ती थोडं धावत पळतच फलाटावर आली . गाडी समोर उभी होती, बरोबर पाच वाजता दिल्लीला जाणारी ‘तेजस ‘ट्रेन सुटणार होती आणि ती करेक्ट पाच मिनिटांपूर्वी फलाटावर पोहचली होती, तिला हुश्श झालं .ती बॅगा सांभाळत आपली बोगी शोधू लागली, ‘B4 ‘तिनं तिकीट काढून कन्फर्म केलं, जवळच तिला तिची बोगी दिसली, फार वेळ चालावं लागलं नाही, ती डब्यात चढली.
तिला तिचा सीट नंबर दिसला, बॅग सीटच्या खाली सरकावून ती खिडकीजवळ बसली, तिने फोन काढला, आईला फोन लावला.
“आई मिळाली गं ट्रेन, खुप ट्रॅफिक होती मला वाटलं चुकते की काय ट्रेन , बाबांना सांग मी पोहचले म्हणून . आले का ते ऑफिस मधून?”
“हो, हो सीट चांगली आहे ”
तिला थोडं टेन्शन आलं, ती पहिलांदाच इतक्या लांब आई वडीलापासून ,मुंबई पासुन दूर चालली होती
UPSC च्या ट्रेनिंग साठी. दोन महिन्याचचं ट्रेनिंग होतं पण तिला ते दोन महिने खुप मोठे वाटत होते.
“हॅलो तुम्ही माझ्या सीट वर बसला आहात ” कोणीतरी तिला उद्देशून बोलत होतं,
तिनं मान वर करून पाहिलं प्रश्नार्थक नजरेने.
“ही सीट माझी आहे 34 नंबरची सीट “तो परत म्हणाला.
“माझी 35 नंबर ची सीट “ती पुटपुटली . थोडी शरमल्यासारखी झाली ती.
“अच्छा मी थोडा वेळ इथे बसू का?
जेवण झाल्यावर रात्री मी वरती जाऊन बसेन, खरे तर ती मधला बर्थ आहे हे पाहून थोडी नाराज झाली होती,वर चढून जायला तिला मुळीच आवडत नसे, ती कोकणात आपल्या गावी जाताना खालच्या बर्थ ची सीट मिळावी म्हणून कटाक्षाने बघत असे.
ती थोडी अवघडून बसली, तिने नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं, तो हॅंडसम होता ,सावळा होता पण फिचर शार्प होते ,धारदार नाक आणि भव्य कपाळावर दाट केसं, चांगली उंची होती.पहील्या नजरेतच तो तिला आवडला, कंपनी चांगली आहे ,तिनं मनाशी म्हटलं आणि स्वतःशीच हसली.
सुरेखा मुंबईत राहतं होती आईबाबा आणि ती, लालबागलाच घर होतं त्याचं, आईबाबांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे अगदी बिनधास्त वाढवलं होतं तिला, ती नाटकात काम करायची, कॉलेजेसच्या अनेक स्पर्धा ,पिकनिक स्वतः पुढाकार घेऊन मॅनेज करायची, थोडक्यात ती लाजरी बुजरी अशी मुलगी नव्हती .
दिसायला सुरेख होती ती. कुरळ्या केसांची, त्वचा झळाळती गोरी तिच्या आई सारखी.
गाडी कधीच निघाली होती. सीटच्या गोंधळामध्ये तिच्या लक्षात आलं नव्हतं, खिडकीच्या काचेतून संध्याकाळचं बाहेरचं दृश्य खुप छान दिसत होतं .सुर्य अस्तास निघाला होता, पश्चिमेकडे अगदी सोनेरी रंगाने आकाश सुंदर दिसत होतं, झाडें झरझर मागे पळत होती, एका विस्तीर्ण नदीच्या पुलावरून जाताना ती नदीच्या पात्राकडे डोळे विस्फारून पाहू लागली, आमच्या कोकणात पण आहेत नद्या पण एवढं मोठं पात्र, हे खुपच मोठं आहे . तिच्या मनास वाटून गेलं, आता संधीप्रकाश दाटत आला होता. तिने गाडीत नजर फिरवली .सगळ्या सीट्स भरल्या होत्या. बाजूच्या सीटवर एक कुटुंब बसलं होतं , नवरा बायको आणि दोन वर्षाचं मुल, त्यांची मस्ती चालली होती, तिनं त्याच्याकडे बघून स्मितहास्य दिलं, तिचा सहप्रवासी मोबाईल मध्ये गर्क होता. तिनेही हातात मोबाईल घेऊन ती व्हिडिओ बघू लागली , आता आठ वाजायला आले होते ,गाडीत खायचं घेऊन फेरीवाले फिरू लागले होते, तिने मोबाईल बाजुला ठेवला, पिशवी उघडून डबा काढला ,आईने तिला आवडणारी बटाट्याची भाजी आणि पोळ्या दिल्या होत्या, तिने सहप्रवाशाकडे पाहिलं “खाणार का?”
