व्हा स्वतःचे बॉस, करून फ्रीलान्सिंग खास!
तुम्हाला देखील स्वतःचा बॉस व्हायचंय का?हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात,फ्रीलान्सिंग सुरू करून तुम्ही सुद्धा स्वतःचे बॉस होवू शकता. आजकाल घरबसल्या ऑनलाइन पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पैसे कमावण्याचा विचार करीत असाल तर फ्रीलान्सिंग हा उत्तम पर्याय असू शकतो. अलीकडे फ्रीलान्स काम पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनले आहे. तुमचा अनुभव, आवड,पात्रता, व कौशल्यानुसार (स्किल) तुम्ही फ्रीलान्सिंग द्वारे महिन्याला चांगली कमाई करू शकता. या लेखात आपण फ्रीलान्सिंग काय आहे आणि ते कसे काम करते? याचा खालील काही मुद्यानुसार आढावा घेऊ.
•फ्रीलान्सिंग काय आहे ?
•फ्रीलान्सिंग कसे कार्य करते ?
•फ्रेशर म्हणून फ्रीलान्सिंगची सुरुवात कशी करावी?
•फ्रीलान्सिंग कोणत्या क्षेत्रात करता येईल?
•फ्रीलान्सिंगचे फायदे आणि तोटे
•सर्वोत्तम फ्रीलान्स वेबसाइट्स
•फ्रीलान्सिंग काय आहे?
फ्रीलान्सिंग हा एक स्वयंरोजगाराचा प्रकार आहे जो इतर व्यवसायांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. यामध्ये व्यक्ती कोणत्याही विशिष्ट संस्थेत (कंपनी) काम न करता त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार अनेक ग्राहकांना सेवा प्रदान करतात. कोणत्याही कार्यालयात न जाता त्यांच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर ते त्यांच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार घरी बसून पैसे कमवू शकतात. अशा फ्रीलान्सिंग द्वारे काम करणाऱ्या व्यक्तीला फ्रीलान्सर म्हणतात. फ्रीलान्सर एकाच वेळी अनेक क्लायंटसह काम करू शकतात.
•फ्रीलान्सिंग कसे कार्य करते?
इंटरनेटमुळे फ्रीलान्सिंगचे स्वरूप विकसित झाले आहे.
डिजिटल युगात फ्रीलान्सर त्यांच्या सेवा ऑनलाईन देतात. यामुळे फ्रीलान्सर आणि त्यांचे क्लायंट या दोघांसाठीही एक चांगली संधी निर्माण झाली आहे. फ्रीलान्सिंग मध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे फ्रीलान्सर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करून संभाव्य ग्राहकाशी संपर्क साधून त्यांच्या सेवेची मानक किंमत ठरवितात.दोन्ही पक्षांच्या परस्पर सहमतीनंतर काम पूर्ण झाल्यावर कामाच्या स्वरूपानुसार आणि कालावधीनुसार पैसे दिले जातात.
•फ्रेशर म्हणून फ्रीलान्सिंगची सुरुवात कशी करावी?
तुमचा फ्रीलान्स प्रवास यशस्वीपणे सुरू करण्यासाठी खालील काही महत्त्वाचे निकष लक्षात घेणे आवश्यक आहे.
1. तुमची कौशल्ये विकसित करा
ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचे आहे ते ओळखून त्या क्षेत्रासंबंधी ज्ञान मिळवून आपली कौशल्ये विकसित करा.
2. एक पोर्टफोलिओ तयार करा
फ्रेशर म्हणून फ्रीलान्सिंग सुरू करण्यासाठी तुमच्या कामाचा प्रभावी पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या मागील कामाची उदाहरणे, तसेच केस स्टडीज किंवा क्लायंटकडून प्राप्त झालेल्या प्रशंसापत्रांचा तुम्ही समावेश करू शकता.
3. ऑनलाइन समुदाय व मंचामध्ये सहभागी व्हा
फ्रीलान्सरना कनेक्ट होण्यासाठी असे अनेक ऑनलाइन समुदाय व मंच आहेत. ज्यामुळे काम शोधण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी किंवा उद्योगातील अनुभवी व्यक्तींकडून शिकण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते.
4. तुमच्या सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करा
तुमचे काम शेअर करण्यासाठी, संभाव्य क्लायंट किंवा व्यवसायांशी कनेक्ट होण्यासाठी आणि तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी Twitter, Linkedin आणि Facebook यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमच्या सेवांचे मार्केटिंग करू शकता. दुसरा मार्ग म्हणजे ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करून तुम्ही तुमच्या सेवांचे मार्केटिंग करू शकता.
