पारंपारिक तांब्या पितळेची भांडी व त्यांचे औषधी गुणधर्म 

WhatsApp Group Join Now

  पारंपारिक तांब्या पितळेची भांडी व त्यांचे औषधी गुणधर्म 

        सर्वसाधारणपणे आपल्या रोजच्या वापरात आपण जी भांडी वापरतो ती वेगवेगळ्या धातूंची असतात. यामध्ये ॲल्युमिनियम, स्टील, पितळ, तांबे, कास्य आणि मातीची भांडी अशी विविध प्रकारची भांडी आपण सध्या वापरतो. पण पूर्वी फक्त मातीची, त्याचबरोबर पितळेची व तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जायची. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये ही भांडी हमखास बघण्यास मिळायचीत. याला कारण ही तसेच होते. पितळेची व तांब्याची भांडी आरोग्यदायी असतात, फक्त ती योग्य प्रकारे वापरणे गरजेचे असते.

तांब्या पितळेची भांडी कशी तयार होतात :

        तांब्या-पितळेची भांडी तयार करणाऱ्या कामास पारंपारिक रित्या तांबट काम असे म्हटले जाते. ही भांडी जो तयार करतो त्याला तांबट असे म्हटले जाते. हा तांबट सगळ्यात पहिले तांब्याचा किंवा पितळेचा पत्रा घेऊन त्याच्यावर भांड्यांच्या आकाराचे वर्तुळ काढतो. नंतर ते वर्तुळ कात्रीने कापून घेऊन मग ते दगडी खोलगट ऐरणीवर ठेवून हातोड्याने ठोकतो. त्यामुळे त्या पत्र्याला खोलगट आकार येऊ लागतो. त्याला हवा तसा आकार येईपर्यंत हे काम चालूच असायचे. यानंतर त्यावर पुन्हा वेगवेगळ्या आकारांच्या आणि वजनाच्या हातोडीने तीन ते चार वेळा ठोके दिले जातात. प्रत्येक भांड्याचा खालचा भाग व वरचा भाग असे वेगवेगळे भाग तयार केले जातात. यानंतर हे दोन्ही तयार केलेले भाग पितळ, टाकणखार व नवसागर यांच्या उपयोगाने डाख काम करून एकमेकास जोडून त्यामधून एक सारखे भांडे तयार करण्यात येत असे. हे भांडे तयार झाल्यावर तांबट कोळशाची पूड किंवा चिंच यांनी घासून ते भांडे चकचकीत करायचा व शेवटी हातोडीने पुन्हा त्यावर ठोके मारून ते चमकदार बनवीत असे. याचबरोबर जे लांब गळ्याचे मोठे भांडे असते ते मात्र तीन भागांमध्ये तयार केले जाते. अशाप्रकारे तांबट ही तांब्या पितळेची भांडी तयार करतो.

तांब्या पितळेच्या भांड्यांचे प्रकार :

◆ दररोजच्या घरगुती वापरातील भांडी- तपेली, ओघराळे, पातेली, कावळा, पळी, डाव, वेळणी, कराळे, ताटल्या, ताट, वाट्या, कळशी, घागर, हंडा, फुलपात्र, सुरई, लोटा, पिंप, गंगाळ, बंब इत्यादी.

◆ प्रासंगिक उपयोगासाठी असणारी भांडी- पीक दाणी, गुलाबदाणी, अत्तरदाणी.

◆ देवपूजेसाठी लागणारी भांडी- ताम्हण, तांब्या, पंचपात्र, पळी, समई, धूपदानी, निरांजन, हळदी-कुंकवाचा करंडा, फुलांसाठी तबक, गंधाची तबकडी, पुष्पपात्र, अभिषेक पात्र इत्यादी.

◆ या भांड्यांसाठी प्रसिद्ध असणारी महाराष्ट्रातील ठिकाणे-                                 अहमदाबाद, पुणे, नाशिक, सांगली

भांड्यांना कलई करणे म्हणजे नेमके काय?

