कथा – सोहमची डायरी

WhatsApp Group Join Now

मे महिना संपला. मामाच्या, आजीच्या, बाबांच्या गावाला गेलेले सगळे परत आले. लवकरच शाळा सुरू होणार म्हणून तयारी सुरू होती. नवीन पुस्तकं, नवीन वह्या, त्यांना घातलेली कव्हर, नवीन दप्तर, नवीन गणवेश अशा नवीन नवीन सुगंधात मुलं शाळेत जाण्यासाठी तयार झाली. आज शाळेचा पहिला दिवस.  सोहम आणि अवनी आज खूप दिवसांनी भेटत होते.

“हाय सोहम, कसा आहेस?” अवनीने सोहमला विचारले.  

“हाय. मी मस्त. तू बरीच खूश दिसतेस” सोहमने अवनीला आनंदी बघून विचारले.  

“हो ना. आज मॅडम आपली डायरी बघणार आहेत ना. म्हणून खूप एक्सायटेड आहे.  काय झालं? तू नाही का  तयार केलीस?” अग्नीने सोहमचा निरुत्साह बघून विचारले. 

“आहे ग लक्षात. डायरी लिहून काढण्याचा प्रयत्न केला. पण नाही जमलं मला लिहायला. जी सुरवातीला लिहीली आहे ती सुद्धा लिहीताना खूप बॅड फिल झालं. ” सोहम थोडा नाराज होत म्हणाला. 

“म्हणजे काय रे? काय झालं?” असं म्हणत अवनी त्याला पुढे अजून विचारणार तितक्यात मॅडम वर्गात आल्या.

“गुडमॉर्निंग चिल्ड्रन्स.” वर्गशिक्षिका वर्गात आल्या आल्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणाल्या. सुट्टीनंतर पहिल्यांदाच बघत होत्या त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना भेटायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला ऊत्सुक होत्या. 

“गुडमॉर्निंग मॅडम.” विद्यार्थ्यांनी सुद्धा ऊत्साहात आपल्या वर्गशिक्षीका बाईंना म्हणाले. 

“काय सगळ्यांनी सुट्टी एन्जॉय केली ना?”  बाईंनी मुलांना विचारले.

“हो मॅडम” सगळेच एका सुरात म्हणाले.

“वाह छान. पण ह्या मध्ये मी दिलेला टास्क लक्षात आहे ना. डायरी बनवण्याचा. ह्या सुट्टीच्या दिवसातला तुमचा अनुभव आणि तुमचे विचार नोंद करायला सांगितले होते. केले का?” बाईंनी विद्यार्थ्यांना करायला सांगितलेल्या ऊपक्रमाची आठवण करून देत ते केले की नाही ह्याची विचारणा केली. 

“हो मॅडम” परत एका सुरात ऊत्साहात विद्यार्थ्यांनी ऊत्तर दिले. 

“गुड”. बाईंना आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ऊपक्रमाची शाबासकी दिली. त्यांनी केलेल्या ऊपक्रमाची नोंद ऐकण्यास ऊत्सुक होत बाईंनी विद्यार्थ्यांना विचारले, “आता सुरुवात करूया वाचायला. तयार “

“हो” परत एका सुरात सगळे म्हणाले. 

मॅडमनी एका एकाला ऊभं करून डायरी वाचायला सांगितली. कुणी आपल्या गावी केलेली धम्माल डायरी नोंदवली होती तर कुणी नवीन ठिकाणी फिरण्याची नोंद. कुणी नवीन कला शिकलेल्या नोंद आणि नमुने डायरीत चिकटवले होते. मैथिलीने तिच्या डायरीत तिच्या तीने नवीन सुरू केलेल्या ऊपक्रमाची सविस्तर माहिती लिहीली होती. भैरवीने गावी माडाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या वस्तूंचे छान फोटोज काढून चिकटवले होते. गणेशाच्या आईने घरी मशिनवर शिवलेल्या विविध प्रकारच्या कापडी पिशव्यांचे फोटोज लावून त्याखाली त्याने तिला केलेल्या मदतीची नोंद केली होती. 

