देव दिवाळी कधी आहे ? त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा

WhatsApp Group Join Now

नुकतीच दिवाळी संपली परंतु अजूनही देव दिवाळी बाकी आहे . देव दिवाळी म्हणजेच देवांची दिवाळी. हा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो.प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावास्या तिथी येत असतात. हिंदूंच्या दिनदर्शिकेनुसार, पौर्णिमा शुक्ल पक्षात येते. साधारणपणे दिवाळीच्या पंधरा दिवसांनी ही मंगलमय पौर्णिमा येते. या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. 

कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणारी मानली जाते. या पौर्णिमेला “त्रिपुरारी पौर्णिमा” किंवा “त्रिपुरी पौर्णिमा” असे म्हटले जाते. या दिवशी प्रदोष काळात घरोघरी दिवे लावले जातात. दारासमोर तसेच, मंदिरांमध्येही दिवे लावले जातात. रांगोळ्या काढल्या जातात. रोषणाई आणि दिव्यांची आरास केली जाते. त्यामुळे, या दिवसाला “देव दिवाळी” किंवा “देव दीपावली” असे म्हटले जाते. 

मुहूर्त –

या वर्षीची ( २०२४ ) कार्तिक म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा ही शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होणार आहे. तसेच, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांनी ( १५ नोव्हेंबरची उत्तर रात्र ) संपणार आहे. शुभ वेळेनुसार ही पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. देव दिवाळीचा शुभ मुहूर्त देखील याच दिवशी असणार आहे. 

देव दिवाळीचा प्रदोष काळ मुहूर्त १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांपासून ते ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. या पूजेचा एकुण मुहूर्त काळ २ तास ३७ मिनिटे इतका असेल. 

कथा –

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दोन पौराणिक कथा आहेत. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थ स्थळी मोठी तपश्चर्या केली होती. त्यामुळे, त्याच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले होते. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले. “देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री, रोग यांच्यापासून मला मृत्यू नको येऊदे. त्यांच्यापासून अभय मिळूदे.” असा त्याने वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर तथास्तु म्हटलं. पण, या वरामुळे त्रिपुरासुर खूपच माजला. त्याने सगळीकडे हैदोस माजवायला सुरुवात केली. त्याची आकाश संचारी तीन पुरे होती. त्रिपुर राक्षस त्या पुरात बसून त्रैलोक्याला खूपच त्रास देऊ लागला. 

त्याच्या वाढत चाललेल्या त्रासाला सगळे देव वैतागून गेले. सगळ्यांना भीती वाटायला लागली. मग, एके दिवशी सगळे देव मिळून भगवान शंकर यांच्याकडे गेले. त्यांना शरण गेले. त्रिपुर राक्षसाच्या या वागण्याने महादेव क्रोधित झाले. महादेवांनी त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून टाकली. त्यानंतर त्रीपुरासुराला मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोष काळी घडली होती. म्हणूनच प्रदोषकाळी असलेल्या कार्तिक पौर्णिमेला “त्रिपुरारी पौर्णिमा” किंवा “त्रिपुरी पौर्णिमा” असं म्हटलं जातं. 

दुसऱ्या एका कथेप्रमाणे  तारकासुर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते. मयासुराने तीन पुरे बनवून या तिन्ही पुत्रांना दिली होती. सोबतच त्यांना बजावून देखील ठेवले होते की, ‘चुकूनही देवांच्या वाटेला जावू नका. त्यांचा अनादर करू नका.’

पण, तरीही या तिन्ही पुत्रांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. कालांतराने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. ते देवांना त्रास देऊ लागले. हळूहळू या त्रासाने उच्छाद मांडला. मग, त्रासून गेलेले सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. 

त्यानंतर, क्रोधित झालेल्या महादेवांनी या तिन्ही पुत्रांजवळ युद्ध केलं. त्यांची पुरे नष्ट केली. या युद्धात तिन्ही राक्षसांचा अंत झाला.

त्यामुळे, या दिवसापासून लोकं कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव करतात आणि त्रिपुरासुर संहाराचा आनंद साजरा करतात. 

पूजा – 

या दिवशी रात्री घरामध्ये, घराच्या बाहेर, मंदिरात दिवे लावले जातात. दीप दान सुद्धा केलं जातं. गंगा नदी मध्ये स्नान केली जाते.कार्तिक म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला ‘हरिहर भेट’ होते. म्हणजे विष्णू आणि शंकर यांची भेट होते, असं मानलं जातं. दोन पवित्र तत्वांची भेट होते. त्यामुळे, या दिवशी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. दिवे लावले जातात. फटाक्यांची आतिषबाजी करून हा दिवस साजरा करण्यात येतो.

देशातील काही भागांमध्ये, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचे पुत्र  कार्तिकेयची पूजा केली जाते. 

या पवित्र दिवशी वाराणसी येथील गंगा नदीच्या घाटावर सगळे भाविक एकत्र येतात. पहाटेला “कार्तिक स्नान” केली जाते. हजारोंच्या संख्येने मातीचे दिवे लावून रोषणाई करतात. हा क्षण डोळे दिपवणारा ठरतो. पुण्य मिळवण्यासाठी गंगा नदीमध्ये स्नान केली जाते. गंगेच्या पवित्र पाण्याने पाप धुतले जाते, असे मानण्यात येते.  नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित स्नान करावे, असे सांगितले जाते. यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा आवर्जुन ऐकावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी. तसेच दीपदान करावे, असे सांगितले जाते. या दिवशी महादेवांची अगदी मनापासून आराधना केली जाते. ज्यामुळे, त्यांचा वरदहस्त भक्तांवर कायमच राहतो. तसेच, इच्छित फळ मिळते. शिवाय, भूतकाळात घडलेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी देव दिवाळीचा सण फारच महत्त्वाची भूमिका बजावतो.

याच दिवशी भगवान विष्णूंनी ऋषी-मुनींचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार धारण केला होता. हा दिवस शीख धर्मासाठी देखील विशेष असा आहे. ज्या दिवशी गुरूनानक जयंती साजरी करण्यात येते. 

आज तुम्हाला  देव दिवाळीच्या सणाची धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर सांगा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top