नवग्रहांची माहिती ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म व उपयोग

WhatsApp Group Join Now

नवग्रहांची माहिती ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म व उपयोग

 पृथ्वीच्या खाली खडकांमध्ये अथवा जलाशयांच्या म्हणजेच समुद्राच्या खाली जे मौल्यवान खडे आढळतात त्यांना रत्न असे म्हणतात. पृथ्वीवरचा प्रत्येक पदार्थ अणूंनी बनला आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये खूप दाब असतो तसेच उष्णता सुद्धा असते त्याचा परिणाम पृथ्वीवर  पोटात असलेले खनिजे खडक यांच्यावर होऊन विशिष्ट भौमितिक रचना असणारा, भौतिक, ,रासायनिक आणि प्रकाशिय गुणधर्म असणारा पदार्थ तयार होतो. त्याला क्रिस्टल असे म्हणतात हे क्रिस्टलच बहुतेक रत्न असतात. असे अनेक रत्न आढळतात. पण नऊ मौल्यवान रत्नांना नवरत्न असे म्हणतात. भारतीय ज्योतिष शास्त्रात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नव रत्न नवग्रहांशी संबंधित आहे असा ज्योतिष शास्त्रात समज आहे. नवग्रहांच्या गतीप्रमाणे त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर व त्याच संदर्भात मनुष्यावर होत असतो. ज्योतिष्य शास्त्रात प्रत्येक ग्रहा करता एक रत्न धारण करायला सांगितलेले आहे.

  ज्योतिष्यशास्त्र हे विश्वासावरच आधारलेले आहे. या नवरत्नांना काही उपरत्ने सुद्धा आहेत. प्रत्येक रत्नाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. 

नवरत्नांची माहिती ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म व उपयोग characteristics of gemstones and its astrological uses in marathi या लेखामध्ये आपण या नवरत्नांची माहिती व गुणधर्म बघूया 

हे नऊ महारत्न आहेत १) माणिक, २) मोती ३) पोवळे ४) पाचू ५) पुष्कराज ६) हिरा ७) नीलम ८) गोमेद ९) लसण्या 

१) माणिक—-माणिक ज्याला इंग्लिश मध्ये रुबी असे म्हणतात. व संस्कृत मध्ये रविराज असे म्हणतात हा रत्नांचा राजा आहे.हे सूर्याचे रत्न आहे. याचा रंग डाळिंबी किंवा लालसर असतो.

एका भांड्यात ठेवल्यावर त्याच्या बाजूने जर गुलाबीसर किराणा परावर्तित होत असतील तर ते खरे माणिक रत्न  आहे असे ओळखले जाते.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–एखाद्या श्रेष्ठ ज्योतिषाला दाखवूनच या रत्नाला धारण करता येते. हे रत्न धारण केले की नाव आणि  प्रसिद्धी मिळते.ज्यांना लोकांचा खूप संपर्क आहे म्हणजेच नेता अधिकारी यांनी हे रत्न वापरावे. माणिक रत्न अनामिकेवर प्रधान केले जाते. हे रत्न सूर्याशी संबंधित असल्यामुळे रविवारी सूर्योदयाच्या वेळी घातले जाते. घालण्यापूर्वी त्याला दूध गंगाजलने अभिषेक करून सूर्याचा मंत्र म्हणून घातले जाते. कमीत कमी दोन ते तीन कॅरेट चे रत्न घालायला हवे. याची किंमत अगदी 450 रूपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत आहे.

२) मोती–मोती हे  रत्न समुद्रामध्ये खोलवर शिंपल्यामध्ये आढळते. इंग्लिश मध्ये याला पर्ल असे म्हणतात.शिंपल्यामध्ये एखादा धुळीचा कण वाळू अथवा इतर पदार्थ गेला की  चिकट पदार्थ त्याला एका कवचात बंद करून टाकतो व त्यातूनच मोत्याची निर्मिती होते.नैसर्गिक रित्या सापडले जाणारे मोती अत्यंत मौल्यवान असतात. कल्चर मोती हे मानव निर्मित असतात. याची शेती केली जाते.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–मोती हे चंद्राचे रत्न आहे. ते धारण केलं की मानसिक त्रास कमी होतो. कारण चंद्र हा मनुष्याच्या मनस्थितीवर परिणाम करत असतो असे म्हटले जाते.

