त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग: त्र्यंबकेश्वर, नाशिक
भगवान शंकरांची बारा जागृत स्थाने भारतात विविध ठिकाणी आहेत. ही ठिकाणे ‘बारा ज्योतिर्लिंगे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ही ठिकाणे म्हणजे शिवभक्तांची तीर्थक्षेत्रेच आहेत.
ज्योतिर्लिंग हा शब्द ‘ज्योती’ आणि ‘लिंग’ असा दोन शब्दांपासून बनला आहे. याचा अर्थ होतो ‘भगवान शंकरांचे ज्योतिर्मय, तेजस्वी, प्रकाशरूप प्रतिक.’
श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लाखो शिवभक्त आपल्या आराध्याचे दर्शन घेण्यासाठी या सर्व ठिकाणी मोठी गर्दी करतात.
या बारा ज्योतिर्लिंगांपैकी चार स्थाने महाराष्ट्रात आहेत. ती अशी:
१ | श्री वैजनाथ | परळी, महाराष्ट्र |
२ | श्री भीमाशंकर | भीमाशंकर, महाराष्ट्र |
३ | श्री त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र |
४ | श्री घृष्णेश्वर | वेरुळ, महाराष्ट्र |
आज या लेखातून आपण श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
त्र्यंबकेश्वर मंदिराचे स्थान:
हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असून नाशिक शहरापासून २८ किमी आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशन पासून ४० किमी अंतरावर आहे. सह्याद्रीमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी ते वसलेले आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. ही नदी लांबीला भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. स्कंद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, ब्रह्म पुराण, यामध्ये त्र्यंबक क्षेत्राचा महिमा वर्णन केला आहे.
पौराणिक कथा:
असे म्हणतात की प्राचीन काळी या पर्वतावर ब्रह्मदेवांनी तप केले. म्हणून या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी असे पडले. ही भूमी गौतम ऋषींची तपोभूमी होती. न्यायदर्शन या दर्शनाची निर्मिती या ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर केली असे मानले जाते.
या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागील कथा अत्यंत अद्भुत आहे.
महर्षी गौतम येथे आपली पत्नी अहिल्या हिच्यासह राहत असताना एकदा सलग चोवीस वर्षे दुष्काळ पडला. लोकांची उपासमार होऊ लागली. पण गौतम ऋषींनी वरुण देवाला प्रसन्न करुन घेतले असल्याने त्यांच्या आश्रमात रोज पाऊस पडत असे. तेथे भात पिकवून ते अनेकांना जेवू घालत. त्यामुळे त्यांच्या तपोवनात अनेक ऋषी राहावयास आले. एकदा त्यांच्या तपोवनात राहणाऱ्या ऋषींच्या पत्नींचा अहिल्येबरोबर काही विवाद झाला. त्या अहिल्येवर नाराज झाल्या. त्यांनी आपापल्या पतींकडे गौतम ऋषींना तपोवनातून दूर करण्याचा हट्ट धरला. त्यावर त्या ऋषींनी भगवान गणेशाची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. भगवान गणेशांकडे त्यांनी गौतम ऋषींना या आश्रमापासून दूर करण्याचा वर मागितला. भगवान गणेशांनी ऋषींना असा वर मागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांचा निरुपाय झाला.
त्यानंतर भगवान गणेश एका दुर्बल गाईचे रुप घेऊन गौतम ऋषींच्या शेतातील पीक खाऊ लागले. जेव्हा गौतम ऋषींनी हातात दर्भ घेऊन त्या गाईला शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती गाय मृत्यू*मुखी पडली. सर्व जण ऋषी गौतमांची निर्भत्सना करू लागले. गौतम ऋषी आश्चर्यचकित आणि दुःखी झाले. आश्रमातील सर्व ऋषींनी त्यांना आश्रम सोडून जाण्यास सांगितले. त्यांना वेद-पाठ तसेच यज्ञयागादी कर्मे करण्यास मज्जाव केला. गौतम ऋषींनी अत्यंत विनम्रतेने त्या ऋषींकडे गोहत्येच्या पापाचे परिमार्जन कशाने होईल याबद्दल विचारणा केली.
