निराशा म्हणजे काय ? कारणे आणि उपाय   

WhatsApp Group Join Now

नैराश्य – कारणे आणि उपाय             

           आज, विसाव्या शतकात भौतिक समृद्धीने आपण संपन्न झाले आहोत . यालाच  प्रगती समजण्याची चूक करुन आपण या यांत्रिक युगाला शरण जाऊन ,आम्ही किती सुखात आहोत असे सतत स्वतःला पटवून देत असतो.तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आम्हीही यंत्रवत आणि एकलकोंडे झाले आहोत. याचेच दुष्परिणाम म्हणजे. आज भारतात नैराश्य उदासीनता, तणाव यांच्या आवर्तात गरगरणार्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसते आहे. नैराश्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त होणे किंवा सरळ आत्महत्या करणे ….या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. वैद्यकीय संदर्भ पाहता प्रत्येक वर्ष प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी निराश्याने ग्रासलेली असते.

       नैराश्य ही मानवी मनाची एक नैसर्गिक भावना आहे. आनंद ,दुःख, राग, भीती ,चिंता ,कंटाळा, उत्साह याप्रमाणेच.  या भावनांच्या सोबत जगण्याची आपल्या मनाला सवय लागली असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मेंदू अधिक विकसित असल्यामुळे भावनांची अनुभूती त्याला जास्त तीव्रतेने होत असते . मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये मानवी  मेंदूत प्रथम भावना निर्माण झाल्या त्यानंतर विचार निर्माण झाले. त्यामुळे मेंदूतील भावनांचे केंद्र हे चटकन उद्दीपित होते, अनेक व्यक्ती भावनाप्रधान असतात ते यामुळेच असतात.

निराशा म्हणजे नेमके काय ?

 वास्तविक रोजच आपण आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत असतो. दैनंदिन जगण्यामध्ये बरेचदा निराशेचे क्षण आपण अनुभवतो.  परीक्षेत कमी गुण मिळणे,  आजार  होणे आवडती वस्तू हरवणे, मनासारखे वागता न येणे…..या साध्या घटनांनीही माणूस निराश होतो पण ही निराशा तात्पुरती असते आणि ती अगदी सहज मानवी प्रवृती आहे . कमकुवत मनाच्या व निराशावादी व्यक्ती वारंवार निराशेला बळी पडतात. निराशा ही एक भावना  आहे तसेच हे व्याधीचे लक्षण  आहे व नैराश्य ही व्याधी सुद्धा आहे या तीनही प्रकारांमधील फरक आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे.

भावना म्हणजे निराशा जाणवते आणि ती नाहीशी कधी होते हे समजतही नाही.निराशा हे ‘लक्षण’ अनेक आजारांमध्ये दिसून येते.आजार बरा होऊ लागला की निराशाही कमी होते. लक्षण तात्पुरते असते. नैराश्य हा आजार मात्र बऱ्याच कालावधीपासून जडलेला असतो. त्यामुळे साधारणतः सहा आठवड्यांच्या वर जर निराशावस्था कायम राहत असेल तर ती धोक्याची घंटा आहे , हे लक्षात ठेवले पाहिजे.दुसरे महत्त्वाचे  हे की दीर्घकालीन निराशा ज्यावेळी दैनंदिन कामांवर, वागणुकीवर व कार्यशक्तीवर परिणाम करते त्यावेळी नैराश्य हा व्याधी आहे हे पक्के करावे.

नैराश्याची कारणे 

नैराश्य व्याधी  होण्याची कारणे बरीच आहेत .अगदी क्षुल्लक  कारणापासून तर गंभीर कारणामुळे हा विकार होऊ शकतो. 

सर्वसाधारणपणे कारणांची  विभागणी केली जाते.

१  कौटुंबिक – 

    कुटुंबातील सदस्यांच्या एकमेकांच्या   विसंवादी नातेसंबंधामुळे. 

 –   कुटुंबातील वातावरण नेहमी ताणलेले असणे .

 –    घरातील भावा बहिणींची , मित्रांची, शेजाऱ्यांची सतत  तुलना होत असल्यामुळे 

–     पालकांच्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे 

२ व्यक्तिगत – 

   –   जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू .

   –  नोकरी किंवा व्यवसायात झालेली  फसवणूक.

