आश्चर्यकारक सरासरीने ६९१२ धावा त्याने केल्या. त्याशिवाय ३६ बळी आणि ६९ झेल त्याच्या नावावर आहेत. १९९९ आणि २००३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो एक प्रमुख अंग होता.
मायकल हसी (ऑस्ट्रेलिया) : २७-०५-१९७५ = मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली पण आपल्या चिवट खेळाने आणि लढाऊ वृत्तीने त्या संधीचे सोने करत धावांचा पाऊस पाडला. २००७ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य. ७९ कसोटी (६२३५ धावा, १९ शतके, सरासरी ५१.५२), १८५ वन-डे (५४४२ धावा, सरासरी ४८.१५) आणि ३८ टी-२० (७२१ धावा, १३६ची धावगती).
ग्रॅमी हिक (इंग्लंड) : २३-०५-१९६६ = मूळ झिंबाब्वेच्या मधल्या फळीतील फलंदाज ‘हिक’ची १९८३ च्या विश्वचषक संघात १७ व्या वर्षी निवड झाली पण त्याला खेळायची संधी मिळाली नाही. नंतर चांगल्या भवितव्यासाठी तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. आठ वर्षांनी १९९१ मध्ये त्याला कसोटी व वन-डे पदार्पणाची संधी मिळाली. खूप गुणवान हिककडून क्रिकेटतज्ञांच्या मोठ्या अपेक्षा होत्या पण तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही. त्याने ६५ कसोटीत ३३८३ धावा केल्या, तर १२० वन-डेमध्ये ३८४६ धावा. १९९२,९६ आणि ९९ च्या इंग्लिश विश्वचषक संघांचा तो भाग राहिला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मात्र त्याने २५ वर्षे खोऱ्याने धावा काढल्या. त्यात त्याने ४१,११२ धावा करताना १३६ शतके आणि १५८ अर्धशतके ठोकली आणि ४०५* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. शिवाय ‘ऑफस्पिन’ने २३२ बळी घेतानाच ७०९ झेल टिपले. तीन वेगवेगळ्या दशकांत (१९८८, १९९७ आणि २००२) प्रथमश्रेणी तिहेरी शतके झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
पॉल कॉलींगवूड (इंग्लंड) : २६-०५-१९७६ = ‘पॉल’ हा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, उपयुक्त मध्यमगती गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कप्तान. याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१० चा टी-२० विश्वचषक जिंकला. २००५ साली बांगलादेशविरुद्ध एका वन-डे सामन्यात त्याने शतक ठोकत नंतर ६ बळी घेण्याचा पराक्रम केला. ६८ कसोटी (४२५९ धावा, ९६ झेल), १९७ वन-डे (५०९२ धावा, १०८ झेल, १११ बळी), आणि ३६ टी-२० (५८३ धावा, १६ बळी) अशी त्याची उठावदार अष्टपैलू कामगिरी राहिली आहे.
मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) : २८-०५-१९७४ = मधल्या फळीतला फलंदाज ‘मिसबाह’ हा पाकिस्तानच्या मोजक्या उच्चशिक्षित क्रिकेटपटूंपैकी आहे. फलंदाजी किंवा कप्तानी करताना तो अतिशय विचारपूर्वक, संयमाने परिस्थितीचा आढावा घेत पवित्रा घेई. त्यामुळेच २६ कसोटी जिंकत तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. २००१ साली पदार्पण केलेला मिसबाह २००७ नंतर संघात स्थिरावला. ७५ कसोटीत ५२२२ धावा, १६२ वन-डेत ५१२२ धावा आणि ३९ टी-२० मध्ये ७८८ धावा अशी त्याची कामगिरी राहिली आहे. २०१६ मध्ये ४२ व्या वर्षी शतक करून, कसोटीत शतक करणारा सर्वात वयस्कर कप्तान असा विक्रम त्याने नोंदवला. तसेच २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ५६ चेंडूत कसोटी शतक करून विवियन रिचर्डस यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
पॅट कमिन्स** (ऑस्ट्रेलिया) : ०८-०५-१९९३ = सध्याचा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक. कसोटी आणि एकदिवसीय संघाचा अतिशय यशस्वी कप्तान. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २०२१-२२ ची अॅशेस, २०२३ ची कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि २०२३ ची वन-डे विश्वचषक स्पर्धा, असे मोठे विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर खाली फलंदाजीला येऊन गरजेनुसार आक्रमक वा चिवट फलंदाजी करून संघासाठी महत्त्वाचे योगदान देतो. आत्तापर्यन्त ६२ कसोटी (२६९ बळी), ८८ वन-डे (१४१ बळी) व ५२ टी-२० (५७ बळी) अशी त्याची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे.
à ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू :-
मॉरिस टेट (इंग्लंड) : ३०-०५-१८९५ = वेगवान गोलंदाज व उपयुक्त फलंदाज. ३९ कसोटीत १५५ बळी आणि ११९८ धावा.
कॉनरॅड हंट (वेस्ट इंडिज) : ०९-०५-१९३२ = सलामी फलंदाज. ४४ कसोटी (८ शतके, ३२४५ धावा)
इयान रेडपाथ (ऑस्ट्रेलिया) : ११-०५-१९४१ = सलामी फलंदाज. ६६ कसोटी (८ शतके, ४७३७ धावा)
डेरीक मरे (वेस्ट इंडिज): २०-०५-१९४३ = यष्टीरक्षक. ६२ कसोटी (१८९ झेल+यष्टीचीत), ३६ वन-डे (३८ झेल+यष्टीचीत). १९७५,१९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
किथ फ्लेचर (इंग्लंड) : २०-०५-१९४४ = फलंदाज व कप्तान. ५९ कसोटी (३२७२ धावा), २४ वन-डे.
