आवळी भोजन: विस्मरणात चाललेली महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा आणि तिचे वैज्ञानिक महत्त्व

WhatsApp Group Join Now

आवळी भोजन: विस्मरणात चाललेली महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा आणि तिचे वैज्ञानिक महत्त्व

आवळी भोजन: विस्मरणात चाललेली महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा आणि तिचे वैज्ञानिक महत्त्व

भारतीय परंपरा, सण, व्रतवैकल्ये यांचे सृष्टीशी, निसर्गाशी अगदी घट्ट नाते आहे. जवळपास सर्वच सणांमधून हे प्रकर्षाने दिसून येते. प्राचीन भारतीय परंपरेनुसार अनेक औषधी वनस्पतीचा समावेश दैनंदिन देवपूजेत केला जातो. विविध देवतांना प्रिय असणाऱ्या दुर्वा, बेल, तुळस अशा अनेक वनौषधी आहेत. अनेक पुरातन मंदिरांमध्ये काही प्राचीन वृक्ष आहेत, जे अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जातात. आपल्या सर्वांच्या परिचयाचे उदाहरण द्यायचे झाले, तर आळंदी येथील ज्ञानोबा माऊलींच्या समाधी मंदिरातील प्राचीन अजान वृक्ष (सुवर्णपिंपळ) हे होय. भारतीय परंपरेनुसार आपण वड, पिंपळ अशा अनेक वृक्षांची पूजाही वेगवेगळ्या निमित्ताने करत असतो. कार्तिक महिन्यात केली जाणारी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि आवळी भोजन ही अशीच एक परंपरा! आता या सर्व परंपरा आपण जुनाट, कालबाह्य म्हणून टाकून दिल्या आहेत. पण खरे तर त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या परंपरा किती योग्य होत्या……नव्हे आहेत…… हे पटते. आपले ऋषीमुनी हे थोर वनस्पतीशास्त्रज्ञ होते याबद्दल मनात जराही शंका राहत नाही. 

आवळी भोजन म्हणजे काय? ते कसे करतात?

आजच्या बहुसंख्य तरुण पिढीला आवळी भोजन म्हणजे काय हे फारसे माहीत नाही. पण हा शब्द ऐकून प्रौढ आणि ज्येष्ठांच्या मनात मात्र नक्कीच त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणी जागृत झाल्या असतील. 

आवळ्याचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. एक डोंगरी आवळा आणि दुसरा रायआवळा. यापैकी डोंगरी आवळा हा औषधी मानला जातो. या आवळ्याच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू, खोडात श्री ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकरांचा वास असतो असे मानले जाते. 

कार्तिक शुद्ध नवमीला ‘आवळा नवमी’ साजरी केली जाते. या नवमीला कुष्मांडा नवमी तसेच अक्षय नवमी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाभोवतालचा परिसर स्वच्छ करून सडा सारवण केले जाते. तो परिसर रांगोळीने सुशोभित केला जातो. झाडाच्या चारही बाजूंना तुपाचे दिवे लावले जातात. झाडाची विधीवत पूजा करून गोडाचा नैवेद्य केला जातो. वटपौर्णिमेला जसा वडाच्या झाडाला धागा गुंडाळला जातो, तसाच या दिवशी आवळ्याच्या झाडाला धागा गुंडाळला जातो. त्यानंतर भगवान विष्णूंचे पूजन केले जाते.  आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळले जाते. खालील श्लोक म्हणून आवळ्याच्या वृक्षाची प्रार्थना केली जाते,

धात्रिदेवि नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि ।

नीरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा ।। 

अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाकडे ‘आपल्या पापांचा विनाश करण्याची,  आरोग्य प्राप्तीची आणि सर्वांच्या रक्षणाची’ प्रार्थना केली जाते.   