  –    प्रेमभंग , घटस्फोट 

  –   मनाविरुद्ध केलेले करिअर 

  –    असाध्य आजार 

   –     स्वतःबद्दल अवाजवी अपेक्षा  बाळगणे.

  – सतत येणारे अपयश 

३  सामाजिक – 

      कोरोनाची साथ .

   –   एखादी जीवघेणी घटना उदा.अपघात,  भूकंप , पूर, हत्या 

  • बॉम्बस्फोट, जाळपोळ,  बघितल्यामुळे किंवा अनुभवल्यामुळे. 

४ – व्यसनाधीनता

–  अनेकदा मध्यम तसेच तरुण वयातील मुले अंमली पदार्थांकडे आकर्षित होतात .आणि त्याचे व्यसन लागते. ही नशा करण्यास विरोध केला की या व्यक्ती नैराश्यात जातात.

 ५ – आनुवंशिकता

       बरेचदा काही कुटुंबांमध्ये अनेक सदस्यांना नैराश्य हा आजार 

       असतो अशावेळी तो पुढील पिढींमध्ये सुद्धा संक्रमित होऊ 

        शकतो.

   ६ – शारीरिक

         मेंदूमध्ये रासायनिक असमतोल जर  घडला तर  तर काहीही कारण  नसताना नैराश्य येऊ शकते.

      ही अगदी सर्वसाधारण कारणे आहेत. ज्याप्रमाणे व्यक्ति तितक्या प्रवृत्ती  त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या नैराश्यामागे         ठराविक कारण असेलच असे नाही.आज सुबत्ता वाढल्यामुळे तसेच  कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावल्यामुळे,  विभक्त कुटुंब पद्धती, एकच अपत्य, आई-वडिलांची नोकरी या कारणांमुळेच मुलांनी जे मागितले, ते  दिले जाते. त्यांचे अनाठायी लाड  केले  जातात. कोणत्याही गोष्टीला  नाही म्हटले जात नाही. त्यांच्यावर घरातली कोणतीही जबाबदारी  टाकली जात नाही. त्यांना नको  तितके  जीवापाड जपले जाते. अशा मुलांना ज्यावेळी हवे असलेले  मिळत ्नाही. किंवा भरपूर कष्ट करावे  लागले की या परिस्थितीला ते  सामोरे जाऊ  शकत नाही. आणि  त्याना नैराश्य  येते. 

नैराश्य आजाराची लक्षणे

मानसिक  लक्षणे- 

-कोणत्याही कामात उत्साह नसणे. 

-झोपेतून उठल्यावरही सतत थकवा येणे

-सतत चिंता किंवा भीती वाटणे. 

 -दैनंदिन दिनक्रमामध्ये नियमितता नसणे. 

-आनंदाच्या प्रसंगी ही निराशेचा स्तर तसाच राहणे. 

समाजात  मिसळण्याचे टाळणे .

-निरुत्साह 

-कोणत्याही कामात लक्ष न लागणे.

-आत्मविश्वास गमावणे

-संवाद क्षमता कमी होणे.

 शारीरिक लक्षणे 

 – निद्रानाश. 

 – वजन कमी होणे.

 – जेवणावरची वासना उडणे.

-तोंडाला कोरड पडणे. 

-छातीत धडधड करणे. 

        थोडक्यात काय, नकारात्मक विचारांचा जबरदस्त पगडा असल्यामुळे व निराशा, चिंता, उदासीनता यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये निष्क्रियता येते ही निष्क्रियता कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक व व्यक्तिगत  स्तरावरही आढळते.आजाराबद्दल वस्तुस्थिती 

         घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीत फरक पडला हे नातेवाईकांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या बरेचदा लक्षात येते. तरीसुद्धा हा नैराश्य किंवा मानसिक व्याधीचा प्रकार आहे हे आजही समाज आणि रुग्ण स्वीकारत नाही. उलटपक्षी त्या व्यक्तीला सतत वडीलधाऱ्यांकडून रागावले जाते. त्याला हिडीसफिडीस केले जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे नैराश्य अधिकच वाढते.  ‘तुला काहीच जमणार नाही’, ‘तुझ्याकडून काहीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे’, सतत दुसऱ्यांची उदाहरणे देणे, दुसऱ्यांशी तुलना करणे, असे सतत बोलल्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील खालावत जातो. परंतु वैद्यकीय सल्ला घेतल्या जात नाही. आणि मग नैराश्य या आजाराचे निदान फार उशिरा केले जाते किंबहुना हाताबाहेर परिस्थिती गेल्यानंतरच रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी आणले जाते. 

