” गुड मॉर्निंग सर.” देशपांडे सर दहावी अ च्या वर्गात शिरल्यावर सगळ्या मुलांनी त्यांना अभिवादन केले.
” गुड मॉर्निंग ऑल. आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही. आज आपण गप्पा मारुया.” देशपांडे सर म्हणाले.
सर शिकवणार नाही तर नुसत्या गप्पा मारणार यामुळे मुले प्रचंड खुश झाली आणि वर्गात गलका करू लागली.
सरांनी बेंचवर डस्टर आपटले आणि म्हणाले, ” मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे असे बोललो. तुम्हाला आरडाओरडा करायला सांगितला नाही.” सर ओरडल्यावर सगळी मुले शांत बसली.
” ओके ! तर आपण आज पर्यावरणाविषयी बोलणार आहोत. दरवर्षी ५ जून रोजी ‘ जागतिक पर्यावरण दिन ‘ साजरा केला जातो. तर मला एक सांगा की पर्यावरण म्हणजे नक्की काय ? कोण सांगू शकेल ?” सर म्हणाले.
” सर मी सांगतो.” ध्रुव म्हणाला.
” ओके ! सांग.” सर म्हणाले.
” सर, पर्यावरण म्हणजे जमीन, हवा, वनस्पती, पाणी, तापमान, पर्जन्यमान, आपण आणि इतर सजीव प्राणी.” ध्रुवने उत्तर दिले.
” एकदम बरोबर. तर मग सांगा आपल्या पर्यावरणाचे आपण कसे रक्षण केले पाहिजे ?”
” सर मी सांगते.” नामश्री म्हणाली. ” सर, आपण पर्यावरण प्रदूषण टाळले पाहिजे. हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.”
” गुड ! मग हे प्रदूषण रोखायचे कसे ?” सरांनी मुलांना विचारले.
” सर मी सांगते.” नामश्री म्हणाली.
” नाही तू नको. प्रत्येकाला संधी मिळायला हवी. अच्छा ! कोणी हात वर केले आहेत ? ऋग्वेद तू सांग ह्याचे उत्तर.”
” सर ! कारखान्यांतून विषारी धूर सोडले जातात, रस्त्यांवरील वाहनांचा धूर, अणुबॉम्ब, रासायनिक कीटकनाशकांचे फवारे यामुळे हवेचे प्रदूषण होते. तसेच कारखान्यांतून सोडणारी जाणारी विषारी द्रव्ये, सांडपाणी, कचरा, प्लास्टिक तसेच त्यापासून बनवलेल्या वस्तू इत्यादी वस्तू सर्रास पाण्यात सोडतात त्यामुळे जलप्रदूषण निर्माण होते. तसेच यंत्रांचे आवाज, लोकांचा गोंगाट, वाहनांचे आवाज, फटाक्यांचे आवाज यामुळे ध्वनिप्रदूषण निर्माण होते.
सर, वायू प्रदूषण टाळण्यासाठी मला तरी वाटतं की कमीत कमी वाहनांचा वापर झाला पाहिजे. आजकाल रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गाड्या धावताना दिसतात तर जी ट्रान्सपोर्ट सेवा आहे म्हणजे उदाहरणार्थ बस, रेल्वे यांनी शक्यतो प्रवास करावा किंवा हल्ली काही ऑफिसमधील कर्मचारी असेही करतात की, एक कोणीतरी आपली गाडी काढतो आणि त्याच्या जवळपासच्या विभागातील लोकं मिळून आरामात त्या गाडीत पाचजण प्रवास करतात त्यामुळे काय होतं की इतर चारजण त्यांची गाडी काढत नाही आणि त्यामुळे साहजिकच रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होते आणि गाड्यांमधील धूर हवेत कमी पसरण्यास मदत होते. साहजिकच ह्यामुळे ध्वनिप्रदूषण देखील रोखले जाईल. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.” ऋग्वेद म्हणाला.
” खूप छान सांगितलंस ऋग्वेद. जल प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल कोण सांगेल ? सृष्टी तू सांग.” सर म्हणाले.
” सर, जलप्रदूषण रोखण्यासाठी मुळात आपण मानवाने ज्या प्लास्टिकच्या पिशव्यांना जन्म दिला आहे ना त्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या ह्यांचे उत्पादन बंद केले पाहिजे. समस्त मानवजात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सर्रास निर्माल्य वगैरे टाकून त्या पिशव्या वाहत्या पाण्यात, नदी, ओढा, तलाव, खाडी, समुद्र ह्यामध्ये सोडतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या तसेच पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा तिथे खच पडलेला दिसून येतो.
देवदेवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठया उंच मुर्त्या बनवून समुद्रात त्यांचे विसर्जन होते; पण मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने तसेच रासायनिक रंगामुळे त्यांचे विघटन होत नसल्याने जलप्रदूषण होते ते टाळण्यासाठी शाडूच्या मूर्त्या घडवून नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करावे.
२६ जुलै २००५ ला जी ढगफुटी झाली होती तेव्हा मुंबईसारख्या शहरात ‘ मिठी ‘ नदी अस्तित्वात आहे हे समजले. म्हणजे ती नदी केवळ रासायनिक विषारी द्रव्ये, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कचरा यांनी वेढलेली असल्याने तिचे अस्तित्व नाहीसे झाले ही किती दुर्दैवाची बाब आहे.
कारखान्यांतून सोडली जाणारी रासायनिक विषारी द्रव्ये, सांडपाणी यांचे विघटन करण्यासाठी काहीतरी दुसरा मार्ग अवलंबवयास हवा जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही.” सृष्टी म्हणाली.
” वाह छान मुद्दे मांडलेस सृष्टी. आता ध्वनिप्रदूषण कसे टाळायचे हे कोण सांगतंय ? रिद्धेश तू सांग.” सर म्हणाले.
” सर ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मुळात वाहनांचा कमीत कमी वापर करावा जेणेकरून वाहनांचा गोंगाट होणार नाही. मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे कारण त्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच पण समस्त प्राणिमात्रांना त्याचा खूप त्रास होतो.
कर्णकर्कश लाऊडस्पीकर, लोकांचा गोंगाट यांचे प्रमाण कमी केले तर ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे सोपे जाईल.” रिद्धेश म्हणाला.
” याचा अर्थ तुम्हा मुलांना पर्यावरणाविषयी बरीच माहिती आहे आणि त्याकरता तुम्ही जागरूक आहात. तुम्ही उद्याचे सुज्ञ नागरिक होणार आहात तर तुम्ही आपल्या पर्यावरणाचे नक्कीच संरक्षण कराल ही मला खात्री आहे. तुम्ही तुम्हाला असलेली माहिती नुसती तुमच्याजवळ न ठेवता सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्या.” सर म्हणाले.
इतक्यात तास संपल्याची बेल झाली आणि देशपांडे सर समाधानाने वर्गाबाहेर पडले.
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे ,ठाणे