ऋषींनी त्यांना ब्रह्मगिरीस १०१ प्रदक्षिणा करून शिव शंकरांची उपासना करण्यास व गंगास्नान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते आपली पत्नी अहिल्येसह भगवान शंकरांची आराधना करू लागले. अनेक वर्षे कठोर तप केल्यावर भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी गौतमांसमोर प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला. गौतम ऋषींनी गंगास्नान करुन गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गंगा नदी महादेवांच्या जटेतून बाहेर येऊ इच्छित नव्हती. म्हणून भगवान शंकरांनी क्रोधित होऊन तेथे तांडव नृत्य केले आणि आपली जटा जमिनीवर आपटली. त्या जटेतून गंगेचा एक प्रवाह मुक्त झाला. त्यात स्नान करून गौतम ऋषी गोहत्येच्या पापापासून मुक्त झाले. त्यानंतर गौतम ऋषींनी भगवान शिवांना तेथे नित्य निवास करण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेमुळे महादेव तेथे त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग या नावाने स्थित झाले.
गौतम ऋषींनी आणलेली गंगा तेथे गोदावरी नावाने प्रवाहित झाली. (गौतम ऋषींच्या गाईला जीवनदान देणारी म्हणून तिचे नाव ‘गो-दा: गोदावरी असे पडले)
(दुसऱ्या एका कथेनुसार इंद्रदेवांनी गौतम ऋषींचे वाढते पुण्य पाहून त्याने आपल्या आसनास धोका आहे असे वाटल्याने श्री गणेशास गाईचे रुप घेऊन गौतम ऋषींच्या शेतात पाठवले.)
भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतीर्ण होण्याच्या आधी गोदावरी पृथ्वीवर प्रवाहित झाली. म्हणून तिला वृद्ध गंगा तसेच दक्षिणची गंगा म्हणतात.
पुराणातील भाकडकथा म्हणून या कथेला सोडून देता येणार नाही. कारण गौतम ऋषींनी विकसित केलेले दुष्काळातही भात पिकवण्याचे तंत्रज्ञान, वाहून जाणारे पाणी अडवण्याचे ज्ञान आणि गोदावरीला प्रवाहित करण्यासाठीचे त्यांचे अथक परिश्रम यातून अधोरेखित होतात. एवढेच नव्हे तर पिकवलेले धान्य उपाशी लोकांसाठी निस्वार्थ बुद्धीने देण्याने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. मत्सरबुद्धीने त्यांच्यावर गोहत्येचे खोटे आरोप लावणाऱ्यांना क्षमा करण्याची क्षमशीलता त्यांच्या ठायी होती.
त्र्यंबकेश्वरचा अर्थ काय आहे?
येथे शिवपिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे लिंगाच्या शीर्षामधे अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. त्यात सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही तीन लिंगे “ब्रह्म-विष्णू-महेश” या तीन देवतांची म्हणजेच “विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची” प्रतीके आहेत. म्हणूनच अशा त्रिमूर्तीस्वरुप, त्रिनेत्र महादेवांना येथे ‘त्र्यंबकेश्वर’ म्हटले जाते.शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सतत वाहत असतो. ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी, अहिल्या आणि वैतरणा अशा तीन नद्या उगम पावतात. पेशवे काळापासून येथे ‘त्रिकाळ पूजा’ केली जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती:
शिलाहार राजा झंझ याने दहाव्या शतकात गोदावरी ते भीमा या नद्यांच्या दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवालये बांधली. त्र्यंबकेश्वरचे शिवमंदिर त्यापैकी एक आहे.
१६९० मधे औरंगजेबाने या मंदिराचे मोठे नुकसान केले. त्यानंतर, श्रीमंत बाळाजी बाजीराव (तिसरे) यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान हेमाडपंथी स्थापत्यशैलीत हे मंदिर परत बांधले. १६ फेब्रुवारी १७५६ रोजी महाशिवरात्रीचा शुभदिनी सनई चौघड्याच्या नादात आणि भेरी, तुतारी व रणशिंगाच्या गजरात उद्घाटन सोहळा पार पडला. उत्कृष्ट स्थापत्यशैली आणि शिल्पकलेचा नमुना असलेल्या या भव्य मंदिराची निर्मिती आणि पूर्णत्व याचा संस्कृत भाषेतील शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारी आहे. काळ्या दगडांनी बनलेल्या या मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. हे मंदीर बांधण्यासाठी सोळा लाख रूपये खर्च आला असा त्यात उल्लेख आहे. मंदिराला चारही बाजूस प्रवेशद्वारे असून उत्तरेकडील प्रवेशद्वार सर्वात मोठे आहे. मंदिराच्या कळसावर अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केलेले पाच सुवर्णकलश आहेत, तसेच पंचधातूंची ध्वजा आहे.