5. उद्योग कार्यक्रमाला उपस्थित रहा
संभाव्य ग्राहकांना भेटण्यासाठी आणि उद्योगाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही उद्योग इव्हेंट्स मध्ये उपस्थित राहून इतर फ्रीलान्सर सह नेटवर्क करण्याचा हा चांगला मार्ग असू शकतो.
•फ्रीलान्सिंग कोणत्या क्षेत्रात करता येईल?
फ्रीलान्सिंग अनेक क्षेत्रात करता येते.खालील काही फ्रीलान्सिंग नोकरीच्या लोकप्रिय श्रेणी द्वारे तुम्हाला कामाच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
1] ग्राफिक डिझाईन ( Graphic Design)
2] वेब डिझाईन (Web Design)
3] डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
4] सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ( Software Development)
5] सोशल मीडिया ( Social Media)
6] प्रोजेक्ट मॅनेजमेंट (Project Management)
7] सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
8] व्हिडिओ शूटिंग एडिटिंग ( Video Shooting Editing)
9] अकाउंटिंग (Accounting)
10] आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)
11] कॉपीरायटिंग ( Copywriting)
12] डेटा एन्ट्री (Data Entry)
13] एसइओ (SEO)
14] ॲनिमेशन (Animation)
15] वेबसाईट कंटेट रायटर (Website Content Writer)
•फ्रीलान्सिंगचे फायदे
1} फ्रीलान्सर्स कोणत्याही ठराविक वेळेचे बंधन न पाळता कोठून,कधीही त्यांच्या वेळेत, त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करू शकतात.
२} ठराविक एका कंपनीसाठी काम केल्याने सामान्यतः इतर उद्योग आणि करिअर क्षेत्रातील अनुभव मिळत नाही. फ्रीलान्सिंगमुळे कौशल्ये आणि करिअरची क्षितिजे विस्तृत करण्याची संधी मिळते.
3} फ्रीलान्सर्स विविध नवीन क्लायंट किंवा फक्त काही निवडक दीर्घकालीन करारांसह देखील काम करू शकतात.
4} फ्रीलान्सर्सना अतिरिक्त कामाचा वर्कलोड न घेता कामाचा समतोल साधण्याचे स्वातंत्र्य मिळते.
•फ्रीलान्सिंगचे तोटे
1} फ्रीलान्सर म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करता अशावेळी तुम्हाला कर्मचारी लाभास मुकावे लागते. उदा.
सशुल्क सुट्टी,आरोग्यलाभ, सेवानिवृत्तीचे योगदान आणि यामध्ये बरेच काही समाविष्ट असू शकते.
2} फ्रीलान्स कामात स्थिरतेचा अभाव असतो यामुळे तुमच्या कमाईत चढ उतार जाणवू शकतात.
3} तुमचा व्यवसाय चालू ठेवणाऱ्या सर्व व्यवहार आणि कौशल्य यामध्ये तुम्हाला सर्वोत्तम असावे लागते, जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या समस्यांचे तुम्ही सहज निराकरण करू शकता.
•सर्वोत्तम फ्रीलान्स वेबसाईट्स
1.Fiverr
Fiverr हे वेबसाईट डिझाईन, कंटेंट रायटिंग आणि व्हॉइसओवर सह विविध डिजिटल प्रोजेक्ट मध्ये सेवा शोधणाऱ्या क्लायंटशी फ्रीलान्सर्सना जोडणारे व्यासपीठ आहे. या वेबसाईट मध्ये फ्रीलान्सर आणि क्लायंट दोघांनाही एकमेकांशी नीटपणे संवाद साधता येतो. या वेबसाईट वर तुम्ही विनामूल्य साइन अप करून तुमच्या सेवांची (गिगची) यादी करून सेवा प्रदान करू शकता.
येथे फ्रीलान्सर यांच्या सेवा $5 पासून सुरू करतात म्हणून याला fiverr हे नाव आहे. येथे वेगवेगळ्या सेवांसाठी किंमत बदलू शकते.Fiverr सामान्यतः 20% कमिशन स्वतःकडे ठेवून 80% रक्कम काम पूर्ण झाल्यावर फ्रीलान्सरला देते. पेमेंट प्रक्रियेसाठी येथे काही दिवस लागतात. पेमेंट काढण्यासाठी डेबिटकार्ड, पेपल आणि वायर ट्रान्सफर यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.या वेबसाईट द्वारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग,वेबसाईट डेव्हलपमेंट,डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया इत्यादी कौशल्यानुसार काम करून अर्थार्जन करू शकता.
