द्वितीय क्रमांक विजेती कथा –  संक्षारण-(संस्कृत)करोजीव-जाळून टाकणारा.

WhatsApp Group Join Now

‘दूरवर पसरलेल्या,धुक्यात विरत जाणाऱ्या पर्वतरांगा,त्यातून उसळणारा केशरी-लाल अग्निफुलं उधळत,वाफेचे भपकारे सोडणारा उग्र ज्वालामुखी. घशात चटके बसताहेत. कुणीतरी शांत करा रे तो ज्वालामुखी. नुसती आग आग होत्येSSे!’ आकाशच्या सुप्त मेंदूने मूक टाहो फोडला.अर्थात तो कोणालाच ऐकू येणार नव्हता.

आय.सी.यु च्या क्युबिकल चार चा मॉनिटर जोरजोरात अलार्म द्यायला लागला.डॉक्टर, नर्स सगळे मिनिटभरातच तिथे पोहोचले. सिरींजपंप वर मिडाझोलामचं बोलस डोसचं बटण दाबल्यावर हळूहळू ॲब्स्ट्रॅक्ट संगीता सारखा चालू असलेला कल्लोळ एका लईत पोहोचला. रुग्णाची नाडी-श्वास-रक्तदाब मुकाट्याने शिस्तबद्ध ताल धरून चालू लागले. “श्वास घ्यायला जमत नसताना व्हेंटिलेटरशी कुस्ती कशाला खेळतो हा पेशंटचा मेंदू?” ज्युनियर डॉक्टर सई बोलून गेली.

तिच्याकडे एक मंद स्मित फेकत मालविका मॅडम मेन डेस्कवर पोहोचल्या. “मीरा सिस्टर,आता ह्या आकाशचे व्हाईटल पॅरामीटर चांगले आहेत.हळूहळू व्हेंटिलेटर विन ऑफ करायला बघूया उद्यापासून.” सिस्टरना ऑर्डर सांगून मालविका मॅडम दुसऱ्या पेशंटचे रिपोर्ट वाचायला घेणार इतक्यात,पुन्हा अस्वस्थ अशी सई त्यांना म्हणाली, “का?ही तरुण मुलं-मुली अशी आयुष्य फेकून द्यायला बघतात शुल्लक कारणांनी? ॲसिड ही काय प्यायची गोष्ट आहे का? आगीच्या धगीने मेणबत्ती कशी बेढब होत वितळून जाते,तसं त्या आकाशची अन्ननलिका आणि श्वासनलिका वितळून एकत्र विचित्र आकार घेऊन बसलेत.

जागा होईल तेंव्हा कळेल त्या मूर्खाला आपण काय करून बसलोय ते. म्हणे प्रेमभंग!””शांत हो सई.गेल्या बावीस वर्षांच्या माझ्या वैद्यकीय सेवेत क्युबिकल चार कधीही रिकामा राहिला नाही.खास पाॅयझनिंगच्या केससाठी राखूनच ठेवावा लागला. यावरून समजून घे. कितीही समाज प्रबोधन केलं, जनजागृती वगैरे शब्द वापरले तरी माणसाचं मन,त्याच्या भावना फार चमत्कारिकपणे व्यक्त होतात कधी कधी.

आपलं काम आहे, आपल्या भावभावना बाजूला ठेवून रुग्णावर योग्य उपचार करायचे .कळल?” ह्या सगळ्या धावपळीला ब्रेक लागल्यावर अगोदर पासूनच त्या आय.सी.यूच्या अगम्य वातावरणात घाबरून अंग चोरून कोपऱ्यात उभे असलेले आकाशचे वडील मालविका मॅडमना दिसले. “या बाबा इकडे या.घाबरू नका.”त्यांनी हाकारलं.  “मॅडम,तुम्ही सगळे आत्ता आकाशकडेच काहून पळत गेला? बरा होईल ना तो नक्की?” ” बाबा’..

काशच्या जीवाला आता शभर टक्के धोका नाही. पण त्याच्या अन्ननलिकेला, श्वासनलिकेला इतकी इजा झाली आहे .ते सगळं कसं आणि किती महिन्यांमध्ये भरून येईल सांगता येणार नाही. तुम्हाला हवं तर त्याला आपण आता सरकारी दवाखान्यात हलवू शकतो. मला कल्पना आहे ह्या खाजगी इस्पितळाचा खर्च फार होईल तुम्हाला .दहा लाखांपेक्षाही जास्त सहजच.” “नाहीSनाही मॅडम,आम्ही तर त्याची आशाच सोडलेली. तुम्ही जीव वाचवला. त्याला इथून बाहेर सोतःच्या पायावर चालतच नेणार आता. खर्चाची काळजी करू नका. झाली सोय.” पुटपुटत बाबा वळून आय.सी.यू मधून बाहेर गेले. 