त्र्यंबकेश्वर महाराज पालखी:
त्र्यंबकेश्वर महाराज हे या गावचे राजे आहेत असे मानले जाते. दर सोमवारी हा त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच कुशावर्तात स्नान करण्यासाठी बाहेर पडतो. त्यावेळी, शिंदे सरकारांनी अर्पण केलेला त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसून वाजत गाजत गावात फिरवला जातो व त्यानंतर त्याला कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान घातले जाते. त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणून पिंडीवर विराजमान करतात व त्याला पाचू-हिरे जडित सोन्याचा मुकुट घातला जातो. हा मुकुट पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. (हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. भाऊसाहेब पेशवे यांनी तो मुघलांकडून मिळवला आणि श्रीं च्या चरणी अर्पण केला असे म्हणतात.) कार्तिक पौर्णिमेला त्र्यंबकेश्वर महाराजांची रथातून मिरवणूक निघते. हा रथ सरदार विंचुरकरांनी १८६५ साली श्रींच्या चरणी अर्पण केला आहे. महाशिवरात्रीस श्री त्र्यंबकेश्वर महाराजांची पालखी संपूर्ण नगरातून मिरविली जाते. विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनासाठी पालखी नगराबाहेर नेली जाते. महाशिवरात्रीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले असते.
मंदिराचा परिसर:
मंदिराच्या प्रांगणात काळ्या पाषाणापासून बनवलेला देखणा नंदी आहे.
मंदिराच्या आवारात असलेल्या अमृतकुंडाचे पाणी श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेकासाठी वापरले जाते. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत, तसेच अनेक संतांच्या समाधी आहेत.
त्र्यंबकेश्वर परिसरात गंगा- गोदावरी, गायत्री देवी, जलेश्वर, रामेश्वर, गौतमेश्वर, केदारेश्वर, राम, कृष्ण, परशुराम, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि लक्ष्मी-नारायण अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्याचप्रमाणे रामकृष्ण तीर्थ, कांचन तीर्थ, बिल्वतीर्थ, वराह तीर्थ, कनगळ तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र तीर्थ आणि सर्वात महत्वाचे समजले जाणारे कुशावर्त तीर्थ आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराज (संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि सद्गुरू) यांची समाधी त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. येथे वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा आणि प्रवचन संस्था आहेत.
कुशावर्त तीर्थ:
मंदिराच्या बाजूला कुशावर्त तीर्थ आहे. त्याची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. शंकरांच्या जटेतून मुक्त झालेली गंगा तेथे राहू इच्छित नव्हती. ती ब्रह्मगिरी पर्वतावरुन वारंवार नाहीशी होत असे. तिला थांबविण्यासाठी गौतम ऋषींनी तिची प्रार्थना केली व कुशाची (गवताची) मदत घेऊन गोदावरीला बांधले. तेव्हापासून हा तलाव कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि गोदावरी नदी ‘गौतमी-गंगा’ म्हणून प्रसिद्ध झाली. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी लुप्त होऊन ह्या तलावात प्रकट होते. या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असते. ह्या ठिकाणी १२ वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो. कुंभ स्नानाच्या वेळी शैव आखाडे याच कुंडात शाही स्नान करतात. होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार केला.
ब्रह्मगिरी पर्वत:
शिवभक्तांच्या लेखी ब्रम्हगिरीचा डोंगर म्हणजे साक्षात शिवाचे रूपच. येथून गोदावरी, अहिल्या आणि वैतरणा अशा तीन नद्या उगम पावतात. या डोंगरावर असलेली पाच शिखरे म्हणजे भगवान महादेवांची पाच रूपे(वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि व्योमजटा)आहेत असे मानले जाते. म्हणून ब्रह्मगिरीला पंचलिंगी असे म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वतावरच गौतम ऋषींनी तपश्चर्या करुन भगवान शंकरांना प्रसन्न करुन घेतले. जेथे भगवान शंकरांनी जटा आपटली आणि गोदावरी प्रवाहित केली तेथे जटा मंदिर आहे.