मोत्याचा रंग चमकदार पांढरा असतो. मात्र हे रत्न धारण करण्याआधी ज्योतिषांशी बोलावे. हे रत्न कर्क राशीच्या लोकांना उपयोगी आहे. उच्च रक्तदाब ,झोपेचा त्रास इत्यादी कमी करायला मोती या रत्नाचा उपयोग होतो. हे रत्न सोमवारी धारण केले जाते. कारण सोमवार हा वार चंद्राचा आहे. रत्न घालण्यापूर्वी त्याला दूध व दह्याचा अभिषेक करून चंद्राचा जप केला जातो.

मोती या रत्नाचा आयुर्वेदामध्ये औषधात घालण्यासाठी उपयोग केला जातो. त्याचा परिणाम शरीरातील रसायनांवर होतो.

३) पोवळे–या रत्नाला इंग्लिश मध्ये कोरल असे म्हणतात. याला मुंगा असेही म्हणतात. हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे. पोवळे सुद्धा समुद्रात खोलवर सापडतात. काही प्राणी समूहांनी स्वतःच्या भोवती सागरामध्ये तयार केलेल्या बाह्य कंकालाला म्हणजेच सांगाड्याला पोवळे असे म्हणतात. हे बाह्य कंकाल मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते. वेगवेगळ्या पोवळ्यामध्ये ही कंकाल रचना वेगवेगळी असते व ती बऱ्यापैकी क्लिष्ट असते. पोवळ्याचा व्यवसाय सागरी किनाऱ्यालगतच्या प्रदेशात होतो. लाल पोवळे आणि काळे पोवळे जे अतिशय महाग मिळतात त्याचा व्यवसाय अतिशय जोरात चालतो.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–हे रत्न मंगळ ग्रह करता आहे. हे रत्न परिधान केल्यावर मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो. या रत्नामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती भक्कम होते. मंगळ ग्रहाची स्थिती कमकुवत असली की अपघात होण्याची शक्यता असते. पोळ्याची माळ घालणं जास्त फायदेशीर ठरते. पोवळे रत्न अनामिका बोटात घातले जाते. मंगळवारीच धारण केले जाते याआधी त्या रत्नाला पाणी व दुधाचा अभिषेक करून मंगळ ग्रहांचा मंत्र म्हटला जातो. पोवळे घातल्याने मनुष्याला अदम्य ऊर्जा मिळते. पोवळे रत्न सोन्यामध्ये घातले जाते. पोवळ्याला कानातले किंवा ब्रेसलेट मध्ये सुद्धा घालतात.

४) पाचू –पाचू रत्न हे बुध ग्रहासाठी घातले जाते. त्याचा रंग गडद हिरवा असतो. पाचू हे रत्न खडका मध्ये आढळते. हे खनिज बेरिलियम आणि ॲल्युमिनियम यांच्यापासून बनते. खडकामध्ये जेव्हा पाचूचे साठे तयार होत असतात ,त्यामध्ये क्रोमियम ऑक्साईड मिसळला जातो. त्यामुळे त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. पाचूचे स्फटिक हार्नब्लेड या खडकामध्ये आढळते. पाचू हे रत्न हिऱ्याप्रमाणेच मौल्यवान आहे. हे रत्न भारत रशिया कोलंबिया दक्षिण आफ्रिका येथे सापडते.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म—पाचू रत्नाला धारण करताना आधी ज्योतिष्य शास्त्राचा आधार घ्यावा आणि मगच धारण करावे. हे रत्न उजव्या हाताच्या करंगळी मध्ये घातले जाते. मिथुन आणि कन्या राशीचे लोक हे रत्न घालू शकतात. पाचू घातल्याने उत्तम आरोग्य समृद्धी येते  ज्याचा बुध ग्रह कमजोर आहे ती व्यक्ती हा पाचूचा खडा घालू शकते. पाचूमुळे अनेक सकारात्मक बदल जीवनामध्ये घडू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धीचा ग्रह आहे. त्यामुळे पाचू घातल्यामुळे बुद्धीची वाढ होते. हा खडा कॅरेट प्रमाणे घातला जातो हे कॅरेट तुमच्या वजनानुसार ठरवले जाते. घालण्याआधी या खड्याला दूध दही यांचा अभिषेक केला जातो. तसेच गंगाजलाने स्वच्छ धुऊन त्याला हळद-कुंकू वाहून पूजा केली जाते व बुधाचा मंत्र म्हटला जातो. अशा प्रकारे हा रत्न परिधान केल्याने एक सकारात्मक प्रवृत्ती माणसांमध्ये येते. रत्न बुधवारी परिधान केले जाते. सोने किंवा चांदीच्या अंगठी मध्ये घातल्या जाते.

