पूर्णा नदीचा संथ जलाशय, उगवत्या सूर्यकिरणांमुळे मनोहारी केशरी रंगात अगदी झळाळून निघाला होता. काठावरच्या मंदिरातल्या, आरतीच्या घंटानादामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर मंगलमय भासत होता. अजून वर्दळीला सुरुवात झाली नव्हती. अश्या प्रशांत वातावरणात, पंडीत महादेवशास्त्री कमरेपर्यंतच्या नदीच्या पात्रात उभे राहून उगवत्या सूर्याला अर्घ्य देत, आपल्या भारदस्त आवाजात स्तोत्र म्हणत होते. पन्नाशीला पोचलेले असूनही कमावलेली धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर, मुखावर विलसत असलेलं
विद्वत्तेचं तेज यामुळे अचलपूर या गावातले सगळे त्यांना बिचकून असत.
जळगाव जिल्ह्यातलं हे अचलपूर गाव. पूर्णा नदीच्या सुपीक खोऱ्यामुळे इथे कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती.
आधुनिकतेचं वारं लागलेलं असलं तरी अजूनही गावात सावकारी चालू होती. सगळे रीतीरिवाज, कुलाचार, परंपरा जपणारी गावातली माणसं होती. त्यामुळे महादेवशास्त्री कायमच कुठल्यातरी धार्मिक
कार्यक्रमात व्यस्त असायचे. बहुतेक सगळेजण त्यांनाच पाचारण करत असत. ते अविवाहित होते आणि बाकीही कुठले पाश त्यांच्यामागे नव्हते. इतक्या वर्षांचा अनुभव होता आणि अजूनही सतत वेगवेगळ्या गहन विषयांवरचा त्यांचा अभ्यास चालूच होता.

अर्घ्य देऊन होताच ते जायला निघाले. तेवढ्यात केशवशेठचा एक गडीमाणूस लगबगीने त्यांच्याकडे येताना दिसल्यावर ते जरा थबकले. त्या गड्याने अदबीने त्यांना नमस्कार करुन, ‘शेठजींनी वाड्यावर बोलावलं आहे’ असा निरोप दिला. शास्त्रींनी दहा वाजेपर्यंत येण्याचं कबूल केलं. घरी परतताना ते विचार करत होते की केशवशेठचं काय काम असावं?
केशवशेठ गावचे सावकार होते. पिढीजात श्रीमंत, तितकेच दानशूर, अडीअडचणीला गावकऱ्यांना मदत करणारे असल्यामुळे गावात चांगलेच लोकप्रिय होते. एकुलता एक मुलगा परदेशी स्थायिक झाला होता आणि भारतीय वंशाच्या, तिकडेच रहाणाऱ्या मुलीशी लग्न करुन संसारात छान रममाण झाला होता. कित्येकदा येण्याचा आग्रह करुनही, केशवशेठ काही जायला राजी होत नव्हते. इथेच सगळी हयात गेलेली असल्यामुळे आता इतका मोठा बदल स्वीकारायला साहजिकच ते कचरत होते.
शास्त्रींनी दोन घरची धार्मिक कार्य यथासांग पार पाडली आणि बरोबर दहा वाजता ते वाड्यावर पोहोचले.
पिढ्यानपिढ्या चालत आलेला भक्कम, दगडी वाडा होता केशवशेठचा. आतमध्ये आता त्यांनी आधुनिक सुखसोयी करुन घेतल्या असल्या तरी, बाहेरच्या जुन्या बांधकामाला हातही लावला नव्हता. हंड्या, झुंबरं, भिंतीतली मोठी लाकडी कपाटं तशीच होती. आता सहसा पहायला न मिळणारं तळघरपण तसंच ठेवलं होतं. कोरीव काम केलेलं, शिसवीचं मजबूत प्रवेशद्वार त्याच्या लोखंडी कडीकोयंडयासकट
शाबूत होतं. एकदा का ते अजस्त्र दार बंद झालं की आतल्या माणसांचा बाहेरच्या जगाशी संपर्क संपला, आतमध्ये ती अगदी सुरक्षित रहाणार, अशी काहीशी भावना मनात यायची.
