अगदी माणसासारखे दिसणारे, त्याच्यासारखे वागणारे आणि काम करणारे यंत्रमानव म्हणजे ह्युमनॉईड रोबोट्स. जगात सर्वत्र असे रोबोट्स बनवले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर याकरिता होत आहे. आपला भारतही या क्षेत्रात मागे कसा राहील? चला तर मग जाणून घेऊ यात भारतातील काही ह्युमनॉईड रोबोट्स बद्दल!
१) व्योममित्र (VyomMitra):
इस्रोच्या गगनयान मिशनच्या यशस्वीतेसाठी ऑपरेशन्सवर लक्ष ठेवण्यासाठी विकसित केलेली ही एक अर्ध-ह्युमनॉइड महिला रोबोट आहे.
व्योममित्र शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे.
पहिला शब्द आहे व्योम- म्हणजे अवकाश. आणि दुसरा शब्द आहे –मित्र.
म्हणजे, व्योममित्र या शब्दाचा अर्थ असा आहे की जे उपकरण (रोबोट) अवकाशात मित्राप्रमाणे सर्व समस्यांवर लक्ष ठेवेल.
व्योममित्रला पाय नसल्याने तिला अर्ध-ह्युमनॉईड म्हणतात. व्योममित्रला मुद्दाम अर्ध ह्युमनॉईड ठेवले आहे. त्यामुळे क्रू मॉड्यूलमध्ये ती कार्यक्षमतेने सुव्यवस्थित काम करू शकेल.
केरळमधील वट्टियूरकावू येथील इस्रोच्या इनर्शिअल सिस्टीम्स युनिट (IISU) ने स्त्रीप्रमाणे दिसणाऱ्या या रोबोटची रचना केली आहे.
गगनयान मोहीमेत अंतराळवीर हे ‘मानव नियंत्रित सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात’ पृथ्वीच्या बाहेर रहाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या वजनरहीत अवस्थेला त्यांचे शरीर कसा प्रतिसाद देईल याचा अभ्यास करणे व्योममित्रमुळे शक्य होईल. अंतराळातील विकिरणांचा (रॅडिएशन्स) मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी व्योममित्रची मदत होईल, ज्यामुळे भविष्यातील मानवयुक्त अंतराळ मोहिमांची सुरक्षा सुधारण्यास मदत होईल.
- व्योममित्रला कार्यक्षम पाय दिलेले नाहीत. पण ती सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगू शकतो,
- व्योममित्र अंतराळवीरांशी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधू शकते.
- ती मानवी कृतींचे अनुकरण करू शकते, जसे श्वास घेणे, हालचाल करणे इत्यादी. त्यामुळे अंतराळयान मानवाला रहाण्यासाठी सुयोग्य आहे की नाही हे निश्चित करता येईल.
- ती व्यक्ती ओळखू शकते आणि चौकशीला प्रतिसाद देऊ शकते.
- व्योमामित्र अंतराळयानामधील विविध पॅरामीटर्सचे निरीक्षण करू शकते, उदाहरणार्थ, तापमान, दाब, ऑक्सिजन पातळी इत्यादी. अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हे फार महत्वाचे आहे.
- व्योममित्र पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम, स्विच पॅनल ऑपरेशन्स हाताळणे तसेच पर्यावरणीय हवेच्या दाबामधील बदलांबाबत इशारा देणे इत्यादी कार्ये करू शकते. केबिनमधील पर्यावरणीय बदलांना स्वायत्तपणे ओळखण्यास ती सक्षम आहे.
- ती एअर कंडिशनिंग समायोजित करू शकते.
- आयआयएसयूने व्योममित्र मध्ये संगणक “मेंदू” समाविष्ट केला आहे. त्यामुळे ती मानवरहित चाचणी उड्डाणांदरम्यान नियंत्रण पॅनेलचा अर्थ लावू शकते. ती ग्राउंड स्टेशन कमांड्स ओळखू शकते. त्यामुळे अंतराळवीराना इस्रोच्या ग्राउंड स्टेशनशी संवाद साधण्यास व्योममित्रची मदत होऊ शकेल. तसेच मिशनच्या योग्य अंमलबजावणीसाठी उपयुक्त माहितीचा अहवालही व्योममित्र देईल.
