भाऊबीज – भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचे प्रतीक
नात्यातला गोडवा, आपुलकी, विश्वास
भाऊ बहिणीचे नाते असतेच खास
निरांजनातल्या ज्योती बोलती आज
भाऊबीज म्हणजे संस्कृतीचा अनमोल साज
शारदीय नवरात्रीतला भक्ती आणि शक्तीचा उत्सव संपतो न संपतो तोवर येतो लखलख दिव्यांनी अंधाराला दूर करून चैतन्याची बरसात करणारा सणांचा राजा म्हणजेच दिवाळी सण. आठवडाभर चालणाऱ्या या दिवाळी सणात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा जपल्या जातात. या शृंखलेत सहाव्या दिवशी साजरी होते ती भाऊबीज. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या द्वितीयेस दरवर्षी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याला वृद्धिंगत करणारा, एकमेका प्रती असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा, नात्यातली वीण घट्ट करणारा आणि नात्याला विश्वासाचं बळ देणारा विशेष दिवस. रक्षाबंधनानंतर भावा बहिणीच्या नात्यास समर्पित असणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवसाची संपूर्ण माहिती जाणून घेणे आपणास निश्चितच आवडेल. आपणासाठी ही खास माहिती या व्हिडीओतून आम्ही घेऊन आलो आहोत.
इतिहास आणि आख्यायिका
प्राचीन आख्यायिकेनुसार या दिवशी मृत्यूचा देवता यम आपली बहीण यमी कडे गेला.. यमी न आपल्या लाडक्या भावाचे यथोचित स्वागत करून औक्षण करून गोडधोड जेवू घातलं.आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावरती यम देवाने प्रसन्न होऊन तिला वस्त्रे व अलंकार भेट म्हणून दिली. याशिवाय तिला वर मागण्यास सांगितले त्यावेळी ति म्हणाली “की दरवर्षी या दिवशी तू मला भेटायला अवश्य ये. शिवाय या दिवशी जी बहीण भावाचं औक्षण करेल त्या दोघांनाही तुझी भीती राहणार नाही.” यमराजाने तिला तसे वरदान दिले आणि या दिवसापासून भाऊबीजेची सुरुवात झाली असे म्हणतात.
शिवाय आणखीन एका कथेनुसार या एका दिवसासाठी नरकात थिजत पडलेल्या जीवांना यमाने मोकळीक दिली. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवसाला यमद्वितीया सुद्धा म्हटले जाते. यम आणि तिची बहीण यमी यांच्या बाबतची आणखीन एक कथा म्हणजे यमाचा मृत्यू झाला हा शोक अनावर होऊन यमीच्या डोळ्यातून अश्रूंची संततधार लागली तिचे दुःख काही केल्या कमी होईना त्यावेळी देवांनी दिवस संपला हे दाखवण्यासाठी रात्र केली आणि यमी चा शोक थांबला. या दिवशी यमुना नदीत अंघोळ करण्यास विशेष महत्त्व आहे. एका प्राचीन मान्यतेनुसार याच दिवशी श्रीकृष्ण नरकासुर राक्षसाचा वध करून द्वारिकेत परत आले. त्यावेळी त्यांची बहीण सुभद्रा हिने त्यांना विजय तिलक लावून औक्षण केले. व आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.तेव्हापासून भाऊबीज या सणास सुरुवात झाली असे म्हणतात.
पूजा मुहूर्त
यावर्षी २०२४ मध्ये दिनांक ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. या दिवशी ओवाळणीचा मुहूर्त दुपारी १:१७मि.सुरू होईल व दु. ३:३८ मिनिटांपर्यंत असेल.
पूजा विधि
या दिवशी भावाने बहिणीकडे जावे किंवा बहिणीस आपल्या घरी घेऊन यावे.बहिणीने नियोजित ठिकाणी सडा समार्जन करून रांगोळी घालावी. अक्षतांनी चौकोन तयार करावा व त्यावर छानसा पाठ मांडावा. नियोजित शुभ मुहूर्तावरती बहिणीने भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेस मुख येईल अशा पद्धतीने पाटावर बसवावे. भावाने आपल्या डोक्यावरती मानाची टोपी परिधान करावी.आरतीच्या ताटात निरांजन, हळद-कुंकू, अक्षता, चंदन, सुपारी, खाऊची पाने आणि फुलं सजवावीत. बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकवाचा तिलक लावावा. तिलाका वरती कांही अक्षदा लावाव्यात. त्याचबरोबर काही अक्षता त्याच्या डोक्यावरती खांद्यावरती टाकाव्यात.
त्यानंतर प्रसन्न मुखाने त्याला निरांजन ओवाळावे. गोड मिठाईने भावाचे तोंड गोड करावे. दोघांनीही एकमेका प्रति स्नेहाची व विश्वासाची भावना व्यक्त करावी. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने प्रार्थना करावी. भावानेही बहिणी करता आपल्या कुलाचार पद्धतीप्रमाणे वस्त्रे,अलंकार स्नेहाची भेट म्हणून द्यावीत व आयुष्यभरासाठी तिच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे वचन द्यावे. बहिणीने भावासाठी प्रेम भावाने स्वतःच्या हाताने सुग्रास जेवण तयार करावे. व भावास भोजनास बसवावे. या दिवशी बहिणीच्या हातचे बनवलेले भोजन केल्याने भावांना दीर्घायुष्य मिळते अशी श्रद्धा आहे. भावांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी काही बहिणी उपवास सुद्धा करतात. ज्यांना भाऊ नसेल त्यांनी चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळण्याची पद्धत आहे.
भारतातील सर्वच राज्यात भाऊबीज मोठ्या आनंदात साजरी केली जाते. या सणास हिंदीमध्ये ‘भाईदूज’ म्हटले जाते. भाऊ बहिणीच्या नात्यास उजाळा देऊन एकमेकाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याचा मंगलमय दिवस म्हणून भाऊबीज सर्वच भाऊ-बहिणींच्या आवडीचा आणि निवडीचा सण आहे.
ही माहिती आपणास कशी वाटली आपण कमेंट द्वारे जरूर कळवावे आपणा सर्वांना भाऊबीज व दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखक -सदानंद पाटील