7.कात्यायनी देवी
या देवी सर्वभूतेषु !
मा कात्यायनी रुपेण संस्थिता !
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तसे नमो नमः !!
आपल्या धर्मात अवतार ही संकल्पना आहे.देवता पूर्ण किंवा अंश रूपाने पृथ्वीवर अवतरीत होतात.अधर्मावर धर्माचा विजय होतो आणि मानवी जीवन संपन्न व समृद्ध होते.
हे अवतार इथवर सिमित नसतात.विष्णूचे दशावतार असोत किंवा मग देवीचे नव अवतार असोत.त्यात एक खोल अर्थ दडलेला आहे.देवी ही स्त्रीत्वाचे प्रतिक आहे.या स्त्री चे विकसित होत जाणारे रूप म्हणजे देवीचा होणारा अवतार.शैलपुत्री या प्रथम अवतारा पासून नवरात्राची सुरुवात होते.या दिवशी कुमारिका पूजन होते.पुढे प्रत्येक अवतारा गणिक देवीचे स्वरूप बदलते.तिचे अधिक विकसित रूप समोर येते.कुमारिके पासून प्रोढावस्थे पर्यंत बदलत जाणारे तिचे रूप हे स्त्री च्या विकासाचे प्रतीक आहे.
आज या लेखात मी तुम्हाला नव दुर्गांपैकी देवी कात्यायनी या देवीच्या सहाव्या अवताराची माहिती करून देणार आहे..
देवी कात्यायनी ही योद्धा देवी मानली जाते. कणखर,तेजस्वी प्रगल्भ रूपातील देवी कात्यायनी अतिशय करूणामयी आहे.

देवी कथा व स्वरूप
महर्षी कात्यायन यांनी ब्रम्ह देवाची आराधना केली. आदिशक्ती ने पुत्री रूपाने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती ,म्हणून त्यांनी उग्र तपारंभ केला .
पृथ्वी वर त्यावेळी महिषासूर राक्षसाचा उत्पात वाढला होता.त्याचा नाश करण्यासाठी त्रीदेवांनी आपल्या तेजाचा अंश एकत्रित करून महर्षी कात्यायनांच्या आश्रमात देवी स्वरूप बनवले.
अशा रितीने कात्यायन ऋषींच्या आश्रमात अवतरीत,कात्यायन पुत्री कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली . सप्तमी,अष्टमी आणि नवमी पर्यंत महर्षीं कात्यायनांनी देवी पूजन केले , दशमीला देवीने महिषासूराचा वध केला व ती महिषासुरमर्दिनी झाली.
महिषासुरचा वध करणारी ही देवी आतप्रोत क्षात्रतेज दर्शवणारी आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच षष्ठीला हिची पूजा केली जाते.
देवी स्चरूप आणि मंत्र
कंचनाभा वराभयां पद्मधरां मुकुटोज्जवलां l
स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते ll
षष्ठी ला हा मंत्रजप करून देवीची आराधना केली जाते.या सिद्ध मंत्राच्या पठणाने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.
कांचन म्हणजेच सोन्यासारखी आभा असलेली अशी ही देवी कात्यायनी चतुर्भूज असून तिच्या एका हातात चंद्रहास म्हणजेच तलवार रूपी शस्त्र आहे तर दुसर्या हातात तिने पद्म धारण केले आहे.अभय प्रदान करणार्या तिच्या भुजे बरोबरच ती भक्तांना वरदान ही प्रदान करत आहे.
अशा पूर्ण तेजस्वी रूपातील देवी कात्यायनी ही भक्तांच्या कल्याणासाठी सज्ज आहे.
देवी पूजाविधी
कात्यायनी देवी पूजन हे गोरज मुहूर्तावर केले जाते.
देवीची पूजा करताना गंगाजल,नारळ,कलश,धूप,दीप व नैवेद्य अर्पण केला जातो.देवीला लाल रंग विशेष प्रिय असल्यामुळे लाल रंगाची फुले त्यातही कर्दळी ची फुले देवी पूजनासाठी वापरली जातात.
नैवेद्य म्हणून देवीला मध अत्यंत प्रिय आहे.त्यामुळे देवी पूजनात व नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश असतो.
देवीची उपासना कात्यायनी देवी ची उपासना सर्वश्रेष्ठ तर आहेच पण विशेष फलदायी सुद्धा आहे. कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी देवी अर्चना करतात.देवी भक्त संकट हरणार साठी देवी पूजन करतात.
मंडळी आपल्या सर्वांवर देवी कात्यायनी ची कृपा सदैव राहो .आपल्यालाही इच्छित वरदान प्राप्त होवो.
लेखिका -मैत्रेयी किशोर केळकर
Very nice informative write up.