मॅडमचं लक्ष सोहम कडे होतं. सगळी मुलं ऊत्साहात आपली डायरी वाचून दाखवत होते आणि समजावून सांगत होते. 

 पण सोहम मात्र ऊदास वाटत होता. मॅडम नी सोहम ला त्याची डायरी वाचायला सांगितली.

सोहम डायरी वाचायला ऊभा राहिला. काही सेकंद तो काहीच बोलले नाही. नंतर त्याने बोलायला सुरुवात केली.

तो म्हणाला, “मॅडम, गेल्या वर्षीच्या सुट्टीत मी देशाबाहेर फिरायला गेलो होतो आईबाबांबरोबर. म्हणून ह्यावर्षी  महाराष्ट्र फिरण्याचे ठरले. बाबांची ती अटच होती. ते म्हणाले नेहमी बाहेरचं जग बघण्या आधी आपलं जग फिरून घे. आणि आपला जन्म ह्या मातीतला. आपलं कामाचं ठिकाणं ही हा महाराष्ट्रच आहे. त्याला आधी जाणून घे. म्हणून मग गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग ला गेलो. अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणी गेलो.  पण सगळी कडे निराशा झाली. आणि जे बघितलं त्याने खूप ऊदास झालो. सगळीकडे फिरण्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसले. किल्ले काय, समुद्र किनारा काय.. सगळीकडे प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाण्याच्या पदार्थाचे रॅपर, आणि बराच प्रकारचा कचरा होता. किल्ल्यावर तरी ही परिस्थीती दिसायला नको ना. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि प्राणपणाने लढणाऱ्या शूरवीरांची ती भूमी तरी स्वच्छ ठेवली पाहिजे ना . पण तिथेही कचरा. इतिहास समजून घ्यायला जातात की फिरून फोटो काढायला आणि कचरा करायला हेच समजत नाही. फार वाईट वाटले बघून. म्हणून मग मी नोंद नाही केली डायरीत कसलीच. “

इतकं बोलून सोहम गप्प झाला. फक्त तोच नाही वर्गातील सगळेच.  कारण सगळ्यांनीच हे पाहिलं होतं फिरण्याच्या ठिकाणी. त्यामुळेच सगळेच गप्प झाले.

मॅडम नी सोहम कौतुक केले. त्या म्हणल्या, “सोहम तुझं करावं तेवढ कौतुक कमी आहे. अरे सगळेच फिरायला जातात. तिथे बघतात ते समुद्र, लाटा, राजवाडा, खाण्याचे पदार्थ. पण तू बघितलंस तिथे वाढलेलं दुषित साम्राज्य.  वाह. तुझं ऑब्झरवेशन खरचं खूप छान आहे. तुला ह्या ऑब्झरवेशन मध्ये प्रॉब्लेम कळला आहे. म्हणजे आता सोल्यूशन सुद्धा कळलंच असेल हो ना.

अरे  हे कचर्‍याचे ढिग आपणच निर्माण केले आहेत. मग ते होऊ नये म्हणून सुरुवात आपणच  करायला पाहिजे हो कि नाही. कचरा डस्बीन मध्ये फेकायचा. किंवा एका ठराविक जागेवर गोळा करायचा. शक्य तितकं प्लास्टिक चा वापर टाळायचा. प्लास्टिक बॅग, प्लास्टिक बाटली यांना विकत घ्यायचे नाही. कापडी पिशवी, स्टीलचा डबा ह्यातून वस्तू आणायच्या.

 गणेशची आई खूप छान पिशव्या शिवत आहेत. तसेच आपण सुद्धा त्याचा वापर करू. गावी अजूनही निसर्गापासून बनलेल्या वस्तूंचा ऊपयोग काही प्रमाणात होतो. भैरवीच्या डायरीतील नोंद पहा बरं हे त्याचेच ऊदाहरण आहे. माडांच्या झावळ्यांपासून बनवलेले झाडू, टोपली, करवंट्यापासून बनलेल्या वस्तू,  केळीच्या पानांपासून बनलेल्या जेवणासाठी वापरले जाणारी पत्रावळी अशी कित्येक ऊदाहरणं आहेत जी आपल्याला निसर्ग वाचवण्यासाठी निसर्गच मदत करतो हे सांगतात.