गंगा नदी प्रथम जेथे प्रकट झाली ते मूळगंगा स्थानही ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. येथे दोन औदुंबर वृक्षाच्या मुळातून ती प्रकट होते.
गौतम ऋषींनी जिथे तपश्चर्या केली तिथे मुख्य ब्रह्मगिरी मंदिर आहे. मूळगंगेच्या ठिकाणी प्रगट झालेली गंगा तेथून गुप्त होत पुढे या ब्रह्मगिरी मंदिरात गोमुखातून प्रगटते. तेथील कुंडात गौतम ऋषींनी स्नान केले व ते शापमुक्त झाले. येथे श्री गोदावरी देवीचेही मंदिर व गंगाद्वार आहे.
काही दानशूर भाविकांनी ब्रह्मगिरीवर दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (फेरी):
अनेक भाविक ब्रह्मगिरी पर्वताला श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा घालतात. त्याला ‘फेरी’ असे म्हणतात. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पुराण काळापासून प्रचलीत आहे. याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराजांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.
दृष्टी पडता ब्रह्मगिरी | त्यासी नाही यमपुरी ||
नामा म्हणे प्रदक्षिणा| त्याच्या पुण्या नाही गणना||
या फेरीचे असे वर्णन संत नामदेवांनी आपल्या अभंगात केले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून कुशावर्त स्नान करुन या प्रदक्षिणेस सुरुवात होते आणि फेरीनंतर परत स्नान केले जाते.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे तीन मार्ग आहेत.
१) ब्रह्मगिरी प्रदक्षिणा: साधारण २० ते २१ किमी.
२) हरिहर-ब्रह्मगिरी प्रदक्षिणा: ३५ ते ३८ किमी.
३) अंजनेरी-ब्रह्मगिरी प्रदक्षिणा : ६० किमी.
यापैकी पहिली प्रदक्षिणा सोपी आणि जास्त लोकप्रिय आहे. अनेक भाविक ही प्रदक्षिणा अनवाणी करतात. या मार्गांवर प्रयाग तीर्थ, श्रीराम लक्ष्मण तीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, सरस्वती तीर्थ, नाग तीर्थ, धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आदी तीर्थे आहेत. परंतु यापैकी काही तीर्थे सध्या बुजली आहेत.
प्रदक्षिणा मार्गावर गौतम ऋषींचा आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर आहे. त्यात गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्या मूर्ती आहेत.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा करण्याची येथे परंपरा आहे. परंतु आता श्रावणातील सर्व सोमवारी प्रदक्षिणा घातली जाते.
त्र्यंबकेश्वर तीर्थाचा महिमा:
आदी शंकरचार्यांनी आपल्या द्वादश ज्योतिर्लिंग या स्तोत्रात त्र्यंबकेश्वरचे वर्णन केले आहे.
“सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे |
यद्धर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ||”
अर्थ: पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर नित्य निवास करणाऱ्या त्रिमूर्तीरुप श्री त्र्यंबकेश्वरचे मी अनन्य भावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात.
वैदिक साहित्यातील महामृत्युंजय मंत्रातूनही त्र्यंबकेश्वराची स्तुती केली आहे.
त्र्यंबकेश्वरमधे श्रद्धापूजा, पितरांना तर्पण व अन्नदान केले जाते. या व्यतिरिक्त नारायण नागबळी पूजा, त्रिपिंडी, कुंभविवाह, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप अनुष्ठान याही पूजा केल्या जातात. येथे गोदावरी दक्षिण दिशेला वाहत असल्याने येथे केलेल्या श्रद्धादी क्रियांचे विशेष फळ मिळते असे म्हणतात.
अशा या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आणि कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविकांची बाराही महिने गर्दी असते. परंतु श्रावण महिन्यातील सोमवारी इथे लक्षावधी भाविक येतात.
तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाविषयीची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका –क्षितिजा कापरे
Khupch chan information aahe
आज श्रावण महिन्यातील सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची माहिती, महिमा वाचायला मिळाला. सर्वस्पर्शी आहे लेख… खूप छान लिहिलंय
खूप छान आणि सखोल माहितीपूर्ण लेख…