        तांबे व पितळ हे दोन्हीही धातू आम्ल व क्षारांशी प्रक्रिया करतात. ज्याच्यामुळे विषारी द्रव्य तयार होतात. हे होऊ नये म्हणून या दोन्हीही धातूंना आतील बाजूने कथिल या धातूचा पातळ थर दिला जातो. या प्रक्रियेस कलई करणे असे म्हणतात. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम ज्या भांड्यास कलई करावयाचे आहे ते भांडे छोट्या भट्टीवर गरम करून घेतले जाते. त्याच्यामध्ये नवसागर टाकून ते फडक्याने अगदी स्वच्छ पुसून घेतले जाते. यानंतर त्याच्यावर कथिलाची कांडी फिरवतात.कथिल या धातूचा मेल्टिंग पॉईंट अगदी लो असल्यामुळे तो लगेच वितळतो. हा वितळलेला थर भांड्याच्या आतील बाजूत व्यवस्थित पसरवला जातो आणि शेवटी याच्यावरून फडके फिरवले की त्या भांड्यात कथिलाचा पातळ थर पक्का बसतो. अशाप्रकारे कल्हई केलेल्या भांड्यामध्ये अन्न शिजवणे केव्हाही चांगले. यामधून कोणत्याही प्रकारची विषबाधा सुद्धा होत नाही.

पितळेच्या भांड्यांचे आरोग्यदायी फायदे :

        पितळ हा धातू अलीकडच्या काळात फारच कमी प्रमाणात वापरला जातो परंतु याचे फायदे खूप आहेत.

◆ या भांड्यांच्या उपयोगामुळे रक्तप्रवाहाचे सुरळीत नियमन होऊन तजेलदार त्वचा मिळते.

◆ स्वभावातील चिडचिडेपणा व चिंता कमी होते. 

◆ याचबरोबर हे पित्त शांत करते तसेच लठ्ठपणाही कमी करते. 

◆ आपली दृष्टी सुधारण्यास व आपल्या त्वचेची स्थिती सुधारण्यास या धातूचा उपयोग होतो.

◆ या भांड्यांमध्ये तुम्ही अन्न शिजवून खाणे अगदी उत्तम आहे, परंतु पितळेच्या भांड्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकत नाही. तसेच अन्न शिजवण्यापूर्वी देखील या भांड्यांना कलई करणे गरजेचे असते. 

◆ पितळेच्या भांड्यांमध्ये साठवलेल्या पाण्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते.

◆ यासोबतच पितळेच्या डब्यांमध्ये धान्य साठवणूक केल्याने त्यांचे गुणधर्म बदलत नाहीत. 

◆ इतर भांड्यांमध्ये अन्न बनवण्याच्या तुलनेत या भांड्यांमध्ये अन्नातील पौष्टिक घटक जास्त प्रमाणात टिकून राहतात.

तांब्याच्या भांड्यांचे आरोग्यदायी फायदे :

◆ तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी साठवून ठेवून ते पाणी सकाळी सकाळी पिल्याने त्याचे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी फायदे होतात आणि हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेले आहे.

◆ तांबे युक्त पदार्थामुळे आपल्या शरीरातील कॉलेजन वाढते आणि त्यामुळे आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. 

◆ तांबे हा धातू अग्नी व सूर्याशी निगडित आहे म्हणून तो आपल्या शरीरातील अग्नी वाढवण्यास मदत करतो आणि अप्रत्यक्षपणे तो आपल्या शरीरातील चयापचयाची गती देखील वाढवतो.

◆ त्याचबरोबर ते शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते व हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत देखील करते.

तांब्या व पितळेची भांडी वापरताना घ्यावयाची काळजी

◆ कलई करणे- ही भांडी अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वापरायची असतील तर ती कल्हई केल्याशिवाय वापरता येत नाही.

◆ अमलीय पदार्थ- अमलीय पदार्थ जसे की लिंबू, टोमॅटो हे पितळेशी प्रतिक्रिया करतात. त्यामुळे या भांड्यामध्ये या प्रकारचे अन्न शिजवताना काही शारीरिक समस्या होऊ शकतात. जसे की अपचन, उलट्या किंवा विषबाधा. त्यामुळे या भांड्यांमध्ये जेवण करताना अमलीय पदार्थ टाळावेत.

◆ लेपन (कोटिंग)- अलीकडच्या काळात तांब्या- पितळेच्या भांड्यांना टीन किंवा स्टेनलेस स्टीलचे कोटिंग केलेले असते. याच्यामुळे ही भांडी जास्त सुरक्षित होतात. अशा कोटिंग केलेल्या भांड्यांमध्ये अमलीय पदार्थ देखील अगदी सुरक्षितपणे शिजवले जाऊ शकतात.

◆ स्वच्छता- पितळेच्या भांड्यांची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे असते. स्वच्छता न राखल्यास अन्नामध्ये धातुयुक्त पदार्थ मिसळण्याची शक्यता असते.

        या काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर पितळेच्या व तांब्यांच्या भांड्यांचा आपल्या अन्नपदार्थ शिजवण्यासाठी व स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी उपयोग करणे अत्यंत फायद्याचे ठरते.

समाप्त…….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top