निसर्गाचा जितका वापर करू तितकेच निसर्ग संवर्धन होऊ शकेल. मानवनिर्मित अविघटीत गोष्टींच्या वापरामुळेच निसर्गाचा समतोल ढासळतो. पुढल्या पिढीसाठी निसर्ग वाचवून ठेवायचा असेल तर आपल्या पासून सुरुवात करावी लागेल.”

अवनी मध्येच ऊठून मॅडमना म्हणाली, “मॅडम माझा दादा सुद्धा किल्ल्यांवर फिरायला जातो. त्यांचं एक मंडळ आहे. ते महिन्यातील एका शनिवारी रविवारी किल्ल्यांवर जातात आणि तिथे साफसफाई करतात. तसंच किल्ल्यांवर आलेल्यांना सफाई राखण्याची विनंती करतात. किल्ल्यांचे संवर्धन करतात. मी सुद्धा जाते कधी कधी त्यांच्या सोबत. कचरा इथेतिथे  फेकण्यापासून लोकांना परावृत्त करते. आपण असे प्रयत्न करत रहायचे. मॅडम आपण हे नक्कीच करू शकतो ना ?” 

“मॅडम मी काही सांगू का?” मैथिलीने ऊठून बोलण्याची परवानगी मॅडमकडे मागितली. “हो मैफिली सांग ना. ” मॅडम म्हणाल्या. परवानगी मिळताच मैथिली म्हणाली, “सोहम असं नाही कि कचरा होऊ नये ह्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. परंतू त्याचा वेग कमी आहे. मॅडम ह्या सुट्टीत मी माझ्या ताईबरोबर तिच्या संस्थेत जात होते. ती पर्यावरण संवर्धन विषयक कामे करते. रिड्यूस, रियूज, रिसायकल ह्या संकल्पनेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम करते. ह्याच सगळ्याची नोंद मी माझ्या डायरीत केली आहे. 

तिच्याच संस्थेमार्फत मला अजून अशा व्यक्तींना भेटता आले जे प्लास्टिक रिसायकल करतात. ते प्लास्टिकपासून पर्स, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तू बनवतात. मी त्या व्यक्तींना ह्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्या शाळेत बोलावू शकते का मॅडम? म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ह्याबाबत माहिती मिळेल.”

मैथिलीच्या ह्या विचारावर मॅडम खूष झाल्या. त्या म्हणाल्या, ” वाह मैथिली कल्पना छान आहे. फक्त त्यांनाच कशाला तुझ्या बहिणीला ही बोलावू म्हणजे ती आपल्याला पर्यावरण संवर्धनाबाबत अधिक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. मी आपल्या प्रिन्सिपल सरांची परवानगी आहे का ते बघते आणि मग एक दिवस छोटा कार्यक्रम आयोजित करू. 

पुढे त्या सोहमला म्हणाल्या, “सोहम जसं हा कचऱ्याचा ढीग जमा झाला तसा आपल्या चांगल्या सवयींमुळे तो ढीग कमी होईल आणि सर्वात सुंदर अशा जगाचे आपण साक्षीदार बनू. आज प्रत्येकाने एक निश्चय करायचा. रोज एक समाज ऊपयोगात येणारे एखादं काम करायचं. आणि त्याची नोंद तुम्ही बनवलेल्या ह्या डायरीत करायची. समजलं… “

“हो मॅडम.” सोहमने मॅडमना आश्वासन दिले. 

सोहमला मिळालेल्या ऊत्तरामुळे तो खूप खूष झाला आणि मनोमन ठरवले प्लास्टिक वस्तू वापरायच्या नाहीत. कचरा कुठेही फेकायचा नाही.

त्याला आणि वर्गातील सगळ्यांना कळलं आहे. तुम्हाला कळलं आहे ना.

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top