2.Upwork
Upwork या फ्रीलांसिंग वेबसाईट द्वारे जगभरातील क्लायंट आणि फ्रीलान्सर एकमेकांना जोडले जातात. अपवर्कसह फ्रीलान्सर म्हणून सुरुवात करण्यासाठी तुमचे खाते तयार करून चांगला पोर्टफोलिओ तयार करून तुमच्या कौशल्या नुसार कामाची सुरुवात करू शकता.या वेबसाईटवर प्रोग्रामिंग, ब्रँड मार्केटिंग, वेबसाईट डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट रायटिंग इत्यादी सेवा प्रदान करून उत्तम कमाई करू शकता.
3. Freelancer
Freelancer.com ही आणखी एक फ्रीलान्स वेबसाईट आहे जिथे जगभरातील व्यवसायिक आणि कंपन्या विविध प्रकल्पांसाठी सहयोग करतात. नवशिक्यांना फ्रीलान्सर हा एक चांगला पर्याय असू शकतो. या वेबसाईटवर तुम्ही साइन अप करून तुमची कौशल्य,शैक्षणिक पार्श्वभूमी, आणि कामाचा अनुभव याची तपशीलवार माहिती द्या. येथे एकूण कमाईच्या रकमेवर 10% कमिशन शुल्क आकारले जाते व उर्वरित रक्कम फ्रीलान्सर्सना देण्यात येते.या वेबसाईटवर सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाईनिंग, कंटेंट रायटिंग, एसइओ इत्यादी करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
4. Toptal
Toptal ही एक फ्रीलान्स वेबसाईट आहे जी उच्च पात्र फ्रीलान्स उद्योग तज्ञांना कंपन्यांशी जोडते. Toptal कडे वेब डेव्हलपर आणि वेब डिझायनर्सपासून वित्त सल्लागार आणि उत्पादन व्यवस्थापकांपर्यंत फ्रीलान्सर ची विस्तृत श्रेणी आहे.
फ्रीलान्सर म्हणून Toptal ला अर्ज करण्यासाठी कौशल्य चाचण्या आणि मुलाखतीचा समावेश असलेली त्यांची स्क्रीनिंग प्रक्रिया उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तुमचे कौशल्य, अनुभव आणि मागील कार्य हायलाइट करणारे आकर्षक प्रोफाइल तयार करा आणि फ्रीलान्सिंग करून पैसे कमवा. एक चांगली प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे कार्य तयार करा ज्यामुळे तुम्हाला कामाच्या अधिक संधी उपलब्ध होतील.या वेबसाईटवर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आर्थिक सल्लागार,अंतरिम व्यवस्थापन इत्यादी सेवा प्रदान करून चांगले पैसे मिळवू शकता.
5. SimplyHired
SimplyHired एक जॉब बोर्ड आहे जिथे कंपन्या विनामूल्य नोकरीच्या संधी पोस्ट करू शकतात. ही संपूर्ण इंटरनेटवरून एका पृष्ठावर नोकरीच्या ऑफर देखील एकत्रित करते. फायनान्स आणि मार्केटिंग सह विविध क्षेत्रात फ्रीलान्सच्या विविध संधी आहेत. SimplyHired लेखन, वेब डेव्हलपमेंट मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन, डेटा एन्ट्री, वित्त आणि बऱ्याच काही फ्रीलान्स नोकऱ्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. येथे तुम्हाला तुमच्या कौशल्यांशी जुळणाऱ्या आणि चांगले उत्पन्न मिळणाऱ्या विविध उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
6. 99designs
99designs ही एक फ्रीलान्स वेबसाईट असून फ्रीलान्स डिझायनर्सना भरपूर पर्याय देते. लोगो डिझाईन, बुक कवर, कपडे व व्यापार यासह विविध डिझाईन प्रकल्प येथे उपलब्ध आहेत. तुम्ही डिझायनर असाल तर तुम्ही 99 डिझाईन प्लॅटफॉर्म द्वारे तुमचे करिअर सुरू करून उत्तम कमाई करू शकता.
याव्यतिरिक्त Designcrowd, Flexjobs, Hubstaff, Cloudpeeps, Taskrabbit, Angellist यासारख्या अनेक फ्रीलान्स वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार उत्पन्नाच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
फ्रीलान्सिंग मध्ये स्वतंत्रपणे काम करून योग्य अनुभव व कौशल्य वापरून फ्रीलान्सिंग प्लेटफॉर्मसह फ्रीलान्सर त्यांच्या स्वतःच्या अटींवर परिपूर्ण करिअर घडवू शकतात.
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका – आकांक्षा निरळकर ,मुंबई
Good information
खुप छान माहिती..धन्यवाद👏👏👏
माहिती पूर्ण लेख
अतिशय माहितीपुर्ण लेख
Very nice information!!
Thank you so much.