२) मानव (Manav) – ए-सेट ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केलेला हा रोबोट भारतातील पहिला ३डी प्रिंटेड रोबोट आहे. संस्थेचे प्रमुख दिवाकर वैश्य यांनी तो विकसित केला आहे.
२०१४-१५ मधे आयआयटी मुंबई च्या ‘टेकफेस्ट’ मधे मानव सर्वप्रथम झळकला.
- २ फुट उंच आणि २ किलो वजनाच्या मानवला २१ वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करता येतात, त्यामुळे तो चालणे,नाचणे अशी कामे करू शकतो.
- आवाजाद्वारे दिलेले आदेश (वॉइस कमांड्स) त्याला समजतात .
- मानवला वायफाय आणि ब्लूटूथ ची जोडणी करता येते.
- तो मुख्यत्वे संशोधनाच्या कामासाठी वापरला जातो.
३) केंपा (KEMPA): बंगळुरू येथील सिरेन टेकनॉलॉजीज या स्टार्टअपने तयार केलेला हा रोबोट केंपागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारपाशी उभा करण्यासाठी बनवला आहे.
- तो प्रवाशांचे स्वागत करू शकतो तसेच त्यांना उड्डाणांबद्दल इंग्रजी आणि कन्नड या दोन भाषांत माहिती देऊ शकतो.
- प्रवाश्यांच्या सामानाचे स्कॅनिंग करणे, त्यांना बोर्डिंग पास देणे ही कामे सुद्धा तो करू शकतो.
- बंगळुरू येथील पर्यटनस्थळे, सांसृतिक वारसा असलेले ठिकाणे याबद्दल हा रोबोट माहिती देऊ शकतो.
४) शालू (Shalu) : मेकरलॅब्स एज्युटेक ने तयार केलेला हा भारतातील पहिला महिला रोबोट आहे जो पूर्णपणे टाकाऊ वस्तूंपासून आणि एल्युमीनियम, प्लास्टिक, कार्डबोर्ड, लाकूड आणि वर्तमानपत्रे यापासून बनवला आहे. केंद्रीय विद्यालय, मुंबई येथे संगणक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश पटेल यांनी तो विकसित केला आहे.
- शालू ९ भारतीय आणि ३८ परदेशी अशा एकूण ४७ भाषा बोलू शकते. शैक्षणिक उपयोगासाठी ती मुख्यत्वे तयार केली गेली आहे.
- ती लोकांना ओळखून लक्षात ठेवू शकते.
- ती लोकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.
- शालू इतिहास, भूगोल, विज्ञान, सामान्य विज्ञान व हवामान विषयक माहिती देऊ शकते तसेच गणितातील साधे प्रश्न सोडवू शकते. ती पाककृती, पुस्तक आणि चित्रपट पुनरावलोकन करू शकते.
- ती हास्य, आनंद, राग इत्यादी मानवी भावना दाखवते तसेच विनोद सांगून लोकांना हसवते.
- शालू केवळ तोंडी माहितीच देऊ शकते असे नाही, तर ती ईमेलद्वारे सुद्धा उत्तर देऊ शकते.
- रोबोट शालूचा उपयोग शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा साथीदार म्हणून तसेच विविध कार्यालयांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून केला जाऊ शकतो.
५) रोबोकॉप (RoboCop): केरळमधील थिरुअनंतपुरम येथे पोलिस मुख्यालयात केपी- बॉट (KP- Bot) ही महिला रोबोट ‘उपनिरीक्षक’ पदावर तैनात केली आहे. ‘असिमोव्ह रोबॉटिक्स’ या कोचिन स्थित कंपनीने ‘सायबरडोम’ या केरळ पोलिसांच्या तंत्रज्ञान विकास केंद्राच्या साहाय्याने ५ फुट उंच आणि ४३ किलो वजन असलेली KP-Bot, सन २०१७ मध्ये विकसित केली.
- पोलिस मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला त्याच्या कामाबद्दल केपी- बॉट माहिती विचारते. त्यानंतर त्यासाठी कोणाला भेटावे आणि ती व्यक्ती कुठे बसते याबद्दलही मार्गदर्शन करते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करण्याचे कामही ती करते.