५) पुष्कराज अथवा पुखराज—हे गुरुचे रत्न मानले जाते. याचा रंग सोनेरी पिवळा असतो. अतिशय कठीण असे हे रत्न असते. व मौल्यवान पण आहे. किमतीला देखील खूप महाग आहे. पुष्कराज खाणीत सापडतो. भारत अफगाणिस्तान आफ्रिका इत्यादी देशांमध्ये सापडतो. तीन ते पाच कॅरेटचे रत्न धारण केले जाते.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–हे रत्न गुरु ग्रहाचे आहे. हे घातल्याने आत्मविश्वास वाढतो. प्रगतीतील अडथळे दूर होतात. तसेच मानसिक शांती पण मिळते. जी व्यक्ती हे धारण करते त्याला चांगले वाईट यातला फरक कळतो. विवाहातील अडथळे दूर होतात व कर्जातून मुक्तता होते. विद्यार्थ्यांनी हे रत्न धारण केले तर शैक्षणिक प्रगती लवकर होते. गुरुवारी सूर्योदयानंतर दूध ,साखर मध,गंगाजल या मिश्रणामध्ये पुखराज च्या अंगठीला ठेवावे व गुरु ग्रहाचा जप 108 वेळा करून उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये घालावा. पुखराज रत्नाला सोन्याच्या अंगठीतच तयार केले जाते. पुखराज घातल्याने अध्यात्मिक प्रगती होते.

६) हिरा —हे एक पारदर्शक रत्न आहे. शुक्र ग्रहासाठी हिरा घातल्या जातो. हिरा हे कार्बनचेच एक शुद्ध रूप आहे. यात एक चतुः पृष्ठ एकमेकांशी जोडलेलं असतं. हिऱ्यामध्ये स्फटिक कार्बन जाळीची  रचना असते. कार्बनचाC-C बंध यात असतो. यात कार्बनचे अणू एकमेकांशी जोडलेले असतात. हिरा अतिशय मौल्यवान असतो तसेच महागही असतो. हौस म्हणूनही स्त्रिया हिऱ्याचे दागिने घालतात. हिरा विजेचा दुर्वाहक आहे. तसेच उष्णतेचा सुवाहक आहे. अतिशय कठीण असा हा पदार्थ आहे. हिरा कापायला हिऱ्याचा उपयोग केला जातो. हिरा हा भूपृष्ठाच्या प्रावरणाखाली 180 किलोमीटर वर सापडतो. अतिशय उच्च तापमान वर तो सापडतो. हिरे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या एका प्रकाराद्वारे भूपृष्ठावर आणले जातात.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–हिरा शुक्र ग्रहाची संबंधित आहे तसेच प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरा धारण केला की आर्थिक प्रगती सुद्धा होते. हिंदू पुराणानुसार हिऱ्याला आठ गुण आणि नऊ दोष आहेत. हिऱ्याचे चेहरे समान असतात. कोन उंच असतात, धार तिक्ष्ण असते, पाण्यात तरंगतो, स्वच्छ आणि तेजस्वी असतो. वजनाने कमी असतो. ज्योतिषांच्या मते, कुंभ मिथुन कन्या वृषभ मकर तुळ या राशी हिरा घालू शकतात. चांगल्या ज्योतिषाकडून माहिती घेऊनच हिरा परिधान केला पाहिजे. हिरा घालण्यापूर्वी पत्रिकेमधील ग्रह बघून साधारणतः शुक्रवारी सूर्योदयानंतर अकरा वाजेपर्यंत अभिषेक करून शुक्राचा मंत्र म्हणून घातला जातो. हिराला सोन्यामध्ये बहुतेक घातले जाते.

७) नीलम —नीलम हे शनी ग्रहाचे रत्न आहे. गडद निळ्या रंगाचे रत्न आहे. इंग्लिश मध्ये या रत्नाला ब्लू सफायर असे म्हणतात.

