स्मार्ट वीज मीटर्स: पारंपरिक मीटर्सना ‘स्मार्ट’ पर्याय

WhatsApp Group Join Now

भारतातील ऊर्जेच्या क्षेत्रात पायाभूत बदल घडवण्याचे आणि या क्षेत्राचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या चालू आहेत. वीज चोरीला आळा घालून वीज पुरवठ्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी  विद्यमान पारंपरिक वीज मीटर हे स्मार्ट वीज मीटर्सनी बदलण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम (स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम) केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये यासंबंधीची घोषणा भारताच्या अर्थमंत्र्यांनी केली. १.५ लाख करोड रुपयांचे बजेट यासाठी निर्धारित केले गेले आहे. भारतातील स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५-२६ पर्यंत २५ कोटी पारंपरिक वीज मीटर्स बदलून त्याजागी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर्स बसवण्याची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. विशेष म्हणजे उपभोक्त्यांसाठी ते पूर्णपणे निःशुल्क आहेत.

स्मार्ट वीज मीटर्स आणि पारंपरिक वीज मीटर्समधे काय फरक आहे? 

सध्या आपण घरगुती किंवा व्यावसायिक कामांकरिता खर्च केलेली वीज मोजण्यासाठी  पारंपरिक वीज मीटर्स वापरतो. आपल्या ऊर्जेच्या वापराचे मोजमाप करणे, निरीक्षण करणे आणि त्याची नोंद ठेवणे ही कामे वीज मीटर करतो. या मीटरच्या साहाय्याने ग्राहकाने वापरलेली एकूण वीज नोंदवली जाते व महिन्याभरात वापरल्या गेलेल्या एकूण वीजेच्या प्रमाणात वीज कंपनी ग्राहकाकडून पैशाची वसुली करते. त्यासाठी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्षपणे प्रत्येक मीटरपाशी जाऊन ग्राहकाने खर्च केलेल्या वीजेची नोंद घ्यावी लागते. त्यानंतर ग्राहकांना विजेची देयके पाठवली जातात. त्याचा भरणा ग्राहक पुढील काही दिवसांत करू शकतो. ही पद्धत किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. तसेच ती अचूक नाही. या पद्धतीत, उपयोगात आणलेली वीज नोंदवताना मानवी चुका होऊ शकतात. रीडिंग वेळेवर न होणे, ते चुकीचे असणे तसेच चुकीचे बील येणे यासारख्या अनेक समस्यांना ग्राहकाला तोंड द्यावे लागते. त्या टाळण्यासाठी आणि एकंदरीतच ही सर्व यंत्रणा कार्यक्षम करण्यासाठी स्मार्ट वीज मीटर्सची रचना केली आहे. या मीटर्सची संपूर्ण रचना पारंपरिक मीटर्सप्रमाणेच असते. परंतु या व्यतिरिक्त या मीटर्समध्ये एक ‘कम्युनिकेशन मॉड्यूल’ असते. त्यामुळे हे मीटर्स वैशिष्ट्यपूर्ण बनतात. या मीटर्सची वैशिष्ट्ये तसेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या मीटर्ससंबंधी ग्राहकाच्या मनात असलेल्या शंका आणि त्यांचे निरसनही येथे केले आहे. 

स्मार्ट वीज मीटर्सचे प्रकार:

वीज वापरावरून या वीज मीटर्सचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार केले जातात. 

१) सिंगल फेज मीटर्स– सामान्यत: घरगुती वापरासाठी, जिथे कमी शक्तीची वीज वापरली जाते, त्या ठिकाणी सिंगल फेज मीटर्स वापरतात. (२ कि वॅट पेक्षा कमी)

२) थ्री फेज मीटर्स- मोठ्या उद्योगांमध्ये तसेच व्यावसायिक वापरासाठी, जिथे अधिक शक्तिशाली विजेची गरज असते, तिथे थ्री फेज मीटर्स वापरतात. (२ कि वॅट पेक्षा जास्त)

स्मार्ट वीज मीटर्सची वैशिष्ट्ये:

या मीटर्सची काही खास वैशिष्ट्ये अशी: 