जेफ दुजॉं (वेस्ट इंडिज) : २८-०५-१९५६ = १९८० च्या दशकातल्या महान विंडीज संघाचा यष्टीरक्षक. ८१ कसोटी (३३२२ धावा, २७२ झेल+यष्टीचीत), १६९ वन-डे (१९४५ धावा, २०४ झेल+यष्टीचीत)
रोशन महानामा (श्रीलंका) : ३१-०५-१९६६ = सलामी फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ५२ कसोटी (२५७६ धावा), २१३ वन-डे (५१६२ धावा). १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
अॅशवेल प्रिन्स (दक्षिण आफ्रिका) : २८-०५-१९७७ = मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. दक्षिण आफ्रिकेचा पहिला ‘अश्वेत’ कर्णधार. ६६ कसोटी (३६६५ धावा), ४३ वन-डे (१०१८ धावा)
जीतन पटेल (न्यूझीलंड) : ०७-०५-१९८० = भारतीय वंशाचा ऑफब्रेक फिरकी गोलंदाज. २४ कसोटी, ४३ वन-डे, ११ टी-२०.
जॅक्स रुडॉल्फ (दक्षिण आफ्रिका) : ०४-०५-१९८१ = मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. ४८ कसोटी (६ शतके, २६२२ धावा), ४५ वन-डे (११७४ धावा). कसोटी पदार्पणात द्विशतक.
तातेन्दा तैबू (झिंबाब्वे) : १४-०५-१९८३ = यष्टीरक्षक, कर्णधार. २८ कसोटी (१५४६ धावा, ६२ झेल+यष्टीचीत), १५० वन-डे (३३९३ धावा, १४७ झेल+यष्टीचीत). ‘कसोटी’मध्ये दुसरा सर्वात लहान वयाचा कर्णधार.
यासीर शाह** (पाकिस्तान) : ०२-०५-१९८६ = लेगब्रेक फिरकी गोलंदाज. ४८ कसोटी (२४४ बळी), २५ वन-डे (२४ बळी). २०० कसोटी बळी सर्वात जलद (३३ कसोटीत) घेण्याचा विक्रम.
सर्फराज अहमद** (पाकिस्तान) : २२-०५-१९८७ = यष्टीरक्षक व कर्णधार. ५४ कसोटी (३०३१ धावा, १८२ झेल+यष्टीचीत), ११७ वन-डे (२३१५ धावा, १४३ झेल+यष्टीचीत), ६१ टी-२० (८१८ धावा, ४६ झेल+यष्टीचीत).
मुशफिकुर रहीम** (बांगलादेश) : ०९-०५-१९८७ = फलंदाज, यष्टीरक्षक व कर्णधार. ८८ कसोटी (५६७६ धावा, १२५ झेल+यष्टीचीत), २७१ वन-डे (७७९२ धावा, २९५ झेल+यष्टीचीत), १०२ टी-२० (१५०० धावा, ७२ झेल+यष्टीचीत). कसोटीत २ द्विशतक करणारा पहिला यष्टीरक्षक.
सुनील नारायण** (वेस्ट इंडिज) : २६-०५-१९८८ = उजव्या हाताचा गूढ फिरकी गोलंदाज व आक्रमक डावखुरा फलंदाज. ६ कसोटी, ६५ वन-डे व ५१ टी-२० सामने. देशासाठी खेळण्यापेक्षा जगभरातील टी-२० लीगस् खेळायला प्राधान्य देणारा व त्या गाजवणारा अष्टपैलू खेळाडू.
कगीसो रबाडा** (दक्षिण आफ्रिका) : २५-०५-१९९५ = आफ्रिकेची प्रभावशाली वेगवान गोलंदाजांची परंपरा पुढे नेणारा गोलंदाज. ६२ कसोटी (२९१ बळी), १०१ वन-डे (१५७ बळी), ५६ टी-२० (५८ बळी)
[ब] भारतीय खेळाडू :-
हेमचंद्र (बाळ) दाणी : २४-०५-१९३३ = एक अस्सल अष्टपैलू खेळाडू, जे मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती तसेच फिरकी गोलंदाज होते. त्यांच्या नावे फक्त १ कसोटी लागली, जे ती १९ व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध खेळले. २३व्या वर्षी हवाई दलात रुजू झाल्यावर ते ‘एयर कमोडोर’ म्हणून निवृत्त झाले. दरम्यान तब्बल २१ वर्षे ते महाराष्ट्र व सेनादलातर्फे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
रमेश पोवार : २०/०५/१९७८ = ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज – २ कसोटी, ३१ वन-डे. भारताच्या महिला क्रिकेट संघाचा २०२१-२२ या काळात प्रशिक्षक.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी ३०-०४-२०२४ पर्यंतची )
मित्रहो, ‘मे’मध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण, मनोरंजक लेख, बातम्या, कथा आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि आमच्या ‘व्हॉटसअॅप व टेलिग्राम ग्रुप’शी जोडले जा.
धन्यवाद !
– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)