शास्त्रींना बघून शेठजी लगबगीने पुढे झाले आणि त्यांना नमस्कार करुन आतमध्ये घेऊन आले. शास्त्रींनीही अदबीने मान तुकवली. किती झालं तरी गावचे सावकार होते ना! यथोचित पाहुणचार वगैरे झाल्यावर
शेठजींनी म्हणाले, “शास्त्रीजी, सरळ मुद्द्यावरच येतो. आमचा हा पिढीजात चालत आलेला वाडा, तुम्ही बघत आला आहातच. हा वाडा कित्येक पिढ्यांच्या भल्याबुऱ्या प्रसंगांचा साक्षीदार आहे. बरीच गुपितं आपल्या उदरात सांभाळून ठेवत, अनेक तडाखे सोसत खंबीरपणे हा उभा आहे. या वाड्याचं एक गुपित मी आज तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. तुम्ही याची वाच्यता कुठे करणार नाही ही खात्री आहे मला.”
“केशवशेठ, याबाबतीत तुम्ही अगदी निश्चिन्त रहा. गावातली लोकं माझ्याशी जरा बिचकूनच वागतात, कामापुरतंच बोलतात. त्यामुळे कित्येक घरांशी, धार्मिक कार्यांमुळे मी जोडला गेलो असलो तरीही एका अंतरावरच सगळे असतात. विशेष सख्य कोणाशीच नाही. तुम्ही अगदी मोकळेपणाने सांगा. शक्य तितकं सहाय्य मी नक्की करेन.”
थोडं गूढ हास्य करत शेठजी म्हणाले, “ते तर तुम्हाला करावंच लागणार.”
त्यांचा हा बोलण्याचा सूर शास्त्रींना अजिबात आवडला नाही. त्यांच्या भालप्रदेशावर एक खोल आठी उमटली.
शेठजी पुढे बोलायला लागले, “या वाड्यात पूर्वापार चालत आलेला खजिना कुठेतरी गुप्त जागी ठेवला आहे. माझ्या वडिलांनी,
त्यांच्या मृत्यूसमयी मला एक जीर्ण झालेली चोपडी दिली होती. त्यामध्ये या खजिन्याची गुरुकिल्ली कोणत्यातरी अगम्य गणिती भाषेत लिहिलेली आहे. आमच्या सर्वच पूर्वजांनी याचा खूप शोध घेतला; पण कोणालाच त्यात यश नाही मिळालं. तुम्ही तो नक्की शोधून काढाल याची मला खात्री आहे. आपल्या गावात सुसज्ज हॉस्पिटल आणि सर्व फॅकल्टी असलेलं कॉलेज काढायचं, माझं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न आहे. त्यासाठी भरपूर पैसा लागणार हे तर उघडच आहे. पैश्यांची सोय झाली तर गावातल्या सर्वांनाच कॉलेज आणि हॉस्पिटलचा लाभ घेता येईल ना? तो खजिना मिळवण्यामागे मी फक्त माझा स्वार्थ बघितलेला नाही.
मग? तुम्ही शोधून काढाल ना खजिना?
“माफ करा शेठजी; तुमचा हेतू अतिशय स्तुत्य असला तरी माझ्या तत्त्वांत हे बसत नाही. कुठलाही भौतिक फायदा लाभावा, या हेतूसाठी स्वतःचं ज्ञान पणाला लावायचं नाही ही माझ्या गुरुंची शिकवण, मी आजतागायत सांभाळली आहे. खरंच, माझा नाईलाज आहे.”
“तुमच्या गुरुंनी ही शिकवण नक्कीच दिली नसणार.”
असं म्हणून शेठजींनी त्यांच्या गड्याला हाक मारली. सकाळी अदबीने बोलणारा तो गडी, महादू आता अगदी गुर्मीत चालत शास्त्रींच्या जवळ आला आणि हातातला मोबाईल त्यांच्यासमोर धरुन चालू केला.
काही क्षणांतच शास्त्रीजींचा चेहरा पांढराफटक पडला. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. त्यांना स्थिर उभं रहाणंही मुश्किल झालं. ते मटकन तिथल्याच एका खुर्चीवर बसले. केशवशेठच्या नजरेला नजर देणं आता त्यांना जमेना. त्यांची भेदक नजर पार कावरीबावरी होऊन गेली.
जरा वेळाने कसंबसं सावरुन ते खोल गेलेल्या आवाजात म्हणाले, “द्या ती चोपडी माझ्याकडे. मी त्याचा सखोल अभ्यास करुन मग तुम्हाला येऊन भेटेन. फक्त एक विनंती होती, तो व्हिडिओ तेवढा…”
मध्येच शेठजी म्हणाले, “हो तर, लगेच डिलीट करतो. तो खजिना मिळाला तर आपल्या गावाचं किती भलं होईल हे पटलं ना तुम्हाला?”
