केस गळती ची समस्या जाणवते आहे? आपल्या आहारात करा या पाच पदार्थांचे सेवन ….
केस गळण्याची समस्या कमी अधिक प्रमाणात बहुतेकांना जाणवते. दिवसाला 50 ते 100 केस गळणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण अगदी पुंजके च्या पुंजके प्रत्येक वेळी जात असतील, तर मात्र या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
यासाठी अनेक बाह्य उपाय केले जातात, जसं की महागडे शाम्पू, तेलं, मसाज, स्पा इत्यादी. पण फारसा फरक जाणवत नाही. कारण या बाह्य उपायांपेक्षा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो पोषण मूल्यांचा. पुरेशी झोप, सकस आहार, व्यायाम व ताण-तणावांचे योग्य नियोजन यामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच केसांच्या समस्या मुळातूनच दूर व्हायला मदत होते.
तुमचे केस किती गळतात? ते कसे दिसतात? यावरून तुम्ही किती निरोगी आहात हे समजते.
पोषण मूल्यांचा अभाव, हार्मोनल असंतुलन, हिमोग्लोबिनची कमतरता, अति ताण, अपुरी झोप व बिघडलेली पचनसंस्था यासारख्या कारणांबरोबरच काही जणांमध्ये धूम्रपान, अति मद्यसेवन अशी अनेक कारणे, केसांचे व शरीराचे आरोग्य बिघडवत असतात.
चांगल्या व योग्य आहाराने यात सुधारणा होऊ शकते हे जरी खरं असलं तरी आपल्या राहणीमानाच्या सर्व बाबींवर सुधारणा केली तर खूप चांगले परिणाम दिसून येतात.
*पोषण मूल्यांचा अभाव कसा परिणाम करतो ?
सर्वांगीण स्वास्थ्यासाठी, जीवन पद्धतीत सुधारणा करण्यावर भर दिला जातो. यात आपण आहारात काय पोषणमूल्यं असावित हे ठरवू व अमलात आणू शकतो.
तर आधी हे पाहू की कोणती पोषणमूल्ये केसांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाची आहेत. मुख्यत्वे करून विटामिन B7, A ,D, C, E आणि मिनरल्स, जसं की झिंक, लोह, फॉलिक ऍसिड, सेलेनियम आणि बोरॉन. यातला प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो व एखादा जरी कमी अधिक झाला तरी केसांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे डायट करण्यापूर्वी आपल्याला योग्य व पुरेशी पोषणमूल्य मिळत आहेत याची खात्री करून घ्यावी.
आता आपण पाहूया, पाच असे पदार्थ ज्यांच्या सेवनाने केस गळती कमी होईल.
१) कढीपत्ता
कढीपत्त्याच्या पानांमधील पोषणमूल्यं बघितली की जाणवेल भारतीय स्वयंपाकात कढीपत्ता इतका का वापरला जातो? कडीपत्त्याच्या पानांमध्ये बीटा कॅरेटोन, प्रोटीन, लोह, कॅल्शियम, विटामिन सी, फॉस्फरस इत्यादी असते जे केस गळती आणि अकाली केस पिकणे थांबवते.
कढीपत्त्याच्या पानांचा वापर कसा करावा?
- भाज्या, आमटी, रस्सा, चटण्या, ताक यात कढिपत्त्याचा वापर.
- भाज्यांचा ज्यूस बनवताना किंवा नुसतं चावूनही खाणे.
- अनेक आयुर्वेदिक केस तेलांमध्ये याचा वापर होतो.
२) बीटरूट बीटरूट मध्ये विटामिन B6, C, फायबर, B9,मॅंगेनीज, पोटॅशियम,लोह, कॅरेटोनॉईड्स असतात. त्यात असणाऱ्या नायट्रिक ऍसिड मुळे रक्ताभिसरण सुधारते. बीटमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे केस गळतीत मदत करतात. बीट कुठल्या पद्धतीत घ्यावे.
- बीटचा ज्यूस, स्मूदी घेऊ शकता.
- सूप किंवा सलाड रूपात.
- खिचडी, भाजी स्वरूपात
३) प्रथिने युक्त आहार
- डाळींमध्ये प्रोटीन्स असतात. डाळ तांदूळ खिचडी, वरण इ.
- कडधान्ये, उसळी, राजमा राईस.
- सुकामेवा, नट्स, बिया, अंड्याचे पांढरे चिकन, मासे यात भरपूर प्रमाणात B7 ही मिळते.
- हमस मध्ये विटामिन B, प्रोटीन, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, लोह, A, D, E,C अशी अनेक पोषक मूल्यं असतात.
- प्रोटीन पावडर, सत्तू
४) लोहयुक्त खाद्यपदार्थ
हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोहयुक्त खाद्यपदार्थ जसे की खजूर, नट्स, बिया, हिरव्या पालेभाज्या, लिंबू इत्यादींचा आहारात समावेश करावा.
- पदार्थांचे गुणधर्म ओळखून त्यांचे सेवन करणे योग्य ठरते. जसे की हिरव्या भाज्यांवर लिंबू पिळणे.
- लोहयुक्त पदार्थांच्या सेवनानंतर चहा कॉफी घेतल्याने पदार्थांचे गुणधर्म शरीरात शोषले जात नाहीत. त्यामुळे खाल्ल्यावर कमीत कमी एक तासानंतरच चहा किंवा कॉफी घ्यावे.
५) कांदा
कांद्यात कॅटलिस् असते. यामुळे केस गळती आणि अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करता येतो. केसांना नैसर्गिक रंग देणाऱ्या मेलानिन चा मुख्य घटक असणारा सल्फर कांद्यात भरपूर प्रमाणात असतो.
- जेवणात कच्चा कांदा खाणं हे भारतीय परंपरेत आहेच.
- सॅलड, भाज्या, रस्सा यात कांद्याचा वापर करावा.
- कांद्याचा रस प्या किंवा केसांच्या खालील त्वचेवर कांद्याचा रस चोळावा.
थोडक्यात महत्त्वाचे वरील खाद्यपदार्थ तुमच्या केस गळतीच्या समस्येवर उपयोगी होतीलच, पण तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनशैली व आहारावर लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे. पुरेशी झोप, व्यायाम, तणावाचे नियोजन व योग्य आहार यांनी तुम्ही केस गळतीच्या समस्येतून सुटका मिळवू शकता.
सौ वैशाली मांगुरकर
उपयुक्त माहीती