गौरी आणि रितेश खूप हौशी जोडपे. दोघांनाही रेडिओवरची गाणी ऐकायला, फिरायला जायला, दर्जेदार चित्रपट पाहायला खूप आवडतं असे. दोघांची मते एकदम मिळतीजुळती त्यामुळे संसारात जास्त वाद होत नसत. त्यातल्या त्यात दोघांचे एका गोष्टीने मात्र वाद व्हायचे ते म्हणजे स्वतःचा फिटनेस.
रितेश स्वतःच्या फिटनेसबद्दल एकदम जागरूक आणि त्या विरुद्ध गौरी. रितेश लहानपणापासून खेळाडू होता त्यामुळे व्यायाम हा त्याच्या नसानसात भरलेला. गौरीला अजिबात व्यायाम करायला आवडत नसे. शाळेत देखील तिने पी.टी. च्या तासाला कधीच व्यायाम केला नव्हता.
रितेशला वाटायचं आता आपण पन्नाशी क्रॉस केलेली माणसे. आपण आता आपल्या तब्येतीची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. एकदा का शरीराची काही कुरकुर चालू झाली तर थोडे दिवस आपली शुश्रूषा आपली माणसे करतील ; पण कालांतराने ते तरी आपल्याकडे किती लक्ष देतील ? आपण आपल्या आईवडिलांचं करू शकलो; पण आपल्या पुढच्या पिढीला स्वतःसाठी वेळ नाही तर आपल्यासाठी त्यांना डोंबलं वेळ मिळणार ?
रितेशने कितीही बडबड केली तरी गौरीमध्ये सुधारणा काही होत नव्हती. शेवटी रितेशने योगा क्लासची चौकशी केली. गौरीला तिथे तो पाठवणार होता. गौरीला व्यायामाचा खूप आळस म्हणून रितेशच्या सांगण्याला प्रत्यक्ष नकार कसा द्यायचा म्हणून तिने त्याला तो ऑफिसमध्ये गेला असता एक कविता करून व्हाट्सएपवर पाठवली.
योगा नको ग मला
अंग माझं वळेना
पायाच्या अंगठ्याला
बोटे पण लागेना
मान आला मानेला
ती काही फिरेना
काय झालंय कंबरेला
ती खाली वाकेना
चमक भरली खांद्याला
हात वर जाईना
कसं निस्तरु वाढत्या पोटाला
काय करावं ते सुधरेना
नका देऊ व्यायामाचा सल्ला
माझ्याच्यानं ते जमेना
रितेशला गौरीची कविता वाचून खरंतर खूप हसायला आलं होतं. त्याने एक हसण्याची स्माईल टाकली. इथे गौरीला वाटलं आपल्या नवऱ्याला पटलं की आपण कुठलाही व्यायाम करू शकत नाही.
रितेश संध्याकाळी घरी आला आणि त्याने गौरीची चंपी करण्यास सुरुवात केली.
” गौरी ! मला तुझी कुठलीही कारणं चालणार नाहीत. तुला योगा क्लासला जावंचं लागणार आहे. साधा वॉक देखील तू करत नाहीस. वॉकच्या नावाने जातेस आणि पिशवीतून भाजी आणतेस. हा कसला तुझा वॉक ?”
” ठीक आहे, तुम्ही मला कुठला ना कुठला व्यायाम करायला सांगता आहात ना ? तर मी योगाला जाणार नाही. माझं अंग इतकं स्टीफ झालं आहे की ते जरातरी वळेल का ? त्यापेक्षा मी स्विमिंगला जाते. असं म्हणतात की, स्विमिंग हा असा व्यायाम आहे की तो केल्याने इतर व्यायामाची गरज भासत नाही.” गौरीने रितेशला आत्मविश्वासाने सांगितले कारण गौरीची लेक केवळ चार दिवसांत स्विमिंग शिकली होती म्हणून गौरीला वाटले की ती देखील कमी वेळात स्विमिंग शिकू शकेल आणि तिच्या मोठ्या नणंदेने वयाच्या पन्नास वर्षानंतर स्विमिंग शिकून ‘ बेस्ट स्विमर ‘ पुरस्कार प्राप्त केला होता.