होकारार्थी मान डोलावण्यावाचून शास्त्रीजींकडे दुसरा पर्याय तरी कोणता होता?
दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी त्या चोपडीत, ज्या गणिती आकृत्यांद्वारा खजिन्याचा मार्ग विशद केला होता त्याचा अभ्यास सुरु केला.
दोनच दिवसांत त्यांना कल्पना आली. सूर्याचे पहिले किरण दिवाणखान्यातल्या ज्या तसबिरीवर पडतील तिथे काहीतरी संकेत असणार. त्यावरुन पुढे जायचं. दुसऱ्या जागी पुढचा धागादोरा, तिथून पुढे तिसरा..
शास्त्रींना या गोष्टी पटतही नव्हत्या, शिवाय तद्दन बालिशपणाच्या वाटत होत्या; पण आता त्यांच्या नाड्या केशवशेठच्या हातात होत्या. दुसरं असं, खजिना शेठजींचाच होता, पूर्वापार चालत आलेला. त्यामुळे तो त्यांनी गावासाठी न वापरता, कायदेशीर बाबींची पूर्तता करुन स्वतःसाठी ठेवला असता तरी वावगं ठरलं नसतं. शास्त्रींना या सगळ्या प्रकरणातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडायचं होतं.
तरीही, अवकाळी आलेला पाऊस, ढगाळ, कुंद वातावरण, शास्त्रीजींनी पार पाडलेली गावातील दोन लग्नकार्य, यामुळे आठ दिवस नुसतेच वाया गेले.
नवव्या दिवशी मात्र, नेटाने सुरु केलेल्या शोधमोहीमेची सांगता एका मोठया, भिंतीतल्या लाकडी कपाटासमोर झाली असं म्हणायला हरकत नव्हती. एकेक धागादोरा अलगद सोडवत, शेवटचा संकेत या कपाटाचा दिलेला होता, तिथे शास्त्रीजी उभे होते. केशवशेठ आज कामानिमित्त गावाला गेले होते. रात्री परतणार होते; पण त्यांनी वाड्यात कुठल्याही भागात जाऊन शोध घेण्याची संपूर्ण मुभा, शास्त्रीजींना दिली होती, अपवाद फक्त तळघराचा. अजिबात वापरात नसल्याने केशवशेठनी ते कुलूपबंद ठेवलं होतं आणि कधीच उघडलं जात नव्हतं.
या खजिन्याची कुठेही वाच्यता करायची नसल्यामुळे या क्षणी शास्रीजी एकटेच तिथे उभे होते. त्यांच्या गणितानुसार कपाट उघडून त्याच्या आत कुठेतरी खजिन्याचा शोध संपत होता. अर्थातच कपाट
उघडल्यावर लगेच तर तो दिसणार नव्हता; नाहीतर शेठजींना कधीच सापडला असता. पुरुषभर उंचीचं कपाट शास्त्रीजींनी उघडलं. ते पूर्ण रिकामं बघून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. बारकाईने बघताना त्यांना उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला एक खटका दिसला. तो खटका दाबताच कपाटाची आतली एक लाकडी फळी अलगद बाजूला सरकली. शास्त्रीजींना सगळं स्वप्नवत वाटत होतं. प्रत्यक्षात असं काही अनुभवायला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी कधी केली नव्हती. आतमध्ये ओबडधोबड, खाली जाणाऱ्या पायऱ्यासदृश काहीतरी दिसत होतं.
त्यांनी खाली जाऊन बघण्याचा निर्णय घेतला. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात जपून पावलं टाकत ते उतरले. पायऱ्या संपल्यावर एका मोठया पण अतिशय कुबट, अंधाऱ्या खोलीत ते पोचले. टॉर्चचा उजेड लांबवर पोचत नव्हता इतका गडद अंधार होता. डोळे ताणून-ताणून बघितल्यावर त्यांना लांबवरच्या भिंतीच्या एका कोपऱ्यात, एका अवाढव्य पेटाऱ्यासारखं काहीतरी जाणवलं. ते अंदाजाने पुढे जात राहिले. पुढे गेल्यावर लक्षात आलं, भलामोठा पेटाराच होता तो. खजिन्याचा शोध संपला असं वाटून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुढचं काम अगदीच किरकोळ होतं. एकदा फक्त तो उघडून खात्री करुन घ्यायची आणि केशवशेठच्या हाती सुपूर्त करायचा, बस्स!