तीने विचारलं, तो थोडासा गोंधळला “न ,नाही मी आणलाय टिफिन” तो म्हणाला
तिनं आपला टिफिन खायला सुरुवात केली, तिचं बघुन त्यानेही आपला टिफिन उघडला, त्याच्या टिफिन मध्ये एक ग्रेव्ही ची भाजी आणि पोळ्या दिसत होत्या
“तुम्ही कुठे जाणार आहात ?” तिनं विचारलं
“दिल्ली “तो म्हणाला
“मी ही दिल्लीला चालली आहे UPSC च्या ट्रेनिंग साठी “
तो हसला “अच्छा माझंही एक वर्षाचं ट्रेनिंग आहे दिल्लीला,
मी MBA झालो गेल्या वर्षी , बजाज इन्स्टिटयूट मधून, नोकरीला लागलो आणि कंपनी मधून आता ट्रेनिंग साठी दिल्लीला चाललोय. सहा महिने झाले ट्रेनींग सुरू होऊन, सुटी साठी चार दिवस मुंबईला आलो होतो ” तो म्हणाला
अच्छा, मी सायकोलॉजिचा विषय घेऊन पदवीधर झालेय , रूपारेल मधून एक वर्ष UPSC साठी प्रयत्न केला, नाही जमलं , आता दुसऱ्या प्रयत्नासाठी दिल्लीला ट्रेनिंग घ्यायला चाललेय. “ती म्हणाली.
दोघांचही खाणं होतं आलं होतं.
दोघंही वॉशरूमला जाऊन आले, ती झोपण्यासाठी वरच्या बर्थ वर जाऊ लागली. तर तो म्हणाला “अच्छा, तुम्हाला नसेल आवडत तर मी जातो वरच्या बर्थ वर झोपायला तुम्ही झोपा खाली.”
तिला खुप बरं वाटलं.
आपलं नाव काय तिनं विचारलं
“अविनाश “तो म्हणाला
आणि तुमचं?
“सुरेखा “ती उत्तरली
“अच्छा गुड नाईट “म्हणून तो वरच्या बर्थ वर गेला.
खुप चांगला आहे ती मनाशी म्हणाली.
रात्र संपली.
सकाळी तो खालच्या बर्थ वर आला.
“लागली का झोप “तिनं विचारलं.
“हो पण Ac खुप जास्त होता
तो थोडासा भिडस्त होता.
विचारलेल्याचं प्रश्नांना उत्तरं देत होता.
चहावाले गाडीतून फिरायला लागले होते.
दोघांनी दोन चहा घेतले.
त्याने चहावल्याचे पैसे दिले.
तो म्हणाला “तुमची हरकत नसेल तर मला थोडं काम आहे ,मी माझा लॅपटॉप उघडून काम करू शकतो का?
ती हसून म्हणाली ” हो का नाही “
त्याने आपल्या लॅपटॉप वर काम करण्यास सुरुवात केली.
तिने आईला फोन लावला ” हा आई आज सकाळी मी पोहचेन नऊ वाजेपर्यंत, हो रात्री झोप लागली, तू काळजी करू नकोस सहप्रवासी चांगले आहेत “ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो कामात गर्क होता. दिल्ली जवळ येत होती .लोक बॅगा काढत होते, तिनेही खाली वाकून सीट खालची बॅग काढून घेतली, गाडी थांबली, त्याच्यामुळे इतका लांबचा प्रवास खुप सोपा आणि छान झाला होता तिला तो भेटणार नाही म्हणून हुरहूर वाटत होती, तिने बॅग घेतली, दोघेही खाली उतरली.ती धीर करून त्याला म्हणाली “हा पत्ता बघा ना, मला ह्या मुलींच्या हॉस्टेल मध्ये जायचं आहे “
त्याने पत्ता बघितला तो म्हणाला “
ही जागा मला माहित आहे मी तुम्हाला सोडेन आणि पुढे जाईन “
ती निर्धास्त झाली
ते स्टेशनच्या बाहेर आले, रिक्षा केली पंधरा मिनिटात तिचं होस्टेल आलं ,उतरताना ती म्हणाली, मला तुमचा नंबर दया ना, काही गरज लागली तर तुम्हाला मी फोन करेन, तशा दिल्ली बद्दल मी काही वाईट बातम्या ऐकल्या आहेत “
त्याने तिला त्याचा मोबाईल नंबर दिला, ती थोडीशी घुटमळली, मग म्हणाली माझा नंबर नकोय का तुम्हाला “
“हो ,हो दया ना “तो हसून थोडा ओशाळल्यासारखं बोलला.
तिनं त्याला तिचा नंबर दिला
“बाय “म्हणत ती होस्टेलच्या आवरात शिरली.
