महागौरी देवी माहिती

WhatsApp Group Join Now

9. महागौरी 

‘श्वेते वृषे समारूढा श्वेतांबरधरा शुची:

महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददः’ 

अर्थ : जी धष्टपुष्ट अशापांढऱ्याशुभ्र वृषभावर आरुढ झालेली आहे, जिने पवित्र अशी श्वेतवस्त्रे परिधान केलेली आहेत. जिने देवाधिदेव महादेवाला प्रसन्न करून घेतले आहे अशा या तेजस्वी महागौरीला माझा नमस्कार असो!! 

मंडळी सध्या घराघरात घटस्थापना झालेली आहे. सगळीकडे आदिशक्तीचे नवरात्र सुरू आहे.आपण या निमित्ताने देवीच्या आठही रूपांची स्तुती व पूजाअर्चना करतो.

चला तर मग आज देवीच्या आठव्या रूपाचा महिमा असलेल्या महागौरीचे वर्णन, पूजाविधी, मंत्र, कथा या विषयी सविस्तर माहिती आपण या भागात जाणून घेऊयात!!

आदिशक्तीचे आठवे रूप म्हणजे महागौरी!! महागौरीचे हे रूप शांतीचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. या स्वरूपातील देवीच्या उपासनेमुळे बुद्धिमत्ता तसेच अक्षय्य सुखशांती प्राप्त होते.

महागौरी स्वरूपाचे वर्णन :-

मार्कंडेय पुराणात देवी महात्म्यात नवरात्रीच्या नऊ रूपांचे वर्णन सांगितले आहे. त्यातील एक रूप म्हणजे महागौरी!! ‘अष्टवर्षे भवेद् गौरी’ म्हणजेच जिचे वयोमान आठ वर्षांचे आहे. ती चतुर्भुजा, कुमारीका आहे. ती शुभ्र अशा नंदीवर स्वार आहे. जिची कांती तेजस्वी शुभ्र, किंचित उबदार गुलाबीसर अशी आहे. जिच्या गौरवर्णाची तुलना शंख, चंद्र व कुंदकळ्या यांच्याबरोबर केली जाते. तिच्या एका हातात त्रिशूल असून दुसऱ्या हातात डमरू आहे. तिच्या एका हाताची अभयमुद्रा आहे. तर दुसऱ्या हाताने ती ‘वरदायिनी’ रुपात आहे. जिने श्वेतवस्त्र परिधान केले आहे. जिची आभूषणे देखील श्वेतवर्णी आहेत. अशी सुखदायी, वरदायिनी बुध्दीदात्री, जिचे मुखकमल अतिशय प्रसन्न आहे. अशी महागौरी माझ्यावर सदैव प्रसन्न राहो.

पूजाविधी :-

नवरात्रात पंचमी नंतर, महाअष्टमीच्या या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अष्टमीच्या दिवशी लवकर उठून, शुचिर्भूत होऊन, स्वच्छ श्वेत अथवा हलकी गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करून पंचोपचारे देवीची पूजा आरंभ करावी. प्रथम देवीच्या प्रतिमेला स्वच्छ जलाभिषेक करावा. देवीला शुभ्र वस्त्रे, शुभ्र-गुलाबी फुले, हळदकुंकू, धूप-दीप अर्पण करून यथाशक्ती पूजा करावी. पंचखाद्य, साखरफुटाणे, मिष्टान्न, फळे यांचा नैवेद्य दाखवावा. आठव्या दिवसाची आठवी माळ घालावी. नऊ दिवस देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत ठेवावा. यथाशक्ती नऊ दिवस अथवा पहिल्या दिवशी किंवा पंचमी, अष्टमीचा उपवास करावा. रोज सप्तशतीच्या पाठाचे मनोभावे वाचन करावे. अष्टमीच्या दिवशी देवीच्या आठव्या रूपाचे, पराक्रमाचे गुणगान करावे. तिच्याकडे बुध्दी, ऐश्वर्य, स्थिरता, सुखशांतीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे भक्तीभावाने नवरात्रीचे व्रत करावे. 

देवीच्या महागौरी रुपाची कथा :-

पुराणातील एका कथेनुसार देवीने आठव्या वर्षी महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. याचे प्रतीक म्हणून नवरात्रातील आठव्या दिवशी महागौरी स्वरूपातील देवीची विशेष पूजा केली जाते. शुंभ-निशुंभ राक्षसांचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूपात अवतार धारण करून या दैत्यांचा नाश केला. अष्टमीच्या दिवशी कुमारीका पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या या पावनपर्वात भारताच्या काही भागात या दिवशी कुमारिकांचे पूजन केले जाते. 

दुसरी कथा अशी सांगितली जाते की, देवीचे काली स्वरूपातील रूप पाहून महादेवांनी तिची थट्टा केली. ती सहन न झाल्यामुळे पार्वतीने घोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. ती वनात निघून गेली. कित्येक वर्षे झाली तरी ती परत आली नाही म्हणून भगवान शंकरांनी तिचा बराच शोध घेतला. इकडे पार्वती मातेची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिला प्रसन्न झाले. त्यांनी तिला कैलास पर्वतावरील सरोवरात स्नान करण्यास सांगितले. त्यानुसार पार्वती मातेने सरोवरात स्नान केल्यानंतर तिला चंद्रासम तेजस्वी कांती प्राप्त झाली. मोत्यांसमान झळाळी प्राप्त झाली.

आशा या महागौरीची मनोभावे पूजा करून 

 या देवी सर्वभूतेषु, गौरीरूपेण संस्थितः 

 नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः!! या मंत्राचा जप करावा.

माता आदिशक्तीची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना!! ही माहिती आपणास कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा.

धन्यवाद!!

4 thoughts on “महागौरी देवी माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top