- त्याचवेळी त्याचे ओळखपत्र तपासून संपूर्ण माहिती घेणे, फोटो काढून घेणे आणि तक्रार नोंदवून घेणे ही कामेही ती करते.
- आवश्यक असेल तर ती वरिष्ठांना व्हिडीओ कॉलही करते.
- तिच्याकडे आयईडी डिटेक्टर तसेच मेटल डिटेक्टर सुद्धा आहेत. त्यामुळे रोबोकॉप प्रत्येक गोष्टीचे स्क्रीनिंग करू शकते.
- आलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्यांचा चेहरा ओळखून ती ‘सॅल्यूट’सुद्धा करते.
- रोबोकॉप माणसे ओळखू शकते आणि त्यांचे चेहरे लक्षात ठेवू शकते. त्यामुळे आलेल्या व्यक्तीचा फाइल नंबर, त्याला आवश्यक असलेली माहिती, त्याची भेटीची वेळ इत्यादी माहिती ती ताबडतोब देऊ शकते.
- सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये ती संवाद साधू शकते.
- प्रशासकीय कामासाठी आवश्यक असलेली मूलभूत माहिती, तारखा, आकडे यांची अद्ययावत माहिती या रोबोकॉपकडे असते.
६) मित्र (Mitra) : पाच फुट उंचीचा मित्र हा एक ग्राहकसेवी रोबोट आहे. बंगळुरूस्थित इन्व्हेंटो रोबोटिक्सने तयार केलेला हा रोबो २०१७ मधे त्यावेळी चर्चेत आला, जेव्हा त्याने इवांका ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना GES (ग्लोबल आंतरप्रेनरशिप समीट) शिखर परिषदेत शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
- कोविड २०१९ च्या काळात हा रोबो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामधील दुवा बनला होता. त्याच्या छातीवर असलेल्या पडद्यावर रुग्ण आपल्या प्रियजनांना पाहू शकत असे. डॉक्टर्स, नर्सेस यांना मदत करणे, रुग्णांना वेळेवर औषधे घेण्याची आठवण करणे, इत्यादी कामेही तो करत असे.
- तो चेहरे ओळखू शकतो तसेच संवाद साधू शकतो. त्यामुळे बॅंका, मॉल सारख्या ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी तो वापरता येऊ शकतो.
७) इंद्रो (INDRO): संतोष हुलवले यांनी एका घरात, अत्यंत कमी खर्चात तयार केलेला हा रोबोट भारतातील सर्वात जास्त उंचीचा रोबोट आहे. याची सर्वात आधुनिक आवृत्ती ६ फुट उंच आहे. घरगुती कामे, मनोरंजन तसेच शैक्षणिक कामांसाठी तो वापरता येतो. तो मानवाप्रमाणे सर्व कार्ये करू शकतो.
८) रश्मी (Rashmi) : रांची येथे प्रोग्रामर म्हणून कार्यरत असलेले रणजित श्रीवास्तव यांनी एकट्याने रश्मी हा रोबोट विकसित केला आहे. ते करताना त्यांनी कोणत्याही तांत्रिक गटाची मदत घेतली नाही अथवा कुठलीही संशोधन शाळाही वापरली नाही.
- ‘इंडियाज गॉट चॅलेंज’ या शोच्या आठव्या सीझनमधे रश्मी झळकली आहे.
- रश्मीने रेडिओवरील काही कार्यक्रमात ‘आरजे’ म्हणून काम केले आहे.
- अनेक इंजीनियरिंग महाविद्यालयांत रश्मीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले आहे.
- रश्मी सहा वेगवेगळ्या अक्षातून आपली मान हलवू शकते तसेच ती चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकते. ८३ वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसू शकतात.
- बोलणाऱ्या शब्दांप्रमाणे तिच्या ओठांची हालचाल होते. ज्याला इंग्रजीत लिप सिंकिंग म्हणतात.
- ती हिंदी, इंग्रजी, मराठी आणि भोजपुरी अशा चार भाषा बोलू शकते. रश्मीला पाय नाहीत.