“कशी सोय केली म्हाताऱ्याने काय माहित मॅडम?”  “शेत गहाण ठेवून आलाय तो कालंच.”असं म्हणत सुरेश मामांनी दहाचा चहा मीरा सिस्टरांच्या पुढे ठेवला. त्याचं काय झालं मॅडम,काल सगळ्या स्टाफचा चहा देऊन बाहेर पडलो. दोन कप चहा उरला. असेल कोणीतरी रजेवर. पाहतो तो म्हातारा गुडघ्यात डोकं खूपसून मुटकुळं करून पडलेला. दया आली मला. म्हटलं’चहा घ्या बाबा’तर टकामका बघत बसले.

हल्ली कोण कोणाला फुकट काही देतो?घाबरले असतील. मी म्हटलं’मॅडमनी पाठवलाय’मग बरोब्बर घेतला. सगळी कहाणी सांगितली ह्या आकाशच्या आत्महत्येची. माणगावला भात शेती करतात. मोठ्या दोन मुलींची लग्न, ह्या आकाशचा डिप्लोमा,अवकाळी पाऊस, दुष्काळ सगळ्यातून तग धरलेली उपजाऊ जमीन गहाण ठेवली,सांगताना भरून आलं म्हातार्‍याला.”काळी आई गेली,काळी आई गेली”.

असंच म्हणत बसला पुन्हा पुन्हा. सुरेश मामांनीही नकळत डोळे टिपले. “त्या सोशल वर्कर आशा मॅडमना पाठवून दिलेत मी आकाशचे सगळे रिपोर्ट. बघू काही कमी होतंय का बिलात.”गप्पीष्ट हळव्या सुरेश मामांना सांत्वनापर पण रोखठोक प्रॅक्टिकल मीरा सिस्टर उत्तरल्या. सगळेजण आपापल्या कामाला लागले. 

“रंजू,अगं असं काय करतेस? आपल्यासाठी घरं बघत हिंडतोय मी आठवडाभर आणि तू म्हणतेस लग्न करू शकत नाही !”

“हे बघ आकाश, मी तुला शेवटचं सांगते.मी कधीच तुला लग्न करीन म्हटलं नव्हतं. चार सिनेमे एकत्र बघितले,चार सहा वेळा जेवलो म्हणजे प्रेम असं गृहीत कसं धरलंस तू?वी आर जस्ट फ्रेंड्स-गुड फ्रेंड्स कळलं?”

“मला माहित्ये तुझं लग्न ठरवलंय घरच्यांनी. मुंबईचा मुलगा आहे सत्तर हजार पगार, राहायला स्वतःचा फ्लॅट.बोलला मला पक्या. माझाच विश्वास बसला नाही तू तयार होशील म्हणून.”

“वेडा आहे का रे तू आकाश?वीस हजार पगारात लग्न करून भाड्याच्या घरात नेणार मला आणि काय हौसमौज म्हातारपणी करू मी?गावाकडची शोध ना एखादी.खुश होईल ती पुण्यात राहायचं एवढ्यावर.माझा पिच्छा सोड यार.”

“रंजू माझं ऐक.मी मरून जाईन तुझ्याशिवाय.रंजू,मागे फिर.इकडे बघ”

.पुन्हा व्हेंटिलेटर वर अलार्म वाजायला लागले. पुन्हा एकदा तेच उपाय. आकाशच्या त्या स्मृती जसजश्या त्याला निद्रिस्त आणि जागृत अवस्थेतल्या सीमेवर धडका मारू लागत त्या स्ट्रेसफुल मेमरीजमुळे त्याचे नाडी-श्वास उत्तेजित होऊन जात.मग त्याला झोपेच्या औषधांचा अतिरिक्त डोस द्यावा लागे. हे सगळं सुरळीत व्हायला वेळ तर जाणारच होता ना?

माणगावच्या शाळेत कायम पहिला येणारा आकाश गुणवत्ता यादीत झळकला. आई बापाला आकाश ठेंगण झालं. काका मामांनी ही मदत करून त्याला पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं. घराण्याचं नाव उज्वल करायला निघाला होता ना आकाश! फर्स्ट क्लास मध्ये डिप्लोमा होऊन आकाशला नोकरी सुद्धा लागली. रोजच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच रंजनाच्या वडिलांचं वाणसामानाचं दुकान होतं. कधी दुधाची पिशवी,कधी मॅगी असली फुटकळ खरेदी करता करता रंजनाने तिच्या चंचल स्वभावाला अनुसरून आकाशशी मैत्री केली. तिच्यासाठी ह्या सगळ्या शुल्लक गोष्टी होत्या. शाळेपासून तिचे दोन चार बॉयफ्रेंड होऊन गेले होते. आकाशचं मात्र तसं नव्हतं. तो रंजनाकडे भावी पत्नी म्हणूनच बघू लागला होता. लग्नाआधी असली नसती थेर करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. गावाकडचा साधा सरळ मार्गी मुलगा होता तो.