गौरीच्या बोलण्याने रितेशला हुरूप आला. त्याने लगेचच जवळच्या क्लबमध्ये गौरीचे स्विमिंगसाठी ऍडमिशन घेतले. गौरीसाठी स्विमिंगचे कपडे आणले. इतका सगळा तामझाम झाल्यावर गौरी निघाली स्विमिंग करायला.
स्विमिंग पुलमध्ये उतरताना गौरी भयंकर घाबरली. ती आलेली पाहिल्यावर तिचा ट्रेनर तिच्यापाशी आला. त्याने स्विमिंगचा श्रीगणेशा सुरू केला. श्वास रोखून पाण्यात तोंड घातल्यावर गौरीचा श्वास कोंडला. तो ट्रेनर मात्र ‘ डर के आगे जीत है ‘ असं बोंबलत होता.
पाण्यात थोडं फ्लोट केल्यावर तिने तिच्या ट्रेनरला विचारले, ” मी पाण्यात चालू का ? पाण्यात चालण्याचा देखील एक व्यायामचं आहे ना ?”
ट्रेनर म्हणाला, ” हो मॅम ! तुम्ही दोन – तीन राउंड मारा.”
गौरीने पडत्या फळाची आज्ञा म्हणून पाण्यात चालायला सुरुवात केली. हळूहळू पावले टाकत, कठड्याचा आधार घेत गौरीने पाण्यात चार राउंड मारले. आजूबाजूला लहान लहान मुले पटापटा उड्या मारत स्विमिंग करत होती. त्यांचे पाय तळाशी लागत नसताना देखील ती मुले पाण्यात तरंगत उभी होती. ‘ मेलं माझं शरीरचं पाण्यापेक्षा जड आहे म्हणून पाण्यात तरंगू शकत नाही मी.’ स्वतःच्या वाढलेल्या देहाकडे बघून चरफडतच गौरी म्हणाली. थोडे हातपाय मारल्यावर शॉवर घेऊन गौरी घरी आली.
गौरी घरी आल्यावर रितेशने गौरीला स्विमिंग बद्दल विचारले. तेव्हा गौरी म्हणाली, ” लगेच येईल का हो मला पोहायला ? जरा वेळ लागेलच ना ? पाण्यात पडल्यावर पोहता येतं हे स्टेटमेंट साफ चुकीचं आहे बरं.”
” ठीक आहे ! वेळ लागला तरी चालेल; पण आवडीने कर.” रितेश म्हणाला.
” हं !” गौरी उद्गारली.
अगदी न चुकता गौरी स्विमिंगला जाऊ लागली. कधी कंटाळा आला तरी रितेश तिला ‘ कंटाळा करून चालणार नाही ‘ असे म्हणून तिला स्विमिंगला पिटाळायचा तेव्हा गौरीला आपला नवरा हिटलरप्रमाणे वाटायचा. एक महिना होत आला; पण बोर्ड धरून थोडेसे पाय पाण्यात मारण्यापर्यंतचं गौरीची मजल गेली होती. हां ! पण एक गोष्ट नक्कीच झाली होती की, गौरीला पाण्यात गेल्यावर खूप फ्रेश वाटू लागले होते. त्यामुळे तिने ठरवले होते की, कितीही वेळ लागला तरी चालेल मी स्विमिंग शिकणार. तिच्या ह्या निर्धाराने मात्र रितेशला अत्यानंद झाला होता हे वेगळे सांगायला नको.
चला तर वाचकहो ! आपल्या गौरीला लवकरात लवकर स्विमिंग येऊदे अशी प्रार्थना करूया. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांना ‘ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फिट राहा, निरोगी राहा, आनंदी राहा.’
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे,ठाणे
धमाल कथा👌