९) अच्युत (AcYut): या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘अविनाशी’ असा होतो. बिट्स-पिलानीच्या सेंटर फॉर रोबॉटिक्स अँड इंटेलीजेंट सिस्टिम्सने तयार केलेली ही रोबोट्सची मालिका आहे. डॉ.बी.के.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बिट्स पिलानीमधील अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी हे रोबोट्स विकसित केले आहेत. भारतातील स्वदेशी बनावटीचा हा पहिला ह्युमनॉईड आहे.
- अच्युतने भारताचे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रतिनिधित्व केले आहे. या रोबो कप, रोबो गेम्स, सीएमयू, स्टॅनफोर्ड इत्यादींचा समावेश आहे.
- ‘रोबोकप’ या अत्यंत प्रगत अशा ‘ह्युमनॉईड टीन साईझड सॉकर लीग’मध्ये सातत्याने प्रवेश मिळवणारा अच्युत हा एकमेव ह्युमनॉईड रोबोट आहे. या सॉकर लीगमध्ये रोबोट्स स्वतंत्रपणे सॉकर खेळतात.
- हा रोबोट मुख्यत्वे संशोधनाच्या कामासाठी वापरला जातो. मानवी आकलन, संरक्षण, आणि अंतराळ संशोधनासाठी तो मुख्यत्वे वापरला जातो.
१०) राडा (RADA): टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ने ‘राडा’ नावाचा ह्युमनॉईड रोबोट तयार केला आहे. हा रोबोट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली, इथे वापरला जात आहे. टाटा इनोवेशन लॅब मधित तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि प्रशिक्षणार्थींच्या चमूने याची कल्पना, रचना आणि अभियांत्रिकी केली आहे. त्यासाठी त्यांनी काही नामांकित संस्थांच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली.
- या रोबोटचे मुख्य काम विमानतळावर विमानात चढण्यापूर्वी प्रवाश्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या उड्डाणसंबंधीच्या शंकांचे समाधान करणे हे आहे.
- प्रवाश्यांचे स्वागत करणे, त्यांचे बोर्डिंग पास स्कॅन करणे, त्यांना विमानतळाच्या टर्मिनलची आणि प्रस्थानासंबंधीची तसेच गंतव्य स्थानाच्या हवामानासंबंधी माहिती देणे ही कामे हा रोबोट करू शकतो.
- तो प्रवाश्यांना ‘विस्तारा’ची उत्पादने आणि सेवा याबद्दल माहिती देतो.
- हा रोबोट भारतातील अत्यंत किफायतशीर रोबोट्स पैकी एक आहे.
- भारताच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा पुरस्कार करणार हा रोबोट संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे.
- राडा रोबोट चार चाकांच्या चासीसवर तयार केला आहे. तो ३६० अंशातून फिरू शकतो. त्यामुळे तो विमानतळावर पुनर्निर्धरित मार्गावरून फिरू शकतो.
- समोरील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी राडामध्ये तीन इनबिल्ट कॅमेरे आणि व्हॉईस तंत्रज्ञान वापरले आहे.
हे आणि असे अनेक ह्युमनॉईड रोबोट्स भारतात बनवले जात आहेत. असे रोबोट्स बनवणे, मानवी मेंदूतील संदेश वहनाची प्रक्रिया सामील करणे हे फार कठीण आणि गुंतागुंतीचे काम आहे. उदाहरणार्थ, एखादी वस्तू उचलताना आपण तिचा आकार, वजन इत्यादी अनेक गोष्टी लक्षात घेत असतो. आपल्याला सोपी वाटणारी ही क्रिया रोबोट्स कडून करून घेण्यासाठी आवश्यक ते हार्डवेअर वापरणे आणि त्या अनुषंगाने सॉफ्टवेअर लिहिणे तितकेसे सोपे नसते.
एक मात्र खरे. दिवसेंदिवस माणूस भावनाशून्य आणि विवेकहीन होत रोबोटप्रमाणे यांत्रिकतेने काम करत आहे आणि दुसरीकडे रोबोट्स मधे भावना आणि विवेक कसे टाकू शकतो याचा विचार करत आहे. हा मोठाच विरोधाभास आहे.
तुम्हाला भारतातील ह्युमनॉईड रोबोट्स बद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
Very informative and detailed information…Also very interesting…
Veey informative