  • या मीटर्समधे देयके भरण्यासाठी ‘प्रीपेड’ आणि ‘पोस्टपेड’ असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. ही पद्धत काहीशी मोबाईल फोनच्या प्रीपेड आणि पोस्टपेड कार्ड प्रमाणे आहे. प्रीपेड पध्दतीत आपण वीज कार्ड आवश्यकतेनुसार ‘रीचार्ज’ करू शकतो. कार्डमध्ये भरलेले पैसे संपत आल्यावर ग्राहकाला तसे सूचित केले जाते व कार्डमधील पैसे संपल्यानंतर विद्युतपुरवठा खंडित केला जातो. पोस्टपेड पद्धतीत देयकाची रक्कम महिनाभराच्या वापरानंतर भरावयाची असते.
  • हे मीटर्स विजेचा वापर होत असतांना, वापरलेल्या विजेची ‘रियल टाईम’ नोंदणी (त्याच वेळी केली गेलेली नोंदणी) करतात. तसेच, जर तुमचे कार्ड प्रीपेड असेल तर खर्च केलेल्या विजेच्या प्रमाणात आपल्या कार्डवरील पैसे कमी होतात. हे मीटर्स इंटरनेटला जोडलेले असतात. वीजवापराची माहिती हे मीटर्स वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीला दर १५ मिनिटांनी पाठवतात. त्यामुळे वीज कंपनी दूरस्थपणे प्रत्येक मीटरची नोंद ठेवू शकते. म्हणूनच या मीटर्सना कुठल्याही प्रत्यक्ष मानवी तपासणीची गरज नसते. 
  • आपण खर्च केलेल्या वीजेची नोंद ग्राहक ॲपमधे स्वतः पाहू शकतो. थोडक्यात ग्राहक आपण खर्च करत असलेल्या वीजेचा ‘ट्रॅक’ ठेवू शकतो. पारंपरिक मीटर्समध्ये हे शक्य नसते. अनेकदा ग्राहकाला बिल हातात आल्यावर आपल्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वीजवापराबद्दल समजते. 
  • या मीटर्सच्या सहाय्याने ग्राहकाला अचूक वीज देयके मिळण्यास मदत होते. 
  • कार्डवरील पैशाची बाकी कमी झाल्यास ग्राहकाला त्वरित संदेश पाठवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
  • आपण करत असलेला विजेचा वापर ग्राहक पुनर्निर्धरित करु शकतो. त्याहून जास्त वापर होत असल्यास ग्राहकाला संदेश पाठवला जातो. 
  • वापरकर्त्यांसाठी सोपे असे वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप यासाठी उपलब्ध आहे. 
  • या मीटर्समधे वापरकर्त्याने काहीही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तसा मेसेज ताबडतोब वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे जातो.
  • या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे मीटर्स अतिशय  कार्यक्षम आणि सोयिस्कर आहेत. 

स्मार्ट वीज मीटर्सचे फायदे: 

  • या मीटर्सच्या वापरामुळे वीज देयकाची संपूर्ण पद्धत स्वयंचलित होते. त्यामुळे ही पद्धत अत्यंत कार्यक्षम आहे.
  • आपल्या दररोजच्या वीज वापरानुसार ग्राहक मीटरमधे विजेची कमाल मर्यादा सेट करुन ठेऊ शकतो. त्यामुळे अधिक वीज खर्च होण्यास आळा बसू शकतो. यामुळे वीजेची आणि खर्चाची बचत होण्यास मदत होते. याचा अजून एक फायदा असा की जर आपल्या विजेची चोरी होत असेल तर विजेची कमाल मर्यादा ओलांडली जाईल. त्यामुळे ग्राहकाचा सूचना देणारा गजर लगेच वाजू लागेल. 
  • या मीटर्समधे दर आठवड्याला रीचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे महिन्याची मोठी रक्कम एकदम भरण्याऐवजी ग्राहक चार छोट्या साप्ताहिक हप्त्यांत पैसे भरू शकतो. 
  • पारंपरिक वीज मीटर्स मधील मानवी तपासणीची पद्धत केवळ अकार्यक्षमच नाही, तर खर्चिकही आहे. या पद्धतीमुळे वीज पारेषण कंपनीला खूप तोटा सहन करावा लागतो. आधुनिक स्मार्ट प्रीपेड वीज मीटर्समुळे हे नुकसान टळू शकेल. 
  • अनेक ग्राहक वीजबिल थकीत ठेवतात. अशा थकबाकीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होते. 
  • हे मीटर्स वापरून आपण आपले जैविक इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकतो. त्यामुळे पर्यायाने आपले कार्बन उत्सर्जन (कार्बन फूटप्रिंट) कमी होण्यास मदत होईल.

स्मार्ट वीज मीटर्सचे तोटे व ग्राहकांच्या मनातील शंका :

ग्राहकांच्या मनात या मीटर्सच्या वापराबद्दल अनेक शंका आहेत. त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे. 