मकर आणि कुंभ राशीसाठी हे रत्न लाभदायक आहे. नीलम मध्ये विविध प्रकारचे खनिजे आहेत. कोबाल्ट टायटॅनियम लोह शीसे क्रोमियम व्हॅनडियम मॅग्नेशियम असे अनेक प्रकारचे खनिजे या रत्नात आढळतात. या रत्नावर खूप चमक असते. या रत्नाचे मूल्यमापन त्याच्या निळ्या रंगावर केले जाते. नीलम रत्न श्रीलंकेमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. नीलम मध्ये पण वेगवेगळे रंग आढळतात. त्यातील खनिजांच्या जास्त कमी प्रमाणावर रंग आढळतात.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–कुंभ आणि मकर राशीचे लोक  हे रत्न घालू शकतात. हे रत्न घातल्यावर समृद्धी वाढते. अर्थात याकरता ज्योतिष्याची मदत घेऊनच घातले पाहिजे. नीलम हा शनिवारच्या दिवशी घातल्या जातो. या रत्नामुळे चैतन्य वाढते तसेच चयापचय सुद्धा वाढून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. जीवनामध्ये स्थिरता येते.नीलम या रत्नाला पंचधातू किंवा चांदीमध्ये धारण केल्या जाते. या रत्नाला शनिवारच्या दिवशी सकाळी गंगाजलाचा अभिषेक करून शनीचा मंत्र 108 वेळा म्हणून मग मध्यमेमध्ये धारण केले जाते.

८) गोमेद–हे रत्न राहू या ग्रहाचे आहे. वृषभ कन्या तूळ आणि कुंभ या राशीच्या लोकांना हे रत्न लाभी असते. पण त्याकरता ग्रहांची स्थिती बघितली जाते व ज्योतिषाचा सल्ला घेऊनच हे रत्न धारण केले जाते.

गोमेद हे रत्न खाणीमध्ये आढळते. श्रीलंका आणि म्यानमार मध्ये आढळते. गोमेदचा रंग तपकिरी असतो. ते अतिशय मौल्यवान रत्न आहे. त्याचा रंग साधारण  गाईच्या त्वचेसारखा असतो म्हणून त्याला गोमेद असे म्हटले जाते. 24 तास हे रत्न गोमूत्र मध्ये ठेवले आणि गोमूत्राचा रंग बदलला तर हे रत्न खरे आहे, असे समजले जाते.

ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म–राहू हा ग्रह ज्या राशीशी संबंधित आहे तसे फळ देतो. राहूची महादशा ज्या राशीला चालू आहे त्या राशीच्या व्यक्ती घालू शकतात. बाकी पत्रिका ज्योतिषाला दाखवून ग्रहांची स्थिती समजून घेऊनच हे रत्न धारण केले जाते. हे रत्न धारण केले की व्यक्तीची नकारात्मकता कमी होते. एखादी अज्ञात भीती असेल ती दूर होते. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना गोमेद शुभ फळ देऊ शकतो. गोमेद हे रत्न सात ते आठ रतीचे घातले जाते. रत्नाला चांदी किंवा अष्ट धातूच्या अंगठी मध्ये तयार केले जाते. शनिवारी रत्नाला अभिषेक करून राहू चा 108 वेळा मंत्र म्हणून ही अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घातली जाते. किंवा गोमेद या रत्नाला गळ्यामध्ये सुद्धा घातले जाऊ शकते.

९) लसण्या–हे रत्न केतू या ग्रहाचे मानले जाते.

हे रत्न सुद्धा जमिनीमध्ये आढळते. लसण्या सुद्धा मौल्यवान रत्न आहे. हे रत्न अपारदर्शक किंवा अंशतः पारदर्शक असते. किंचित पांढरा व सोनेरी झाक असलेले हे रत्न आहे.

ज्योतिष शास्त्रीय गुणधर्म–केतू ग्रह म्हणजे पूर्व जन्माचे संचित असतं. अध्यात्मिक उन्नती आणि विरक्ती हे दोन्हीही केतूग्रहांशी संबंधित आहे. लसण्या धारण केला की अध्यात्मिक उन्नती होते. उत्तम आरोग्य मिळते. राहूच्या महादशेत लसण्या धारण करावा. अथवा इतर काही ग्रहांसाठी किंवा उपायांसाठी ज्योतिषांशी चर्चा करूनच  हे रत्न धारण करावे. घालण्याआधी हे रत्न रात्रभर गोमूत्रात ठेवावे. मग शुद्ध पक्षातील मंगळवारी ज्या दिवशी अश्विनी  अथवा मघा नक्षत्र असेल त्या दिवशी सकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हे रत्न धारण करावे. धारण करण्यापूर्वी  त्याला अभिषेक करून पूजा करून केतूचा जप करावा व मगच धरण करावे. त्याने योग्य फल मिळते.

नवग्रहांची माहिती, ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म व उपयोग characteristics of gemstones and its astrological uses in marathi हा लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या तसेच आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन लेख व कथा नक्की वाचा व अभिप्राय द्या. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा व आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला पण जॉईन व्हा. धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top