रंजना आपल्याबरोबर बाहेर फिरायला येते म्हणजे तिला आपण आवडतो हे त्यानं गृहीतच धरलं. मनानी तो खोल खोल गुंतत गेला,अगदी बाहेर पडता नं येण्या इतपत. हळव्या स्वभावाच्या आकाशला रंजना पाठ फिरवून निघून गेलेली सहन झालं नाही. तिरिमिरीत खोलीवर परतलेला आकाश अस्वस्थ असा दिवसभर पलंगावर पडून राहिला. रंजनाचे शब्द परत परत त्याच्या मनावर असुडाचे फटके मारत राहिले.’आता जगण्यातच काही अर्थ उरला नाही’ह्या निर्णयापर्यंत तो येऊन पोहोचला.

आपसूकच त्याच्या हाती बाथरूम स्वच्छ करण्याची ॲसिडची बाटली लागली. पुढचा मागचा विचार न करता त्यानं ती तोंडाला लावली. हाताळणाऱ्याची मानसिकता त्या ॲसिडला काय कळणार? त्यांनं त्याचं जाळून टाकण्याचं काम पार पाडलं. फक्त नेहमीसारखी घाण साफ न होता आकाशचा घसा पार वितळून सोलवटून गेला. त्याला नाकातून थेट जठरापर्यंत पोहोचणारी नळी घालावी लागली. काही महिने वा वर्षेसुद्धा आता ही नळीच त्याच्या अन्ननलिकेचं काम करणार होती.

अर्ध्यामुरध्या वाचलेल्या श्वासनलिकेमध्ये ट्राचीयोस्टोमीची नळी म्हणजे तात्पुरती श्वासाला नळी बसवावी लागली.या सगळ्यांनी जीव वाचला,पण आकाशचं स्वरयंत्र पार पुसून गेलं. नष्ट झालं. ते आता परत कधीच पूर्ववत होणार नव्हतं. घशातल्या भोकावर बोट ठेवून दाब कमी जास्त करत त्याला मेटालिक अनुनासिक शब्द बोलता येऊ शकणार होते. कष्टाचा पैसा पाण्यासारखा खर्च होत होता.आई बापाची जमीन-दागिने आधी गहाण पडले,मग विकले गेले.

रंजना एकदा जी पाठ फिरवून चालती झाली,ती मुंबईत मजेत जगत राहिली. आकाश नावाचा मुलगा तिच्या खिजगणतीतही नव्हता. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अचानकच मध्ये मध्ये आकाश गदगदून रडू लागे. “काय रे बाळा? दुखतं का रे?कसं असं होऊन बसलं बा!विठुराया काळजी घे रे लेकराची.” त्याची आजी त्याच्या पाठीवर हात फिरवत बोले. कधी आई जवळ असे ती सुद्धा डोळ्याला पदर लावत मूकपणे आकाश बरोबर रडू लागे. दोघांचेही शब्द घशातून फुटत नसत.

वडील दिवस-रात्र देशमुखांच्या शेतावर रोजंदारीवर काम करत. आई सकाळी पहाटे परसबागेतल्या भाज्या बाजारात विकून येई. त्या दोघांचे अविरत कष्टणारे देह आकाशला बघवत नसत. स्वाभिमानी अशा शेतीच्या मालकाचा आपल्यामुळे रोजंदारी मजूर होऊन बसला. जन्मापासून आपल्यासाठी प्रेमाने खस्ता खाणाऱ्या आई-बाबांचा क्षणभरही विचार न करता आपण मूर्खासारखं खोट्या प्रेमाच्या दुःखात काय करून बसलो,हे जाणून “मला माफ करा.माझी अत्यंत मोठी घोडचूक झाली.मी माणूस ओळखायला कमी पडलो.'”

इतकं सगळं आकाशला बोलायचं असे,पण गदगदून रडताना त्याच्या गळ्यातून विचित्र शिट्टी सारखे फक्त आवाजंच बाहेर पडत. त्याचे पाझरणारे अश्रूच ॲसिड बनून त्याच्या पश्चात्तापाने दग्ध हृदयाला नव्याने रोज जाळून टाकत. मनातला ज्वालामुखी जिवंत होत उसळी मारतच राही.

लेखिका – डाॅ.मोनाली हर्षे.कोथरूड,पुणे

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. कोणत्याही परवानगी शिवाय कथा वापरू नये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top