कुष्मांडा देवी संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now

५.कुष्मांडा

“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके |

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते|| “

आपले सर्व भारतीय सण हे निसर्गाशी जवळीक साधणारे आणि ऋतुबदलाची जाणीव करून देणारे आहेत.आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. आदिमाया,आदिशक्ती असलेल्या देवीने दुष्टांचा समूळ नाश केला.राक्षसाचा संहार करणारी महिषासुरमर्दिनी नऊ दिवस,नऊ रात्री विविध रुपात लढली, त्याच रुपांची  विधिवत पूजा नवरात्रात मनोभावे केली जाते.आदिशक्तीचे हे नवरात्र ‘विजयोत्सव’ म्हणून संपूर्ण भारतात साजरे होते. 

आज नवदुर्गांपैकी देवीच्या चौथ्या माळेला केल्या जाणाऱ्या ‘कुष्मांडा देवीची’ पूजा, नैवेद्य,देवीचा मंत्र,देवीची कथा या विषयीची माहिती या मी लेखात सांगणार आहे.

चला तर जाणून घेऊया ‘कुष्मांडा देवीची माहिती..

कुष्मांडा देवीचा मंत्र – 

“ॐ कुष्मांडा देव्यै नमः”

या देवी सर्वभू‍तेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

कुष्मांड शब्दाचा अर्थ – कुष्मांडा शब्द तीन शब्दांच्या संयोगाने तयार होतो. कु म्हणजे “थोडे”, उष्मा म्हणजे “ऊर्जा” आणि अण्ड-ब्रम्हांड या दोन शब्दांची संधी होऊन तयार झाला तो शब्द कुष्मांडा.

संस्कृत भाषेमधे कुष्मांडचा कुम्हड़ किंवा काशीफल अर्थ आहे तर हिंदीत कोहड़ा आणि मराठी भाषेत लाल भोपळा असा अर्थ आहे. 

या देवीस काय अर्पण करावे ?

कुष्मांड म्हणजे कोहळा.ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या या देवीमध्ये कोहळ्या प्रमाणे संपूर्ण विश्व सामावले आहे.म्हणूनच या देवीस कोहळा अत्यंत प्रिय असतो व तो यज्ञात अर्पण केला जातो.

कुष्मांडा देवीची पूजा व नैवेद्य – 

प्रत्येक उपासकाने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी.असे असले तरी या देवीला गडद निळा रंग विशेष प्रिय असतो.नैवेद्यात कोहळा उपलब्ध न झाल्यास पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही,साखर,पेठा,मालपुआ अर्पण करावा.यात मालपुव्याचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांची विघ्ने दूर होतात.

देवीचे वाहन आणि आयुधे –

तेजस्वी अष्टभुजा रूपातील ही देवी सिंहावर आरूढ आहे. तिच्या सात हातात असलेल्या आयुधांमधे कमळ,चक्र, कमंडलू, धनुष्य, बाण,गदा,पवित्र अमृताचे दोन पात्र ज्यात सुरा आणि रक्त आहे, आणि आठव्या हातात जपमाळ आहे. असे मानले जाते की या जपमाळेमधे सिद्धी आणि निधी देण्याची सर्व शक्ती  आहे. नेहमी अभयमुद्रेवर असलेला तिचा हात सर्व भक्तांना आशीर्वाद देत असतो.

देवीची उपासना महात्म्य –

 “सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेवच

दधाना हस्तपद्माभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु मे 

  या श्लोक पठणाने कुष्मांडा देवीची उपासना करतात.देवीच्या तेजःपुंज रुपाने

साधकाचे मन ‘अनाहत’ चक्रात स्थिर होते त्यामुळे उपासनेत साधकाचे मन चंचल नसावे.असे केल्यास मनुष्याला रोगांपासून मुक्ती मिळते व आयुष्य,यश,शक्ती  वृध्दींगत होते.

देवीची कथा –

कुष्मांडा,ही देवी पार्वतीचा अवतार असून तिला प्रकाश आणि उर्जेची देवी समजली जाते.सुर्यमंडलामध्ये या देवीचा निवास असल्याने तिचा वर्ण तप्त सूर्याप्रमाणे झळाळलेला दिसतो.तिचे तेज, कांती आणि प्रभा प्रकाशमान आहेत, ज्यामुळे दाही दिशा उजळून निघतात.विश्वाची सर्जनशील शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुष्मांडा देवीने आपल्या दैवी ईश्वरी हास्याने हे विश्व निर्माण केले.

सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला असताना ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्वही नव्हते त्यावेळी या देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून तिला ‘सृष्टीची आद्यशक्ती’ मानले जाते.

आपले जीवन प्रकाशमान करून सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण

कुष्मांडा देवीची भक्तीभावाने प्रार्थना करूया – 

आजच्या चौथ्या दिवशीची कुष्मांडा देवीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top