४. श्री चन्द्रघंटा देवी :
“ या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण
संस्थिता नमस्तस्यै नसस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: “
मंडळी घटस्थापना होऊन दोन दिवस झाले.सगळीकडे आई जगदंबेचा जागर सुरुआहे. वेगवेगळ्या रंगाची,वेगवेगळी सुगंधित फुले,हार,तोरण,…याने वातावरण उल्ल्हासित झाले आहे.अश्विन महिन्यातला हा भक्ती – शक्ती,उपासनेचा उत्सव.
नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. नवरात्री मध्ये तिसरी माळ देवी चंद्रघंटा हिच्या नावाने बांधतात.
: देवीचे स्वरूप :
देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे.तिचा महिमा अनन्य साधारण आहे. सिंहारुढ असलेली देवी
दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आहे. देवी चंद्रघंटा
हे दुर्गा मातेचे शक्ति स्वरूप आहे.
दशभुजा असलेल्या या देवीच्या हातात विविध शस्त्रासह,जपमाळ,कमळ असून उजव्या बाजूचा एक हात हा अभय मुद्रेत आहे. मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्ध चंद्र असल्यामुळे हिला चंद्रघंटा देवी म्हणतात. ही देवी युद्धासाठी सदैव सज्ज आहे. तिचे वाहन सिंह असल्याने या देवीचे उपासक पराक्रमी व निर्भय होतात. देवीची मुद्रा जरी उग्र स्वरूपाची असली तरी ती केवळ दुष्ट, असुर, विध्वंसक शक्तीच्या नाशासाठी आहे. भक्तांसाठी ती शंतिदायक आणि कल्याणकारी आहे.तिची कांती तेजस्वी आहे. चंद्रघंटा देवी ही न्याय व अनुशासन प्रिय आहे.
: देवीची अख्यायिका :
प्रचलित पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासुर खूप शक्तिशाली झाला होता. तो आपल्या असूरी शक्तीचा वापर करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पहात होता.स्वर्गातील देवता भयभीत झाल्या होत्या.खुद्द इंद्र राजाही चिंतातुर झाला होता. त्यांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांना मदतीसाठी बोलावले.देवतांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मा,विष्णू व महेश क्रोधित झाले.त्यांच्या तोंडातून ऊर्जा बाहेर पडली.त्या उर्जेतून एक देवी अवतली. ती देवी म्हणजेच चंद्र घंटा. भगवान शंकराने तिला आपला त्रिशुळ दिला,भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले,देवराज इंद्राने देवीला घंटा दिली. तसेच आपला वज्र व ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला. इतर देवतांनी आपली शस्त्र – अस्त्र दिली. चंद्रघंटा व महिषासुर यांच्यात भयंकर युद्ध झाले.देवीने महिषासुराचा वध करून त्रिलोकीचे रक्षण केले. देवांना अभयदान देऊन ती आंतर्धान पावली. तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली.
शिवपुराणानुसार , चंद्रघंटा ही चंद्रशेखराच्या रूपातील भगवान शिवाची “ शक्ती” आहे.शिवाचे प्रत्येक पैलू शक्तिसह आहे म्हणून अर्ध नारिश्र्वर आहे.
: पूजाविधी :
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा समर्जन करावे. श्री गणेश, श्री लक्ष्मी, विजया,कार्तिकेय,देवी सरस्वती तसेच योगिनी जया यांची पूजा केल्यानंतर “ ओम देवी चंद्र घंटा ए नमः “ या मंत्राचा जप करून चंद्रघंटा देवीची विधिवत पूजा करतात. देवीला पिवळ्या रंगाची फुले, शंख पुष्पी, पांढरे कमळ अर्पण करतात. दूध, मध, दुधापासून बनवलेली मिठाई, खीर यांचा नैवेद्य दाखविला जातो. सप्तशतीचे पाठ केले जातात.
या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते.अध्यात्मिक व आत्मिक शक्ती प्राप्त होते.आत्मविश्वास वाढवण्यासाठी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.
या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यावसायिक आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा आहे. चंद्रघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप व संकट दूर केले जाते. तिच्या घंटेच्या आवाजाने भक्तांचे भूतप्रेतबाधे पासून रक्षण केले जाते. देवीची आराधना केल्यास निर्भय होऊन वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद मिळते.चंद्रघंटा देवीचे प्रसिद्ध मंदिर प्रयागराज, उत्तर प्रदेश इथे आहे.
तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, मला कमेंट मधून सांगा.उद्या कुष्मांडा देवीची माहिती आपण करून घेणार आहोत. तर नक्की या.
शेवटी सांगते की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, सुख – समृध्दी, शांती, विश्र्वकल्याण यासाठी चंद्रघंटा
देवीला साष्टांग नमस्कार. व तिचा वरद हस्त कायम आमच्या पाठीशी असू दे .
लेखिका – सौ.वृषाली विश्वनाथ पोंदे.
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण लेख
अभ्यासपूर्ण लेखन अभिनंदनीय आहे.