  • काही जणांच्या मते हे मीटर जलद गतीने चालतात. परंतु ही शंका पूर्णपणे निराधार आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर या मीटरची चाचणी घेतली जाते. तसेच पूर्णपणे तयार झाल्यावर प्रत्येक मीटर हा पूर्णपणे तपासणी करून मगच स्थापित करण्यासाठी पाठवला जातो. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय), एनएबीएल दुसरे म्हणजे, या मीटरच्या रीडिंग बद्दल काही शंका असेल तर त्याचे निरसनही ग्राहकाला सहज करता येते. कारण हा मीटर दर १५ मिनिटांनी आपले रीडिंग वीज कंपनीला पाठवत असतो. त्यामुळे दर १५ मिनिटांचे रीडिंग कंपनीकडे उपलब्ध असते. तसेच ते वापरकर्त्यालाही ऍपवर दिसते.  मीटर व्यवस्थित चालत नसेल तर ते या रीडिंग्ज वरून सहज कळू शकते. तरीही उपभोक्त्यांच्या मनातून ही शंका पूर्णपणे काढून टाकण्यासाठी सरकारने एक विशेष व्यवस्था केली आहे. तिच्या अंतर्गत नवीन स्मार्ट मीटर लावल्यानंतर तीन महिने ग्राहक दोन्ही मीटर जोडून ठेवू शकतात. अशा परिस्थितीत जुना मीटर नवीन मीटरचा ‘तपासनीस’ म्हणून काम करतो. जर नवीन मीटर व्यवस्थित चालत नसेल तर ते जुन्या मीटरमुळे कळू शकते. तसेच अशा वेळी जुन्या मीटरप्रमाणे देयक आकारले जाण्याची व्यवस्था आहे. 
  • ग्राहकांच्या समोरील दुसरी अडचण म्हणजे हे मीटर प्रीपेड असल्यास त्यात आधीच पैसे भरावे लागतात. केलेला रीचार्ज संपल्यानंतर वीज पुरवठा खंडित होतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेला यामुळे अडचण येऊ शकते. पारंपरिक वीज मीटर पद्धतीत विजेची थकबाकी दंडात्मक रकमेसह पुढील महिन्यात भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या मीटर्समधे ती नाही. यामुळे प्रीपेड मीटर्सना मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. प्रीपेड योजना ऐच्छिक असावी आणि ज्यांना वीज बिल नंतर भरणे सोयीचे वाटते, त्यांच्यासाठी पोस्टपेडचाही पर्याय असावा अशी मागणी होत आहे. 
  • रात्रीच्या वेळी रीचार्ज संपला तर काय? अशीही एक शंका उपस्थित केली जात आहे. पण तसे झाल्यास रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होणार नाही आणि ग्राहकाला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत वीजबिल भरण्याची मुभा मिळेल. 
  • संगणकीय किंवा तांत्रिक समस्येमुळे अनेक जणांचे मीटर्स एकाच वेळी बंद पडून वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.
  • या मीटर्समुळे वीज मंडळातील बिलिंग आणि अकाउंटिंग विभागातील अनेक वीज कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
  • या मीटर्समुळे वीजचोरीला आळा बसेल असे ठासून सांगितले जात असले तरी त्याबाबत काही वीजतज्ञ साशंक आहेत. 
  • काही जणाच्या मते ही वीज मंडळाच्या खाजगीकरणाकडे चाललेली वाटचाल आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना मोठी दरवाढ सोसावी लागू शकते.
  • उपभोक्त्यांसाठी हे मीटर्स पूर्णपणे निःशुल्क असले तरी काही काळाने या मीटर्सची किंमत अप्रत्यक्षपणे ग्राहकांकडूनच वसूल केली जाईल अशी शंका ग्राहकांच्या मनात आहे.

या उपक्रमासमोरील आव्हाने:

  • सध्याचा कामाचा वेग बघता, अत्यंत महत्त्वाकांक्षी असे २५ कोटी वीज मीटर्स बसवण्याचे उद्दिष्ट २०२५-२६ पर्यंत पूर्ण होणे अवघड दिसते. डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात ८लाख मीटर्स बसवण्याचे काम पूर्ण झाले होते. 
  • या कामासाठी आवश्यक असलेला प्रचंड मोठा निधी हे एक प्रमुख आव्हान आहे. 
  • ग्राहकाच्या माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्याचे मोठे आव्हानही या उपक्रमासमोर आहे.
  • या योजनेला होणारा ग्राहकांचा विरोध नाहीस करण्यासाठी त्यांच्या मनातील शंकांचे समाधानकारक निरसन करणे हे एक मोठे आव्हान या उपक्रमासमोर आहे. 

या मार्गात अनेक अडचणी असल्या तरी हे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल होत आहे. सध्या देशात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर इत्यादी राज्यात या मीटर्सचा वापर थोड्या प्रमाणावर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही लवकरच तो सुरु होणार आहे. (मे, २०२४ मधे यासंबंधीच्या कामाला सुरुवातही झाली). जनतेचा विरोध लक्षात घेऊन महाराष्ट्रात सध्या फक्त सरकारी कार्यालयांमधेच स्मार्ट मीटर्स बसवले जाणार आहेत. 

गेल्या काही वर्षांत भारताने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. कामे सोपी, जलद आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग सर्व क्षेत्रांत होत आहे. स्मार्ट वीज मीटर्स ही अशीच तंत्रज्ञानाचा प्रगतीमुळे साध्य झालेली गोष्ट आहे, जिचा प्रभाव नजीकच्या भविष्यात आपल्या दैनंदिन जीवनावर पडणार आहे. जगात अनेक प्रगत देशांत सध्या स्मार्ट मीटर्स वापरले जात आहेत. या पंक्तीत आता भारतही जाऊन बसला आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असलेले स्मार्ट वीज मीटर्स हे भावी पिढीचे मीटर्स आहेत. त्यांच्या वापरामुळे ऊर्जा क्षेत्राच्या आधुनिकीकरणास चालना मिळणार आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम ग्राहकांच्या मनातील शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे.

तुम्हाला स्मार्ट वीज मीटर्स बद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top