नंतर झाडाखाली स्वयंपाक करून सामुदायिक भोजन केले जाते. या सोहळ्याला आवळी भोजन असे म्हणतात. या वेळी स्त्रिया, मुले विविध खेळही खेळतात. असे हे आवळी भोजन पुढे दशमीपासून पौर्णिमेपर्यंत केले जाते. यानंतर आवळा खाण्यास सुरुवात केली जाते.  

आवळी भोजनाचे धार्मिक महत्त्व आणि कथा:

आवळा नवमीच्या दिवशी केलेले पुण्य आणि दान अक्षय असते असे मानले जाते. 

प्राचीन काळी लक्ष्मी मातेने पृथ्वीवर हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव यांची उपासना केली. विष्णूंना प्रिय असलेली तुळस आणि शंकरांना प्रिय असलेला बेल या दोन्हींचे औषधी गुणधर्म ज्याच्या ठायी एकवटलेले आहेत अश्या आवळ्याच्या झाडाखाली, स्वहस्ते स्वयंपाक रांधून, आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ त्यांना खाऊ घातले. हा दिवस होता कार्तिक शुद्ध नवमीचा! हे पहिले आवळी भोजन असे म्हणावे लागेल. तेव्हापासून आवळी भोजनाची परंपरा सुरु झाली. 

दुसऱ्या एका कथेनुसार कुष्ठरोगाने ग्रासलेली एका स्त्री गंगामातेला शरण गेली. गंगामातेने तिला कार्तिक शुद्ध नवमीला आवळी पूजन करुन आवळ्याचे सेवन करण्यास सांगितले. तिने तसे केल्यावर ती रोगमुक्त झाली, तसेच तिला पुत्रप्राप्तीही झाली. 

ब्रह्मदेवांनी निर्माण केलेला पहिला वृक्ष म्हणजे आवळा, असे पद्म पुराणात तसेच स्कंद पुराणात सांगितले आहे. 

आवळ्याच्या संदर्भात अशा अनेक कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये सांगितल्या आहेत.

देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी महान ऋषी च्यवन यांच्यासाठी आवळ्यापासून च्यवनप्राश तयार केले. त्याच्या सेवनाने त्यांना चिरयौवन प्राप्त झाले. कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी द्वापार युगाला सुरुवात झाली. 

भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांडक राक्षसाचा वध केला. 

या दिवशी आवळ्याच्या वृक्षाच्या सहवासात राहणे, त्याला प्रदक्षिणा घालणे, आवळ्याचे सेवन करणे, आवळ्याचे झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते. इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा या दिवशी केलेले दान अनेक पटींनी लाभदायक असते असे मानले जाते.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवळी भोजनाचे महत्त्व: 

भारतीय आयुर्वेदानुसार आवळा हे फळ अतिशय महत्त्वाचे आहे. संस्कृतमधे आमलकी या नावाने ओळखले जाणारे हे फळ आरोग्यदृष्ट्या फारच महत्त्वाचे आहे. आवळ्याच्या वृक्षाला ‘धात्रीवृक्ष’ असेही म्हटले जाते. ‘धात्री’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘धारण करणारा’. आपले धारण- पोषण करणारा असा हा वृक्ष आहे. 

याच्या नियमित वापराने अनेक फायदे होतात.

१. रोगप्रतिकारशक्ती तसेच पचनशक्ती वाढते. 

२. केसांची मुळे मजबूत होऊन केसांची वाढ होते. 

३. आवळा श्वसनविकारांवर गुणकारी आहे.

४. दृष्टी संबंधीच्या तक्रारींवर आवळ्याच्या सेवनाने लाभ होऊ शकतो. 

५. आवळ्याच्या सेवनाने अनिमिया दूर होऊ शकतो. 

६. आवळ्यातील अँटीऑक्सिडेंट्स मुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे, वृध्दत्वामुळे आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या या सर्व समस्या दूर होतात. 

७. आवळ्याचे नियमित सेवन करणाऱ्याला निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते.

८. च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्यापासून बनलेली औषधे बहुगुणी व आरोग्यदायी आहेत.