  उपचार

आज नैराश्याची समस्या पूर्ण जगाला सतावते आहे.

  नैराश्य येण्याची कारणे शोधून काढणे व ती दूर करणे हे सगळ्यात मोठे वैश्विक आव्हान मानसोपचार तज्ञांसमोर आहे. यावर वेळीच उपचार केले तर व्यक्तीच्या आयुष्याची गाडी नक्कीच रुळावर येते . उपचारांचा प्राधान्यक्रम ठरविणे हे या आजारात फार महत्त्वाचे आहे .वैद्यकीय सल्ला  – 

मानसोपचार तज्ञ औषधे

-आजाराच्या मूळ कारणाचे निराकरण योग साधना, व्यायामसंतुलित आहार 

– आवश्यक असल्यास समुपदेशनकुटुंबाचे समुपदेशन

-नातेवाईक संबंधित मित्र यांचे सहकार्य छंद जोपासणे.

-यामध्ये समुपदेशन आणि गरजेनुसार औषधे ही फार महत्त्वाची भूमिका वठवितात. औषधांमुळे  मेंदूतील रासायनिक संतुलन साधले जाते.  त्यामुळे व्यक्तिला तीव्र निराश अवस्थेतून बाहेर काढण्यात मदत होते. 

समुपदेशनामध्ये मनामध्ये खोलवर दडलेली निराशा, भीती किंवा शंका यांचे निरसन केले जाते.. समुपदेशनाची अनेक सत्रे व्यक्तीला करावी लागतात, यात बऱ्याचश्या ऍक्टिव्हिटीज त्याला करायला सांगतात, देहबोली बद्दल  सांगितले जाते, चुकीचा दृष्टिकोन बदलला जातो, मनात असलेल्या चुकीच्या समजुती काढून टाकल्या जातात.

 आज भारतात नैराशानी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या फार वाढते आहे .भौतिक गरजा वाढल्यामुळे आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे विशेषत्वाने तरुणांमध्ये हा आजार प्राधान्याने दिसून येतो. आणि आणि या वयात विचार परिपक्वता नसल्यामुळे, भावनांचा उद्रेक झाला की आत्महत्या केली जाते. यामध्ये कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची आहे. रुग्णाला समजून घेणे,  त्याच्यावर अपेक्षांचे ओझे  न लादणे किंवा वाटेल ती आवड पूर्ण करणे हे टाळावे. हल्ली मुले मोबाईलवर गेम खेळतात. त्यामध्ये  वेगवेगळ्या लेव्हल्स पार करत ते पैसे कमवतात. ही गोष्ट पालकांना माहीतही नसते .आणि या मोबाईलच्या नादी लागल्यामुळे बरेचदा पैसे हरले की नैराश्य येते. आणि मुले आत्महत्येला प्रवृत्त होतात.

     नैराश्य हे पूर्णतः बरे होऊ शकते. मनातल्या विचारांना सकारात्मक दिशेने वळवणे, हे इथे महत्त्वाचे आहे. कोणताही  मैदानी खेळ खेळणे ,गाणी ऐकणे, छंद जोपासणे यामुळे नकारात्मक विचार दूर सारले जातात .प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहणे, त्यांचे विचार ऐकणे, त्यांच्याशी संवाद साधणे यामुळे सुद्धा निराशा कमी होण्यास मदत होते 

कुटुंबाची भूमिका

         निराशा या व्याधीचे निदान लवकरात लवकर करणे हे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत निराशेच्या गर्तेत  असलेली व्यक्ति बाहेर काढण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात.  त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांशी  मनमोकळा संवाद करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या वागणुकीत थोडाही बदल झाला तर त्याची नोंद घेणे ,त्या व्यक्तिला  समजून घेणे, सतत न रागवणे हे पथ्य कुटुंबीयांनी पाळले तर नैराश्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसेल.

1 thought on “निराशा म्हणजे काय ? कारणे आणि उपाय   ”

  1. खूप छान लेख आहे. संपूर्ण माहिती लेख वाचून मिळते. आजच्या पिढीने वाचण्यासारखा लेख आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top