शास्त्रीजी पुढे झाले आणि टॉर्चच्या उजेडात पेटाऱ्याचं कुलूप बघायला लागले. अपेक्षेपेक्षा फारच झटक्यात ते निघालं, नेहमी वापरात असावं तसं. उत्सुकतेने त्यांनी झाकण वर केलं आणि…
भयातिरेकाने ते एकदम मागे कोलमडलेच.आतमध्ये कुठलाही खजिना नव्हता, होते फक्त तीन मानवी सां*गाडे, दात विचकणारे.
आपण काय बघतो आहोत हेच त्यांना समजेना. जरा वेळाने हृदयाचे ठोके पूर्ववत झाल्यावर, पुढे जाऊन थोडी हिंमत करुन त्यांनी पुन्हा पेटाऱ्यात डोकावून पाहिलं. तिथेच आजूबाजूला स्त्रियांचे कपडे, तुटलेल्या बांगड्या, अजून काही आभूषणं, लेडीज चप्पल यांसारख्या गोष्टी आढळल्या.
हा काय प्रकार होता? शास्त्रीजी विचार करायला लागले, आणि अचानक गेल्या तीन-चार महिन्यातल्या घटना त्यांना आठवल्या. केशवशेठच्या शेतावर काम करणाऱ्या तीन बायका थोडया-थोडया दिवसांच्या अंतराने रहस्यमयरित्या गायब झाल्या होत्या. पो*लिसांनी याचा कसून शोध घेतला होता. शेठजींनीही त्यावेळेस लागेल ती मदत करुन संपूर्ण सहकार्य केलं होतं; तरीही त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता. शेवटी के*स बंद करण्यात आल्या होत्या. शेठजींचं इतकं सत्शील वर्तन होतं की त्यांच्यावर कोणीच संशय घेतला नव्हता, उलटपक्षी शेतावरचा मुकादम सैल वर्तनाचा आहे, त्याने त्या बायकांच्या बाबतीत गैरवर्तन केलं अशी आवई उठवून त्याची पार गावातून हकालपट्टी केली होती. हे सगळं लोकांच्या डोळ्यांत धूळ
फेकण्यासाठी केलेलं नाटक होतं तर!
नक्कीच हे सां*गाडे त्याच तीन बायकांचे असणार याबद्दल शास्त्रीजींना आता संदेह उरला नाही. संभावित दानशूरपणाच्या बुरख्याआड केशवशेठने आपला स्त्रीलंपट स्वभाव, त्यासाठी त्यांचे जी*व घेण्यापर्यंतची मजल सराईतपणे लपवली होती.
शास्त्रीजींनी दिशेचा जरा अदमास घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं, हेच वाड्यातलं तळघर असणार. तिथे जाण्याची एक वाट शेठजींनी बंद करुन ठेवली होती. ही दुसरी गुप्त वाट त्यांना नक्कीच माहिती नसणार, नाहीतर त्यांनी असा धोका पत्करला नसता. खजिन्याच्या हव्यासापायी अनाहूतपणे, त्यांची माणुसकीला काळिमा फासणारी गैरकृत्यं उघडकीला आली होती. बाकी पु*रावे वगैरे गोळा करण्याचं काम पो*लिसांचं होतं. केशवशेठ नसतानाच पो*लिसांना लगेच बोलवून कारवाई करायला हवी होती. शेठजींना थोडासा जरी सुगावा लागला असता तरी त्यांनी लगोलग हे सगळं नष्ट केलं असतं.
शास्त्रीजींनी फ्लॅशलाईट मारुन शक्य तितके सुस्पष्ट फोटो घेतले आणि ते आल्या मार्गाने परत फिरले. कपाटाचं दार घट्ट बंद करुन ते दिवाणखान्यात जरा विसावले. एकूणच सगळ्या प्रकरणाचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. इथूनच पो*लिसांत वर्दी द्यावी असा विचार करत असताना, बाहेरुन वाड्यात शिरणारा महादू त्यांना दिसला. तो शास्रीजींना बघून कुत्सितपणे हसला आणि एकदम त्यांना या गडबडीत, विस्मरणात गेलेला तो व्हिडिओ आठवला, आणि शेकडो इंगळ्या डसाव्या असा त्यांचा चेहरा विदीर्ण झाला.