ही यादी खरंतर खूप वाढवता येईल. आवळ्यामधील या औषधी गुणधर्मांमुळेच आवळ्याला अमृतफळ असेही म्हणतात. 

कार्तिक महिन्यात आवळ्याचे झाड फळांनी बहरते. अश्या रसरशीत फळांनी लगडलेल्या वृक्षांच्या संनिध्यात रहाणेही आरोग्यदायी असते. म्हणूनच, आवळी भोजनाच्या निमित्ताने लोक या झाडाच्या सावलीत, परिसरात दिवस घालवतील, त्याच्या आंबट-तुरट फळांचा आस्वाद घेतील, लहान मुलांना त्याच्याबद्दल माहिती होऊन ते ज्ञान पुढील पिढीतही जाईल अश्या उदात्त हेतूनेच आवळी भोजनाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी आखली असावी. 

आवळी भोजनाचे इतर फायदे:

माझ्या मते आवळी भोजनाचे धार्मिक तसेच आयोग्यविषयक फायदे आहेतच, पण इतरही अनेक फायदे आहेत. 

  • कार्तिक महिन्यात कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम नुकताच संपलेला असतो. त्यामुळे तो थोडा निवांत झालेला असतो. हेमंत ऋतूस नुकताच प्रारंभ झाला असल्याने वातावरण आल्हाददायक असते. गुलाबी थंडीस सुरुवात झालेली असते अशा वेळी आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमवेत ‘पिकनिक’ करण्याची ही पूर्वापार पद्धत आहे. पण ही पिकनिक आपल्या विचारी पूर्वजांच्या कल्पनेतून निर्माण झाली असल्याने त्यात पिकनिकचा स्वार्थ आणि आरोग्य व धार्मिकतेचा परमार्थ पण दडला आहे. पिकनिकच्या नावाखाली धांगडधिंगा घालणे, आरोग्याला हानिकारक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे असे (आजच्यासारखे) याचे स्वरूप नाही. 
  • आवळी भोजनाला अनेकदा शेजारी-पाजारी एकत्र मिळून जातात. यामुळे समाजातील एकोपा, बंधूभाव वाढण्यास तसेच नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. ‘सामाजिक सलोखा’, ‘शांती’ असे शब्दांचे बुडबुडे निर्माण करण्यापेक्षा हे ‘कृतिशील’ सामाजिक उपक्रम निश्चितच जास्त सकारात्मक परिणाम करणारे असतात. कधी कधी  स्त्रिया आपापल्या घरून वेगवेगळे पदार्थ करून आणतात. मग त्या वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांची झकास अंगत पंगत होते. जेवणाच्या पदार्थांमध्येही आवळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा विशेषत्वाने समावेश असतो. 
  • आवळी भोजनाच्या मुळे लोकांमध्ये सर्वच झाडांबद्दल प्रेम, जागृती निर्माण होण्यास मदत होते. 

या प्राचीन परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. आजकाल आपण अनेक वेळा पिकनिक्स, गेटटुगेदर्स करत असतो. मग एक पिकनिक आवळी भोजनासाठी होऊन जाऊ देत…..काय? हो, पण ही पिकनिक पारंपरिक पद्धतीने करायची आहे बरं का. बहुमूल्य अशा आवळ्याच्या झाडाचे वृक्षारोपण, जतन, संवर्धन करून आपण या प्राचीन परंपरेला आधुनिक ‘टच’ सुद्धा देऊ शकतो. या वर्षी कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे आवळा नवमी १० नोव्हेंबर २०२४ रोजी असून कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी आहे. या कालावधीत आपण आवळी भोजन करू शकतो. 

तुमच्यापैकी किती जण आवळी भोजन करता? त्या दिवशी तुम्ही काय काय करता? तुमच्या लहानपणी तुम्ही कश्या प्रकारे आवळी भोजन करत होता? हे सर्व कमेंटमधे लिहून पाठवा. 

तुम्हाला आवळी भोजनाची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top