आवार प्रशस्त होतं, इमारत ही मोठी होती, ती स्वागत कक्षात गेली तिने होस्टेल चं भाडं भरलेली पावती दाखवली आणि तिच्या खोली बद्दल विचारलं एक फॉर्म भरून ती दुसऱ्या माळ्यावर आपल्या खोलीत आली, खोलीही हवेशीर होती, तिथे दोन मुली होत्या साधारण तिच्याच वयाच्या चौवीस ,पंचवीस वर्षांच्या तिला पाहून एक मुलगी पुढे आली “हाय वेलकम मी रीमा ,तुझी रूममेट आणि ही हेमांशी दुसरी रूममेट तिला बरं वाटलं स्वागत तर चांगलं झालं होतं, तिथे तीन बेड होते आणि तीन कपाटं तिनं दोघींशी हात मिळवला आणि ती आपल्या बेड वर बसली आपलं सामान ठेवलं आणि बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली, पुढचे दोन दिवस ती खुप कामात गुंतून गेली पुस्तकं लावली आणि ट्रेनींग चे तास सुरू झाले, मेसचं जेवण आवडत नव्हतं पण तिला अभ्यासात लक्ष द्यायचं होतं त्यामुळे तिनं बाऊ केला नाही, शनिवारी सुटीच्या दिवशी तिनं सगळं आवरलं सतत चार तास अभ्यास करून संध्याकाळी ती थोडी मोकळी झाली, तिला क्लास रूम मधलं वातावरण आणि प्रोफेसर आवडले होते.
तिला अविनाशची आठवण झाली तिला काही कपडे आणि बिस्कीट्स घ्यायची होती. का जाणे पण तिला अविनाशला फोन करावासा वाटला आणि तिनं नंबर शोधला.
तिच्या हृदयाची धडधड वाढली होती, एका मिनटातच फोन उचलला गेला “हॅलो मी सुरेखा बोलते
“हाय !बोला कशा आहात” त्याचं कशा आहात हे ऐकून तिला उगीचच आपण खुप मोठे आहोत असं वाटलं भेटला की सांगायला पाहिजे सुरेखा म्हणून हाक मार म्हणून.
“हा हा मी बरी आहे , माझ्याबरोबर खरेदीला याल का? “मला थोडे कपडे घ्यायचे आहेत ती पटकन बोलली
“हा का नाही ? येईन ना किती वाजता जायचं?”
तिला गोड आश्चर्याचा धक्काचं बसला. तिनं लागलीच दहा मिनिटात निघायचं म्हणून सांगून, ती तयारीला गेली, दहा मिनिटात ते दोघेही भेटले. यावेळी तिला तो खुपच हँडसम वाटला .त्याने जांभळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. संपुर्ण खरेदीवर तो जुजबीच बोलत होता . पण सामान घ्यायला तिला मदत करायला आपणहुन पुढे येत होता. दोघांनी रस्त्यावरचं चटकदार खाणं एकत्र खाल्लं आणि ती रूम वर परतली, पुढच्या आठवड्यात ती परत आपल्या अभ्यासात गुंतून गेली, पण तिला अविनाशची सारखी आठवण येत होती आठवडाभर तिनं संयम ठेवुन पुन्हा तिनं अविनाशला फोन केला, कामाचं निमित्त काढून ती त्याला पुन्हा भेटली प्रत्येक भेटीनंतर तो तिला अधिकाधिक आवडत होता,
तिसऱ्या आठवड्यातही तिने अविनाशला फोन केला ती, तयार होऊन त्याला भेटायला गेली तर त्याच्याबरोबर एक मुलगीही होती, तो सुरेखाला म्हणाला “माझ्या खास मैत्रिणीला भेट, आम्ही एकाच कॉलेज मध्ये होतो आणि आता एकत्रच काम करतोय लवकरच आम्ही लग्न करणार आहोत .”सुरेखाच्या मनात इतके दिवस भिरभिरणाऱ्या असंख्य फुलपाखरांच्या पंखावरचे रंग जणु एकाच वेळी हवेतुन उडत चालले असं वाटत होते.
त्याने तिला म्हटलं
“असुरक्षिततेतून वाटणारी ओढ ही खरी नसते.
अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.
You will get your solmate “
कशी बशी ‘बाय ‘म्हणून ती रूम वर परतली तेव्हा ती खुप उदास आणि खिन्न झाली होती .तो म्हणाला तसं ही असुरक्षितेतून वाटणारी ओढ नव्हती .तिला तो खरंच आवडत होता .त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा प्रगल्भ ,जबाबदार आणि भिडस्त स्वभाव तिला आवडला होता . त्याने माझा अपमान केला का ? की मला वेळीच वाहवत जाण्यापासून सावरले ? तिच्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठले होते. मुंबईत तिचे खुप मित्र होते पण कधीही तिच्या हृदयाची तार छेडली गेली नव्हती आणि आता जो आपला व्हावा असं तिला वाटत होतं तो कुणा दुसरीचा होता .स्वतः बद्दल अपमान आणि निराशा सगळंच तिच्या मनात दाटून आलं होतं.
लेखिका – वीणा चव्हाण
छान कथा, छान मांडणी.
आजकालच्या मोकळ्वाया तावरणात असे प्रसंग घडत असतात…कथा आवडली..