साधारण पंधरा दिवसांपूर्वीची ती पहाटेची वेळ होती. नेहमीप्रमाणे ते पूर्णेच्या काठी अर्घ्य द्यायला आले होते. बाकी सर्वत्र शुकशुकाट होता; पण नदीच्या थोडया पलीकडच्या भागात त्यांना हालचाल जाणवली. सहज म्हणून त्यांनी थोडं पुढे जाऊन पाहिलं, तर एक अतिशय सुस्वरुप नवयौवना आजूबाजूला कोणी नसल्यामुळे निःसंकोचपणे स्नान करत होती. बहुदा कोणाकडे आलेली पाहुणी असावी, कारण गावातली वाटत नव्हती. तिला या अवस्थेत बघून कसा कोण जाणे, शास्त्रींच्या मनावरचा ताबा सुटला. इतके दिवस जपलेलं कडकडीत ब्रम्हचर्य, त्यांची विद्वत्ता, कठोर साधना सगळं-सगळं विकारांच्या गर्तेत कुठेच्या-कुठे लुप्त झालं. मोहाचा तो एक विनाशकारी क्षण; पण त्यांच्यातल्या मनुष्यप्राण्यामधला मनुष्य लयाला जाऊन फक्त प्राणी उरला होता.
तिच्यावर अत्या*चार करताना ते इतक्या हीन पातळीवर पोचले होते की नुकताच उगवू पाहणारा सूर्य शरमेनं, काही काळ ढगांच्या आड लपला होता. जरा वेळाने गलितगात्र झालेल्या तिने उठण्याचा प्रयत्न केला; पण त्राणहीन अवस्थेत ती अचानक नदीच्या प्रवाही पाण्यात पडली. तिला पोहता येत नसावं. नाकातोंडात पाणी जात असताना ती शास्त्रींनाच मदतीसाठी बोलवायला लागली. त्या क्षणी त्यांनी तिला वाचवलं असतं, तरी केलेल्या प्रमादाचं परिमार्जन करण्याची संधी त्यांना होती; पण आज त्यांची सद्सद्विवेकबुद्धी त्यांना सोडून गेली होती. आपण तिला वाचवलं तर ती आपली बे*अब्रू केल्याशिवाय रहाणार नाही या विचारांत ते अडकले आणि परिमार्जनाचा लाखमोलाचा वेळ तसाच घरंगळून गेला. ती नदीच्या खोल पात्रात दिसेनाशी झाली.
त्या प्रकरणाची चौकशी झाली; पण पुराव्याअभावी केस बंद करण्यात आली.
नंतर शास्त्रींचा स्वतःचाच आपल्या कृत्यावर विश्वास बसत नव्हता. कितीदातरी आपल्या गु*न्ह्याची कबुली द्यावी असा प्रबळ विचार त्यांच्या मनात यायचा; पण कोणत्या शब्दांत सांगायचं? इतके वर्षांचं आपलं पांडित्य एका मोहाच्या क्षणापायी उधळून लावलं हे सांगायचं, का बेअब्रू होऊ नये म्हणून एका निष्पाप जीवाला वाचवलं नाही हे सांगायचं. क्षणाक्षणाला त्यांच्या मनावरचं ओझं मात्र वाढत चाललं होतं, त्यांना ते असह्य होत होतं.
केशवशेठ नेमके तेव्हा त्या जागी होते. त्यांनी ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवलं होतं, ज्याची जाणीव आत्ता शास्त्रीजींना त्यांनी करुन दिली होती, आणि खजिना शोधायला भाग पाडलं होतं.
आता पो*लिसांत खबर दिल्यावर शास्त्रीजींचं
कृत्यही लपून रहाणार नव्हतं. त्यांनी निर्णय घेतला आणि मोबाईलवर नंबर फिरवून ते म्हणाले, “पोलिस स्टेशन?”
-समाप्त
-सौ. राधिका जोशी, पुणे
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
धन्यवाद !
वा फारच छान, कथा आवडली. पुढे त्या खजिन्याचे काय झाले हे गुढ राहिले. ह्या कथेचा पुढील भाग नक्की लिहावा. उत्कंठा कायम राहील. याची एखादी लघु मराठी सिरीयल देखील होईल. झी मराठीवर सध्या अशी कुठलीच गुढ सिरीअल नाही आहे. सगळ्या आहेत त्या एकाच धाटणीच्या वाटतात. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी नविन पहायला मिळेल.
खूप छान कथा
वा सुरेख