दिवाळीतील घर सजावट आणि आकाशकंदील तयार करण्याचे उपाय

WhatsApp Group Join Now

दिवाळीतील घर सजावट आणि आकाशकंदील तयार करण्याचे उपाय

      सण कोणाला आवडत नाहीत?. . . खरंतर सण प्रत्येकालाच आवडत असतात. सण साजरे करण्यामागची मानसिकता आणि भावना ही, माणसाच्या आत असलेली उत्कट आनंदाची भावना व्यक्त करणे ही असते. जगाच्या पाठीवर, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे सण हे साजरे होत असतात. पण प्रत्येक सण हा आनंदाचा एक मुक्त अविष्कार असतो, हे लक्षात घेणे, खूप महत्त्वाचे. भारत वर्षामध्ये, संपूर्ण वर्षात प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण येतात. . . . आणि या सणांचा राजा ज्याला म्हणता येईल तो म्हणजे दिवाळी. 

    नवरात्रीचे नऊ दिवस नवदीप जागृत ठेवून दशमुखी रावणाला हरवून दशहरा साजरा होतो. मग वेध लागतात ते दिव्यांच्या सणाची . . . दिवाळीची. 

   मानवी जीवनाची वाटचाल ही अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशातून तेजप्रकाशाकडे अशीच सुरू असते. या तेज प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवाळीत लावले जाणारे हे दिवे. जे आपल्या आतील निरंतर जागृत असलेल्या आत्मदिव्याची प्रतीक म्हणून आपण बाहेर लावत असतो. 

       चौदा वर्षे वनवास, रावणाबरोबर युद्ध आणि सीतामाताची सुरक्षित सुटका यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येकडे परतत असताना प्रत्येक गावामध्ये दिवे, पताका लावून आनंद व्यक्त केला गेला. आपल्या जीवनामध्ये सुध्दा रामराज्य यावे, आपल्या कुटुंबामध्ये सुध्दा रामराज्य यावे यासाठी या दिव्या पताकांचा आकाश कंदील यांचा उपयोग आपण करतो.

आजच्या लेखात दिवाळीत सजावट कशी केली जाते आणि आकाश दिवे कशा प्रकारचे बनवू शकता याची माहिती आपण घेऊ.

स्वच्छता आणि घर सजावट

  दिवाळीची सुरुवात स्वच्छतेंने सुरू होते. सर्व जुन्या, न वापरणाऱ्या वस्तूंना बाहेर टाकून नव्या वस्तूंना जागा करून दिली जाते.

    याबरोबरच घराची रंगरंगोटी, वस्तूंची व्यवस्थित मांडणी यामुळे घराची सुंदरता आणखी खुलून दिसते. 

      यामुळेच लक्ष्मी पूजेच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. ही झाडू स्वच्छतेचे साधन म्हणून प्रतीकात्मकरित्या वापरतात. जसं घरातील कचऱ्याची स्वच्छता झाडूने होते, तसे दिवाळीतल्या आनंदी भावना, उच्च प्रार्थना यातून शरीररुपी घरातील, मनात साचलेला कचरा हाही बाहेर काढता येतो, हाच संदेश या झाडू पूजेतून आणि सजावटीमधून मिळतो. 

सजावटीमध्ये रांगोळी 

     दिवाळी आणि रांगोळी यांचे एक अनन्यसाधारण नातं आहे. दररोजच्या वेगवेगळ्या दिवसाच्या निमित्तानुसार वेगवेगळ्या रांगोळ्या अंगणात काढणं हा दिवाळीतला एक मोठाच कार्यक्रम असतो. भल्या पहाटे उठून अंगणात सडा मारून, सुंदर अशा रांगोळ्या . . .मग त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या असतील किंवा मुक्तहस्तानी काढलेल्या रांगोळ्या असतील किंवा संस्कार भारतीच्या रांगोळ्या असतील. अंगणातील आणि मनाची प्रसन्नता वाढवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. यामुळे अंगणातूनच येणारा जाणारा, प्रत्येकजण प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता असतो. रांगोळी साठी एक खास व्हिडीओ तुमच्यासाठी बनवला च आहे. तो ही नक्की पाहून घ्या.

आकाश कंदील बनवणे 

    आकाश कंदील बनवणे आणि लावणे, हा सुद्धा दिवाळीमधला एक महत्त्वाचा इव्हेंटच असतो.  आजच्या काळात आकाशकंदीला बरोबरच वेगवेगळ्या रंगांच्या दिव्याची माळ, त्यांची सजावट हे सुद्धा घर, अंगण आणि परिसर खुलवून टाकतं. आकाश कंदील बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे पारंपरिक पद्धतीमध्ये दोरा, कार्डशिटचा कागद, चिरमुरे कागद, सुतळी काथ्या इत्यादींचा उपयोग केला जातो. आज नवीन तंत्रामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक याचाही वापर आकाश कंदील बनवण्यासाठी केला जातो. आकाशकंदील बनवण्यासाठी वेगवेगळे कागद, कागद प्रकार, प्लास्टिक यांचाही वापर केला जातो. बऱ्याच शाळांमधून विद्यार्थ्यांना कार्यानुभव अंतर्गत अशा आकाश कंदील बनवण्यासाठी ट्रेनिंग ही दिले जाते आणि विद्यार्थी मुले हे बनवून आपल्या घरामध्ये त्याचा उपयोग करतात. 

दरवर्षी काही नवीन प्रकार आकाशकंदीलात पहावयास मिळतात. हंडी कंदील, पार्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रसिसाद असतो. या वर्षी बाजारात आलेले आकाश कंदिलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकार जाणून घेऊ या-

नवे प्रकारे कोणते?

हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, झगमगते आकाशकंदील.

 अगदी साद्या पतंगाच्या कागदापासून तसेच जिलेटिन कागदाच्या पारंपारिक कलाकृतीही आकाशदिव्यांत साजून दिसतात. दीपावली हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीला घेऊन. या सणात निरनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात, घराबाहेर, सज्ज्यावर लावल्या जाणाऱ्या पणत्या, दिव्यांच्या माळा यामुळे प्रत्येक घर प्रकाशात न्हाऊन निघते. कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणाऱ्या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील पाहणेही आनंददायी असते. संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाशदिवेच दिवाळीच्या प्रसन्न, आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात.

     अशा पद्धतीने दिवाळीमध्ये केली जाणारी सजावट आणि आकाश कंदील यातून घराची आणि मनाची प्रसन्नता वाढवणं आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणं सहज शक्य होत जातं. आपणास सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top